‘स्ट्रगल ही एक शिकवणच...’

पूजा सामंत
सोमवार, 12 जुलै 2021

गप्पा    

तीन वर्षांपूर्वी मराठमोळा दिग्दर्शक अमित मसूरकरच्या ‘न्यूटन’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमित मसूरकरनेच दिग्दर्शन केलेल्या ‘शेरनी’ चित्रपटामुळे तो आता मोठ्या दिग्दर्शकांच्या श्रेणीत पोचला आहे. अनेक वास्तव घटनांचा आणि खऱ्याखुऱ्या समस्यांचा वेध अमित मसूरकरने ‘शेरनी’मध्ये घेतला आहे. या चित्रपटानिमित्त त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

ॲमेझॉन प्राईमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरनी’ चित्रपटामागची प्रेरणा कोणती?
अमित मसूरकर : ‘शेरनी’ची कथा माझी स्नेही आस्था टिकू हिने लिहिली आहे. तिच्याकडे वनसंवर्धन विषयावर एक दीर्घ संशोधन तयार होते. हे नुसते संशोधन नव्हते तर त्यामागे एक तत्त्वज्ञान होते. चित्ता, वाघ, सिंह, अस्वल, गेंडा अशा अनेक जंगली प्राण्यांच्या जीवनशैलीची, जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांची, त्यांच्या समस्यांची तिला विस्तृत माहिती होती. वनअधिकाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या होणाऱ्या बदल्या अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह यात होता. जंगलात प्राणी सुरक्षित नाहीत, ते मानवी वस्तीकडे येतात, त्यांची शिकार होते; त्यात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप होतो. अशा अनेक कळीच्या मुद्द्यांवर आधारित ‘शेरनी’ची कथा आम्ही गुंफली.

गेली अनेक वर्षे हिट सिनेमे देणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या ‘ए लिस्टर’ असलेल्या विद्या बालनसारख्या अभिनेत्रीला भूमिकेसाठी विचारणे अवघड होते का?
अमित मसूरकर : ‘शेरनी’ची लिहून पूर्ण झाली तेव्हा सगळ्या टीमच्या मनात ‘विद्या व्हिन्सेंट’ या प्रमुख भूमिकेसाठी फक्त विद्या बालन हेच नाव होते. ती सहज, एफर्टलेस, सतत विविध व्यक्तिरेखा करणारी प्रयोगशील अभिनेत्री आहे. आजवर कुठल्याही व्यक्तिरेखेत ‘विद्या बालन’ दिसून न येता ती व्यक्तिरेखा म्हणूनच दृष्टीस पडली. सतत विविध आव्हाने पेलणाऱ्या विद्या बालनला मी फोन केला तेव्हा तिने कथानक ऐकून मग ठरवेन असे म्हटले. अर्थात तीन-चार ओळींमध्ये तिला फोनवर नॅरेशन दिले होते. तिच्याशी प्रत्यक्ष भेट झाली, तिची संपूर्ण व्यक्तिरेखा तिच्यासमोर मांडली. तिला ही कथा, तिची भूमिका पसंत पडली आणि तिने होकार दिला.
चित्रपटामध्ये वनअधिकारी विद्या व्हिन्सेंट आपल्या भावना व्यक्त करताना फारशी दिसत नाही. अशी व्यक्तिरेखा रंगवताना स्वतः विद्याचा दृष्टिकोन कसा होता?
अमित मसूरकर : आम्ही संपूर्ण रिसर्च केला. अनेक महिला वनअधिकाऱ्यांना भेटलो. त्या सगळ्या महिला वनअधिकाऱ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे विद्या व्हिन्सेंट ही व्यक्तिरेखा. ‘शेरनी’मध्ये विद्या व्हिन्सेंटला नऊ वर्षे डेस्क जॉब केल्यानंतर फिल्ड पोस्टिंग मिळालेली असते. तिला आपल्या कामाबद्दल निष्ठा, आत्मीयता आहे. काम करताना समर्पण आहे आणि ती प्रामाणिकपणे काम करते. बहुधा सगळेच वनअधिकारी त्यांचे काम अतिशय शांतपणे, परिपक्वतेने, सद्सद्‍विवेकबुद्धीला जागून करतात. जंगलात काम करण्यासाठी कदाचित हा निकष महत्त्वाचा असतो. आपले मत मांडण्यासाठी ते आरडाओरडा करत नाहीत. वादाने प्रश्न सोडवले जात नाहीत हे त्यांच्या देहबोलीतून जाणवते. विद्या व्हिन्सेंट ही वनअधिकारी एक वास्तव आणि खरीखुरी व्यक्तिरेखा आहे, फिल्मी नाही. त्यामुळे विद्या बालनलादेखील विद्या व्हिन्सेंट या व्यक्तिरेखेच्या आलेखाप्रमाणे अभिनय करायचा होता. विद्या बालन स्वतः अतिशय समजूतदार, परिपक्व अभिनेत्री असल्याने ‘मेरे किरदार को अक्सर खामोश ही क्यों दिखाया? मेरे हिस्से डायलॉग्ज क्यों नहीं हे?’ वगैरे प्रश्न तिच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. विद्याविषयी ही खात्री होतीच आणि विद्या बालनने अपेक्षेनुसार तिच्या व्यक्तिरेखेत गहिरे रंग भरले आहेत!

