गरज पर्यावरणस्नेही उत्सवाची

इरावती बारसोडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
 

गणपती... आपला लाडका देव! त्याचा उत्सव घराघरात-गल्लोगल्ली साजरा होतो. हा उत्सव आता पर्यावरणस्नेही, पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी आग्रह होऊ लागला आहे. पण, मुळात पर्यावरणपूरक म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे. दुसऱ्या कुठल्याही देवापेक्षा बाप्पाचे लाड जरा जास्तच केले जातात. गणेशोत्सवात आपला उत्साह फार दांडगा असतो. पण उत्साहाच्या भरात आपल्याकडून अशा अनेक गोष्टी घडतात, ज्यांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते आणि आपल्याला तेच थांबवायचे आहे. उत्सवासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे पर्यावरणाची, आजूबाजूच्या नैसर्गिक संसाधनांची हानी न करणे, ती प्रदूषित न करणे म्हणजे पर्यावरणपूरक उत्सव. 
गणेशमूर्ती
प्रदूषण कशामुळे?
मूर्तीला हवा तसा आकार देता येतो, तसेच मूर्ती हलकी होते म्हणून मूर्ती घडविण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) वापर केला जातो. मात्र, पीओपी पाण्यामध्ये विरघळत नाही. त्याशिवाय मूर्ती रंगवायला वापरले जाणारे ऑईल पेंटरसारखे रंगही घातक असतात. मूर्ती अधिक आकर्षक दिसावी, यासाठी चकाकणारे रंग, चमकी, खडे यांचा वापर होतो. या मूर्त्या पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर यातल्या प्रत्येक गोष्टीमुळे जलप्रदूषणामध्ये भर पडते. 

पर्याय काय?
गणेशमूर्तीपासून होणारे प्रदूषण रोखायचे असेल, तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे मातीची मूर्ती. गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा मातीच्याच मूर्ती असायच्या. त्यामुळे त्या नदीप्रवाहामध्ये विसर्जित केल्या, तरी फरक पडत नसे. आता शाडू मातीचा पर्याय समोर आला आहे. मागील काही वर्षे बाजारामध्ये शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. माती ही केव्हाही पर्यावरणपूरकच. त्यातही मुलतानी मिट्टी, हळद, काव अशा नैसर्गिक रंगांपासून रंगवलेली मूर्ती सर्वोत्तम. या मूर्तीचे हौदातही विसर्जन करता येते आणि घरच्या घरी बादलीतही. तुम्ही बादलीमध्ये मूर्ती विसर्जन केले, तर असे लक्षात येईल की शाडू मातीची मूर्ती भंगल्यानंतर माती तळाशी साचून राहते. ती पाण्यात विरघळत नाही. ही माती सुपीक नसते, त्यामुळे झाडांनाही तिचा उपयोग नाही. पण तिचा पुनर्वापर नक्कीच करता येतो. माती बाहेर काढून पुन्हा मूर्तिकाराकडे सुपूर्द करू शकता किंवा ती तशीच व्यवस्थित ठेवून पुढील वर्षी तुम्हीच तिचा वापर करून नवीन मूर्ती घरच्या घरी घडवू शकता.
याशिवाय सोने, चांदी, लोखंड, तांबे आणि जस्त या पंचधातूंची मूर्ती आणून तिचीही प्रतिष्ठापना करता येईल. पंचधातू नको असेल, तर चांदी किंवा तांब्याची मूर्तीही करून घेता येईल. शास्त्राप्रमाणे मूर्ती तीन वेळा पाण्यामध्ये संपूर्ण बुडवली, की तिचे विसर्जन होते. 
त्यामुळे विसर्जन करताना घरच्या घरी बादलीमध्ये मूर्ती तीन वेळा संपूर्ण बुडवून विसर्जित करू शकता. नंतर पुढच्या वर्षीही त्याच मूर्तीची रीतसर पूजा करून, तिची प्रतिष्ठापना करता येईल.

