करण देओलचेही पदार्पण

पूजा सामंत
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

गप्पा
कपूर, खन्ना, चोप्रा अशा चंदेरी दुनियेत असलेल्या अनेक नामवंत फिल्मी खानदानांपैकी एक प्रसिद्ध खानदान म्हणजे देओल परिवार! या देओल परिवाराची तिसरी पिढी म्हणजे धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने अभिनयात पदार्पण केले असून, त्याचा डेब्यू सिनेमा ‘पल पल दिल के पास’ नुकताच २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्यानिमित्त करण देओल याच्याशी मारलेल्या या गप्पा...

तुझा पहिलावहिला सिनेमा ‘पल पल दिल के पास’ रीलिज झाला. काय भावना आहेत तुझ्या? 
करण : मैं खूश हूँ, लेकिन झूठ नहीं कहूंगा मुझे नर्वसनेस भी है। शायद यह फीलिंग हर डेब्यूटंट के साथ होती होगी। भीती, उत्कंठा, नैराश्य, आत्मविश्‍वास अनेक भावभावना माझ्या हृदयात धडधडत आहेत. मला नेमके सांगता येणार नाही.

तुझ्यावर धर्मेंद्रचा नातू आणि सनी देओलचा ‘पुत्तर’ असण्याचे किती दडपण आले आहे? 
करण : मी बडे पापा (धर्मेंद्र) यांचा नातू आणि पपांचा (सनी) लेक असल्याने माझ्यावर खूप ताण होता. हे टेंशन शूटिंग सुरू झाल्यावरही आरंभीचे सात-आठ महिने जाणवत होते. जसजशी प्रदर्शनाची तारीख जवळ आली; तसे पपांनी, ‘रीलिज होणारा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत नसतो, पण तुझा परफॉर्मन्स उत्तम असला पाहिजे,’ हे मला समजावून सांगितले आणि मी आमच्या फिल्म इंडस्ट्रीतील एक जळजळीत वास्तव समजून गेलो.

तुझी प्रशंसा आणि टीका दोन्ही होऊ शकते, तुझी मानसिक तयारी आहे का?
करण : जी बिलकूल. बडे पापा राज कपूरचे फॅन होते, त्यांच्या सिनेमातदेखील त्यांनी अभिनय केला होता. बडे पापांनी मला एक उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘राज कपूर यांनी आपली अनेक वर्षे खर्ची घालत ‘मेरा नाम जोकर’साठी लाखो रुपये खर्च करत हा सिनेमा काढला. ओव्हर बजेट झालेला ‘मेरा नाम जोकर’ बॉक्स ऑफिसवर कोसळला. गुरुदत्त यांच्या ‘कागज के फूल’ सिनेमाला अपयश आले, पण या दोन्ही सिनेमांतून राज कपूर, गुरुदत्त हे किती जीनियस होते, हे जगासमोर आलेच. जर कोणी प्रेक्षक ‘पल पल दिल के पास’कडून काही अपेक्षा ठेवत असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर ते प्रेक्षक माझ्यावर टीका करतील. प्रत्येक व्यक्तीचे मत वेगवेगळे असू शकते, ज्याचा मला आदर करावा लागेल. 

‘पल पल दिल के पास’मध्ये तुझी भूमिका काय आहे?
करण : माझ्या ‘पल पल...’ चित्रपटाची कथा एक प्रेमकथा आहे. चित्रपटातदेखील माझे नाव करण हेच आहे. तर, माझी नायिका असलेल्या सिमल्याच्या सहेर बम्बबा या युवतीच्या व्यक्तिरेखेचे नावदेखील सहेर आहे. धर्मेंद्र यांच्या ब्लॅक मेल या चित्रपटातील गाजलेले गीत ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ या रोमँटिक गाण्याचे गारुड आजही रसिकांच्या मनावर आहे. नव्या पिढीलाही हे गाजलेले गीत ठाऊक आहे, म्हणूनच माझ्या रोमँटिक सिनेमासाठी हेच टायटल देणे पपांनी निश्‍चित केले.

तुझा या पदार्पणातील सिनेमाला उशीर झाला आहे ना? काही विशेष कारण?
करण : पपा त्यांच्या भय्याजी सुपरहिट आणि घायल वन्स अगेन या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. माझ्या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण होईपर्यंत दीड वर्ष लागले. माझ्या सिनेमासाठी काही सुंदर आणि व्हर्जिन लोकेशन्स शोधण्यात वेळ लागला. हिमाचल प्रदेशातील अतिशय दुर्गम जागांवर, मनाली, रोहतांग पास, स्पिती, दिल्ली, न्यू दिल्ली आणि गुरुग्राम अशा विविध ठिकाणी शूटिंग झाले. हिमाचल प्रदेशात शूटिंग करणे म्हणजे रिस्कदेखील आहे. क्षणोक्षणी वातावरण बदलत राहते. माझ्या नायिकेसाठी पपांनी ४०० मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या. अशा अनेक कारणांनी उशीर झाला. पण स्क्रिप्ट तयार झाल्यावर मात्र दीड वर्षांत चित्रपट तयार झाला.

सनी देओल आणि तुझे सेटवर कसे नाते होते? दिग्दर्शक म्हणून पपांची भीती वाटली का?
करण : पपा खूप कडक दिग्दर्शक आहेत. सुरुवातीला मला त्यांच्याबरोबर काम करताना खूप भीती वाटली. टेंशनदेखील होते. त्यांच्या नजरेतून छोटीशी गोष्टही सुटत नाही. नंतर माझ्या लक्षात आले, की माझे काम अधिक चांगले व्हावे यासाठीच ते इतके स्ट्रिक्ट आहेत. तरीही मला त्यांच्यातल्या दिग्दर्शकाची आदरयुक्त भीतीच वाटली.
शूटिंग करताना त्यांनी मला फक्त एक-दोनदाच ‘डिसेंट! गूड!’ म्हटले. तारीफ फक्त या दोन शब्दांपुरतीच मर्यादित होती. 