‘शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग २०२०च्या कोरोना आणि लॉकडाउन काळात झाले. जंगलात शूटिंग करण्याचा अनुभव कसा होता?
अमित मसूरकर : मध्यप्रदेशच्या बालाघाट जंगलात जानेवारी-फेब्रुवारी २०२०मध्ये आम्ही शूटिंगला सुरुवात केली. अर्थातच त्याआधी शूटिंगसाठी जागा, शूटिंगसाठी परवानगी, राहण्यासाठी गोंदियामधील हॉटेल ही संपूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. गोंदिया ते बालाघाट म्हणजे जंगलातील शूटिंगचे लोकेशन हे ४५ मिनिटे ते एक तासाचे अंतर होते. दररोज गोंदियामधले हॉटेल ते बालाघाट हा प्रवास करणे अपरिहार्य होते.  
शूटिंग पूर्ण होण्याआधी मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि लॉकडाउन सुरू झाले. आम्ही उर्वरित शूटिंग बंद करून मुंबईला आलो. त्यानंतर जेव्हा हळूहळू अनलॉक झाले, तेव्हा आम्ही पुन्हा बालाघाट जंगल गाठले आणि शूटिंग पूर्ण केले. जंगलात चित्रीकरण करताना कॅमेऱ्याचे लाइट्स बंदच ठेवणे हा नियम आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशात शूटिंग करताना जर एक सीन आज बारा वाजता शूट केला, तर त्यात खंड पडू देणे शक्य नसते. रिटेक घेताना दुसऱ्या दिवशी बारा वाजताच तो सीन शूट करणे आवश्यक असे. दुपारी बारा वाजताचा सूर्यप्रकाश आणि चार किंवा तीन वाजताचा सूर्यप्रकाश यात खूप फरक पडतो. अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी ध्यानात ठेवणे गरजेचे होते. शूटिंग करताना आवाज, कोलाहल करणे नियमबाह्य होते. जास्तीत जास्त शांतता पाळत आम्ही चित्रीकरण करत असू.

‘शेरनी’मध्ये मुख्य कलाकार सोडल्यास आणखी किमान ५०० कलाकार आहेत. या कलाकारांना आम्ही मुंबईहून नेले नव्हते. बालाघाट म्हणजेच वनविभागातील आजूबाजूच्या गावातील स्थानिक रहिवाशांनीच अगदी उत्तम परफॉर्मन्स दिलेत. ज्यांनी कधी फिल्म कॅमेरा पाहिला नाही, ॲक्टिंग म्हणजे काय हे ज्यांना माहीत नव्हते अशा गावकऱ्यांनी नॅचरल परफॉर्मन्स देऊन आम्हाला चकित केले.

