आजोबा-नातवाचे तरल नाते

पूजा सामंत
गुरुवार, 19 जुलै 2018

अभिनेता सुबोध भावेला रंगमंचावर, छोट्या-मोठ्या पडद्यावर कुठल्याही भूमिकेत पाहणे हा निखळ आनंद असतो. आजवर त्याने अशा असंख्य भूमिका केल्या आहेत. तो दिग्दर्शक-निर्माताही आहे. ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त त्याच्याबरोबर झालेल्या गप्पा.

अभिनेता सुबोध भावेला रंगमंचावर, छोट्या-मोठ्या पडद्यावर कुठल्याही भूमिकेत पाहणे हा निखळ आनंद असतो. आजवर त्याने अशा असंख्य भूमिका केल्या आहेत. तो दिग्दर्शक-निर्माताही आहे. ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त त्याच्याबरोबर झालेल्या गप्पा.

ः ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाचा तू निर्माता आहेस. तुझी मुख्य भूमिकाही आहे. या चित्रपटामागची प्रेरणा कोणती? 
सुबोध भावे ः ‘पुष्पक विमाना’मागे फक्त आणि फक्त एकच प्रेरणा आहे.. माझे आजोबा! मी आजोबांच्या अतिशय जवळचा होतो. आजोबा आणि त्यांची नातवंडे या नात्याला कधी मरण नाही. आपल्या आजी-आजोबांशिवाय आपले आयुष्य पूर्ण होत नाही. आपल्या बालपणी आपली लहानमोठी स्वप्ने आजीआजोबाच पूर्ण करतात. पण आपल्या पंखांमध्ये बळ येते, आपण प्रौढ होतो तेव्हा आपण आजीआजोबांची स्वप्ने पूर्ण करतो का? याचे उत्तर बहुतांश वेळा ‘नाही’ असेच येते. ‘पुष्पक विमान’ हा आमचा चित्रपट आजोबा आणि नातू यांच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. हा चित्रपट भावनिक - इमोशनल आहे. आमचा चित्रपट प्रत्येकाला त्यांच्या आजीआजोबांकडे; किमान मनाने नक्की घेऊन जाईल. हल्ली विभक्त कुटुंब पद्धती प्रामुख्याने आहे. अशा जीवनशैलीत आजीआजोबा नसतात. कधी तरी त्यांच्याशी भेट होते - कधी होतही नाही. नव्या पिढीला त्यांचे प्रेम - हे रेशमासारखे तलम नाते कधी समजणार? ‘पुष्पक विमान’ चित्रपट आजोबा आणि नातवाच्या नात्यावर भाष्य करत नाही, हे नाते अलवारपणे दृढ करतो. 

ः ‘पुष्पक विमान’ हे शीर्षक देण्यामागे काय दृष्टिकोन आहे? तुझ्या आजोबांकडून तू काय शिकलास? 
सुबोध भावे ः संत तुकारामांचा पृथ्वीवरचा अवतार समाप्त होत असताना त्यांना स्वर्गात नेण्यासाठी पुष्पक विमान आले होते आणि त्यांना ते घेऊन गेले. माझ्या आणि आजोबांच्या आयुष्यात एका विमानाच्या स्वप्नाने घर केले होते. माझ्या दुर्दैवाने मी आजोबांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. माझ्या आजोबांचे नाव चक्रनारायण! म्हणूनच ‘पुष्पक विमान’ असे शीर्षक दिले. 
मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. माझ्या जडणघडणीवर आजोबांप्रमाणे पुणे शहराचा मोठा प्रभाव आहे. आज माझ्याकडे रसिक मायबाप प्रेक्षक कौतुकाने बघतात पण हे श्रेय माझ्या आईवडिलांना आणि तितकेच आजोबांना आहे. आजोबांच्या वागण्या-बोलण्याचा-विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. ते व्यवसायाने बिल्डिंग कॉन्ट्रॅक्‍टर होते; तर आजी गृहिणी होती. आमच्या पुण्याच्या घरी खंडेरायाचे मंदिर होते. घरच्या मंदिराचे पौरोहित्य आजोबाच करत. त्यांची श्रद्धा अफाट होती. आजीआजोबांचा मी लाडका असल्याने कधीही कुठल्याही वस्तूचा मी हट्ट करत असे. अर्थात हा खाद्यपदार्थ असे. मी मागितलेली वस्तू मला तत्क्षणी मिळत असे. मी लहानपणी आजीकडे आताच्या आता पेरू हवा असा हट्ट धरला, की ती म्हणायची, ‘डोळे मिटून देवळात खंडेरायाची प्रार्थना कर..’ आणि खरोखरच कुणीतरी भक्त येऊन देवळात मला हवे ते फळ प्रसाद म्हणून ठेवून जात असे. श्रद्धेने केलेले कुठलेही कार्य व्यर्थ ठरत नाही, ही त्यांची शिकवण माझ्या मनावर कायम बिंबली. आजोबाआजी अनेक बोधप्रद गोष्टी सांगत अस. मी त्यांच्या सहवासात घडत गेलो. 

ः मोहन जोशींची निवड आजोबा कशी झाली? 
सुबोध भावे ः आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करायची म्हटल्यास मोहन जोशी काकांचा क्रमांक फार वरचा असेल. मी त्यांच्या अभिनयाचा चाहता आहे. मोहन जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दहावा चित्रपट आहे. आजोबांची भूमिका कुठल्या अभिनेत्याला द्यावी हा प्रश्‍न मला  पडला नाही कारण माझ्या डोक्‍यात मोहन जोशी पक्के होते. ‘पुष्पक विमान’मधील आजोबा वार्धक्‍याने थकून गेलेले नाहीत, त्यांच्यातील मिश्‍कीलपणा कायम आहे. माझा मोहनकाकांबरोबरचा व्यक्तिगत पातळीवरील स्नेहबंध अतूट आहे. पडद्यावरदेखील ते माझे आजोबा नक्कीच दिसतील. म्हणून मी मोहन जोशी यांची निवड केली. 

