बाप्पाची विविध रुपे...

समृद्धी धायगुडे 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
आपली संस्कृती उत्सवप्रिय आहे. नवरात्र, गोकुळाष्टमी यासारख्या सणांना काही खास पेहराव,ॲक्‍सेसरीज व दागदागिने वापरले जातात. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या आकर्षक ॲक्‍सेसरीज आणि नावीन्यपूर्ण पोशाख बाजारात आले आहेत. या ट्रेंडविषयी...

कपडे
आपल्या रोजच्या पेहरावातील बऱ्याच कपड्यांवर विशेषतः टीशर्टवर, कुर्तीजवर, स्टोल, साडीवर गणेशाची विविध कलरफुल रूपे सध्या प्रिंट करून मिळतात. काही नामांकित ब्रॅण्डच्या दुकानात हे टीशर्ट हमखास मिळतात. कस्टमाइज कुर्ती किंवा टीशर्टची सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही ती जरूर ट्राय करू शकता. कपड्यांमध्ये स्टोल, स्कार्फ, कुर्ती, टीशर्ट, मुलांसाठी शॉर्ट कुर्ते तसेच विविध हॅन्ड बॅग, क्‍लच, पर्ससारखे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

गॅजेट्‌स कव्हर
बुद्धीची देवता असल्याने तिची मूर्ती किंवा तिचे अस्तित्व विविध रूपाने भक्त जपत असतो. याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे सध्याची गॅजेट्‌स. सर्व गॅजेट्‌सवरून मोठे व्यवहार किंवा कल्पक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे बहुतेक व्यापारी वर्गाच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनला गणेशाचे सुंदर रूप असलेली लॅपटॉप कव्हर, मोबाईल कव्हर त्यावरील वॉलपेपर, जीआयएफ इमेजेस ठेवलेल्या दिसतात.

ज्वेलरी
ज्वेलरी हा सध्या प्रत्येक तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे मुलांसाठी आणि मुलींसाठी गणेशाच्या रूपातील पेंडन्ट, अंगठी, ब्रेसलेट, कानातले अशी ज्वेलरी मिळते. यात फक्त गणपतीच्या आकृत्या नाही तर त्याचे मोजके मंत्र, नावे देखील कस्टमाइज करून घेता येतात. मुलांना विशेषतः गणपतीचे पेंडंट असलेली चेन उठून दिसते. महिलांमध्ये कलकत्ती प्रकारातील उठावदार ज्वेलरीत गणपतीचे मोठे पेंडंट असलेले गळ्यातले छान दिसते. हे सर्व प्रकार इमिटेशन ज्वेलरीत उपलब्ध आहेत.

स्टेशनरी
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात जसे गणपतीचे खास स्थान आहे तसे विविध शैक्षणिक साहित्यातसुद्धा ते प्रतिबिंबित होताना दिसते. मोठ्या स्टेशनरी दुकानात कॉफी मग, पेनस्टॅण्ड, पॅड, वह्या, स्टिकर्स, घड्याळे, किचन या छोट्या छोट्या दिसणाऱ्या वस्तूंवरही आपल्याला गणपतीचे अस्तित्व दिसते.

गृहसजावट
बहुतेक हिंदू घरामध्ये गणपतीची किमान एक तरी फ्रेम असतेच. देवघर किंवा दिवाणखान्यात गणपतीच्या पेंटिंगसाठी, शिल्प ठेवण्यासाठी, वॉलपीससाठी खास राखीव जागा केलेली असते. त्यामुळे गृहसजावटीतही गणपतीचे अस्तित्व पाहायला मिळते. याशिवाय थ्रीडी प्रिंटिंगमुळे घरातील विशेषतः दिवाणखान्यातील सोफ्यावरील पिलोज, पडदे, देवघरातील काचेवर, नेमप्लेट व टाइल्सवरदेखील गणपती कोरलेले दिसतात. 

संबंधित बातम्या