मोदकांचा नैवेद्य

उमाशशी भालेराव
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

पारंपरिक उकडीचे मोदक  
उकड कशी बनवावी
तांदूळ स्वच्छ धुवून, सावलीत दोन तीन दिवस वाळवून नंतर बारीक दळून आणून, चाळून ही खास तांदूळपिढी बनवतात. पण हल्ली बाजारात मोदकासाठी खास तांदूळपिठी मिळते. तांदळाची उकड बनवताना दोन सपाट वाट्या तांदळाचे पीठ असेल, तर तितकेच म्हणजे दोन वाट्याच पाणी मोजून घ्यावे व पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात किंचित मीठ व दोन चमचे तूप (अथवा तेल) घालावे. पाण्याला उकळी आल्यावर पातेले विस्तवावरून उतरवून त्यात तांदळाचे पीठ घालून एकत्र कालवावे व नंतर पातेले पुन्हा मंद आचेवर ठेवून दोन वाफा आणून घ्याव्यात. नंतर पातेले उतरवून ही उकड ताटात अथवा परातीत काढून गरम असतानाच मळावी. (हाताने न जमल्यास पालथ्या ताटीचा उपयोग करावा) चांगले मळून गोळा बनवून ठेवावा. 
सारण बनवण्यासाठी
साहित्य : एक मोठा नारळ खोवून दोन वाट्या गूळ अथवा साखर, पाव वाटी खसखस भाजून वेलची पूड, आवडीप्रमाणे थोड्या मनुका व काजूबदामाचे काप 
कृती : खोवलेले खोबरे व गूळ अथवा साखर एकत्र करून शिजवावे. (साखरेपेक्षा गुळाचे सारण अधिक खमंग लागते पण काहींना साखरेचे सारण आवडते) त्यात भाजलेली खसखस व वेलची पूड घालावी व घट्ट शिजवून घ्यावे. आवडीप्रमाणे मनुका, काजू, बदाम काप घालून सारण तयार करावे.
कृती
उकडीची लिंबाएवढी गोळी घेऊन, पुन्हा मळून, त्याला हाताने वाटीचा आकार द्यावा व त्यात तयार सारण भरून, कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून तोंड बंद करावे. वर टोक आणावे. ७ किंवा ८ पाकळ्या यायला हव्यात म्हणजे मोदक सुबक दिसतो. तयार मोदक उकडून घेण्यासाठी मोठे मोदक पात्र व इडलीपात्र नसल्यास पातेल्यात थोडे पाणी उकळत ठेवून, उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून त्याला तेलाचा हात लावून त्यावर मोदक ठेवावेत व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. साधारण १० मिनिटात मोदक वाफवून तयार होतात. तयार मोदकांना एक प्रकारची चमक येते. गरम गरम मोदक साजूक तुपाबरोबर खाण्यास घ्यावेत. (मोदक थंड झाल्यास त्यांना थोडा पाण्याचा हात लावून मायक्रोवेव्हमध्ये ३०-४० सेकंद गरम करून घ्यावेत.)

पारंपरिक तळणीचे मोदक
साहित्य : एक वाटी मैदा (अथवा कणीक), एक वाटी बारीक रवा, चार चमचे तूप व तेलाचे मोहन,चिमूटभर मीठ, तळण्यासाठी रिफाइंड तेल (अथवा तूप) 
सारणासाठी ः एक नारळ खवून, दोन वाट्या गूळ व साखर, पाव वाटी भाजलेली खसखस, वेलची पूड, मनुका, सुकामेव्याचे काप.
कृती ः रवा मैदा एकत्र करून त्यात तूप व तेलाचे मोहन घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालून घट्ट मळून तासभर ओल्या फडक्‍याने झाकून ठेवावे. उकडीच्या मोदकाच्या कृतीत सांगितल्याप्रमाणे सारण बनवून घ्यावे. तासभर भिजवलेला रवामैदा पुन्हा छान मळून घ्यावा. त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. एक एक पुरीप्रमाणे लाटून घ्यावा. या छोट्या पुरीत सारण ठेवून सर्व कडांना मोदकाचा आकार द्यावा. व रिफाइंड तेलात व तुपात छान गुलाबी रंगावर तळून घ्यावे. 

खवा सुक्‍यामेव्याचे मोदक
तांदळाच्या उकडीमध्ये दुधात भिजवलेले केशर घालून त्याला केशरी रंग आणावा. सारणासाठी वाटीभर पिठीसाखर, वेलचीपूड, व भरपूर सुकामेव्याची भरड घालावी. हे सारण भरून उकडीचे केशरी रंगाचे मोदक बनवावेत. अधिक रंग हवे असल्यास उखडीचे तीन चार भाग करावेत. एक पांढरा ठेवून उरलेल्या भागांना आवडीप्रमाणे खाण्याचे रंग घालावेत. प्रत्येक रंगाची एक एक छोटी गोळी एकत्र घेऊन त्याचा लिंबाएवढा गोळा बनवून नेहमीप्रमाणे त्यात सारण भरून रंगीत मोदक बनवता येतात.

