खिरापतीचा प्रसाद

सुप्रिया खासनीस
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

गुलकंदाचे (तळणीचे मोदक)
साहित्य : एक वाटी रवा, एक वाटी मैदा, मोहनासाठी पाव वाटी तेल किंवा तूप, पुरेसे दूध, दोन वाट्या तयार गुलकंद, अर्धी वाटी काजू व बदाम यांचे तुकडे, तळणीसाठी तूप अथवा रिफाइंड तेल 
कृती : तेल अथवा तूप गरम करून रवा मैदा यांच्यात घालावे. ते एकसारखे कालवावे. नंतर दूध घालून रवा-मैदा घट्ट भिजवावा. गुलकंदमध्ये काजू व बदाम यांचे बारीक तुकडे घालून सारण एकसारखे तयार करावे. रवा व मैदा चांगला दोन तास तरी भिजावयास हवा. नंतर चांगले कुटून त्याच्या गोळ्या कराव्यात. गोळ्यांच्या पुऱ्या लाटून (पारी) त्याला मोदकाचा आकार देऊन त्या तयार वाटीत सारण भरावे व मोदकाच्या मुखऱ्या बंद करून, मोदक मंद आचेवर तळावेत. गुलकंदामुळे सुंदर स्वाद येतो.

खांडवीच्या वड्या
साहित्य : दोन वाट्या तांदळ्याचा रवा, दीड ते दोन वाट्या साखर किंवा गूळ, थोडेसे मीठ, पुरेसे तूप व वेलदोडा पूड, १ मध्यम आकाराच्या नारळाचा खवलेला चव
कृती : तांदळाचा रवा तुपावर चांगला गुलाबीसर होईपर्यंत भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात गूळ किंवा साखर घालावी. चवीला थोडेसे मीठ घालावे व चांगली उकळी आल्यावर भाजलेला रवा त्यात घालून मंद आचेवर चांगला शिजवावा. वेलदोडा पूड घालावी. चांगला शिजवून घट्ट झाल्यावर ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण ताटावर ओतावे. वर ओले खोबरे घालून वड्या थापाव्यात व नंतर कापाव्यात.

बटाट्याच्या वड्या
साहित्य : बटाटे, साखर, वेलदोडा पूड, पुरेसे तूप
कृती : बटाटे उकडून ते पुरणयंत्रातून वाटून घ्यावेत. याप्रमाणे वाटलेला गोळा दोन वाट्या, साखर दोन वाट्या, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे असे सर्व एकत्र शिजत ठेवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून चांगले घोटावे, त्यात वेलदोडा पूड घालावी. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा ठेवून गोळा लाटावा व वड्या पाडाव्यात.

ओल्या खोबऱ्याचे लाडू
साहित्य : एक मोठा नारळ, दोन ते अडीच वाट्या साखर, वेलची पूड, काजू बदाम यांचे बारीक तुकडे, अर्धी वाटी, थोडी चारोळी, दोन चमचे घट्ट साय
कृती : प्रथम खोवलेल्या नारळामध्ये दोन ते अडीच वाट्या साखर व घट्ट साय घालून मिश्रण पातेल्यात एकसारखे करावे. नंतर मंद गॅसवर पातेले ठेवून शिजत ठेवावे. मधून मधून मिश्रण हलवत राहावे. मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण शिजू द्यावे. कडेला कोरडी साखर दिसू लागली, की त्यात वेलची पूड व काजू बदाम, चारोळी घालावी व लगेच कोमट असताना लाडू वळावेत.

गाजराचे लाडू
साहित्य : दोन वाट्या गाजराचा कीस, दीड वाटी खोवलेले (ओले) खोबरे, एक वाटी चिरलेला गूळ, तूप ३-४ चमचे वेलदोडा दाणे
कृती : गाजरे चांगली धुवून व किसून घ्यावीत. नंतर बारीक किसणीने किसावीत. कीस शक्‍यतो बारीक असावा. तो कीस, गूळ खोबरे व तूप सर्व एकत्र करून मिसळावे व शिजावयास ठेवावे. मिश्रण पूर्ण शिजवून घ्यावे. त्यात वेलदोड्याचे दाणे घालावेत आणि लाडू वळावेत.

