आलेखाचे असेही उपयोग 

मंगला नारळीकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

गणित भेट
गणिताची भीती वाटते? छे! किती गमती असतात त्यात...

आज मुलांच्याबरोबर एक तरुण आला होता. नंदूने ओळख करून दिली, ‘हा माझा हरीमामा आहे. हरीमामा केमिस्ट आहे. त्याला शाळेत गणित आवडत नव्हते. पण तो म्हणतो, की गणिताचा अभ्यास आवश्‍यक आहे. तो औषधे बनवणाऱ्या कंपनीत काम करतो.’ ‘तुम्हाला गणिताचा उपयोग करावा लागतो का?’ मालतीबाईंनी विचारले. ‘हो तर! मुलांना समजेल असे एक उदाहरण देतो. तुम्ही आलेख शिकलात का?’ असे त्याने विचारताच हर्षा म्हणाली, ‘हो, आम्ही भूगोलात नकाशे काढतो, ते आलेखाचे प्रकार आहेत. शिवाय इतरही काही आलेख, स्तंभालेख, पाय डायग्राम असे पाहिले आहेत.’ ‘तुम्हाला हेदेखील समजेल,’ असे म्हणून त्याने एक कागद आणि दोन - तीन रंगीत पेन्सिली घेऊन एक आकृती काढली. (कृपया बाजूची आकृती पहा.) 

‘आता समजा, की एका रोग्याला त्याचा रोग बरा करायला औषध द्यायचे आहे. ते किती किती वेळाने द्यावे लागेल हे ठरवू या. औषधाचे २५० एकक त्याच्या रक्तात तीन दिवस सतत असायला हवेत, तर रोगजंतू मरून जातील आणि तो रोगमुक्त होईल हे माहीत आहे. औषध पोटात गेल्यावर रक्तात त्याचे किती एकक कोणत्या वेळी असतात हे यातल्या आलेखात आहे. आडव्या अक्षावर तासात वेळ आहे, तर उभ्या अक्षावर रक्तातील औषधाचे एकक आहेत. पहिली जांभळी वक्र रेषा तपासा..’ हरीच्या सांगण्यावरून सतीशने नमूद केले, ‘एका तासातच रक्तात २५० एकक आले, मग ३०० च्या पुढे गेले, हळूहळू कमी होत सोळाव्या तासानंतर जवळपास शून्य झाले. पण सतत २५० एकक रक्तात ठेवायचे आहेत ना?’ ‘म्हणून हुबेहूब तसलीच वक्र रेषा काढून ती उजवीकडे सरकवत न्यायची. त्या दोन्हींचा अभ्यास करून केव्हा दुसरी गोळी द्यावी ते ठरवतात. इथे तसली दुसरी रेषा हिरव्या रंगात दिली आहे. ती आठव्या तासाला चालू होते आणि पहिल्या रेषेला २५० उंचीवर छेदते. म्हणजे दुसरी गोळी आठ तासांनंतर दिली, तर रक्तात कायम २५० किंवा त्यापेक्षा जास्त औषध असेल,’ हरीने सांगितले. शीतल म्हणाली, ‘बरोबर, तेच या आलेखात दिसते आहे. वास्तविक नऊ किंवा साडेनऊला दुसरी गोळी दिली तरी चालेल. कारण पहिल्या व दुसऱ्या गोळीचा मिळून परिणाम पुरेसा होईल. पण चोवीस तासांचे समान भाग करून औषधाच्या वेळा ठरवणे सोपे होते. म्हणून आठ तासांनी दुसरी गोळी द्यायला सांगितले असेल.’ 

‘बरोबर! औषधयोजना करताना आणखीही ठिकाणी गणित वापरावे लागते. औषध सौम्य नसेल, तर आवश्‍यक तेवढेच द्यायचे असते. ते रोग्याच्या वजनावरून ठरवतात; म्हणजे समप्रमाणाचे गणित वापरावे लागते,’ हरीने खुलासा केला. ‘याशिवाय एखाद्या औषधाची परिणामकारकता तपासताना संख्याशास्त्राचा उपयोग करतात ना?’ बाईंनी विचारले. ‘हो. तेच औषध अनेक लोकांना देतात आणि किती टक्के लोकांना बरे वाटले, किती गुण आला, त्याच्या नोंदी ठेवून मग परिणामकारकता ठरवतात. उदाहरणार्थ नव्वद टक्के लोकांना गुण आला, तर ते गुणकारी असते. ज्या दहा टक्के लोकांना गुण येत नाही, त्यांच्यासाठी वेगळी औषधयोजना करावी लागते. एकूण मला शाळेत गणित आवडत नव्हते, पण आता ते उपयोगी आहे म्हणून शिकावे लागते. आता आवडायलाही लागले आहे. या मुलांना आधीपासूनच चांगले शिकायला मिळाले आणि ते आवडले तर त्यांना फायदाच आहे,’ हरीमामाचे म्हणणे सर्वांनाच पटले.

संबंधित बातम्या