मोटार उद्योगाची जागतिक झेप

दिलीप देसाई
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

विशेष
 

कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था मोटार उद्योगावर मोठ्या प्रमाणात आधारित असते यात शंका नाही. असंख्य लहान-मोठे उद्योग हा उद्योग सुरू राहण्यासाठी अविरत झटत असतात. आपला भारत देशही यास अपवाद नाही. गेल्या तीन दशकांत या सर्व गोष्टींना प्रचंड चालना मिळाली. मुख्यत्वे मारुती उद्योग भारतात मोटारी करू लागल्यापासून ही बाब प्रामुख्याने उदयास आली. काळानुसार हुंदाई, टोयोटा, मर्सिडीज, रेनो यांनी भारतात आपले उद्योग उभारण्यास सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी प्रचंड गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे नवीन नोकऱ्यांना दरवाजे उघडे झाले. ही गोष्ट तितकीच खरी, की भारत हा प्रचंड पर्चेसिंग पॉवर असलेला देश आहे व ही गोष्ट परदेशी मोटार उद्योजकांना चांगलीच माहिती आहे. मात्र, क्रयशक्ती प्रचंड असलेल्या या देशात एका मर्यादेपर्यंत प्रचंड गाड्या विकल्या गेल्या. गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी या उद्योगाची वाढ प्रचंड वेगाने झालेली पाहायला मिळाली होती. त्यावेळी या उद्योगाचा कळस गाठला आहे की काय, अशी परिस्थिती होती. मात्र, शेअर बाजारात करेक्‍शन येते तशी या उद्योगातही मंदी जाणवायला लागली आहे. त्याची कारणेही काही आहेत, त्याकडे आपण नंतर वळू. 

भारतीय मोटार उद्योगाचा आढावा घेतला, तर एकेकाळी भारतात केवळ ॲम्बॅसेडर आणि फियाट आणि त्यांचीच प्रीमियर पद्मिनी अशा तीन ते चार गाड्यांचे राज्य होते. त्यानंतर मारुती गाडीचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला आणि भारतीय मोटारींच्या उद्योगात आणि बाजारपेठेत आमूलाग्र बदल झाला. मारुतीचा प्रवेश हा इथल्या मोटार उद्योगातील क्रांतीचा पहिला टप्पा मानावा लागेल. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय मोटार उद्योगात एक लक्षणीय बदल झालेला आहे, तो म्हणजे लहान गाड्यांपेक्षा एसयूव्ही आणि मल्टीपर्पज व्हेईकल या प्रकारच्या (SUV/mpvc) (अर्टिगा, स्कॉर्पिओ, इनोव्हा) गाड्यांच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ.

याची कारणे अनेक आहेत; पण काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे- 

सर्वांत प्रथम आरामदायी प्रवास, त्याबरोबर सामान ठेवण्याची मुभा, रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांपासून संरक्षण आणि अपघातात इजा होण्यापासून संरक्षण, हे सर्व मिळवण्याकरिता द्यावी लागणारी जास्त किंमत मोजण्याची तयारी. ही जास्त किंमत हॅच बॅकसाठी ५ ते ७ लाख, तर एसयूव्हीसाठी १५ लाख असू शकते. 

भारताच्या वेग मंदावलेल्या मोटार उद्योगाला नवीन गाड्यांचा (परदेशी नवीन बनावट) दणका बसताना बघायला मिळतोय. गेली दहा वर्षे टोयोटा इनोव्हा हे एक उच्च टप्पा गाठलेले वाहन मानले जात असे. २०१९ मध्ये या उच्चासनावर बसलेल्या वाहनाला धक्का मारला जातोय असे दिसते. देशात दोन नवीन ब्रॅंड अवतरले आहेत, पहिला आहे ‘एम.जी.’ या ब्रॅंडचे वाहन ‘हेक्‍टर.’ हेक्‍टर हे वाहन डिझेल, पेट्रोल व हायब्रीड अशा विविध स्वरूपांत उपलब्ध आहे. चौदा लाख ते वीस लाखांच्या आसपास किंमत असलेले हे वाहन पाच सीटर व सात सीटरमध्येसुद्धा उपलब्ध आहे. पहिल्याच महिन्यात पुण्यात १,१०० व संपूर्ण भारतात २८ हजार या ब्रॅंडच्या गाड्या बुक झाल्या आहेत. 

