तयारी बाप्पाच्या स्वागताची

ज्योती बागल 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

गणेशोत्सव म्हटलं, की एक वेगळाच उत्साह, जल्लोष सर्वत्र पाहायला मिळतो. कारण बाप्पा वर्षातून एकदाच येतात आणि येतानाच मांगल्याचं, चैतन्याचे वातावरण सोबत घेऊन येतात. अशा आपल्या मंगलमूर्ती बाप्पाचं मग त्यांच उत्साहात स्वागत व्हायला हवं या उद्देशानेच प्रत्येक भक्त तयारीला लागलेला दिसतो. खरं तर या उत्सवाची सुरुवात ही गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच सुरू होऊन बाजार पेठांमधील खरेदीसाठीची लगबग वाढते. गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश मूर्ती बुक करणे, गौरींचे मुखवटे खरेदी करणे, गौरी-गणपतीच्या सजावटीचे साहित्य, गणपती बाप्पाच्या आराशीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करणे सुरू होते. सध्या बाजारपेठा बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी गजबजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात नवीन गणेशमूर्तींचा ट्रेंड कोणता आणि बाजारात उपलब्ध असलेल्या सजावटीच्या साहित्याविषयी...

यंदा गणेशमूर्तीमध्ये तुळशीबाग, लाल बागचा राजा, गुरुजी तालीम, कसबा गणपती, शिवरेकर, दगडूशेठ, फिलिप्स, नाना पाटेकर गणपती, चौरंग,  आसनमांडी.... हे नेहमीचे प्रकार दिसतात. तर फॅन्सी लूकमध्ये मूषकावर बसलेली गणेश मूर्ती, बाळ कृष्णाच्या अवतारातील गणेशमूर्ती, कमळ, पिंपळाचे पान व जास्वंदीच्या फुलांमध्ये विराजमान झालेली गणेशमूर्ती, हनुमान, विठ्ठल यांच्या रूपातील गणेश मूर्ती पहावयास मिळत आहेत. घरगुती पूजेसाठी लागणाऱ्या गणेश मूर्ती सहा इंचापासून ते अडीच फुटापर्यंत उपलब्ध आहेत. जास्त करून घरगुती पूजेसाठी सहा इंच, नऊ इंच आणि अकरा इंच उंचीच्या मूर्ती खरेदी केल्या जातात. यांच्या साधारण किमती ९०० रुपयापासून ते ६ हजार रुपयांपर्यंत आपण घेऊ तशा आहेत. 

पारंपरिक गणेश मूर्तीमध्ये शिवरेकर, टिळक पगडी, चौरंग, बैठा चौरंग, मध्यम चौरंग, शारदा गणपती, दगडूशेठ गणपती, लोडावर टेकलेली गणेश मूर्ती या मूर्ती दिसतात.

काही मूर्तींना एकदम नैसर्गिक रंग वापरून रंगवले आहे; तर काही मूर्तींच्या मुकुटावर खड्यांची आरास दिसते; तर काही फेटेधारक मूर्तींना चमकीचा मुलामा चढवला आहे. मूर्तीवर कलर कॉम्बिनेशन करताना फेटा किंवा मुकुटाचा रंग आणि धोतर यांचा रंग मॅच केलेला दिसतो. जरी शाडूच्या मूर्तींना मागणी असली तरीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीदेखील मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत.

