मराठी डान्सर्स

पूजा सामंत 
गुरुवार, 22 मार्च 2018

डान्स आणि डान्सचे विश्‍व हे आजच्या जगात अतिशय लोकप्रिय आहे. बहुतेक वाहिन्यांवर नृत्यावर आधारित रिॲलिटी शोज दिसतात. यात सगळ्या स्पर्धकांना छान नाचवून त्यांना जिंकवून देणारे अनेक मराठमोळे शिलेदार आहेत. नामांकित कोरिओग्राफर्सच्या तुलनेत तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या या हाडाच्या नृत्यदिग्दर्शक युवकांना बहुतेक वेळा त्यांचे श्रेय मिळतही नाही, पण विनातक्रार काम करणारे हे कोरिओग्राफर्स झपाटल्यासारखे काम करत असतात.. सुटी घेणेदेखील अपराध ठरावा, इतकी जीवघेणी स्पर्धा येथे आहे.

वैभव घुगे 
कोरिओग्राफर वैभव घुगे गरीब कुटुंबात वाढला. त्याचे वडील पोलिस खात्यात, तर आई गृहिणी. मोठा भाऊ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरीला होता. जेमतेम दोन वेळच्या अन्नाची सोय होत असे. उच्च शिक्षण शक्‍यच नव्हते. आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला प्रसिद्ध कोरिओग्राफर दीपाली विचारे प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. माझा डान्स परफॉर्मन्स त्यांना आवडला आणि त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये साहाय्यक म्हणून घेतले. माझ्यासाठी ही संधी होती..’ कॉलेजमधून तो थेट मराठी चित्रपट ‘उलाढाल’च्या सेटवर पोचला. सहज करता येतील अशा स्टेप्स त्याने कलाकारांना दिल्या. विठ्ठल उमप यांच्याबरोबर एका कार्यक्रमाची कोरिओग्राफी करण्याची त्याला संधी मिळाली. वैभवच्या मानधनातून घराची घडी हळूहळू बसू लागली. वैभव सांगतो, ‘मराठीत काम करून माझं घर चाललं, सावरलं; पण हिंदी म्हणजे काम आणि करिअरचा समुद्रच! पण त्यासाठी ‘कोरिओग्राफर असोसिएशन’चे अधिकृत नोंदणी कार्ड असणे गरजेचे होते. त्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये हवे होते; ते माझ्याकडे नव्हते. माझी निकड आईने जाणली. तिने तिचे मंगळसूत्र, बांगड्या गहाण ठेवल्या आणि आवश्‍यक ती रक्कम माझ्या सुपूर्द केली. हिंदीत अनेक शोज, जाहिराती, मालिका, फिल्म्स अशी कामं मिळू लागली आणि सहा महिन्यांत मी आईचे दागिने सोडवून आणले.’

 

विवेक चाचेरे 
‘मी गणेश आचार्यना माझा गुरु मानतो.. आजच्या आघाडीच्या प्रत्येक स्टारला गणेशसरांनी नाचवले आहे. तळागाळातून वर आलेले गणेश आचार्य मला असामान्य कौशल्य लाभलेले वाटतात,’ ‘डान्स इंडिया डान्स’ आणि अनेक डान्स रिॲलिटी शोजचा कोरिओग्राफर - स्पर्धक विवेक चाचेरे सांगतो. विवेक नागपूरचा.. वडील पोस्टमन. मोठा भाऊ डान्स करायचा. विवेकही त्याचे अनुकरण करू लागला. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्याच सुमारास नागपूरला एका डान्स शोसाठी ऑडिशन्स झाल्या, त्यात विवेक सिलेक्‍ट झाला आणि पुढे तो हैदराबादला गेला. विवेक सांगतो, ‘हैदराबादच्या अनुभवाने जगण्याचे बळ दिले. टीडीएस आणि कॉर्डिनेटरचा हिस्सा यातून शिल्लक उरत नसे. राहायला जागा नव्हती. भाषेचा गंध नव्हता. पण तिथे मी तीन वर्षे काढलीत. दिवस खडतर होते, पण डान्स करताना मात्र मी देहभान हरपून जात असे.’ प्रभुदेवा यांच्या डान्स शोमध्ये विवेक दुसरा आला आणि गीता कपूर यांनी त्याला साहाय्यक म्हणून बोलावले. तिथे एक वर्ष काम केल्यानंतर पुढे त्याला ‘नच बलिये’मध्ये संधी मिळाली. तो सीझन त्याची जोडी जिंकली.

ऋषी 
पुण्याचा ऋषी सांगत होता, ‘आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बेतास बात होती. वडील भाजी विकत, तर आई धुण्या-भांड्याची कामे करत असे..’ दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा अपघात झाला, त्यांना काम करणे अशक्‍य झाले आणि आईला घर चालवण्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागली. घरातली ही परिस्थिती पाहून आपणही काम शोधले पाहिजे असे ऋषीला वाटू लागले. त्यावेळी पुण्यात गणपती उत्सवांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. ऋषीने पाहिले, अनेक लहान मुले या दिवसांत त्यांना येईल तसा डान्स करत आणि जवळच्या नेत्यांकडून बक्षीस मिळवत.  अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आईने ऋषीला डान्स करताना पहिले होते. तिच्या ओळखीने रत्नाकर शेळके आणि गणेश जाधव या दोन डान्स-गुरुंचा परिचय झाला. हे दोघे महिन्याला ५०० रुपये फी घेत, पण ते देणे ऋषीला अशक्‍य होते.. मग गणेश जाधवने ऋषीवर त्यांच्या डान्स क्‍लासमधील मुलांना डान्स शिकवण्याची जबाबदारी ऋषीवर टाकली आणि ते स्वतः ऋषीला डान्स शिकवू लागले. डान्समधून पैसे मिळू शकतात हे समजल्यावर ऋषीने आपल्या उदरनिर्वाहाचे साधन नृत्य करण्याचे ठरवले. पुण्यात एकदा ‘बुगी-वूगी’ या डान्स शोच्या ऑडिशन्स झाल्या. कसलाही सराव, कुठलाही डान्स गुरु नसताना ऋषी पुण्यात पहिला आला. ‘बुगी वूगी’नंतर ऋषीने मुंबई गाठली. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या