खाजा... खाजा... खाजा

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 21 जून 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...
 

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा फोन नव्हते, वीज नव्हती, रस्ते नव्हते. शेतीसुद्धा नव्हती. माणसं गुहेत राहत होती. जगात आजच्या एवढी माणसं नव्हती. त्यांची संख्या फार थोडी होती. ती एकमेकांपासून पुष्कळ दूर दूर राहत होती. आजही तुम्ही शहर/गाव सोडून बाहेर गेलात की असं दृश्य दिसतं. माणसं गुहांतून राहत नाहीत. पण वस्त्या छोट्या असतात. एक वस्ती दुसऱ्या वस्तीपासून पुष्कळ लांब असते. कधीकधी तर एखाद-दुसरेच घर पर्वतावर आढळते. इथे इतक्या दूर, आजूबाजूला दुकान, रस्ता काही नसताना माणसं कशी बरं राहत असतील असे विचार मनात येतात. हो ना? तर ज्या काळची ही गोष्ट आहे तेव्हा तर बांधलेली घरंपण नव्हती. पर्वतात नैसर्गिक गुहा असतात. माणसानं ते तयार निवारे वापरायला सुरवात केली होती. गुहेला दार नसताना पाण्या-पावसापासून, पशुपक्ष्यांपासून संरक्षण कसं बरं होत असेल? तुम्ही कधी ट्रेकला गेलाय? भर पावसात, किंवा रात्री अंधार आणि थंडी यांच्यापासून बचाव करण्यासाठी कधी कुठल्या गुहेत राहिलाय? कधी बाहेर ऊन असताना अशा गुंफांमधे जो काही अवर्णनीय गारवा अनुभवायला मिळतो ना, की ज्याचं नाव ते! त्यासाठी तरी एकदा गुहेत थोडा वेळ का होईना थांबून यायलाच हवं. 

तर गोष्टीकडं परत वळू. अशी ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. माणसं गुहेत राहत होती म्हणजे काय काय करत असली पाहिजे? शिकार? हो, पण रोज शिकार मिळत होतीच असं नाही. रानातून फळं, कंदमुळं गोळा करून आणणं शिकार करण्यापेक्षा जास्त सोपं होतं. शिकार मिळाली की मज्जाच! पण ती मजा काही रोज व्हायची नाही. आणखी काय करत असतील? जगातलं पहिलं चित्रं गोष्ट आठवतेय? बरोबर चित्र काढत असतील. छान विरंगुळा असेल, प्रसंगांची उजळणी होत असेल. एकमेकांशी काय बोलत असतील? कुठल्या भाषेत बोलत असतील? 

आज जी गोष्ट ऐकायची आहे ना ती भाषेबद्दलच आहे. त्यावेळी माणसं नुकतीच भाषा बोलू लागली होती. म्हणजे अशी काल-परवा नव्हे, पण आजच्या एवढा भाषेचा पसारा वाढला नव्हता. एवढे शब्द नव्हते. मोजक्या शब्दांच्या वेगवेगळ्या भाषा होत्या. दूर दूर डोंगरात राहणारी माणसं वेगवेगळ्या भाषा बोलत होती. एका वस्तीची भाषा दुसऱ्या वस्तीला समजत नव्हती. आणि अशातच एक मजा झाली. 

एका गुंफेत माणसांची एक टोळी राहत होती.  त्यात काही छोटी मुलंसुद्धा होती. मोठी माणसं सकाळी रानात जायची आणि मुलं मागे राहायची. मुलांना शाळा नव्हत्या! पण त्यांना थोडं काम करावं लागे. म्हणजे धाकट्या भावंडांना सांभाळ, गुंफा स्वच्छ ठेव इत्यादी. पण मोठी माणसं सकाळी रानात गेली की मागे राहिलेल्या मुलांचा सगळ्यात आवडता उद्योग होता मासे पकडायचा. थोडं अंतर उतरून आल्यावर एक छानशी नदी होती. तिथं काठावर मासे पकडायला उभं राहायचे अगदी सोयीचे दगड होते. तिथं उभं राहायचं आणि भाल्यानं माशाची शिकार करायची हा मुलांचा आवडीचा उद्योग. भाल्यानं बरं का, गळ टाकून नाही. अजून गळ अस्तित्वात आले नव्हते. दगडी टोक लावून तयार केलेले लाकडी भाले होते. नदीत मासे मुबलक आणि पाणी इतकं नितळ की माशांच्या झुंडी पोहत जाताना दिसायच्या. मग नेम धरून भाला रोवायचा आणि मासा पाण्यातून बाहेर काढायचा. अशा पद्धतीनं शिकार करायला सगळ्यात चांगला मासा होता ‘खाजा’. म्हणजे त्या टोळीत त्या माशाचं नावच खाजा असं होतं. मुलांना हे मासे पकडायला फार आवडायचं. त्यांना ती शिकार करायला सोपी होती. अगदी काही मिळालं नाही असं कधी व्हायचं नाही आणि मासा होता चविष्ट. विशेषतः भाजून खाल्ल्यावर तर जास्तच चविष्ट. मुलं लगेच मिटक्या मारायला लागायची. 

त्या दिवशीसुद्धा मोठी माणसं निघून गेल्यावर टोळीतली छोटी मुलं मासे पकडायला नदीपाशी गेली. पण आज त्यांचं नशीब काही वेगळंच होतं. दिवसभर थांबूनसुद्धा त्यांना काही फार मासे मिळाले नाहीत. जेमतेम सात-आठ मासे टोपलीत घालून मुलं बारीक चेहरा करून वर गुंफेत गेली. त्यांना भूक लागली होती. मासे तर काही फार मिळाले नव्हते पण मोठी माणसं काहीतरी शिकार नक्की आणतील अशा आशेवर मुलं होती. मोठ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. अंधार पडला तरी माणसं काही यायला तयार नाहीत..कुठं बरं गेली? 

वाचूया पुढच्या भागात... 
(मूळ गोष्ट www.arvindguptatoys.com या वेबसाइटवरून घेतली आहे)

संबंधित बातम्या