‘व्यक्तिकेखांनीच मला समृद्ध केले’

पूजा सामंत 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

प्रख्यात गणितज्ञ शंकुतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘शकुंतला देवी’ नुकताच ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात शकुंतला देवी यांची प्रमुख भूमिका अभिनेत्री विद्या बालन यांनी साकारली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

ॲमेझॉन प्राइमवर नुकत्याच रिलीज झालेल्या ‘शकुंतला देवी’ या बायोपिकमध्ये तुम्ही गणितज्ञ शकुंतला देवी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तुमचे आणि गणिताचे नाते वैयक्तिक जीवनात कसे आहे? 

विद्या बालन - माझे आणि गणिताचे संबंध नेहमी उत्तम राहिलेत. मला गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले नाहीत पण माझे आणि आकड्यांचे खूप सूत होते. बेरजा करणे, कुठलीही संख्या लक्षात ठेवणे हे सगळे माझ्यासाठी सोपे होते. पूर्वी सगळ्यांचे फोन नंबर्स वर्षानुवर्षे माझ्या लक्षात राहत असत. माझ्या कुटुंबासाठी मी टेलिफोन डिरेक्टरी होते. 

गणित, आकडेमोड, अर्थकारण यांचे आणि स्त्रियांचे जमत नाही असे अनेकांचे मत असते. तुमच्याबाबतीत तुमचे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक कोण बघते?

विद्या बालन - मी स्वतः माझे आर्थिक व्यवहार बघते. इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स बघण्यास सवड नसते, म्हणून आप्पा (वडील) माझी गुंतवणूक बघतात. माझे कुटुंब, अम्मा, आप्पा, दीदी (प्रिया बालन) तिचे यजमान, शिवाय माझे पती सिद्धार्थ रॉय कपूर आणि त्यांचे कुटुंब, आमच्यात घनिष्ठ एकोपा आहे. त्यामुळे माझे आर्थिक नियोजन हे कुटुंबाचे होऊन जाते. 

‘शकुंतला देवी’ या जागतिक कीर्तीच्या गणितज्ञावर सिनेमा स्वीकारावा, असे तुम्हाला का वाटले? या भूमिकेतून काय मिळाले?
विद्या बालन - ‘शकुंतला देवी’वर बायोपिक करावा हा विचार अर्थात दिग्दर्शिका अनु मेनन यांचा. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. जागतिक कीर्तीच्या या विदुषीची व्यक्तिरेखा साकारणे हा कुठल्याही अभिनेत्रीसाठी बहुमानच. मी ही ऑफर स्वीकारली. या व्यक्तिरेखेने माझे विचार समृद्ध केले. मी साकार केलेल्या बहुतेक व्यक्तिरेखांमुळे मी समृद्ध झाले, माझा मानसिक विकास घडत गेला. ‘सुलु’सारखी सर्वसामान्य स्त्री असो, सिल्क स्मितासारख्या अभिनेत्रीवर असलेला बायोपिक (डर्टी पिक्चर) असो, बेगमजान ही सेक्स वर्कर असो किंवा ‘हे बेबी’सारखी अविवाहित माता असो... स्त्रीच्या विविध उत्कट छटा यातून दिसून आल्या. अनेक पदव्या असणारी स्त्री फार महान असते असे नाही. पण अगदी सामान्य स्त्रीमध्येही असामान्य गुण असतात, तेच तिला वेगळे अधोरेखित करतात! इतरांनी त्या स्त्रीकडून काही शिकावे असे विधात्याने स्त्रीला घडवले आहे.

