गौराई माझी लाडाची गं... 

इरावती बारसोडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
 

गणपती-गौरीची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही अनेक घरांमध्ये गौरीचे पूजन केले जाते. प्रत्येक घरचे कुळाचार वेगळे, त्यामुळे गौरी बसवायची पद्धतही वेगवेगळी. स्टँडवर गौरीचे मुखवटे बसवून, त्यांना सुंदरशी साडी नेसवून, दागदागिने घालून नटवले जाते आणि त्या गौरींचे पूजन केले जाते. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा पूजतात, कोणी मातीची प्रतिमा पूजतात, कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात, तर कोणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजा करतात.

महाराष्ट्रात भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात गौरीपूजन करतात. या गौरींना ज्येष्ठा गौरी म्हणतात. हे व्रत तीन दिवस चालते. भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन, अष्टमीला ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि नवमीला मूळ नक्षत्रावर विसर्जन होते. 
पुराणात गौरीची कहाणी सांगितली जाते ती अशी, एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि आपले सौभाग्य अबाधित राहावे, यासाठी त्यांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली. म्हणून महालक्ष्मी गौरीने असुरांचा संहार केला. शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. तेव्हापासून महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीचे पूजन करू लागल्या. गौरीच्या तीन दिवसांच्या काळात घरोघरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होतात. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पूर्वी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडत असत. आता धावपळीच्या युगातही अनेक घरांमधून स्त्रियांनी ही परंपरा जपली आहे. 

निरनिराळ्या परंपरा व पद्धती
बहुजन समाजात मातीची नवीन पाच लहान मडकी आणून त्यात हळदीने रंगविलेला दोरा, पाच खोबऱ्याच्या वाट्या व खारका घालून त्यांची उतरंड रचतात आणि त्याच्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. गौरीच्या अशा दोन प्रतिमा तयार करून मग त्याची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी ती मडकी खाली उतरवून त्यातील दोरे व खारीक-खोबरे काढून घेतात. ते तुकडे त्याच दोऱ्यात बांधून घरातील सुवासिनी व मुले तो दोरा गळ्यात घालतात. पुढे एखादा चांगला दिवस पाहून ते दोरे काढतात व दूध-दह्यात भिजवून शेतात पुरतात. 

कोकणातील शेतकरी वर्गात गौरीचा सण महत्त्वाचा असतो. ते लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात. 

काही ठिकाणी घरातील कुमारिका सुवासिक फुलांच्या एखाद्या वनस्पतीची रोपे उपटून त्यांनाच गौरी करतात आणि घरी आणतात. घराच्या दारात त्यांच्यावरून तांदूळ आणि पाणी ओवाळून टाकतात. नंतर त्या गौरी घरातील प्रत्येक खोलीत नेल्या जातात. त्यांना घरातील ऐश्‍वर्य दाखवले जाते. त्या रात्री रोपट्यांच्या त्या जुडग्यांना स्त्रीचा आकार देतात आणि वर मुखवटा बसवतात. दुसऱ्या दिवशी गौरींची पूजा करून त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील प्रत्येक सुवासिनी आपल्या उंचीचा सोळापट लांब दोरा घेऊन त्याचा गुंडा करून गौरींपुढे ठेवते व त्याची पूजा करते. रात्री घरातील स्त्रिया व मुली जागरण करतात व सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात. तो दोरा नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवायचा आणि आश्विन वद्य अष्टमीला गळ्यातून काढून त्याची पूजा करायची, अशी प्रथा आहे. या दोऱ्याला महालक्ष्मी मानले जाते. 

काही ठिकाणी गौरी आगमनाच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. गौरी पूजनाच्या दिवशी पंचपक्वान्ने, सोळा भाज्या, सोळा कोशिंबिरी आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पूर्वी घरांमध्ये एकत्र कुटुंबे होती, त्यामुळे एवढा स्वयंपाक सहज केला जायचा आणि संपायचाही. 

