‘मनोरंजन क्षेत्र खुणावते आहे’

पूजा सामंत
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी ‘सत्ते पे सत्ता’, ‘डिस्कोडान्सर’, ‘मनोकामना’, ‘हम साथ साथ है’ अशा सुमारे १००-१५० चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. नंतर हे चमचमणारे तारांगण सोडून त्या दुबईमध्ये स्थायिक झाल्या. पण आता त्यांना पुन्हा भारतात येऊन अभिनय करण्याची इच्छा आहे... त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत.

कल्पना, तुम्ही इथे मुंबईत प्रसिद्धीच्या झोतात असताना थेट दुबई का गाठली?
कल्पना अय्यर - आपको यह क्लियर कर दू, की बॉलिवूड में काम करते करते मेरा कोई मोहभंग नही हुआ। मला कसलेही दुःखद अनुभव आले नाहीत. किंबहुना खंत-रुखरुख, हुरहूर अशा कुठल्याही विषण्ण करणाऱ्या माझ्या भावना नाहीत. माझ्या उमेदीच्या काळात फिल्म इंडस्ट्री असे नाव होते, बॉलिवूड असे बारसे झालेले नव्हते. १२-१३ वर्षांत १२५ तरी चित्रपट केले. त्याच काळात मी केलेल्या ‘सत्ते पे सत्ता’ या फिल्मचे मेकर राज एन सिप्पी यांच्या पत्नींने मला सुचवले, की त्यांच्या एका दुबईच्या स्नेह्याच्या हॉटेलमध्ये फ्लोअर मॅनेजरची नोकरी करण्यास मी उत्सुक आहे का? मी विचार केला, आयुष्यभर माझे पोट सिनेमा इंडस्ट्री भरू शकेल का? त्यापेक्षा चालून आलेली नोकरी स्वीकारावी! माझी आजी, आई, बहीण आणि मी सगळे दुबईत गेलो, तिथे स्थायिक झालो. फूड अँड बेव्हरेजेस विभागात मी मॅनेजर म्हणून काम करू लागले. ही नोकरी मी १८-२० वर्षे केली. अनेक काळ मनात असलेली सिनेमाविषयीची ओढ आता पुन्हा उफाळून आली आणि म्हणूनच मी सोशल मीडियावर मला अभिनयात यावेसे वाटते, त्यामुळे भारतात येण्याची संधी मिळेल, असे आवाहन केले. हे कोरोना व्हायरस प्रकरण शांत झाल्यावर मला अभिनय करण्याची संधी पुन्हा मिळेल अशी आशा आहे. 

तुमची कौटुंबिक पार्श्‍वभूमी नॉन फिल्मी असून हिंदी सिनेमात थेट संधी कशी मिळाली? 
कल्पना अय्यर - मध्यमवर्गीय तामीळ ब्राह्मण कुटुंबात मी वाढले. ठराविक चौकटीत जीवन मूल्ये असतानाही कॉलेजमध्ये मी फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला. घरात या स्पर्धेविषयी काही माहिती नव्हती. तरीही मी फर्स्ट रनर अप ठरले आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत टॉप फायनलिस्ट! यामुळे माझ्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधले गेले. राजश्री प्रॉडक्शन्सने त्यांच्या ‘मनोकामना’ या हलक्याफुलक्या प्रेमकथेत मला मुख्य नायिका म्हणून संधी दिली. आयुष्याने अचानक घेतलेला हा यू टर्न माझ्यासारख्या मध्यम वर्गीय मुलीसाठी नवखा आणि आश्चर्यकारक होता. पुढे काय करावे या विचारांत होते आणि अचानक देवसाहेबांनी (देव आनंद) मला फोन केला. त्यांच्या ‘लूटमार’ सिनेमात एक डान्स करशील का असे त्यांनी विचारले. माझा आनंद गगनात मावेना! अशी वाटचाल पुढे सुरू राहिली.

‘मनोकामना’मध्ये नायिका म्हणून काम केल्यानंतर तुम्ही डान्सर म्हणून काम करण्याची रिस्क घेतली असे वाटले का कधी?
कल्पना अय्यर - ‘मनोकामना’ रिलीज झाल्यावर मला प्रश्न होता, पुढे काम मिळेल का? अभिनयाचे आकर्षण वाटत होतेच. पण ही हिरवळ कायम टिकेल का, असा प्रश्न मनात उद्‍भवला आणि देव आनंदसारख्या दिग्गजाने त्याच्या सिनेमात डान्सची ऑफर दिली. आशा भोसले यांच्या आवाजातील ‘जब छाए मेरा जादू’ हे गाणे ऐकून मला खात्री पटली, की हे गाणे स्वीकारून मी काहीही चूक केली नाही. हा डान्स परफॉर्म करत असतानाच मला ‘साजन की सहेली’, ‘कुदरत’, ‘प्यारा दुश्मन’ आणि ‘बम्बई का महाराजा’ हे आणखी चार चित्रपट मिळाले. 
मी ‘अरमान’ सिनेमासाठी केलेला ‘रंभा हो’ डान्स आजही यूट्युबवर आवडीने पाहिला जातो. मी नायिकेच्या भूमिकेची वाट पाहत बसले असते आणि त्या भूमिका गाजल्या नसत्या, ते सिनेमे अयशस्वी ठरले असते, तर माझे एकूण अस्तित्व संकटात आले असते. 