‘शकुंतला देवी’साठी तुम्हाला काय पूर्वतयारी करावी लागली?
विद्या बालन - शकुंतला देवी शिक्षणाने फार उच्चशिक्षित नव्हत्या. पण त्यांनी जगभर गणिताचे शोज केले. त्यांना वाटे, स्त्रीला स्वतःच्या इच्छा-आकांक्षांप्रमाणे जगता येऊ नये का? तिचे लग्न झाले, मातृत्व लाभले यातच तिचे परिपूर्णत्व का मानले जाते? शकुंतला देवी फेमिनिस्ट नव्हत्या, त्याबद्दल त्यांची आग्रही मते नव्हती, त्या पुरुषद्वेष्ट्याही नव्हत्या. मातृत्व लाभल्यानंतर स्त्रीच्या कारकिर्दीवर पूर्णविराम का येतो? असे त्यांना नेहमी वाटे. जीवन रसरसून-समरसून जगलेली ही स्त्री होती. कामशास्त्र ते स्वयंपाक, गणित ते पर्यटन अशा अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. जन्मजात गणित विषयाचे सखोल ज्ञान घेऊन शकुंतला देवी जगल्या. आपल्या देशाचे नावदेखील त्यांनी मोठे केले. गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या विक्रमांची नोंद झालीय. त्या कशा जगल्या, त्यांची देहबोली, त्या नेहमी डार्क लिपस्टिक्स शेड्स वापरत याची माहिती, हे सगळे मी अभ्यासत गेले. दिग्दर्शक अनु मेननबरोबर मी खूप चर्चा केल्या. शकुंतला देवी यांची मुलगी व जावई यांना भेटले. बायोपिकसाठी आवश्यक असणारी ड्रेसिंग स्टाइल मला निहारिका भसीनने करून दिली. त्याच्याही खूप रिहर्सल्स झाल्या. 

‘शकुंतला देवी’ थिएटरमध्ये रिलीज झाला नाही, ॲमेझॉन प्राइमवर झाला.
विद्या बालन - फिल्म सुरू केली ती सिनेमागृहांच्या प्रेक्षकांसाठी! पण कोरोना प्रकरणाने सगळे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे ॲमेझॉन  
प्राइमवर सिनेमा रिलीज झाला. ३१ जुलैला जगात २०० देशांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला. इतक्या देशांमध्ये थिएट्रिकल रिलीज शक्य नव्हते ना! जो होता है अच्छे के लिये।

तुमच्या कारकिर्दीत अनेक चढउतार आले. त्यांना तुम्ही कशा सामोऱ्या गेलात? चित्रपटसृष्टीतील २५ वर्षांच्या प्रवासानंतर काय वाटते?
विद्या बालन - मी खूप बोलकी, नेहमी व्यक्त होणारी आहे. मी सेटवर असले तरी भूमिकेत शिरेपर्यंत मी माझ्या सहकलाकारांबरोबर अखंड बोलत असते. माझ्या माहेरी कायम अतिशय फ्री वातावरण आहे. प्रश्न साधा असो वा गहन, पण त्यावर आम्ही पाचजण (विद्या, आई, वडील, बहीण आणि आजी) आपली मते मांडत असू. माझ्या कुटुंबात माझे व्यक्तिगत दुःख, व्यक्तिगत समस्या कधीही माझ्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्या कुटुंबाचा एक भाग झाल्या! माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये जे काही चढउतार आले, त्याविषयी मी वेळोवेळी घरच्यांबरोबर बोलत राहिले. त्यामुळे मनावरील ताण-तणावांचे गुंते सुटत गेले. आता लग्नानंतरही माझे प्रत्येक बारीक-सारीक अपडेट्स मी सिद्धार्थला देते. एक साधक-बाधक चर्चा आम्ही करतो. त्यातून सकारात्मक आऊटकम निघेल याचा हा प्रयत्न असतो. 

मी दाक्षिणात्य असल्याने करिअरचा आरंभ मी साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये केला. मला अपशकुनी शिक्का मारला गेला. माझ्या कुटुंबाने मला सावरले. प्रोदीप सोरकार (परिणिता चित्रपटाचे दिग्दर्शक) यांच्या ६० जाहिरातींमध्ये मी काम केले. त्यापुढील पायरी होती ‘परिणिता’. पण या चित्रपटाच्या यशानंतरही मला ड्रेसिंग सेन्स नाही, विद्या कान्ट कॅरी हरसेल्फ अशी टीका व्हायची. माझ्या वजनावरूनही टीका झाली. हे झंझावात सहन करणे सोपे नाही. पण कुटुंबाचा आधार असणे, स्वतः ‘व्होकल’ होणे, सकारात्मकता बाळगणे या गोष्टी ‘स्ट्रेस बस्टर्स’ आहेत हा माझा अनुभव आहे! मी आउट सायडर असूनही इथे टिकून दाखवले, यातच सगळे आले.

