निरोपाची वेळ

मंगला नारळीकर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

गणित भेट
गणिताची भीती वाटते? छे! किती गमती असतात त्यात...

जवळ जवळ दोन वर्षे ‘गणितभेट’मधून वाचकांना भेटत आहे. हे सदर मुलांच्या पानासाठी असले, तरी अनेक प्रौढ, आजी-आजोबा असलेले वाचकही दाद देत होते. मुलांसाठी असल्यामुळे आपल्यालाही समजेल, अशा विश्वासाने ज्यांची गणिताशी दोस्ती नाही, असे वाचकदेखील वाचत होते याचा आनंद आहे. गणिताची भीती दूर करायला मदत करणे, प्राथमिक गणिती क्रिया सोप्या करून दाखवणे, गणिताच्या विविध शाखांची तोंडओळख करून देणे आणि त्यांतल्या गमती सांगणे, एकूणच गणिताचा आणखी अभ्यास करायला उत्तेजन देणे हे उद्देश होते, ते बऱ्यापैकी सफल झाले आहेत असे वाटते. 

आता निरोपाची वेळ आली आहे. मुले आणि त्यांचे पालक यांच्यासाठी पुन्हा थोड्या सूचना द्याव्यात असे वाटते... गणिताचा अभ्यास हा एखाद्या उंच टॉवर किंवा मनोऱ्यासारखा असतो. पाया मजबूत असेल तरच मनोरा नीट उभा राहू शकतो. प्राथमिक शाळेत शिकलेले गणित हा पाया आहे. त्यातल्या संकल्पना व्यवस्थित समजल्या, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार जमत असले, तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. अन्यथा तो खच्ची होतो आणि गणित विषयाची नावड व भीती निर्माण होते. असे होऊ नये म्हणून पालक आणि शिक्षक यांनी काळजी घ्यायला हवी. या प्राथमिक क्रियांपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो, तो तर्कशुद्ध विचार आणि प्रश्न सोडवण्यासाठी केलेला योग्य प्रयत्न! पण प्राथमिक वर्गातच गणिताची भीती निर्माण झाली, तर पुढचे गणित जमणे कठीण. नववीतील विद्यार्थ्याला ७६ किंवा ११५ अंश कोनाचा पूरक कोन (Supplementary Angle) शोधता येत नाही, कारण हातच्याची वजाबाकी जमत नाही असे कधी कधी दिसते. ते वास्तव खिन्न करणारे आहे. लहान लहान बेरजा आणि वजाबाक्या यांचा सराव खेळातून करता येतो, ते खेळ लेखमालेत दिले आहेत. तोंडी लहान वजाबाक्या जमल्या, की हातच्याची वजाबाकी कठीण नाही. १५-१६ पर्यंत पाढे पाठ असले, तर गुणाकार भागाकार लवकर करता येतात. म्हणून थोडे पाठांतर करावे. कविता पाठ करण्याएवढे ते रोचक नसेल, पण खूप उपयोगी आहे आणि एवढे पाढे कोणत्याही भाषेत म्हणायला दिवसातून ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. अर्थात पुढे गणितातील तर्कशुद्ध कारणमीमांसा देता आली पाहिजे हे खरेच! 

प्रत्येक विद्यार्थ्याची गणित शिकण्याची आणि करण्याची गती वेगवेगळी असू शकते. एखाद्याला गणित सोडवायला वेळ लागत असेल, तरी हरकत नाही. सावकाश का होईना, चिकाटीने ते पूर्ण केले तर शाबासकी द्यावी. एखादी संकल्पना एखाद्याला समजायला वेळ लागत असेल, काही हरकत नाही. शिक्षकाने धीर ठेवून पुन्हा सावकाश शिकवायला हवे. खूपशी उदाहरणे देत कल्पना स्पष्ट करायला हवी. 

एखादे गणित सोडवण्याच्या अनेक पद्धती असतात. शिक्षकाने शिकवलेल्या पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत विद्यार्थ्याने यशस्वीपणे वापरली, तर त्याचे कौतुक करायला हवे. स्वतंत्र विचार करायला उत्तेजन द्यावे. आव्हानात्मक गणिते सोडवण्याचा आनंद चाखला, की विद्यार्थी आणखी उदाहरणे सोडवायला तयार होतो. तर्कशुद्ध विचार करणे, प्रश्नाशी असंबद्ध माहिती टाळून योग्य माहिती वापरून प्रश्न सोडवणे, जास्तीत जास्त अचूक उत्तर शोधणे या गोष्टींना गणिताच्या अभ्यासाने उत्तेजन मिळते आणि त्यांचा फायदा कोणत्याही क्षेत्रात होतोच.  
वाचकांना वेगवेगळ्या गणिती शाखांमधील ज्ञान मिळून त्याचा आनंद घेता यावा, अशी शुभेच्छा देऊन निरोप घेते. 
(समाप्त)

संबंधित बातम्या