माकडाची हुशारी 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 7 जून 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...
 

मित्रहो, आपण वानर ते नर प्रवासाविषयी गोष्टी करतो आहोत. लांडगा ते कुत्रा प्रवासापेक्षा हा प्रवास वेगळा आहे ना? कुणीतरी कुणाचं तरी ‘पाळीव’ होतं आणि मग त्या पाळीवाला आपलं आपण राहणं कधी शक्‍यच होत नाही. तो आपला मालकाच्या आश्रयानं राहतो. आपल्या पूर्वज वानराला कुणी पाळीव नाही केलं. वानर ते नर प्रवासाला खूप म्हणजे जवळपास पन्नास लाख वर्षं लागली. लांडगा ते कुत्रा हा प्रवास तीस हजार वर्षांत झाला. आहे ना मोठा फरक? अर्थात तीस हजार काय आणि पन्नास लाख काय; आपल्याला दोन्ही  समजायला अवघडच. पण हे होतं एवढं मात्र दिसून आलंय. त्यामुळे दोन्ही गोष्टींची कल्पना करता येऊ लागली आहे. 

समजा आजच्या कुत्र्याला आपला भूतकाळ दाखवला आणि ‘टाईममशीन’द्वारे त्याला भूतकाळात पाठवून असं म्हटलं, की बाबारे, तुला चॉईस आहे! तुला लांडगा म्हणून राहायचं आहे की माणसाजवळ येऊन कुत्रा व्हायचं आहे? इथवर आलास की माणसं तुझं काय वाटेल ते करतील. तुझ्यासाठी खास अन्न बनवतील, तुझी औषधं, तुझा पट्टा, तुझे कपडे (हो, कपडे आणि सॉक्‍ससुद्धा!), सगळं सगळं करतील.. प्रसंगी तुला गोळी घालतील, दूर कुठंतरी सोडून येतील. तर तो कुत्रा काय म्हणेल? तो लांडगा म्हणून राहणं पसंत करेल असं तुम्ही लगेच म्हणाल. पण मित्रांनो, गोष्टी इतक्‍या साध्या नाहीत. असं कुणी ठरवून करतं असंही दिसत नाही. आपण एकच करू शकतो, काय झालंय आणि काय होतंय याकडं अधिकाधिक वस्तुनिष्ठपणं (म्हणजे आपली आयडियाची कल्पना लढवून नव्हे, खरोखरचे पुरावे शोधून, असे पुरावे जे सगळ्यांना पडताळून पाहता येतील), डोळसपणं पाहू शकतो. 

झाडावरचे आपले पूर्वज खाली आले. दोन पायांवर चालू लागले. दगडानं खणू लागले, कापू लागले, दगडाला हत्यार म्हणून वापरू लागले. कसं घडलं असेल हे सारं? 

तुम्ही जातककथा ऐकल्या आहेत? या कथा बोधीसत्त्वाच्या आहेत. म्हणजे बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी बुद्धानं घेतलेल्या वेगवेगळ्या जन्मांच्या कथा. या कथांमध्ये तो कधी हत्ती, वानर म्हणून भेटतो तर कधी माणसाच्या रूपात. ‘नालापान जातक’ ही अशीच एक जातक-कथा आहे. या कथेत बोधिसत्त्वानं वानरांच्या कळपाचा प्रमुख म्हणून जन्म घेतलेला आहे. एके वर्षी दुष्काळ पडतो आणि रानातलं पाणी आटत जातं. पाण्याच्या शोधात सर्वत्र फिरत असलेली वानरं एका तळ्यापाशी येतात. हे तळं पाण्यानं भरलेलं असतं. पाण्याकडं बघून वानरांना मोह होतो. परंतु हुशार वानरं थांबतात आणि तळ्याचा नीट अभ्यास करतात. त्यांना फक्त आत जाणारी पावलं दिसतात. बाहेर येणारी पावलं नाहीतच, असं त्यांच्या लक्षात येतं. ते त्यांच्या नेत्यासाठी थांबतात. नेता येतो आणि पाहणी करून आपल्या कळपाला सांगतो, की तुम्ही घाई करून पाण्यापाशी गेला नाहीत ही अत्यंत योग्य गोष्ट केलीत. या तळ्यात एक यक्ष आहे आणि पाण्याच्या मिषानं जो प्राणी तळ्यापर्यंत जातो त्याला तो खाऊन टाकतो. तेव्हा या तळ्याच्या फार जवळ न जाणंच इष्ट. परंतु तहानलेल्या वानरांचं पाण्याकडं नुसतं बघून तर नक्कीच समाधान होणार नव्हतं. त्यांची तहान ओळखून कळपाचा नेता एक वेगळीच शक्कल लढवतो. बाजूला असलेल्या पोकळ गवताच्या नळ्या करून वानरं त्या चक्क पाण्यात बुडवतात आणि त्यातून शोषून पाणी पितात. यक्षाचा अर्थातच चडफडाट होतो. पण वानरांची तहान शमते. 

वानरं खरोखर वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता दाखवतात. अशी बांबू टाकून पाणी शोषणारी माकडं मी तरी पाहिली किंवा ऐकली नाहीत. पण इतर अनेक प्रकारे आपणही उपकरणं (implements) वापरू शकतो हे वानरं दाखवून देतात (म्हणजे तसं दिसतं) ती काठीनं मुंग्या बाहेर काढतात, दगडानं फळं फोडतात. तुम्ही पाहिलंय का वानरांना किंवा कोणत्याही प्राण्यांना अशा युक्‍त्या वापरताना? मलाही तुमची गोष्ट कळवा. 

माणूसही याच प्राणिसृष्टीचा भाग होता आणि आहे. आपण आणि आपले वानर भाईबंद यांच्यात जनुकीयदृष्ट्या फार थोडा फरक आहे. काय म्हणता? या फरकानं आपल्याला फार हुशार बनवलंय? याचं उत्तर मिळण्यासाठी आधी हुशारीची व्याख्या बनवायला हवी.. काय?!

संबंधित बातम्या