कोरोना प्रादुर्भावापासून सर्वांनीच सुरक्षित राहावे यासाठी आमच्या टीममध्ये सात प्रशिक्षित लोक होते. सगळ्यांनी मास्क घातला आहे का, सॅनिटायझरचा वापर करत आहेत का यावर ते लक्ष ठेवून होते. तातडीची सगळी व्यवस्था, रुग्णवाहिका, औषधे असे सगळे तयार होते. जो बाहेरून लोकेशनवर येई त्याला येण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक होते. त्या व्यक्तीला एक आठवडा विलगीकरणात ठेवून मगच लोकेशनवर वावरण्याची परवानगी होती. अतिशय दक्षता घेत आम्ही ‘शेरनी’चे चित्रीकरण पूर्ण केले. सुदैवाने कुणालाही कोरोनाचे संक्रमण झाले नाही.

तुमच्या दिग्दर्शकीय प्रवासाविषयी काय सांगाल?
अमित मसूरकर : मी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात वाढलो. आमच्या कुटुंबात कधीतरी सिनेमा पाहणे इतकीच मनोरंजनाची व्याख्या होती. सिनेमा विश्वाशी आमचा अन्य कुठलाही संबंध दुरान्वयाने असण्याचे दुसरे कारणही नव्हते. आम्ही माहिमला राहतो. रुपारेल कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर मणिपाल विद्यापीठात इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. त्या काळात ‘पल्प फिक्शन’ या हॉलिवूड फिल्मची लोकप्रियता भलतीच जाणवली. तिथे व्हिडिओ पार्लर्समध्ये या फिल्मची कॅसेट मिळत नव्हती. या फिल्मविषयी उत्सुकता शिगेला पोहचली होती. मी 
आधी फिल्मविषयी जाणून घेतले, 

कथा वाचली आणि मग तब्बल १७ वेळा हाच चित्रपट पाहिला. याच प्रवासात माझ्यावर सिनेमा माध्यमाने गारुड केले. सिनेमाची व्याख्या एका वेगळ्या संकल्पनेतून माझ्या डोक्यात घडत होती. मी घरच्यांबरोबर याबाबतीत बोललो आणि मुंबईत येऊन सिनेमा क्षेत्रात संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. मुलाला पूर्णतः अपरिचित क्षेत्रात संघर्ष करण्यासाठी जाण्याची परवानगी दिली, ही माझ्या आईवडिलांची थोरवी! हे क्षेत्र त्यांच्याइतकेच माझ्यासाठीदेखील अपरिचित, असुरक्षित होते. भविष्य काय असेल याची त्याक्षणी कल्पना नव्हती. पण त्यांनी आडकाठी केली नाही. त्यांच्या सकारात्मकतेमुळे माझ्यावर दडपण नव्हते.मी मुंबईत संघर्षाला सुरुवात केली. किमान ६० दिग्दर्शकांना फोन केले. पण त्या त्या वेळेस हे मान्यवर त्यांच्या ऑफिसमध्ये उपलब्ध नसत. माझे फोन कुणी उचलत नसे. तो काळदेखील आजच्या इतका ॲडव्हान्स नव्हता. आज स्वतःचे टॅलेंट तुम्ही सोशल मीडियावर मांडू शकता. सोशल मीडिया आजचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. पण माझ्या संघर्षाच्या काळात सोशल मीडिया इतका स्ट्राँग नव्हता. पण या संघर्षाला मी लर्निंग प्रोसेस मानतो. आजवर हजारोंनी असा स्ट्रगल केला आहे.

मला टीव्ही माध्यमात स्टाफ रायटरची नोकरी मिळाली. ग्रेट इंडियन कॉमेडी सर्कस हा शो मी तीन वर्षे लिहिला. यात चांगले पैसे मिळाले. पुढच्या टप्प्यावर मित्राच्या मदतीने मी ‘सुलेमानी किडा’ हा कॉमेडी चित्रपट केला, त्यानंतर ‘न्यूटन’ चित्रपट केला. ‘न्यूटन’ला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता मिळाली. मग त्यानंतर ‘शेरनी’ घडला. आता यानंतर आस्था टिकूबरोबर एक वेबसीरीज करण्याचा 
विचार आहे.

संबंधित बातम्या