दुसरा ब्रॅंड किया ‘सेल्टॉर्स’ नावाची एसयूव्ही आता अवतरली आहे. २५ हजारांच्या पुढे या गाड्यांचे बुकिंग झाले आहे. हे सर्व काय दाखवतेय? की भारतात पैसा आहे व गाड्या घेणारे अंधारात नाहीत. संपूर्ण गृहपाठ करून शोरूममध्ये गाडी घ्यायला येतात. मी बाकीच्या एसयूव्हीबद्दल बोलत नाही. प्रत्येक वाहनाचे स्वतःचे एक स्थान आहे; पण या जागेवरून ते केव्हाही पदच्युत होऊ शकते. वाढते वेग व घसरलेली रस्त्यांची स्थिती माणसाला वेगळ्या वाटेकडे नेते यात शंका नाही. 

काही वर्षांपूर्वी टाटा कंपनीने जॅग्वार, लॅंडरोव्हर ही डबघाईला आलेली ब्रिटिश कंपनी विकत घेतली. उत्तम मॅनेजमेंटद्वारे काही काळातच जम बसवून गाड्या जगभर विकायची किमया करून दाखवली. भारतीय सधन मंडळींना या गाड्या घेण्याची संधी मिळाली. त्याच्या आधीची संधी ७५ वर्षांपूर्वी ब्रिटिश जमान्यात राजे-रजवाडे (संस्थानिक) यांनी अनुभवली. जॅग्वार गाडी घेणे ही गोष्ट सोम्यागोम्याच्या आवाक्‍यात नव्हती. 

आणखी एक विभाग आहे! सुपर कार्स यांचा, फेरारी, लॅबॉरगिनी, पोर्शे या गाड्यांचा! एक-दोन कोटी ही स्टॅंडर्ड किंमत! या गाड्यांचा उपभोग घ्यायला ‘बुद्ध इंटरनॅशनल रेसिंग सर्किटचा मार्ग पकडावा लागतो; तुम्ही भारतात कुठेही असाल तरी ताशी २५० किलोमीटर वेगाने जाणे फक्त बुद्ध सर्किटवर शक्‍य आहे. (तुमची ड्रायव्हिंग ॲबिलिटी असेल असे गृहीत धरले आहे.) 

हायस्पीड गाड्यांची मजा चाखायला रेसिंग सर्किटला पर्याय नाही. इंग्लंडमध्ये जिल्हापातळीवर रेसिंग ट्रॅक्‍स आहेत. दर शनिवार/रविवार मंडळी आपापल्या गाड्या घेऊन हात साफ करून घेतात. कालपरत्वे नॉर्मल रस्त्यांवरून खुमखुमी दाखवत नाहीत. अपघातांत लक्षणीय कपात होते. भारतात मोटरस्पोर्ट हा खेळाचा प्रकार मानत नाहीत. सरकारसुद्धा त्याला करमणुकीचे साधन समजते. परदेशात बरेच मोटार उत्पादक आपापले ‘स्पोर्टिंग विभाग’ जोपासतात. रिसर्च व डेव्हलपमेंटचाही उपयोग होतो. भारतात टोयोटा व फोक्‍सवॅगन अल्प प्रमाणात हे करतात. बुद्ध सर्किटवर होणारी फॉर्म्युला - वन दोन वर्षांत बंद पडली. परत एकदा ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे, की ‘मोटार उद्योगाला अर्जितावस्था यायला बऱ्याच गोष्टींचा हातभार लागतो. जनता जनार्दन व मायबाप सरकार! 

आजच्या भारतीय मोटार उद्योगात एक मानाचा तुरा ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ यांनी खोचला आहे. सर्वप्रथम लहान का होईना, संपूर्ण इलेक्‍ट्रिक ई-टू ही गाडी रस्त्यावर धावताना दिसतेय. विविध करांमुळे याची किंमत अवाजवी आहे. इटलीमध्ये ‘पिनीनफरीना’ नावाची मोटारी डिझाईन करणारी कंपनी आहे. या कंपनीचे आजचे मालक आहेत महिंद्रा आणि महिंद्रा. या मंडळींनी जिनिव्हा मोटार शोमध्ये त्यांची नवीन इलेक्‍ट्रिक स्पोर्ट्‌स कार दाखवली. जगातील सर्वांत वेगवान, भन्नाट दिसणारी व चालणारी. ही गाडी यू-ट्यूबवर आपण पाहू शकता. 