वेगवेगळ्या स्वादाचे मोदक
१) नारळ साखरेच्या सारणात आवडीप्रमाणे गुलकंद घालून गुलकंदाच्या स्वादाचे मोदक बनवावेत. २) गुलकंदाऐवजी व्हॅनीला इसेन्सचे तीनचार थेंब घालवेत (वेलची पूड घालू नये) व्हॅनीला इसेन्सच्या स्वादाच्या मोदक खास मुलांना आवडतात. ३) खवासाखरेच्या सारणात आंब्याच्या पल्प घालून घट्ट शिजवून घ्यावे व हे आंब्याच्या स्वादाचे सारण भरून मोदक बनवावेत. ४) खवा परतून घ्यावा व  त्यात चॉकलेट किसून घालावे अथवा चॉकलेट पावडर घालावी. जरुरीप्रमाणे पिठीसाखर मिसळावी व हे सारण भरून उकडीचे वा तळणीचे चॉकलेट स्वादाचे मोदक बनवावेत. ५) नारळ साखरेच्या सारणाऐवजी पुरणाचे सारण भरून तळणीचे मोदक बनवावेत. हे पुरणाचे मोदक खूप छान लागतात. गृहिणी आपली कल्पनाशक्ती वापरून वेगवेगळ्या आवडीच्या स्वादाचे मोदक बनवू शकतात. 

खमंग चटपटीत मोदक
अनेक वेळा सारण संपते पण उकड शिल्लक राहते. अशा वेळी त्याचे मस्त चटपटीत मोदक बनवता येतील. या उरलेल्या उकडीत किंचित मीठ, जिरेपूड, थोडा ओवा घालून पुन्हा मळावे. त्यात आपल्या आवडीप्रमाणे व उपलब्धतेप्रमाणे मटाराची उसळ, बटाट्याची सुकी भाजी, कडधान्याची सुकी उसळ असे काहीही भरून खमंग चटपटीत मोदक उकडून घ्यावेत.

ब्रेडचे झटपट मोदक
कृती : ब्रेड स्लाईसच्या कडा कापून, एक एक ब्रेड स्लाईस किंचित भिजवून, पाणी पूर्णपणे काढून टाकावे. स्लाईस हातावर घेऊन त्यात कोणतेही सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हे ब्रेडचे मोदक रिफाईन्ड तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. 

बिनसाखरेचा मोदक
उकडीच्या मोदकास बनवतो त्याप्रमाणे उकड बनवून घ्यावी. सारणासाठी - १५-२० खजूर (बिया काढून घेणे), १०-१२ सुके अंजीर, थोड्या मनुका, वेलची पूड  
कृती : खजूर अंजिराचे बारीक तुकडे करावेत व मनुकासह मिक्‍सरमधून एकजीव करून घ्यावे. थोडी वेलचीपूड घालावी.हे सारण भरून उकडीचे मोदक बनवावेत.(गरज वाटल्यास शुगर फ्री मिसळून अधिक गोडी आणता येईल)

बेक्‍ड मोदक
साहित्य : दोन वाट्‌या मैदा, अर्धी वाटी तांदळाचे पिठी, ४ चमचे तूप, चिमूटभर मीठ, गरजेप्रमाणे दूध, सारणासाठी ः २ वाट्या खवलेला नारळ, २ वाट्या साखर, पाव वाटी भाजलेली खसखस
कृती : मैदा व तांदळाची पिठी एकत्र करून त्यात चिमूटभर मीठ व ४ चमचे तुपाचे मोहन घालून  व गरजेप्रमाणे दुध घालून भिजवावे. छान मळून हा गोळा ओल्या फडक्‍याने झाकून तासभर मुरु द्यावा. नेहमीप्रमाणे सारण करून घ्यावे. मैदा तासभर भिजल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. एक एक गोळा पुरीप्रमाणे लाटून त्यात सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्यावा. ओव्हन आधीच तापवून ठेवावा. १८० अंशावर ओव्हनमध्ये तयार मोदक एका ट्रे मध्ये ठेवून भाजून घ्यावेत. १० ते १२ मिनिटांनी हलका ब्राऊन रंग आल्यावर मोदक तयार झाले असे समजावे. हे मोदक छान खुसखुशीत होतात.

सफरचंदाचे बेक्‍ड मोदक
वर सांगितल्याप्रमाणे मैदा मळून घ्यावा. सारणासाठी ः दोनतीन सफरचंदे साल काढून बारीक चिरुन घ्यावीत. त्यात ४-५ चमचे पिठीसाखर मिसळून घट्ट शिजवून घ्यावे. नंतर पाणी सुटू नये म्हणून चमचाभर.. कॉर्नफ्लॉवर मिसळावे. थोडी दालचिनी पूड घालावी. 
हे सारण भरून बेक्‍ड मोदक बनवावेत. हे मोदक ’ॲपलपाय’ प्रमाणे चविष्ट लागतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या