ः आजोबांच्या आणखी काही आठवणी सांग... 
सुबोध भावे ः आमचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. मला माझ्या आजोबांचा सहवास त्यांच्या नव्वदीपर्यंत लाभला. माझ्यावर त्यांचे संस्कार आहेत. माझ्या जिव्हारी लागली ती बाब म्हणजे - आजोबांना विमानाने किमान एकदा तरी प्रवास करण्याची तीव्र इच्छा होती. मी मोठा झालो, नोकरीला लागलो परंतु आजोबांना विमानप्रवास घडवून आणायची माझी त्या काळात ऐपत नव्हती. नंतर मी अभिनयात आलो, हळूहळू इथे स्थिरावलो आणि आजोबांना विमान प्रवास घडवावा असे नक्की केले.. पण तोपर्यंत आजोबांना देवाज्ञा झाली. माझा ‘लोकमान्य - एक युगपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ते गेले. 
आजोबांचा विमान प्रवास राहून गेला ही खंत मला आता लागून राहिली. माझ्या उनाडक्‍या, अभ्यास, मस्ती सगळ्याचे ते साक्षीदार होते. त्यांची उणीव मला कायम भासेल. आजही मी पुण्यात माझ्या घरी गेलो की त्यांच्या खोलीकडे लक्ष जाते. मी त्यांच्या खोलीत जातो आणि माझे मन कधी भरून येते मलाही कळत नाही. 
काही वर्षांपूर्वी विमान प्रवास ही चैन होती... एका रात्री मी झोपलो आणि माझ्या स्वप्नात आजोबा आले. त्याच दिवशी मी ‘पुष्पक विमान’ हे शीर्षक नक्की केले आणि चित्रपटनिर्मितीही नक्की केली. 

ः अभिनय, निर्मिती एकाचवेळी करणे अवघड आहे.. हा तोल कसा सांभाळला? 
सुबोध भावे ः माझ्या आणि आजोबांच्या नात्यावर चित्रपट करायचा हे मनात घोळत होते. माझ्या कथेवर वैभव चिंचाळकर याने आताच नव्हे पण आजवर प्रत्येकवेळी खूप झोकून काम केले आहे. पण त्याला त्याच्या कामाचे म्हणावे तसे श्रेय मिळाले नाही. माझ्या प्रत्येक प्रोजेक्‍टमध्ये वैभव असतोच. मग दिग्दर्शनाची सूत्रे मी वैभव चिंचाळकरकडे सोपवली. झी सिनेमाने वितरण-निर्मितीत मोलाची मदत केली. माझ्याबरोबर चार मान्यवर पुढे आले आणि आम्ही पाच जणांनी निर्मिती केली. 
ः स्वतःच्या कारकिर्दीवर कितपत समाधानी आहेस? 
सुबोध भावे ः मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला उत्तमोत्तम भूमिका मिळाल्या. त्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. मी समाधानी आहे, पण कुठलाही कलाकार शंभर टक्के समाधानी कधीही नसतो. पण मला वैविध्यपूर्ण भूमिका नेहमी मिळाल्यात हे  महत्त्वाचे! 
‘कट्यार काळजात घुसली’ हा विषय नव्या पिढीला कितपत आवडेल अशी साशंकता होती. पण त्याला उदंड यश मिळाले. ‘लोकमान्य’ प्रेक्षकांना आवडला. ‘बालगंधर्व’ही अतिशय आवडला. वेगळे प्रयत्न प्रेक्षकांनी उचलून धरले, याचा मनापासून आनंद आहे. 

ः ‘बायोपिक - जीवनपट’ हा सध्याचा ट्रेंड आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरचा तुझा आगामी चित्रपटही प्रदर्शनापूर्वीच गाजतोय... 
सुबोध भावे ः बायोपिक हा सध्याचा लोकप्रिय ट्रेंड आहेच. पण महाराष्ट्रातील
नाट्य-चित्रपट क्षेत्र गाजवणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांना मानवंदना देणारा चित्रपट काढावा हा विचार दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा आहे. या विषयावर त्यांचे काम फार फार आधीपासून सुरू आहे; तेव्हा बायोपिकची लाट वगैरे नव्हती. त्यांनी खूप संयत, छान लिखाण केले आहे.
लेखन-दिग्दर्शन सब कुछ अभिजित देशपांडे यांचे आहे. या विषयावर आत्ताच फार बोलता येणार नाही. कारण चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे. पण हा चित्रपट सगळ्यांना आवडेल याची मला खात्री वाटते. मी डॉ. घाणेकर यांच्यासारखा दिसेन अथवा नाही हा मुद्दा देशपांडे सांभाळताहेत; मी फक्त शूटिंगला जातोय. 

ः सुबोध भावे म्हणजे सकस अभिनय, या अपेक्षेचे ओझे वाटत नाही का? 
सुबोध भावे ः मी अपेक्षांचे ओझे कधीही बाळगले नाही, पुढेही बाळगणार नाही. कुणाच्याही अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून मी अभिनय करत नाही. त्यातून मला समाधान मिळते.

संबंधित बातम्या