आजोबा धर्मेंद्र यांनी तुला काय सूचना दिल्या?
करण : मी आणि दादाजी यांच्यात एक अतिशय प्रेमळ, तरल नाते आहे. गेली ६०-६५ वर्षे मुंबईत जुहूच्या बंगल्यात आम्ही सगळे देओल एका छताखाली राहतोय. त्याचे श्रेय बडे पापा यांना आहे. बडे पापा यांनी सांगितले, की अभिनयाला कधीही घाबरू नको. तुझे आजोबा कधीही कुठल्या ॲक्टिंग क्लासमध्ये जाऊन ॲक्टिंग शिकले नाहीत. ॲक्टिंग हे रिॲक्शनचे दुसरे नाव आहे. जितके नॅचरल राहशील, तेच ॲक्टिंग असेल. स्क्रीनवर तू धर्मेंद्रचा नातू किंवा सनीचा मुलगा नसून ती व्यक्तिरेखा आहेस, हे कायम लक्षात ठेव. तुझ्या भूमिकेला न्याय दे. 

तुझ्या आजोबांवर बायोपिक निघाल्यास तू त्यांची भूमिका करशील का?
करण : फार कठीण आहे या प्रश्‍नाचे उत्तर देणे. धर्मेंद्र त्यांच्या वयाच्या २२व्या वर्षी पंजाबहून मुंबईत आले आणि स्वकष्टाने - टॅलेंट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आपले स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण करून ४० वर्षे अधिराज्य केले. व्यक्तिगत जीवनात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांचे जीवन कलरफूल आहे. अशा लेजंडरी स्टारच्या आयुष्याला मी या वयात न्याय देऊ शकणार नाही. कदाचित आणखी परिपक्वता आल्यानंतर मी बडे पापांचे आयुष्य दाखविण्याची हिंमत करू शकेन. माझी त्यांच्याशी खूप ॲटॅचमेंट आहे. ते ५०-६० वर्षांपूर्वी पंजाबहून मुंबईला आले नसते, तर आज आम्ही सगळे देओल पंजाबमध्ये शेती करत असतो. आज आम्हा सगळ्यांची ओळख त्यांच्यामुळेच आहे. 
 
धर्मेंद्र यांच्या रिव्हॉल्व्हरमधून तू एकदा गोळी चालवली होतीस.
करण : हो. आमच्या जुहूच्या बंगल्यात शूटिंगला वेळ असल्याने बडे पापा त्यांची रिव्हॉल्व्हर काढून ती साफसूफ करत होते. त्यांच्या रूमचा अर्धवट लोटलेला दरवाजा ढकलून मी आत गेलो. त्यांच्या हातातील चमकदार रिव्हॉल्व्हर पाहून माझे बालमन ती रिव्हॉल्व्हर हातात घेण्यास अधीर झाले. माझे वय तेव्हा पाच-सहा वर्षांचे होते. मी म्हटले, ‘बडे पापा, मैनू (मला) देखणा सी।’ त्यांनी मला प्रेमाने त्यांच्या मांडीवर घेत म्हटले, ही वस्तू खतरनाक आहे, याने माणसाचा जीव जाऊ शकतो. पण तरीही मी मागितल्याने त्यांनी रिव्हॉल्व्हर माझ्या हातात दिली आणि मी खेळ म्हणून ट्रिगर दाबला! परिणाम काय होणार? सूं सूं आवाज करत गोळी छताला लागली आणि छताला छिद्र पडले! रुपेरी पडद्यावर कमीने-कुत्ते म्हणत गोळ्या झाडणारा हा ही-मॅन काय एकदम स्तब्ध झाला आणि मी मात्र खाली पळून गेलो!

आजोबांनी आयुष्यासाठी दिलेला सल्ला आठवतोय का?
करण : माझ्या जन्मापासून बॉर्न विथ सिल्व्हर स्पून असलेला मी लाडावलेला होतोच, पण बडे पापांनी माझे डोळे उघडले. आजोबांनी नवीन व्हीएचएस (व्हिडिओ प्लेअर) आणले होते, ज्यावर ते जुने सिनेमे पाहत असत. इतक्या लहान वस्तूत सिनेमातील अनेक माणसे आत जातात तरी कशी, याचे मला औत्सुक्य होते. किचनमधून चमचे-काटे घेऊन मी त्यांच्या व्हिडिओ प्लेअरवर ते चालवले, जेणेकरून तो प्लेअर उघडला जावा आणि आतमध्ये किती जण दडलेत हे बघावे, हा माझा उद्देश होता. त्याच दिवशी बडे पापा लवकर आले आणि माझे उद्योग पाहून चक्रावले. मला न रागावता त्यांनी मला पैशांची किंमत समजावून सांगितली. मेहनत, कष्ट करून पैसे कमावणे किती कठीण असते याची सोप्या भाषेत उकल केली. त्या घटनेनंतर मी घरातील कुठल्याही गॅझेट्सची मोडतोड केली नाही.

तू कविता करतोस?
करण : हो. मी कविता करतो. आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी सुख
दुःखाचे, प्रेमाचे अनेक क्षण पाहिले आहेत. अनेक भावभावनांचे हिंदोळे माझ्या कवितेत आहेत.    

संबंधित बातम्या