उचलली जीभ आणि... 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 15 जून 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

दोस्तहो, वानरांनी बांबूचा स्ट्रॉ सारखा उपयोग करून तळ्यातून पाणी शोषून घेतलं अशी गोष्ट आपण ऐकली. गोष्टीचं नाव होतं, नालापान जातक. ही जातक कथा आहे. जातक कथा सुमारे दोन हजार वर्षं सांगितल्या जात आहेत.. माणसाला तेव्हाही आपल्या वानर भाईबंदातली हुशारी आणि आपल्यात आणि त्यांच्यात असलेलं साम्य जाणवलं होतं का? तशा तर जातक कथा, पंचतंत्र, इसापनीती कथा, हितोपदेश कथा अनेकदा प्राण्यांवर बेतलेल्या असतात.. त्यांच्यात कधी धूर्त कोल्हा भेटतो, कधी लबाड लांडगा, चतुर कावळा.. प्राण्यांचे हे स्वभावविशेष फक्त गोष्टींत आढळतात की ते खरोखरच धूर्त, लबाड आणि चतुर असतात? तुम्हाला काय वाटतं? खरा प्रश्‍न असा विचारला पाहिजे की हे कसं शोधून काढावं? तुम्ही काय विचार करताय ते मला जरूर कळवा... 

आपण असं पाहिलं, की माणसानं एखाद्या अवजाराप्रमाणं दगडबिगड वापरायला सुरवात केली निदान एक लाख वर्षांपूर्वी, कुत्र्याशी दोस्ती केली तीस हजार वर्षांपूर्वी आणि चित्रं काढली सतरा हजार वर्षांपूर्वी.. (म्हणजे त्या आधीचे पुरावे आपल्याकडे नाहीत म्हणून आपण असं म्हणतो आहोत.) ‘वानर ते नर’ प्रवासात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. इतकी महत्त्वाची, की ती आपली ओळख बनली.. तिच्यावरून आज आपण बोलणीसुद्धा खातो.. ‘गप्प बस’, ‘तोंड उघडू नकोस’, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला...’ ‘बोलू नकोस...’ बरोबर! आपण बोलायला शिकलो. 

आपण भाषा वापरायला शिकलो. इतर प्राणी फक्त आवाज वापरत होते, आपण शब्द वापरायला शिकलो. हे कधी घडलं? साधारण सत्तर हजार वर्षांपूर्वी! आपण भाषा वापरायला लागलो आणि आपल्यासाठी जग पुरतं बदलून गेलं. म्हणजे उदाहरणार्थ, अमक्‍यातमक्‍या गुहेत फक्त आत जाणारी पावलं दिसताहेत, बाहेर येणारी नाहीत हे सगळं सांगायला शब्द असतील तर पुढचे गोंधळ टळणार ना! बाकी प्राण्यांना एवढं सगळं ना समजावून सांगण्याची सोय होती ना समजावून घेण्याची! माणसाला, म्हणजे तेव्हाच्या आपल्या पूर्वजांना, एकमेकांशी संवाद साधण्याची नवी रीत सापडल्यावर सगळं बदलून गेलं असेल ना? 

एखादं बाळ रडतं तेव्हा कोणी म्हणतं भूक लागली असेल. दुधाची बाटली दिली तर बाळ दूर लोटतं. कुणी खेळणं दाखवतं. बाळ रडायचं थांबत नाही. कुणी काही करतं कोणी काही.. शेवटी सगळे दमून जातात. कुणी म्हणतं, काय हवंय सांग तरी.. मग एखादी आजी म्हणते त्याचं कमरेचं घट्ट झालंय का बघा.. कोणीतरी नाडी सैल करतं, बाळ एकदम रडायचं थांबतं. ‘काय बाई या वेड्याला काही सांगताच येत नाही..’ एखादी ताई मोठा आव आणून म्हणते. सगळे हसतात. कल्पना करा एखादं सहा महिन्याचं बाळ जर एकदम म्हणालं, ‘अगं आई, मला काचतंय. लक्ष असू दे.’ तर कसं होईल? उरलेल्या बाळांच्या तुलनेत या बाळाचं रडं लवकर थांबेल ना! 

भाषा ही संवादात नेमकेपणा आणत असते. तो नेमकेपणा नसेल तर गोष्टी काही कळणार नाहीत असं नसतं, पण वेळ लागू शकतो, गोंधळ होऊ शकतो. भाषेनं या अडचणी दूर केल्या. रोजच्या संवादात असे कोणते विषय असतात जे एकमेकाला सांगायला शब्दच कामी येतात? आणि ते काय आहे जे एकमेकाला सांगायला शब्दाविना फारसं अडत नाही? विचार करून बघूया.. 

माणसाच्या पूर्वजाला शब्द वापरून भाषा यायला लागली, तेव्हा त्याच्या इतर वानर भाईबंदांना तो फरक लक्षात आला असेल का? त्यांच्या तो फरक लक्षात आला की नाही हे सांगता येणं अवघड आहे, पण त्यांचं जग शब्दभाषा वापरणाऱ्या माणसामुळं पुरतं बदलून गेलं. केळ्यांच्या घडाकडं आता कदाचित माणूस हुशारीनं आणि एकमेकांच्या साथीनं लवकर पोचू शकत असेल. इतरांना उशीर झाल्यामुळं उपाशी राहावं लागलं असेल. काय काय घडू शकतं? 

अगदी प्राचीन काळी माणसांची संख्या फार नव्हती आणि माणसं एकमेकांपासून दूर राहात होती. आजही पर्वतात गेलं तर असं दृश्‍य दिसतं. लांब लांब असलेली तुरळक घरं. थोड्या अंतरावर भाषा बदलते. इतकी की एकाच भौगोलिक प्रदेशात राहून या माणसांना एकमेकाचं समजत कसं नाही असं आश्‍चर्य शहरातून गेलेल्या माणसाला वाटू शकतं. सातपुडा पर्वतरांगेच्या परिसरात मी अशी गावं पाहिली आहेत. अर्ध्या - एक तासाच्या अंतरातली गावं; पण भाषेत किती वेगळेपणा! भिल, पावरा, कोकणा असे अनेक प्रकारचे लोक तिथं राहतात. त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या आहेत. एकाच भाषेच्या पुढं बोलीभाषाही अनेक बनतात. 

फार प्राचीन काळी माणसं जेव्हा सुटी-सुटी राहत होती आणि एकमेकाची भाषा जाणत नव्हती तेव्हा संभाषणात काय गमती उडत असतील? 

अशीच एक गोष्ट वाचूया पुढच्या अंकात..

संबंधित बातम्या