आज भारतीय उद्योजक केवळ देशातच नाही, तर परदेशात आपापली वाहने विकून आपला उद्योग सावरत आहेत. थोडक्‍यात काय, मागणी आणि पुरवठा यामध्ये कमालीची तफावत दिसतेय. मोटारी तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्या एक्‍स्पोर्ट करून आपला तोटा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजचा भारतातील मोटार उद्योग ऊर्जितावस्थेत आहे हे खरे आहे. पण ही अवस्था सर्वतोपरी सुधारण्यासाठी जनता व शासन दोघांनाही निकराचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. भारतातल्या सर्व मोटार उद्योगांमध्ये ‘मारुती’ हे नाव सर्वपरिचित व सर्वांचे लाडके वाहन आहे. आजतागायत गेली अनेक वर्षे मारुती हे वाहन जवळजवळ मोटारींच्या बाजारपेठेतला ५० टक्के मार्केट शेअर असलेले वाहन आहे. भारतातील बाकी सर्व वाहने उर्वरित ५० टक्‍क्‍यांमध्ये आपापली जागा शोधतात. आजमितीला ‘मारुती’ची विक्रीसुद्धा २०-२५ टक्के कमी आहे. असे असूनदेखील जुलै महिन्यात मारुतीच्या ‘वॅगन आर’ या वाहनाने तब्बल १४ हजार गाड्यांची विक्री केली. वॅगन- आर हे वाहन २००९ मध्ये भारतात मिळू लागले व आजतागायत १५ लाख वॅगन- आर विकल्या गेल्या आहेत. आजचे भारतातील वॅगन- आरचे हे थर्ड जनरेशन वाहन आहे. जपानमध्ये सहावे किंवा सातवे जनरेशन सुरू आहे. जपानमध्येही आज हॉट सेलिंग वाहन आहे ते म्हणजे वॅगन- आर. 

आज देशात या उद्योगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की या तयार केलेल्या व विकलेल्या सर्व गाड्या रजिस्टर करताना पार्किंग आहे का, रस्ते आहेत का याचा विचार कुणी करते का? शासनाला तसे वाटत नाही का? असंख्य बिल्डिंग अशा आहेत, जिथे पार्किंगची पुरेशी सोय नाही. या सर्वांचा मोटार उद्योगाला मोठाच अडसर होतो आहे. सिंगापूरसारख्या देशात गाड्यांच्या संख्येवर प्रचंड बंधने आहेत. ही बंधने आपण लादू शकतो का नाही हाही चर्चेचा विषय आहे. 

गाडीची जेवढी किंमत जास्त, तेवढी ती सर्वतोपरी योग्य असेलच असे नाही. बहुतांशी वाहने युटिलिटी व्हॅल्यूच्या पलीकडे असतात. या गाड्यांना लागणारे रस्ते, ‘या गाड्या चालवणाऱ्या माणसांचे कसब’ व मानसिकता या तत्सम गोष्टींकडे काणाडोळा केला गेला. 

आजची भारतातील परिस्थिती जर न्याहाळली तर असे दिसेल, की अपघातांना आमंत्रण व मनस्ताप या गोष्टींचा सुळसुळाट होतोय. लाल दिवा असताना सिग्नल तोडणे, वनवेतून उलट वाहन चालवणे व अनेक कायद्यांचे उल्लंघन करणे हे सहज केले जात आहे. हे सर्व पाहताना मोटार उद्योगाचे वाढीव रूप खरेच पेलण्याची आपली मानसिकता आहे का, हा यक्षप्रश्‍न आहे. 

भारतासारख्या देशाला हायस्पीड गाड्यांची आवश्‍यकता नाही. कमी इंधनात लांबचा पल्ला गाठणे महत्त्वाचे. या सर्व बाबींवर लक्ष दिल्यास असे लक्षात येईल, की बॅटरीवर चालणाऱ्या मोटारींची नितांत गरज आहे. या अनुषंगाने भारतातील बरेच उत्पादक इलेक्‍ट्रिक गाड्यांच्या निर्मितीकडे आकर्षित झालेले आहेत व त्या दिशेने वाटचाल करीत आहेत. हा बदल घडवून आणण्यास भारत सरकारचे कर आकारणी धोरण खूपच महत्त्वाचे ठरेल. 