निर्माल्य
प्रदूषण कशामुळे?
पाच-दहा दिवसांमध्ये भरपूर निर्माल्य गोळा होते. त्यामध्ये फुले, दूर्वा, हार, विड्याची पाने, सुपाऱ्या, गेजावस्त्र (कापसाचे वस्त्र) अशा अनेक गोष्टी जमा होतात. मूर्ती विसर्जनानंतर या गोष्टींचे महत्त्व संपते. हे निर्माल्य सरळ नदीत, ओढ्यात भिरकवून दिले जाते; तेही प्लॅस्टिकच्या पिशवीमधून. फुले, दूर्वा या गोष्टी नैसर्गिक असल्या, तरी नद्यांची सद्यःस्थिती पाहता, त्या पाण्यामध्ये टाकल्यास जलप्रदूषण होणे स्वाभाविक आहे. 

पर्याय काय?
निर्माल्य वाहत्या प्रवाहामध्ये टाकावे, असे म्हणतात. मात्र, आता आपल्याला कालानुरूप बदलायला हवे. या गोष्टी वाहत्या प्रवाहामध्ये म्हणजे अर्थातच नदीमध्ये न टाकता निर्माल्य कलशामध्ये जमा कराव्यात. प्रत्येक विसर्जनाच्या दिवशी विसर्जन ठिकाणी अनेक संस्था निर्माल्य गोळा करतात. त्यांच्याकडे निर्माल्य जमा करावे. 
हे निर्माल्य म्हणजे खरे तर ओला कचराच असतो. तो जिरवताही येईल. फुले, दूर्वा, पाने यांसारख्या गोष्टींचे खत करून दुसऱ्या झाडांसाठी वापरता येईल. याला फार वेगळे काही करण्याची गरज नाही. एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारून घरच्या घरीच कंपोस्ट करता येईल. निर्माल्याचा सद्‍उपयोग होईल. 

सजावट
प्रदूषण कशामुळे?
पूर्वी बाप्पासाठी बाजारातून थर्मोकोलची रंगीबेरंगी मखर आणली, की सजावटीचे निम्मे काम व्हायचे. पण हीच रंगीबेरंगी मखरे पर्यावरणासाठी घातक ठरतात. थर्मोकोल, प्लॅस्टिक यांपासून तयार केलेले कोणतेही सजावटीचे साहित्य धोकादायकच. कारण, गणपती गेले की हे साहित्य कचऱ्यात जाते. त्याचे विघटन होत नाही फक्त अविघटनशील कचरा तेवढा वाढतो. 
 
पर्याय काय?
थर्मोकोल नसला म्हणून काय झाले? त्याला अनेक उत्तम पर्याय आहेत. कागदाची, पुठ्ठ्याची कितीतरी सुरेख मखरे मिळतात. बाहेरून आणायची नसतील, तर स्वतःच घरीही तयार करता येईल. तसेच, बांबूच्या कामच्यांच्या मखरांचे सांगाडेही मिळतात. असा सांगाडा आणून त्यालाही सजावट करता येईल. नुसत्या कामच्या आणून त्यांना तुम्हाला हवा तसा आकार देता येऊ शकतो. जरा शक्कल लढवली, तर घरातल्याच गोष्टी वापरून कितीतरी प्रकारे सजावट करता येते. उदा. गुलाबी कार्डशीट पेपरच्या मोठ्या पाकळ्या कापून कमळ करता येईल किंवा पुठ्ठ्याचे वेगवेगळ्या आकाराचे खांब करून सभामंडप करता येईल. अगदी काहीच नाही, तर वेगवेगळी फुले आणून त्याची सजावट करता येईल.