गौरींचे मुखवटे आणि तयार बॉडी
गौरींचे मुखवटे तीन साईजमध्ये उपलब्ध असतात, लहान,मध्यम आणि मोठ्या आकारात आहेत. मुखवट्यांच्या आकारानुसार किमतीत थोडाफार फरक होतो. तरी यामध्ये मध्यम साईजला जास्त मागणी आहे.काही मुखवटे एकदम साधे आहेत, त्यांच्यावर कसल्याही प्रकारच्या दागिन्यांची नक्षी नसते,तर काही मुखवट्यांना खड्यांच्या दागिन्यांची नक्षी असते. साध्या मुखवट्यांची जोडी साधारण पाचशे रुपयांपर्यंत मिळते, तर दागिन्यांची नक्षी असलेले मुखवटे ९०० रुपयांपासून पुढे मिळतात. 
पूर्वी गौरीचे बॉडी पार्टस हे कापडी हात आणि लोखंडी स्टॅंडमध्ये उपलब्ध असायचे. पण अलीकडच्या काळात त्यातही बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. गौरींचे मुखवटे हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये उपलब्ध आहेत. तर बॉडी पार्टस किंवा पूर्ण बॉडी ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सागवानी लाकूड या मटेरिअलमध्ये उपलब्ध आहेत. फायबरपासून तयार केलेले बॉडी पार्टस हे जास्त टिकाऊ असतात, पण त्याची किंमतही जास्त आहे. फायबरपासून तयार जोडी तीन हजार रुपयांपासून पुढे आहे. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची तयार जोडी बाराशे रुपयांपासून पुढे मिळतात. 
गौरीच्या बाळाचे मुखवटे आणि पूर्ण बॉडीदेखील सर्व प्रकारच्या मटेरिअलमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सागवानी लाकूड इत्यादी.यामध्ये मुलगा मुलगी अशी जोडी पाहायला मिळते. मुलांचे टोपीवाले, पगडीवाले मुखवटे उपलब्ध आहेत तर मुलींचे मुकुटवाले मुखवटे पाहायला मिळतात. यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जोडी आठशे रुपये तर फायबरची जोडी पंधराशे रुपयांपर्यंत आहे. साईजनुसार किंमत कमी जास्त होते. 

गौरीच्या दागिन्यांमध्ये.....
गौरीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बिंदी, नथ, गळ्यातले हार, मंगळसूत्र, डोरली, बांगड्या, बाजूबंद, झुबे, कमरपट्टे, छल्ला, कानातले वेल उपलब्ध आहेत. गोल्डन आणि मोत्यांच्या मुकुटला जास्त मागणी आहे. यांच्या साधारण किमती पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आहेत. ठुशीमध्ये अनेक डिझाईन उपलब्ध असून बेंटेक्‍समध्ये यांच्या साधारण किंमत नऊशे रुपयांपासून पुढे घेईल तशा आहेत. तर हारांमध्ये मोत्यांचे हार, वेगवेगळ्या आणि रंगीत स्टोनचे हार, गोल्डन मस्तानी हार, बोरमाळ, गंठण इत्यादी प्रकार आहेत. मोत्यांचे हार साधारण साडेपाचशेपासून तर स्टोनचे हार सहाशे रुपयांपासून  पंधराशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नथीमध्ये मोत्यांच्या पारंपरिक नथींना जास्त मागणी आहे. यात बानूची नथ, म्हाळसाची नथ, काशीबाईची नथ असे प्रकार पाहायला मिळतात. नथींच्या सर्वसाधारण किंमती दीडशे रुपयांपासून पुढे आहेत. 
हल्ली गौरीलादेखील मोठ्या आकारातले झुबे घेतले जातात. झुब्यांच्या किंमती तीनशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत आहे. गोल्डन बांगड्यांचा सेट हा दीडशे रुपयांपासून पुढे घेईल तसा आहे, तर चमकी असलेल्या काचेच्या मॅचिंग बांगड्यादेखील गौरीसाठी घेतल्या जात आहेत. या सेटची किंमत साठ रुपये आहे. कमरपट्टे हे अनेक प्रकारात आहेत. त्यांच्या साधारण किंमती तीनशे रुपयांपासून पुढे आहेत. तर बाजूबंदच्या किंमती अडीचशेपासून पुढे आहेत. दागिन्यांचा पूर्ण सेट घेणाऱ्यांमध्ये मस्तानीच्या दागिन्यांना भरपूर मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