तुम्ही प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा परफ्यूम वापरता, हे खरे का?
विद्या बालन - जी हां। मी प्रत्येक व्यक्तिरेखेत अगदी आरपार शिरते. ती व्यक्तिरेखा रंगवताना विद्या नाहीशी झालेली असते. विद्या ते ती विशिष्ट व्यक्तिरेखा हा प्रवास होण्यासाठी मी आधी हे जाणून घेते, की मी रंगवणारी व्यक्तिरेखा कुठला परफ्यूम वापरत असे का? मला जर त्या परफ्यूमचे नाव समजले तर मी तोच सुगंध मागवून घेते आणि वापरते. ‘शकुंतला देवी’ जे परफ्यूम्स वापरत असत, ते परफ्यूम्स मी या फिल्मसाठी शूटिंग करताना वापरले. ‘बेगमजान’ कुंटणखाना चालवणाऱ्या देहविक्री करणाऱ्या स्त्रीची कथा होती. बेगमजान सुविद्य-सुसंस्कृत नव्हती. त्यामुळे त्या काळात उपलब्ध असणारी काहीशी उग्र वासाची इत्र (अत्तर) बेगमजान वापरत असे. ‘तुम्हारी सुलु’मध्ये गृहिणी सर्वसाधारणपणे नेहमी वापरतात ते परफ्यूम्स मी वापरले होते. यामुळे भूमिकेच्या दिशेने प्रवास करणे मला सोपे होते.

वेबसीरिजबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला वेबसीरीजमध्ये काम करायला आवडेल का?
विद्या बालन - मला दर महिन्याला किमान दोन-तीन तरी वेब शोजच्या ऑफर्स येत असतात. २०२३ पर्यंत मी फिल्म्समध्ये बिझी आहे. पण कोविडच्या संकटामुळे सगळीच गणिते बदलून गेली आहेत. त्यामुळे सध्या तरी काही अंदाज नाहीत. पुढच्या फिल्म्स कधी सुरू होतील हे नक्की सांगता यायचे नाही. पण सध्या तरी वेबसीरिज करण्याचा विचार नाही. बट यू नेव्हर नो अबाऊट टुमॉरो! मी वर्षातून एकच सिनेमा करते. तो सिनेमा पूर्ण झाला की किमान दोन-तीन महिने मला त्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी लागतात. त्या काळात मी फिरते, कुटुंबासमवेत वेळ घालवते आणि पुन्हा रिचार्ज होते. त्यामुळे हातात फारसा वेळ उरत नाही.

तुमचा लॉकडाउन कालावधी कसा गेला? या दरम्यान काही वेगळे केले का?
विद्या बालन - लॉकडाउन सुरू झाले तेव्हा मी दिग्दर्शक अमित मसूरकर यांच्या ‘शेरनी’ या फिल्मच्या शूटिंगसाठी आसामच्या जंगलात होते. एक महिन्याचे शेड्युल होते, पण अचानकच हे लॉकडाउन सुरु झाले आणि आम्ही मुंबई गाठली. दोन-चार दिवसांत कोविडचे भयानक रूप ध्यानी येत गेले. घरकाम करणारे मदतनीस बंद झाले. आम्ही दोघांनी सामंजस्याने घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मी या दरम्यान अनेक रेसिपीज करायला शिकले. माझी बेचैनी फार वाढू नये म्हणून स्वतःला अधिकाधिक व्यग्र ठेवले. लॉकडाउनमध्ये अगदी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाले. 

या कोरोना संकटाने फक्त संयमाची पराकाष्ठा शिकवली. मला इतकी शांतता हवीशी झाली आहे की माझ्या मोबाइलची रिंग टोन मला सहन होत नाही. मी गेले चार महिने मोबाइल सायलेंटवर ठेवला आहे. मानसिक तणावावर हे माझे एक प्रकारे हिलिंग आहे.

संबंधित बातम्या