रूपे गणेशाची

इरावती बारसोडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
 

यंदा पावसामुळे बाजारात गणेशमूर्ती जरा उशिराच आल्या. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामधील पुराचा फटका गणेशमूर्तींनाही बसला आहे. काही ठिकाणी यावेळी मूर्ती नेहमीपेक्षा कमी आल्या आहेत. काही विक्रेत्यांकडे मात्र नेहमीच्याच संख्येने मूर्ती आल्या आहेत. पण, यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमू्र्तींच्या किमती नक्कीच वाढल्या आहेत. शाडू मातीच्या बहुतांशी मूर्ती पेणहून येतात. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींच्या किमतीही नेहमीपेक्षा वाढल्या आहेत. शाडू मातीच्या गणेशमूर्तींची किंमत पीओपीच्या गणपतींपेक्षा जास्तच असते. 
पीओपीमध्ये अगदी १०१ रुपयांपासूनसुद्धा मूर्ती उपलब्ध आहेत. पाच इंचांची मूर्ती १०१ रुपयांमध्ये मिळू शकेल. मूर्तीचा आकार जसजसा वाढेल, तसतशा किमतीही वाढत जातात. साधारण सात हजार रुपयांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. नऊ इंचाची मूर्ती साधारण ७०० रुपये, एक फुटाची १,२०० रुपये, दोन-अडीच फुटांची तीन हजार रुपये आणि तीन-साडेतीन फुटांची मूर्ती सहा हजार रुपये अशा किमती आहेत. या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. 

शाडू मातीमध्ये पाच-सहा इंचांपासून २२-३० इंच मोठ्या मूर्ती उपलब्ध आहेत. पाच-सहा इंचाच्या मूर्तीची किंमत साधारण ४२५-४५० रुपये अशी आहे. शाडूमातीमध्येही मूर्तीचा आकार वाढला, की किंमतही वाढते. साधारण चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत शाडू मातीच्या मोठ्या मूर्तीही उपलब्ध आहेत. मूर्तींमध्ये प्रचंड वैविध्य पाहायला मिळत आहे. शाडू मातीच्या मूर्तींमध्ये गेल्या एक-दोन वर्षांपासून मुलतानी मिट्टी, हळद, काव यांसारख्या नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्ती लोकप्रिय होत आहेत. तसेच नेहमीच्या सिंहासनावर बसलेला, कमळामध्ये बसलेला, लोडावर टेकून बसलेला गणपती या मूर्तीदेखील आहेतच. शाडू मातीमध्ये फारसे आकार करता येत नसले; तरीही फेटा घातलेला, उंदरावर बसलेला अशा नेहमीच्या मूर्ती आहेतच. शाडू मातीच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करता येते, त्यामुळे या मूर्ती घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे, अशी माहिती पटवर्धन फूड्सच्या अजित पटवर्धन यांनी दिली. 
पीओपीच्या मूर्तींमध्ये पुण्याचे मानाचे तुळशीबाग, केसरीवाडा, दगडूशेठ, जिलब्या मारुती, मंडईचा शारदा गजानन, मुंबईचा लालबागचा राजा या गणपतींच्या प्रतिकृतीही उपलब्ध आहेत. तसेच कृष्णावतार, विठ्ठल गजानन, राधा कृष्ण अशा इतर देवांच्या रूपांमधला गणेशही आहे. बालगणेशाचीही अनेक रूपे पाहायला मिळतील. कधी लाडवांची रास समोर घेऊन बसलेल्या, तर कधी आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या बालगणेशाच्या लोभसवाण्या मूर्ती बाजारात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. उंदीर हे तर गणेशाचे वाहन. त्यामुळे मुषकारूढ गजाननाचे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. त्याशिवाय तीनमुखी हत्तीवर बसलेला, मोरावर बसलेला आणि अगदी नागावर बसलेला बाप्पासुद्धा यंदा पाहायला मिळतो आहे. 

विविध रंगसंगतींमध्ये रंगवलेल्या गणपतीचेसुद्धा भरपूर प्रकार पाहायला मिळतील. फक्त मोतिया रंगामध्ये रंगवलेला सिंहासनावर बसलेला गणपती लक्ष वेधून घेतो, तर कृष्णावतारी गजानन निळ्या रंगामध्ये उठून दिसतो. थोडक्यात काय, तर लाडक्या बाप्पाच्या विविध रूपांनी बाजार सजला आहे.    

तुळशीच्या बिया असलेला बाप्पा
काही शाडू मातीच्या मूर्तिविक्रेत्यांकडे मूर्तीमध्ये तुळशीसारख्या झाडांच्या बिया असलेले गणपती आले आहेत. पटवर्धन फूड्सच्या अजित पटवर्धन यांनी सांगितले, की ही मूर्ती पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. मूर्ती चिकणमातीपासून तयार केलेली असून भरीव आहे. त्यामुळे तिचे वजनही जास्त आहे. मूर्ती रंगवताना हळद, काव यांसारखे नैसर्गिक रंग वापरण्यात आले आहेत. ही मूर्ती पूर्ण नैसर्गिक असल्यामुळे तिची किंमतही इतर मूर्त्यांच्या मानाने जास्त आहे. साधी मूर्ती जर ७५० रुपयांना मिळत असेल, तर त्याच आकाराची ही मूर्ती १,५०० रुपयांपर्यंत मिळते. विसर्जन करताना ही मूर्ती कुंडीमध्ये ठेवायची आणि वरून फक्त पाणी ओतायचे. मूर्तीचेही विसर्जन होते आणि नवीन वृक्षलागवडही होते. 

ब्लॅक अँड व्हाइट बाप्पा
यंदा ब्लॅक अँड व्हाइट कलर कॉम्बिनेशन केलेल्या गणेशमूर्ती बाजारात आल्या आहेत. यामध्ये मूर्तीच्या अंगाला स्कीन कलरऐवजी काळ्या आणि पांढऱ्या रंगाची रंगसंगती करून रंग दिलेला दिसतो. बाप्पाच्या अंगावरील आभूषणे, मुकुट, त्याचे सोवळे आणि कपाळावरील गंध या गोष्टी रंगीत रंगांनी रंगविलेल्या आहेत. बाप्पाचे डोळेसुद्धा काळ्या आणि पांढऱ्या रंगांनीच रंगवलेले आहेत. या वेगळ्या रंगसंगतीमुळे हा बाप्पा नेहमीपेक्षा नक्कीच थोडा वेगळा दिसतो, पण सुरेख दिसतो.
 

संबंधित बातम्या