गणितभेट कुठं आणि कशी? 

मंगला नारळीकर 
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

गणितभेट
गणिताची भीती वाटते? छे! किती गमती असतात त्यात...

आपल्या घरी राहायला आलेल्या तीन वर्षांच्या अंजूबरोबर नंदू खेळत होता. आता तो दुसरीत गेला होता. त्यानं तिला किती संख्या मोजता येतात ते विचारलं. तिनं लगेच, ‘एक दोन तीन पाच आठ सात दहा..’ असं म्हणून दाखवलं. शेजारची हर्षादेखील खेळायला आली होती. ती आता तिसरीत होती. अंजूची संख्या मोजणी ऐकून दोघंही हसू लागले. नंदूची आई मनीषा म्हणाली, ‘ती लहान आहे रे, तिला नीट शिकवा मोजायला. हवं तर शेजारच्या आजींना विचारा, त्या तुम्हाला गणित सोपं करून दाखवतात ना?’ अंजूची आई सुलभा म्हणाली, ‘पण एवढ्या लवकर गणितासारखा अवघड विषय शिकवायचा कशाला?’ 

‘तेही बरोबर आहे... पण आमच्या शेजारच्या आजी हसत खेळत गणित कसं शिकवायचं - शिकायचं ते सांगतात. दर रविवारी हे दोघंही आवडीनं जातात त्यांच्याकडं शिकायला. अंजूलादेखील जाऊ दे त्यांच्याबरोबर शिकायला... नाही खेळायला.’ सुलभा आणि अंजूही गेल्या नंदू आणि हर्षाबरोबर! 

‘अरे वा, ही छोटी पाहुणी आली वाटतं आज खेळायला?’ असं मालतीबाई म्हणाल्या. सगळ्यांना शंकरपाळे खायला देऊन खूष केलं. मग नंदू म्हणाला, ‘हिला अजून दहापर्यंतदेखील वस्तू मोजायला येत नाहीत.’ ‘ते बरोबरच आहे. एवढ्या लहान मुलांना गमतीत खेळत, हळूहळू शिकवायचं असतं. आधी नुसते एक ते दहा हे अंक ओळीनं म्हणायला शिकवावं. गाण्यातून शिकवलं तर मुलं जास्त आवडीनं म्हणायला लागतात. मालतीबाईंनी असं म्हणताच हर्षाला आठवलं.. ‘ए बी सी डी ही अक्षरं गाण्यातून शिकवतात, तसंच ना?’ ‘बरोबर, त्या अक्षरांचा क्रम छानशा गाण्यातून आधी शिकवला जातो. नंतर अक्षर ओळख हळूहळू होते. तसंच मोजायच्या अंकांचं गाणं हवं. पूर्वी एका सिनेमात माधुरी दीक्षितचा नाच होता, त्याचं गाणं छानशा ठेक्‍यावर होतं, सगळ्यांच्या तोंडात बसलं होतं... एक दो तीन, चार, पाच, छे, सात, आठ, नौ, दस, ग्यारा, बारा, तेरा... असं... त्याच्यासारखं गाणं एक ते दहा संख्यांचं बनवता येईल.’ बाईंची सूचना ऐकताच सुलभा म्हणाली, ‘आठवतं आहे ते गाणं. आपण मराठी गाणं करून म्हणू... एक दोन तीन, चार पाच सहा, सात आठ नऊ, दहा आहेत बोटं पाहा..’ ‘हे शीघ्रकवित्व चांगलं आहे की...,’ मालतीबाईंनी कौतुक केलं. तिघंही मुलं लवकरच ते गाणं म्हणायला लागली. ‘पुढच्या काही ओळी बनवीन नंतर..’ सुलभा म्हणाली. 

‘आता अंजूला ओळीनी अंक मोजता आले, तर तिला वस्तू मोजायला येतील ना?’ नंदूनं विचारलं. ‘अशी घाई करायची नाही. अंक ओळीनं म्हणणं ही पहिली पायरी झाली. आता काही वस्तू दिल्या, तर एकेका वस्तूला ओळीनं एकेक अंक देऊन त्या मोजायच्या हे लहान मुलाला सोपं काम नाही,’ मालतीबाई म्हणाल्या. सुलभा म्हणाली, ‘तिला दोन किंवा तीन वस्तू मोजता येतात. पण त्याहून जास्त येत नाहीत.’ ‘त्यासाठी जास्त सराव हवा. प्रत्येक वस्तू एकदा आणि एकदाच मोजायला हवी. ८ - ९ इतस्ततः उडणाऱ्या माशा किंवा फुलपाखरं यांची चित्रं असली, तर लहान मुलांना अशी मोजणी लवकर जमत नाही. ती सोपी कशी करता येईल सांगा पाहू!’ मालतीबाईंनी विचारलं. हर्षा म्हणाली, ‘आपण ती फुलपाखरं किंवा माशा एका ओळीत बसवल्या, तर मोजणं सोपं होईल.’ ‘शाबास! कारण मग क्रमवार मोजताना एखादी वस्तू मोजायची राहणं किंवा पुन्हा मोजली जाणं होणार नाही. मैदानावर खेळणारी मुलं मोजायला अवघड असतं, पण ती एका ओळीत उभी राहिली की मोजणं सोपं असतं.’ मालतीबाई म्हणाल्या. ‘पण चित्रातल्या वस्तू एका ओळीत नाही ठेवता येत,’ नंदूनं शंका काढली. ‘अशा वेळी पेन्सिल घेऊन एकेक वस्तू मोजली की तिच्यावर पेन्सिलीनं लहानशी खूण करता येते, मग मोजताना गोंधळ होत नाही.. 

आता नंदू, हळूहळू अंजूला दहापर्यंत वस्तू मोजायचा सराव दे बरं का. पण ती लहान आहे, तिच्या कलानं, शाबासकी देत, काम करायचं. आधी पाचपर्यंत वस्तू मोजायचा सराव दे. तिला कंटाळा आला, तर थांबायचं. भरपूर वेळ आहे तिला हे सगळं शिकायला...’ मालतीबाई म्हणाल्या.

संबंधित बातम्या