फरसी पुरी
साहित्य :  दोन वाट्या मैदा, एक वाटी ह. डाळीचे पीठ, तिखट, मीठ, ओवा मिरपूड
कृती :  प्रथम मैद्यामध्ये मीठ, मिरपूड व तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावे. नंतर डाळीचे पिठात तिखट मीठ ओवा व तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवावे. दोन्ही साधारण अर्धा ते एक तास भिजू द्यावे. नंतर दोन्ही पीठाच्या वेगवेगळ्या गोळ्या कराव्यात. जितक्‍या मैद्याच्या गोळ्या होतील तेवढ्या डाळीच्या पिठाच्या गोळ्या कराव्यात. नंतर मैद्याच्या प्रत्येक लाटीत (मैद्याचा उंडा करून) त्यात डाळीच्या पिठाची एक गोली घालून मैद्याच्या लाटीचे तोंड बंद करावे व त्याची पुरी लाटावी. पुरीला वरून सुरीने २ ते ४ टोचे मारावेत म्हणजे पुरी फुगणार नाही व खुसखुशीत होईल. (एक वाटी मैद्याला दोन चमचे मोहन घालावे.)

शिरा
साहित्य : एक वाटी रवा, एक वाटी साखर, पाऊण वाटी तूप, दोन ते तीन वाट्या दूध, पुरेसे काजू बदाम, बेदाणे व वेलदोडा पूड
कृती : प्रथम रवा तुपावर चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजावा. एका बाजूला दूध गरम करायला ठेवावे. रवा भाजून झाल्यावर त्यात गरम दूध घालून चांगले हलवावे व त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर दूध एकजीव झाल्यावर त्यात साखर घालावी व मंद गॅसवर ठेवून हलवत राहावे. साखर विरघळली, की त्यावर झाकण ठेवून एक वाफ आणावी वाफ चांगली आल्यावर त्यात काजू बेदाणे, बदाम घालून एकसारखे करावे. जरा कोमटसर झाल्यावर मिश्रणामध्ये वेलदोडा पूड घालावी व एकसारखे करावे.

वाटली डाळ
साहित्य :  दोन वाट्या चण्याची डाळ, सात-आठ ओल्या मिरच्या, मीठ, साखर, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता
कृती : प्रथम डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर ती रोळीत उपसून घ्यावी. मिरच्या घालून ती जाडसर वाटावी. नंतर जरा जास्त तेल घेऊन फोडणी करून त्यात कढीपत्ता घालावा व वाटलेली डाळ घालावी. चांगली मोकळी होईपर्यंत शिजू द्यावी. वाफ आल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सारखे हलवावे. त्यावर झाकण ठेवून पुन्हा वाफ आणावी. डाळ पूर्ण मोकळी झाली की गॅस बंद करावा व नंतर ओले खोबरे कोथिंबीर घालावी.

लिंबाची रसाची डाळ (कच्ची)
साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, सात-आठ ओल्या मिरच्या, मीठ, साखर, कोथिंबीर, कढीपत्ता, दोन चांगली लिंबे, फोडणीचे साहित्य
कृती : प्रथम डाळ चार ते पाच तास भिजत घालावी. नंतर ती रोळीत उपसून घ्यावी. मिरच्या घालून ती जाडसर वाटावी. नंतर तेल घेऊन त्यात फोडणीचे साहित्य व कढीपत्ता घालून फोडणी करावी व ती गार करावा. वाटलेल्या डाळीत साखर, मीठ व दोन लिंबाचा रस गालून एकत्र कालवावे. नंतर गार झालेली फोडणी घालावी व त्यावर कोथिंबीर घालून एकसारखी करावी. ही खिरापत गणपती विसर्जनाच्या दिवशी विशेष केली जाते.

मैद्याची खारी पुरी
साहित्य :  अडीच वाट्या मैदा, एक चमचा जाडसर मिरेपूड, दोन चमचे जिरे पूड, चवीपुरते मीठ, थोडी हळद, तेल
कृती : मैदा, मिरपूड, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ व हळद घालून अर्धी वाटी तेल घालून पाण्याने भिजवून ठेवावे. नंतर एक तासाने चांगले मळावे. मग साधारण लहान आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या पातळ लाटाव्यात. त्यावर सुरीने टोचे पाडून अर्धा पाऊण तास सुकत ठेवाव्यात. नंतर पुऱ्या तेलात गुलाबी रंगावर तळाव्यात. खुसखुशीत होतात.

फोडणीचे मुरमुरे/चुरमुरे
साहित्य :  मुरमुरे, तूप किंवा तेल, लाल तिखट, मीठ, साखर, ओले खोवलेले खोबरे, कोथिंबीर, लिंबू
कृती : प्रथम मुरमुरे घेऊन त्यास तेल लावावे. तेल चुरमुऱ्यांवर दिसून येईल इतपत लावावे. नंतर मुरमुऱ्यात खोबरे, कोथिंबीर, चवीला मीठ व साखर, तिखट व थोडा लिंबाचा रस (गरजेनुसार) घालून एकसारखे कालवावे. मुरमुऱ्यांना तेलाचा हात लावल्यामुळे मुरमुरे मऊ न पडता कुरकुरीत राहतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या