‘संजू’ साकारणे आव्हानात्मक’ 

पूजा सामंत
गुरुवार, 5 जुलै 2018

गप्पा
प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. केवळ हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य नसून आजचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर यात मुख्य भूमिका निभावतो आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर रणबीर कपूरबरोबर मारलेल्या गप्पा. 

‘संजू’ हा चित्रपट तू का स्वीकारलास? ही भूमिका तुझ्याकडे कशी आली? 
रणबीर कपूर ः ‘संजू’ची ऑफर आली तेव्हा मी खूप निराश होतो.. काही वैयक्तिक गोष्टी होत्या. ‘बाँबे वेल्व्हेट’, ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्‍कील’ हे माझे चित्रपट पाठोपाठ फ्लॉप झाले. अभिनेता म्हणून आता काम मिळणार की नाही असा प्रश्‍न मला पडला होता. त्याच सुमारास राजू हिरानी यांचा फोन आला. ‘संजय दत्तवर बायोपिक करत असून संजय दत्तची भूमिका करणार का?’ असा प्रश्‍न त्यांनी विचारल्यावर मी आनंदून गेलो. व्यक्तिरेखा अतिशय आव्हानात्मक आहे हे कुणीही सांगेल त्यामुळे त्यांनी अशा ‘डिफीकल्ट रोल’साठी माझी निवड करावी याचा मला अभिमान वाटला. पण मी ऑनस्क्रीन ‘संजू’ (संजय दत्त) दिसेन का? त्याच्या भावना माझ्या (स्क्रीनवर) भावना वाटतील का? असे अनेक प्रश्‍न मला पडले होते. 
‘संजय दत्तबरोबर ‘मुन्नाभाई’मुळे मैत्री झाली असली तरी त्याचे गोडवे गाण्यासाठी किंवा संजय दत्तची सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी म्हणून मी हा चित्रपट ते काढत नाहीत. गुंतागुंतीचे आयुष्य जगलेल्या संजय दत्तचा ऑनस्क्रीन करिष्मा फार वेगळा - अद्‌भुत आहे. संजूने केलेल्या घोडचुका कुणीही कधीही करू नयेत, त्या चुकांपासून इतरांनी शिकावे या हेतूने ‘संजू’ची निर्मिती केली,’ असे राजू हिरानी यांनी मला स्पष्ट केले. तसेच, मी ‘संजू’ साकारू शकेन ही त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी माझी निवड केली.. आणि मी हे आव्हान स्वीकारले. 

‘संजू’मध्ये मुलगा आणि वडील अर्थात संजय दत्त आणि सुनील दत्त यांचे हृद्य नाते आहे. प्रत्यक्ष तुझ्या जीवनात तुझे अभिनेते वडील ऋषी कपूर आणि तू यांच्यात कसे नाते आहे? 
रणबीर कपूर ः आमच्यात मैत्रीचे नाते नाही. मी लहान असतानादेखील आमचे कधी खेळीमेळीचे नाते नव्हते. मी आणि माझी मोठी बहीण रिद्धिमा आम्हाला आमच्या आईने (नीतू सिंग कपूर) वाढवले. आमच्यासाठी तिने तिचे करिअर सोडले. मला माझ्या वडिलांच्या अभिनय कारकिर्दीचा नितांत अभिमान आहे. ‘राज कपूर यांचा मुलगा’ असल्याने त्यांची तुलना सतत राज कपूर यांच्याशी होणे आणि त्यातून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणे सोपे नाही; पण डॅडनी ते केले. आम्ही दोघांनी कधी सवडीने बसून गप्पा मारल्यात असे मला आजवर आठवत नाही. अर्थात याचे कारण त्यांना कधीच वेळ नसे. शूटिंगमुळे ते सतत बिझी असत. पण एक खंत मात्र मला होती - माझ्या अभिनयाचं, काही विशेष परफॉर्मन्सचं डॅडनी कौतुक करावं असं मला वाटायचं, पण ते भाग्य माझ्या वाट्याला आले नाही. माझ्या अभिनयकारकीर्दीला दहा वर्षे झालीत. माझ्या नव्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला मी त्यांना नेहमी आमंत्रित करत होतो. कधी तरी, कुठला तरी माझा परफॉर्मन्स त्यांना भावेल आणि ते मला दाद देतील असे वाटायचे. पण त्यांनी प्रतिक्रिया दिली, ‘कभी तो कोई अच्छी फिल्म किया करो। यह क्‍या रोल है?’ मी दुःखी व्हायचो! अखेर तो सुदिन मला ‘संजू’ने दाखवला. राजू हिरानी यांना कल्पना होती, की डॅड माझ्या परफॉर्मन्सची तारीफ करत नाहीत. ‘ब्रह्मास्र’ या फिल्मच्या शूटिंगसाठी मी देशाबाहेर गेलो असता राजू हिरानी यांनी ‘संजू’चे स्क्रीनिंग ठेवले होते. डॅड आमंत्रित होते. माझा परफॉर्मन्स पाहून त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्यांची प्रतिक्रिया राजू हिरानींनी पाहिली आणि त्याचा व्हिडिओ मला बल्गेरियाला पाठवला. माझ्यासाठी  माझ्या वडिलांची ही अबोल साश्रूपूर्ण प्रतिक्रिया खूप मोठी भेट होती. मला दुप्पट बळ देणारी... 