धूप, कापूर आणि अगरबत्त्या
प्रदूषण कशामुळे?
बाप्पाची पूजा म्हटली, की अगरबत्त्या, कर्पूरारती ही आलीच. सकाळ-संध्याकाळ आरतीच्या वेळी भरपूर अगरबत्त्या, धूप आणि कापूर जाळला जातो. पण, याच गोष्टी घरातील प्रदूषणाचा (indoor pollution) प्रमुख स्रोत आहेत. या गोष्टी जाळून निर्माण झालेला धूर तुमच्याच नाकातोंडातून तुमच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन साचतो. धूपकांड्या सर्वांत जास्त घातक. चेस्ट रिसर्च फाउंडेशनने केलेल्या संशोधनुसार, साधारणपणे दीड इंच लांबीच्या दोन धूपकांड्या जाळल्या, तर तब्बल २० हजार मायक्रोग्रॅम प्रदूषित घटक तयार होतात. दोन तासांनंतरही खोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषके तशीच राहिलेली असतात. 

पर्याय काय?
धूर न करणाऱ्या अगरबत्त्या, धूप आणि कापूर आपल्याकडे नाहीत. त्यामुळे याला पर्याय म्हणजे या गोष्टींचा वापर कमी करणे. सकाळ-संध्याकाळ दोन-दोन अगरबत्त्या लावत असाल, तर एकदाच एकच लावावी. या सर्व गोष्टी पेटवताना घरातील सर्व दारे-खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास अगरबत्त्या, धूप देवाला ओवाळून झाल्यानंतर बाहेर मोकळ्या जागेत, गॅलरीत, खिडकीत ठेवावे. त्यामुळे त्यांचा धूर थेट घरात न येता मोकळ्या हवेमध्ये विरून जाईल. 

ढोल-ताशे आणि लाऊड स्पीकर्स
प्रदूषण कशामुळे?
हल्ली कोणताही उत्सव म्हटला, की कानठळ्या बसवणारा आवाज झालाच पाहिजे, असा अलिखित नियमच झाला आहे. गणपतीमध्ये ध्वनी प्रदूषणाची सुरुवात होते, ती दोन महिने आधी सुरू होणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या सरावांपासून. अनंत चतुर्दशीपर्यंत हा आवाज सुरूच असतो. गणपती बसले, की मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर्सवर वाजणारी गाणी, मग ती देवाची असली; तरीही कानठळ्या बसवतात. अनंत चतुर्दशीला तर हा आवाज टिपेला पोचतो. ढोल-ताशांच्या दणदणाटापेक्षा लाऊड स्पीकर्सच्या भिंतींमधून बाहेर पडणारा आवाज खूपच त्रासदायक असतो.

पर्याय काय?
खरेतर या समस्येला आवाज कमी करणे, हाच पर्याय आहे. प्रत्येक गोष्ट मर्यादेमध्ये केली तरच तिचा आनंद लुटता येतो. याबाबतीतही हेच लागू होते. लहान मुले, वृद्ध, प्राण्यांना मोठ्या आवाजाचा जास्त त्रास होतो. गणेश मंडळे रहिवासी भागांमध्येच असतात, त्यामुळे ‘रात्री दहानंतर आवाज बंद’ हा नियम मंडळांनी स्वतःहून पाळायला हवा. त्यासाठी कोणताही नियम, कोणतीही सक्ती करायची गरज भासू नये.  
नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होण्याआधी पाऊस वेळेत पडायचा, नदीला पाणी असायचे. पाऊस कमी झाला, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कमी झाले, की नदीकाठी गाळ साचायचा. हाच गाळ म्हणजे माती घरी आणून त्यापासून गणेशमूर्ती घडवली जायची. विसर्जन करताना ती पुन्हा नदीत सोडून द्यायची. म्हणजे निसर्गातून आणून पुन्हा निसर्गातच सोडून द्यायचे, ही त्यामागची धारणा असे. विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यासाठी केलेले पदार्थही नदीत सोडले जायचे, कारण ते खाणारी कासवे, मासे पाण्यामध्ये असायची. आता तीही नाहीशी झाली आहेत. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण पर्यावरणाची अपरिमित हानी करत गेलो आणि आता निरोगी पर्यावरण आपल्या निरोगी आयुष्याशी जोडले गेले आहे. त्यासाठीच आपल्याला आपल्या परंपरांमध्ये थोडा बदल तर करावाच लागेल. शेवटी काळ बदलतो आहे आणि आपल्यालाही बदलावेच लागेल! 

संबंधित बातम्या