जगातलं पहिलं चित्र (भाग २) 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 24 मे 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...
 

... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या हातात मेणबत्ती होती. ती विझू नये म्हणून सगळ्यांचे जिवापाड प्रयत्न चालू होते. (आठवा, ते वर्ष होतं १९४०. त्यावेळी काही आजच्यासारखे फ्लॅश लाइट्‌स सगळीकडं उपलब्ध नव्हते. मुलांकडं तर असलं काही असण्याची शक्‍यताच नव्हती.) रॉब शेपूट हलवत मागं होताच. त्याची कुई कुई चालू होती.. कुठं घेऊन आलेत आपल्याला? त्याला सगळ्यांच्या पुढं असावं असं वाटत होतं. तो त्यांचा रक्षणकर्ताच होता ना! आपल्या चौकडीचं मात्र सगळं लक्ष भुयार कधी संपतंय आणि तिथं काय सापडतंय याकडं होतं. सरपटत चालून ते कंटाळले होते. जवळपास पन्नास फूट सरपटी चालल्यावर त्यांना मान उंच करायला जागा मिळाली.. आणि तिथं काय दिसलं!.. 

कोणत्याही सोन्यारुप्यानं भरलेल्या खजिन्याहून आगळंवेगळं दृश्‍य होतं ते. ती एक विस्तीर्ण गुंफा होती. आणि गुंफेच्या भिंतींवर अनेक भली मोठी चित्रं होती. आजवर कधी न पाहिलेली चित्रं. मेणबत्तीच्या प्रकाशात आपल्या चमूला फार काही दिसत नव्हतं. पण ते ती चित्रं बघून दडपूनच गेले. कोणी काढली होती ती चित्रं? आणि कधीपासून या गुहेत तशी होती? त्या चित्रांमध्ये माणसं फारशी नव्हती. प्राणी होते.. वेगवेगळे प्राणी, घोड्यासारखे, हरिण, लांडग्यासारखे प्राणी.. आताच्या प्राण्यांसारखे दिसणारे प्राणी पण ते नव्हते... वेगळेच. मुलं तो अद्‌भुत नजारा बघतच राहिली. तेवढ्यात एक गंमत झाली. मार्सेल एकदम ‘आईऽऽ गं’ करून ओरडला. त्याच्या हातावर मेणबत्तीचं शेवटचं मेण पडलं आणि मेणबत्ती विझली. मुलं एकदम घाबरली. अनोळखी जागा.. भिंतींवरची ती चित्रं आणि सभोवती काळोख. थंडी वाढू लागली. तशी मुलांनी घाईघाईनं काढता पाय घेतला. कुई कुई.. रॉब सांगत होता.. ‘घाबरू नका मित्रांनो, मी आहे ना..’ त्याला मोठी हुशारी वाटत होती. अंधारात त्याला या मुलांपेक्षा जास्त चांगलं दिसत होतं ना. कशीबशी मुलं भुयारातून बाहेर आली. तेव्हा बाहेरही अंधार झालेला होता. बाहेर आल्यावर सगळ्यांनाच हुश्‍श झालं. काहीतरी अद्‌भुत पाहिल्याचा आनंद आणि थरार सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. 

कुणीही कुणालाही लगेच काही सांगणार नाही.. मुलांनी ठरवलं. फक्त एकाच माणसाला आपला हा शोध सांगावा असं त्यांना वाटलं. ते होते, गावातले इतिहासाचे आणि चित्रकलेचे शिक्षक! त्यांना आपण इथं नक्की घेऊन यावं असं मुलांनी ठरवलं. ते येऊन गेले की मगच इतरांना सांगावं.. मुलांची खात्री होती, सरांना ही जागा नक्की आवडेल. 

पण सरांनी मात्र ती कल्पना झटक्‍यात उडवून लावली. या मुलांचा काहीतरी डाव असणार.. आपल्याला फसवून तिथं नेतील आणि अडकवून ठेवतील. महावात्रट मुलं आहेत. त्यांनी विचार केला. पण मुलं खूपच आग्रह करू लागली, तेव्हा त्यांनाही राहवेना. मुलं म्हणत होती तसं काही असेल तर ते खरोखरच फार मौल्यवान काहीतरी असणार होतं. धीर करून सर मुलांबरोबर गेले. यावेळी मुलं अधिक तयारीनिशी गेली होती. सरांनी ती गुंफा आणि चित्रं पाहिली आणि ते स्तंभितच झाले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. ही चित्रं आजच्या मानवानं काढलेली नाहीत हे त्यांना कळलं. नेमकी किती जुनी हे कळायला मात्र आणखी अभ्यासक तिथं येण्याची गरज होती. मुलांच्या पाठीवर सरांची शाबासकीची थाप बसली. आपल्याला सापडलेलं खरोखरच इतकं मौल्यवान आहे यानं मुलं कमालीची आनंदित झाली. 

यानंतर जगाला फ्रान्समधील लास्को गुंफांचा शोध लागला. या गुंफा जवळपास सतरा हजार वर्षं जुन्या, पार अश्‍मयुगीन काळातल्या आहेत हे कळलं. त्या चित्रांमध्ये चितारलेले प्राणी आजचे नव्हेत तर आजच्या प्राण्यांचे पूर्वज असावेत हे ही कळलं... ती माणसं शिकार कशी करत असावीत, त्यांच्यातल्या समजुती, चालीरीती कशा असाव्यात हे ही कळलं. 

हे आपले चित्रं काढणारे पूर्वज. चित्र काढण्याचा आपला वारसा निदान एवढा जुना आहे. भारतातसुद्धा चित्र काढणाऱ्या पूर्वजांनी आपले पुरावे मागे ठेवलेत.. कुठे माहितीये? तुम्ही शोधा आणि मला नक्की कळवा. ही चित्रं काढण्याआधीच माणसानं कुत्र्याशी मैत्री केली होती. (आठवतीये ‘लांडगा आणि कुत्रा’ गोष्ट?) त्याची शिकारीची तंत्रं आता खूप पुढारलेली होती. पण अजून त्यानं शेती सुरू केली नव्हती. पोळी, भात, भाजी आमटी असलं काहीही अजून आपल्या ताटात नव्हतं. पुढ्यात चित्रं मात्र होती.. आजही आहेत... फक्त आता घराच्या भिंतींवर चित्रं काढायला मनाई आहे.. आहे ना गंमत?

(सत्य घटनेवर आधारित कल्पित गोष्ट)

संबंधित बातम्या