आणखी एक गोष्ट या नवीन गाड्यांच्या बाबतीत खूपच महत्त्वाची! चालू वाहन बंद झाल्यास या गाड्यांचे रिपेअरिंग जवळजवळ अशक्‍य! या सर्वांचे कारण ‘गाड्यांमधील इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे.’ हेही तितकेच खरे, की बॉनेट उघडून उभी असलेली वाहने क्वचितच बघायला मिळतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आजकालची वर्कशॉप्स ही ‘रिपेअर शॉप्स’ नसून, रिप्लेसमेंट शॉप्स आहेत. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आजकालच्या बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये क्‍लच दाबून व गिअर बदलून ड्रायव्हरची वाट लागते. थोडक्‍यात, ॲटोमॅटिक गिअर असलेल्या गाड्यांच्या मागणीत झालेली वाढ! पाच वर्षांपूर्वी याबाबतीत विचार नव्हता. एअरकंडिशनची नितांत गरज वाटते. थंड हवा सोडा, पण प्रदूषण बाहेर ठेवणे फारच गरजेचे झाले आहे. हे सर्व बदल खूपच आनंददायी आहेत; पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमतपण काणाडोळा करण्यासारखी नाही. जगातले बरेच देश चालकाविना चालणाऱ्या गाड्यांबद्दल जोरात पावले उचलत आहेत. भारतात आपण योग्य दिशेने पावले उचलतो आहोत का, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यातल्या त्यात वाहनचालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

आजमितीला जर आपण भारतातल्या मोटार उद्योगाकडे बघितले तर असे लक्षात येईल, की त्याची परिस्थिती एका दाव्याने बांधलेल्या उमद्या घोड्यासारखी आहे. अतिशय उत्तम रपेट करणारा घोडा तबेल्यातून बाहेर पडल्यावर मोकळ्या माळाच्या शोधात दगड-गोटे, खड्डे चुकवत आपल्या जीवनाची वाटचाल करू पहात आहे. मोकाट पळणे त्याच्या नशिबात नजीकच्या काळात तरी दिसत नाही. या सर्व परिस्थितीला एक सोन्याची किनार नक्कीच आहे, ती म्हणजे सध्याचे सरकार. आपल्या देशातल्या वाईट प्रथांवर लगाम घालण्याची प्रक्रिया आता सरकारने नक्कीच सुरू केलेली आहे. भारत हा एकमेव देश आहे, जो सर्व काही सामावून घेऊ शकतो. जे जे नवीन मोटार उद्योगात येऊ पहात आहे, त्याला भारतीय बाजारपेठ खुणावत आहे; पण अतिउत्पादन व त्याला लागणारी नंतरची बाजारपेठ यांचा मेळ बसणे फारच अवघड. 

भारतात ज्या समस्या आहेत, त्या परदेशातील मोटार उद्योगांना भेडसावत नाहीत. अमेरिकेत हायवेवर सहा सहा लेन्स अविरत सुरू राहतात. घुसवा-घुसवी हा प्रकार फारच क्वचित. माझ्या एका परदेश दौऱ्यादरम्यान (झुरीकमध्ये) समोरून एक गवत घेतलेला ट्रॅक्‍टर संथ गतीने येत होता व त्याच्या मागे तीस एक गाड्या त्याच्या गतीने येत होत्या. कोणीही ओव्हरटेक करण्याचे धाडस/आगाऊपणा केला नाही. हो! रस्ता म्हणाल तर कॅरम खेळता येईल एवढा गुळगुळीत. 

मुळात इथे गाड्यांची कितीही वाढ झाली, तरी ती वाढ इथल्या परिस्थितीला सोसेल अशी मानसिकता इथे नाही. भारतीय मोटार उद्योग आता देशाच्या सीमा ओलांडून बाहेर जाताना दिसत आहे; पण त्यांच्या इथल्या वाढीला तरी आज काही प्रमाणात खीळ बसलेली आहे. भारतीय मोटार उद्योगाची आजची अवस्था संक्रमणाच्या कालखंडाची आहे. 

संबंधित बातम्या