‘खाजा..’ची गंमत 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 28 जून 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

..तर मुलं त्यादिवशी आपल्या आई-बाबांची वाट बघत गुहेत बसली होती. त्यांच्यापाशी आज खायला फक्त सहा-सात खाजा मासे होते. एवढ्यावर काही सगळ्यांचं झालं नसतं. आज मोठी माणसं काय घेऊन येतात त्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अंधार पडला होता. रातकिडे गाऊ लागले होते. गुहेच्या भिंतीवर मुलांनी चितारलेली चित्रं अधिकच भेसूर दिसत होती.. आणि एवढ्यात मुलांना पलित्याचा प्रकाश दिसला. करंजाच्या बिया एकमेकावर खोचून पलिता पेटवत ठेवायची युक्ती कळल्यापासून माणसं अंधाराला घाबरेनाशी झाली होती. लांबूनच मुलांना कळलं, की आई-बाबा आले. मुलं एकदम आनंदली. त्यांच्यापाशी काय शिकार आहे, खाऊ आहे उत्सुकतेनं पुढं होऊन पाहू लागली. पण हे काय? त्यादिवशी सगळ्यांचेच हात रिकामे दिसले. कुणालाच काही मिळालं नव्हतं की काय? मुलांचे चेहरे उदास झाले. जरा जवळ आल्यावर मुलांना दिसलं की आज मोठ्यांसोबत कोणीतरी एक नवा मनुष्य आलाय. आधी कधी याला पाहिलं नव्हतं. हा कोण? 

गुहेच्या दारापाशी आल्यावर मुलं एकदम आपापल्या आईबाबांना जाऊन बिलगली. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह होतं. आईबाबांना ते अपेक्षित होतंच. मुलांना जवळ घेऊन ती म्हणाली, ‘बाळांनो, आज काही शिकार मिळाली नाही. खूप उशिरापर्यंत शोधलं पण यश आलं नाही. आज आपल्याला आहे त्यात भागवायला लागणार. तुम्हाला काही मिळालं आहे का?’ मुलांनी खाजा माशांचं वर्तमान सांगितलं. आता तेच भाजून खायचे हे सगळ्यांना कळलं. पण मुलांच्या चेहऱ्यावरचं प्रश्‍नचिन्ह मिटलं नव्हतं. बरोबर आलेला नवा माणूस कोण आहे आणि तो असा काय, काही समजत नसल्यासारखा, इकडंतिकडं बघत उभा आहे? त्यांना कळत नव्हतं. त्यांचं कुतूहल शमवत मोठे काका म्हणाले, ‘अरे, तो बहुतेक नदीच्या पलीकडं राहत असलेल्या टोळीतला आहे. चुकून इकडच्या रानात शिरला असावा आणि भटकला. त्याला आपली भाषा समजत नाही आणि आम्हाला त्याची भाषा. आता त्याला रानात एकटं कसं सोडणार म्हणून बरोबर घेऊन आलो. नेमकं आज जेवणाचा तुटवडा आहे. पण जे आहे त्यातलं त्यालाही द्यायला पाहिजे. हो ना?’ मुलांनी मान डोलावली. ‘चला बघू सगळे पटपट कामाला लागा. लाकडं घेऊन या. आपण मासे भाजायला घेऊ,’ काका म्हणाले तशी सगळे कामाला लागले. 

काही मुलं मात्र नव्या पाहुण्यापाशी घोटाळत राहिली. त्यांना त्याच्याबद्दल मोठं कुतूहल वाटत होतं. त्याच्याशी एक - दोन शब्द कोणते बोलता येतील असे त्यांचे प्रयत्न चालू होते. नवा पाहुणासुद्धा हसून मुलांशी दोस्ती करायचा प्रयत्न करत होता. पण गाडी फार पुढे जाईना कारण एकमेकांची भाषाच एकमेकाला समजत नव्हती ना! हळूहळू सगळ्यांच्याच पोटात भुकेनं आग पडली. माशांचा वास चांगला खरपूस सुटला होता. सगळेजण ताव मारायला उत्सुक होते. तेवढ्यात मोठी काकू म्हणाली, ‘आधी पाहुण्याला जेवायला बसवा. त्याचं झाल्यावर मग आपण खाऊ..’ मुलांनी ऐकलं. पाहुण्याला जेवायला बसवलं. त्यालाही भूक लागली होतीच. कदाचित त्यांच्याही टोळीत अशीच रीत असावी. आधी पाहुण्याला खाऊ घालण्याची. त्यामुळं आपण जेवल्याशिवाय हे लोक जेवणार नाहीत हे त्याला कळलं असावं. तो जेवायला बसला. पानात मासा आला. अरे, हा तर आवडीचा मासा. पाहुणा खुश झाला. मनापासून जेवू लागला. एक मासा तर त्यानं लगेच संपवला. मुलं आजूबाजूला उभी राहून पाहुण्याकडं बघत होती. एका बाजूला त्यांना पाहुण्याविषयी कुतूहल, गंमत वाटत होती आणि दुसऱ्या बाजूला पोटात मरणाची भूक पेटली होती. पाहुण्याचं जेवण संपायची ते वाट बघत होते. 

पाहुणा काही अजून तृप्त झाला नाही हे मंडळींनी ओळखलं. पाहुण्याच्या पुढ्यात अजून एक मासा आला. पाहुणा शिष्टाचार दाखवत म्हणाला, ‘नको.. कशाला?’ 

पण तो काय म्हणतोय हे कुठं कुणाला कळत होतं? पाहुणा आपल्याच भाषेत काहीतरी पुटपुटला होता. याचा काय अर्थ लावावा? गुहेतल्या मंडळींनी विचार केला, बहुतेक माशाचं नाव विचारत असेल. त्यांनीही जोरात सांगितलं, ‘खाजा, खाजा..’ ‘खाजा?’ पाहुण्याला आपल्या भाषेत या शब्दाचा एकच अर्थ ठाऊक होता. अजून खा. खाऊन टाक. अरे बापरे, आता यांची विनंती अव्हेरायची कशी? इतकं प्रेमानं सांगतायत. त्यादिवशी पाहुण्यानं नको कशाला म्हणत सगळे मासे संपवले. गुहेतली मंडळीसुद्धा ‘खाजा खाजा’ म्हणत खिलवत राहिली. शेवटी पोट जड झालं तेव्हा पाहुणा 

पानावरून उठलाच. नवख्या जागेची, लोकांची कसलीही फिकीर न करता मग तो सुखानं झोपी गेला. त्यादिवशी गुहेतली मंडळी उपाशीच राहिली. तृप्त मनानं झोपलेल्या पाहुण्याकडं बघत राहिली. 

असं म्हणतात, की त्यानंतर माणसानं एकमेकाची भाषा शिकायला सुरवात केली. तुम्हाला काय 
वाटतं? 
(समाप्त)

संबंधित बातम्या