हल्ली चरित्र कलाकारांना महत्त्व मिळू लागले, पण त्या काळात खलनायकी भूमिका करणे कितपत योग्य होते?
कल्पना अय्यर - मी १२ वर्षांच्या फिल्म करिअरमध्ये कधीही मॅनेजर नियुक्त केला नाही. सेक्रेटरी मला ठाऊक नाही. कुठल्या कार्यक्रमाला कोणते ड्रेस घालावेत याविषयीदेखील माहिती नव्हती. आपण हे सगळे केले पाहिजे, आणखी उत्तम भूमिका मिळण्यासाठी  
मेकर्सना भेटले पाहिजे, सोशलाईज व्हायला हवे, यातले काही आकलन नव्हते. मी घरगुती वर्तुळात वाढले. आज काळ खूप बदलला आहे हे नक्की! मी खलनायिकेच्या भूमिका केल्या आहेत आणि माझे चाहते मात्र मला आजही फीडबॅक देतात, की माझ्यात पोटेनशिअल असून मी त्यावर लक्ष दिले नाही. कदाचित आणखी चौफेर विविधांगी भूमिका करू शकले असते असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. 

आपण फार धडपड करावी अशी गरज त्या काळात जाणवली नाही. गरजेपुरते कमवावे. मी अल्पसंतुष्ट होते असे म्हणायला हरकत नाही. माझी आणि माझ्या कुटुंबाची जीवनशैली खूप साधी असे. मोठी स्वप्ने, अचाट महत्त्वाकांक्षा नव्हत्या. स्वतःला प्रमोट करावे असेदेखील मला वाटले नाही. 

समाधान याचे आहे, की नूतन, दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, हेमा मालिनी, विनोद मेहरा, राज बब्बर अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांसमवेत मी फिल्म्स केल्या. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले, त्यांचा सहवास लाभला. दिलीप कुमारबरोबर मी केलेला सिनेमा म्हणजे ‘कलिंगा’, जो रिलीज झाला नाही याची खंत आजही वाटते!

शोलेफेम गब्बरसिंग ऊर्फ अमजद खान यांच्याशी तुमची जवळीक होती. त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही दुबईला आलात आणि म्हणून लग्नाचा विचार केला नाहीत?
कल्पना अय्यर - आप पहली जर्नलिस्ट है जिसने मुझे यह सवाल पूछा। मरहूम ॲक्टर अमजद खान साहब अब इस दुनिया में नहीं। त्यांच्या पश्चात त्यांच्याबाबत बोलणे योग्य नाही. अमजद खान यांना स्वर्गवासी होऊन २७ वर्षे, जवळजवळ ३ दशके झाली. काही बोलणे प्रशस्त ठरणार नाही. होय, अनेक सिनेमात एकत्र अभिनय केल्यामुळे आमच्यात मैत्री होती, त्याचा मी इन्कार करणार नाही. पण आमच्या नात्याबद्दल मी पूर्वीही कधी व्यक्त झाले नाही. मी दुबईला शिफ्ट होण्याचे कारण हे नाही!

मी स्वतः एक आनंदी पूर्ण व्यक्ती आहे. अपनी जिंदगी से खूश हूँ। लग्न करणे हा योग माझ्या आयुष्यात नव्हता. पण त्याविषयी मला खंत नाही वाटत. लग्न हाच सुखी आणि आनंदी आयुष्याचा एकमेव मार्ग आहे, असे मला वाटत नाही! माझी आई, बहीण व तिचे कुटुंब यांच्यासह मी सुखी, परिपूर्ण आयुष्य सकारात्मक मार्गाने जगते आहे.

वेबसीरिज, फिल्म्स, टीव्ही अशा कुठल्याही माध्यमात मला अभिनय करायला आवडेल. हे पॅशन मला आता पुन्हा खुणावते आहे.. त्यासाठी पुन्हा भारतात यावेसे अशी ओढ निर्माण झाली आहे!

संबंधित बातम्या