संजय दत्त रंगवताना फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कसे - कितपत शक्‍य झाले? 
रणबीर कपूर ः संजय दत्त तरुण म्हणजे १८-१९ वर्षांचा असताना शरीराने फार किरकोळ होता. या आधीच तो ड्रग्जच्या विळख्यात सापडला होता. मादक द्रव्यांमुळे अन्नही पुरेसे पोटात जात नसे परिणामी अतिशय संपन्न कुटुंबातील संजय कृश राहिला. त्यानंतर नव्वदच्या दशकात त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आणि त्याची चाल, ढब, आत्मविश्‍वास सगळे बदलत गेले. कारण तो नव्वदच्या आसपास बॉलिवूडचा बॅंकेबल आणि सेलेबल स्टार ठरला होता. माझ्यासाठी १८-१९ वर्षांचा संजय दत्त साकारणे त्या मानाने सोपे होते, कारण मी तसा अंगापिंडाने साधारण आहे. ८ पॅक्‍स ॲब्जस आणि पिळदार दंड असलेला संजू हे बलदंड व्यक्तिमत्त्व बनले आणि त्याला स्टारडमही लाभले. वय, कारकीर्द आणि जीवनातले अनेक कठीण प्रसंग यामुळे संजयवर वार्धक्‍याच्या खुणा लवकर झळकू लागल्या. केस विरळ झाले, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली, चेहरा सुजला.. मेकअपसह स्वतःला प्रस्तुत करणे हे ट्रान्सफॉर्मेशन खूप कठीण, जिकिरीचे आणि वेळखाऊ - किचकट होते. माझे वजन मी २२-२४ किलोंनी वाढवले. नॉर्मली माझे वजन ७०-७२ किलोपर्यंत असते. ते अचानकपणे ९० किलोपेक्षा अधिक करणे मला मुश्‍कील होते. मी रात्री ११-१२ पर्यंत झोपायला गेलो, की गजर लावून मध्यरात्री उठत असे आणि १ लिटर प्रोटिन शेक पीत असे. आहारात खूप वाढ केली, कारण वजन वाढल्याखेरीज मी ‘संजूबाबा’ दिसणारच नव्हतो. अशा अनेक दिव्यांनंतर माझा प्रॉस्थेटिक मेकअप सुरू व्हायचा. हे प्रॉस्थेटिक मेकअप प्रकरण फार जीवघेणे आहे. माझ्या ओरिजिनल केसांवर विग्ज लावले जात ज्याने माझे खरे केस किती खेचले जात काय सांगू! राजू हिरानी यांनी ‘संजू’च्या जीवनातील विविध टप्पे आणि वयोगट यासाठी माझे फोटोशूट केले, तेव्हाही माझी अशीच सत्त्वपरीक्षा होती. 

तुझी आणि संजय दत्तची प्रत्यक्ष भेट कधी, कशी झाली? त्याला भेटून त्याच्या आयुष्यातील काही बिकट प्रसंग तू जाणून घेतलेस का? 
रणबीर कपूर ः अभिजात जोशी यांनी ‘संजू’ची पटकथा लिहिली आहे. राजू हिरानी यांनी अनेक महिने संजूच्या सहवासात घालवले, त्याला आणि त्याच्या जीवनातील सगळेच प्रसंग, घटना जाणून घेतले. शूटिंग सुरू होण्यापूर्वी हिरानी यांनी इंटरॅक्‍टिव्ह सेशन्स घेतली होती. इतकी सगळी तयारी असतानाही मला संजूच्या त्या त्या प्रसंगावेळेच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. मी संजूला फोन करत होतो.. त्याच्याशी थेट भेट फार कमी झाली. त्याने त्याचे सॅंडल्स, शूज, त्याची घड्याळे, अनेक परफ्युम्स मला भेट दिलेत. संजूची चालण्याची विशिष्ट स्टाइल आहे. ती मला साध्य व्हावी म्हणून त्याचे शूज त्याने मला दिले. त्याने या भूमिकेसाठी मला त्याचा आत्मा भेट म्हणून दिला होता. सगळ्यांना ठाऊक आहे, संजू मनाने खूप दिलदार आहे. 
संजूच्या आईचे (नर्गीस दत्त) निधन झाले तेव्हादेखील तो ड्रग्जच्या अंमलाखाली होता. आईच्या निधनानंतर त्याला त्याच्या वडिलांनी खूप सांभाळले. अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांमधून संजय सुधारत गेला, माणूस म्हणून घडत गेला. त्या त्या प्रसंगी त्याच्या काय भावना असत, हे मी त्याला विचारायचो, तो सांगायचा... संजूच्या इमोशन्स दाखवण्याचा प्रयत्न केला. 

तुझे आयुष्य बोअरिंग आहे असे म्हणतोस.. अवघ्या पस्तिशीत तू बोअरिंग आहेस असे का बरे म्हणतोस? 
रणबीर कपूर ः शूटिंग झाले की मी थेट घरी जातो. माझी आई माझी जगातील सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे. तिच्याशी मी सगळ्या गोष्टी शेअर करतो. मी सोशल मीडियावर नाही. मी कुणाच्याही पोस्ट - अपडेट्‌स  वाचत - जाणत नाही. हल्ली सोशल मीडियावर असणे हे आयुष्यातील अविभाज्य अंग मानले जाते. ते मी करत नाही. शूटिंग नसले, की छान पंजाबी जेवण, वामकुक्षी, आईबरोबर गप्पा, टीव्ही असे माझे उद्योग असतात; जे तरुण पिढीच्या विरुद्ध आहेत. म्हणूनच मी स्वतःला बोअरिंग म्हणतो! स्वतःला डी-स्ट्रेस करण्यासाठी घरातील कुत्र्यासोबत खेळतो. माझा मित्र अयान (मुखर्जी) आणि मी फुटबॉल खेळतो. कपूर खानदानाचा थोडा आळस,  शैथिल्य माझ्या अंगात भरलेय.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या