गणपतीचे दागिने
गणपतीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, फेटा, शेला, सोंडपट्टी, मोत्यांचे हार, माळा, जास्वंदीचे फूल, दूर्वा, दूर्वा हार, मोदक, मोदक हार, त्रिशूळ, परसू, तोडे, केळीचे पान, उपरणे, मखर, कान, कमरपट्टा यांचा समावेश दिसतो. शेल्यामध्ये गोल्डन शेला उपलब्ध असून त्यावर रंगीत खड्यांची नक्षी आहे. याच्या साधारण किंमती साडेपाचशेरुपयांपासून पुढे आहेत. मुकुट हे तीनशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर फेटे हे अगदी साठ रुपयांपासून उपलब्ध आहेत. यामध्ये साधा फेटा आणि पगडी फेटा असे दोन प्रकार पाहायला मिळतात. पगडी फेटा हा दिसायला खूप आकर्षक आणि वेगळा असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. याची किंमत १३० रुपये आहे. खास गणपतीसाठी मोदक आणि दूर्वा हार बाजारात उपलब्ध आहेत. यांच्या किमती पाचशे रुपयांपासून पुढे आहेत. 

सजावटीचे साहित्य...
गौरी गणपतीच्या सजावटीसाठी आवर्जून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे गणपतीसाठी वेलवेट किंवा रेशीम कापडापासून तयार केलेला शेला आणि आसन, रंगीत फुलांचे हार, मोत्यांच्या माळा, झिरमाळ्या, प्लॅस्टिकचे चमक असलेले बॉल, वेगवेगळ्या आकारात चमकीच्या कागदापासून तयार केलेले ऑलपीस, प्लास्टिकच्या मान्यांपासून तयार केलेल्या माळा, चमकीच्या टिकल्यांचा वापर करून बनवलेले पडदे, रेशीम कापडापासून तयार छत आणि मंडप इत्यादी. तसेच मंडपाला लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीम आणि जाळीच्या झालरी इत्यादींचा समावेश दिसतो. गणेशमूर्तीच्या आकारानुसार शेला आणि आसन उपलब्ध असून हे अगदी १० ते १५० रुपयांपर्यंत मिळतात. प्लॅस्टिकचे चमकणारे बॉल हे ११० रुपये, १८० रुपये पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. एका पॅकेटमध्ये साधारण ६ बॉल असतात. तर कापडाचा मंडप टाकण्याऐवजी बरेच लोक फक्त चमकीची जाळी आणि मण्यांच्या माळांच्या लटकनी लावून मंडप तयार करतात. ही मण्यांची एक माळ १० ते ३० रुपयांच्या दरम्यान मिळते. फुलांचे हार हे ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
बॅकड्रॉपसाठीदेखील छान आणि आकर्षक पडदे बाजारात उपलब्ध आहेत. तर तयार मंडत हे ३×३, ४×४, ६×६ या आकारात उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किंमती अडीच हजारांपासून ते पाच हजारापर्यंत आहेत. गेल्या दोन वर्षात झालेल्या नोटबंदी आणि जीएसटीचा परिणाम प्रत्यक्ष जाणवत नसला तरीही मार्केट जरा शांतच असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
(लेखात दिलेल्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो)

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सुशिक्षित नागरिकांचा कल वाढला आहे. त्यासाठी घरच्या घरीच बादलीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता यावे यासाठी लोक शाडू मातीच्या मूर्तींबाबत आग्रही असून छोट्या आकारातल्या मूर्तींना प्राधान्य देत आहेत.
- मिलिंद दाते, विक्रेते

सध्या गणेश मूर्तीमध्ये अनेक डिझाईन उपलब्ध आहेत,पण घरगुती पूजेसाठी शाडू मातीच्या छोट्या आणि फॅन्सी गणेश मूर्तींना जास्त मागणी आहे.
- मनीषा चंदेल, विक्रेत्या

संबंधित बातम्या