खड्याच्या गौरी
कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांकडे खड्याच्या गौरी पाहायला मिळतात. काही ठिकाणी पाच, तर काही ठिकाणी सात खड्यांच्या गौरी असतात. कऱ्हाडे ब्राह्मणांकडे दोनच खड्यांच्या गौरी असतात, एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा. पूर्वीच्या काळी गौरींसाठी नदीतील खडे वाजत-गाजत आणले जायचे. लहान मुली किंवा कुमारिका खडे आणीत असत. तेव्हा अशी प्रथा होती, की गौरी आणताना एकमेकींशी बोलायचे नाही. मात्र, तरीही लहान मुली गप्पा मारतात म्हणून तोंडात पाणी भरून गौरी आणायची प्रथा होती. 
मनीषा जोशीराव यांनी सांगितले, ‘गौरी घरी आणल्यानंतर त्यांना एका वाटीमध्ये वस्त्रावर खडे ठेवले जातात. त्यांची रीतसर पंचामृती पूजा केली जाते. गौरी पूजनाच्या दिवशी घावन-घाटल्याचा नैवेद्य दाखवला जातो. तांदुळाचे पीठ पाण्यामध्ये कालवून त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून धिरडे केले जाते. त्याला घावन म्हणतात. तर, घाटले हे नारळाच्या दुधापासून केले जाते. नारळाचे दूध, गूळ, वेलची, थोडेसे तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरून घाटले केले जाते. जेवणामध्ये इतर नेहमीचे पदार्थही असतातच, पण खड्यांच्या गौरींना घावन-घाटल्याचा नैवेद्य लागतोच. कोकणामध्ये नारळ आणि तांदूळ भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्यातूनच या नैवेद्याची प्रथा आली असावी. तिसऱ्या दिवशी या गौरींचे विसर्जन केले जाते, म्हणजेच खडे पुन्हा नदीत सोडले जातात.’ 

सध्याच्या काळात नदीवरून खडे आणणे हा प्रकार जवळपास बंद झाला आहे. मनीषा जोशीराव सांगतात, ‘मी घरातल्या तुळशीच्या कुंडीमधून पाच खडे आणते. कारण पाच खडे मिळणेसुद्धा अवघड झाले आहे. गौरी आगमनाच्या दिवशी तुळशीची कुंडीच बाहेर नेते. पूजा करते आणि कुंडीतील खडे घरात आणते. विसर्जन झाले, की पुन्हा कुंडीतच ठेवते.’

गंगा गौर
ही गौर पाणवठ्यावरून आणतात. हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही गौर मुखवट्यांची नसते, तर यात नैसर्गिक वनस्पतींचा वापर आढळतो. या गौरी विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात बसवतात. वृंदा कुवळेकर यांनी सांगितले, की गौरी आगमनाच्या दिवशी घरातील दारापासून ते गौरी बसवायच्या स्थानापर्यंत हळदी-कुंकवाची पावले काढतात. घरातील सवाष्ण बायका पाणवठ्यावर जातात. पाणवठ्याची पूजा करतात, साखर-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतात. काकडीने ओटी भरतात. नंतर पाणवठ्यातील पाणी कलशात घेतात. त्यात सुपारी, हळकुंड, अक्षता, हळदी-कुंकू, पाच खडे घालतात. कलशावर  हळदी-कुंकवाचे पट्टे ओढतात. नंतर त्यात गौरीची म्हणजेच तेरड्याची मुळासकट पाने, तुळस, दूर्वा, आघाडा आणि चाफ्याची पाने घालतात. हीच गंगा गौर होय. त्यानंतर गौरीची पूजा करतात. सुवासिक फुले, कापसाचे वस्त्र वाहतात. तिला साखर-खोबरे, काकडीचा नैवेद्य दाखवतात. तिची आरती करतात आणि तिला वाजतगाजत घरी आणतात. ज्या सवाष्णीने गौर घेतलेली असते, तिने मुक्याने चालावे अशी परंपरा आहे. गौर दारात आली की ज्या सवाष्णीने गौरीला हातात घेतले आहे तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळदी कुंकू लावून, औक्षण करून घरात घेतात. 

गौर घरात आणताना ‘गौर कशाच्या पावली आली, सोन्या मोत्याच्या पावली आली,’ असे म्हणत घरात आणतात. त्यानंतर त्यांना दूधदुभत्याची जागा, कोठीची खोली, गणपती, देवघर दाखवून मग तिची स्थापना करण्याचा रिवाज आहे. या दिवशी गौरीला भाजी भाकरी, मुगाची खिचडी, कढी, कारळाची चटणी असा नैवेद्य असतो. भाजीमध्ये प्रामुख्याने मेथी, शेपू, भोपळ्याचा पाला, मूग, उडीद यांचा पाला इत्यादींचा समावेश असतो. 
दुसऱ्या दिवशी गौरीची यथासांग पूजा करून तिला पुरणपोळी, खीर असा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी एका सुवासिनीला भोजनासाठी बोलावतात व तिची ओटी भरतात. 
तिसऱ्या दिवशी गौरीची पूजा, आरती करून तिला मुरडीच्या करंजीचा नैवेद्य दाखवतात. गौरीला पुढील वर्षी परत येण्याचे आवाहन करतात. गौरीबरोबर दहीभात, करंजी, पाटवडी असा शिधा देऊन तिचे विसर्जन करतात. घरी परत येताना पाच खडे बरोबर घेऊन येतात आणि ते घरात ठेवतात. त्यामुळे घरात समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. 

शुभांगी खासबागदार यांनी सांगितले, की कोल्हापूर, सांगली, सातारा भागात श्रावण महिन्यात ज्येष्ठा गौरीची शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा केली जाते. पूर्वी गृहिणी मातीच्या सुगडावर कावेने रंगवून गौरीचा मुखवटा तयार करीत. आता तांब्याचा तांब्या व पितळी वाटीवर ऑइलपेंटने रंगवून गौर आणली जाते. पितळी वाटीवर गौरीचा मुखवटा व तांब्यावर सूर्य, चंद्र, कमळ, स्वस्तिक, शंख, चक्र, लक्ष्मीची पावले ही शुभ चिन्हे काढली जातात. हळदी-कुंकवाचा करंडा, पाळणा, तुळशी वृंदावन, नाग याशिवाय मंगळसूत्रही काढले जाते. तांब्यामध्ये सुपारी, हिरव्या बांगड्या, 
हळद-कुंकवाची पुडी घालून एकात ज्वारी व एकात तांदूळ घालतात. वाटी तांब्यावर झाकून खण पांघरतात. विड्याचे पान व सुपारी, दक्षिणा ठेवून घरातील गृहिणी तिला आमंत्रण देते. हळद, कुंकू, अष्टगंध, फुले, अत्तर, वस्त्रमाळा अर्पण करून पूजा केली जाते. माहेरवाशीण म्हणून काकडीने (वाळूक) तिची ओटी भरली जाते. घरात सर्वांना सुख, शांती, समाधान, दीर्घायुष्य मिळावे म्हणून या गौराईची प्रार्थना करतात आणि शेवयांची खीर, करंजीचा नैवेद्य दाखवतात. भाद्रपद महिन्यात सप्तमीला कनिष्ठा गौर व गंगा गौरीचे आगमन होते. कलशात चार खडे, सुपारी, नाणे, दूर्वा घालून गंगा म्हणूनच पाणी घालतात. पाच चाफ्याची पाने, तेरडा, रानफुलांचा फुलोरा तयार करून तो कलशावर बांधतात. मणीमंगळसूत्र, अलंकार, वस्त्रमाळा घालून तळ्याकाठी या कलशाची व गणपतीची पूजा करतात. नंतर घरातील कुमारिकेच्या हातून वाजतगाजत गौर घरी आणतात.

महाराष्ट्रामध्ये चैत्रातही गौरीची पूजा केली जाते. त्यानिमित्त हळदी-कुंकवांचेही आयोजन होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अक्षय तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते. 
 

संबंधित बातम्या