‘कथा ताकदीची हवी’ 

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

गप्पा
गेली ४० वर्षे अनेक मालिका, नाटके आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते प्रशांत दामले यांची भूमिका असलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटकही नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...

मुंबई-पुणे-मुंबईच्या दुसऱ्या भागापासून तुम्ही या चित्रपटाचा भाग झालात. पहिला भाग पाहून तुमचे या चित्रपटाबद्दलचे मत काय होते? 
प्रशांत दामले ः मुळात मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाची कल्पनाच खूप ब्रिलियंट आहे. कथेत जर दम नसेल तर चित्रपट करायला मजा येत नाही. मग तुम्ही त्याचे कितीही सीक्वेल करा. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाच्या बाबतीतही तसेच झाले. आम्ही जेव्हा त्या नाटकाच्या कथेवर काम केले तेव्हा ती कथा तेवढी ताकदीची झाली. त्यामुळे ही कल्पनाच छान. टप्प्याटप्प्याने आयुष्य जसे पुढे जाते तसे टप्प्याटप्प्याने पुढची कथा सांगायला मजा येते. ‘परफॉर्मिंग आर्ट’मध्ये तुम्ही ती कथा व्हिज्युअलाईज करून मांडलेली असते. चित्रपटाच्या माध्यमात हे जास्त छान जमते. आमचा दिग्दर्शक सतीश राजवाडे हा खूप उत्तम व्हिज्युअलायझर असल्यामुळे त्याला ते एक गणित जमलेले आहे. 

या चित्रपटात मुलाचे आणि वडिलांचे नाते खूप घट्ट आणि छान दाखवले आहे. त्याबद्दल काय सांगाल? 
प्रशांत दामले ः
जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतशी तुमची मॅच्युरिटीही वाढते. तुम्ही परिपक्व होत जाता... आणि मॅच्युरिटी ही वयामुळे येतेच. त्यामुळे पंचविशीतला मुलगा आणि साठीचा बाप हे नातेच वेगळे असते. त्यांच्यात मित्रत्वाचे नाते तयार होते आणि ते तसेच असले पाहिजे तर ते नाते फार छान खुलते. 

तुमचे आणि तुमच्या मुलींचे नाते कसे आहे? 
प्रशांत दामले ः
मुली या नेहमीच बाबांच्या जवळ असतात. मॅच्युरिटी येणे म्हणजे काय तर ‘ठंडा करके खाओ.’ जे लोक एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्‍ट होतात ते गोत्यात येतात. त्यामुळे कोणतेही नाटक सांभाळायचे असेल, तर धीराने घेतले पाहिजे आणि धीराने घ्यायला अंगवळणी पडणे खूप कठीण असते. माझ्या आणि माझ्या मुलींचे नातेही असेच आहे. मी सगळ्या गोष्टी धीराने घेतो. 

आजकाल नाटक असो वा चित्रपट, प्रमोशनचे महत्त्व खूप वाढले आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे? 
प्रशांत दामले ः नाटक किंवा चित्रपटाचे प्रमोशन करावेच लागते. पण नुसते प्रमोशन करून फायदा नसतो. कारण प्रमोशन हे लोकांना तुमचे नाटक किंवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हे सांगण्यासाठीच असते. त्यानंतर ते आवडणे आणि त्याची माऊथ पब्लिसिटी होणे हे फार महत्त्वाचे आहे. चित्रपट किंवा नाटक हे जास्तकरून माऊथ पब्लिसिटीवरच चालते. तुमची कथा, मांडणी चांगले असेल तरच नाटक वा चित्रपट चालेल. नुसते प्रमोशन या गोष्टीवर भर देऊन काही होत नाही. तुमच्याकडे खूप पैसे असतील तर खूप प्रमोशन करायला काहीच हरकत नाही. पण नाटक किंवा चित्रपट त्यानंतर पडतोसुद्धा. 

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा सीक्वेल तुम्ही करताय. आजपर्यंत मराठी नाटकाचा सीक्वेल कधी आला नाही. तर हा सीक्वेल करावा असे कसे सुचले? 
प्रशांत दामले ः नाटक बनवण्याची प्रोसेस असते. पहिले एक लाइन तयार होते. मग तीन - चार ओळी बनतात. तर जेव्हा वन लाइन तयार झाली तेव्हाच जाणवले, की या नाटकाचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ होऊ शकते. मग त्याच दिशेने आम्ही प्रयत्न करू लागलो. त्याच्या कथेवर काम करू लागलो. मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये या नाटकाची प्रोसेस सुरू झाली ते या नोव्हेंबरमध्ये नाटक रंगभूमीवर आले. 

आम्ही तुम्हाला पाककला कार्यक्रमांमध्येही पाहतो, पण तुम्ही त्याव्यतिरिक्त छोट्या पडद्यावर दिसत नाही. असे का? 
प्रशांत दामले ः वेळच मिळत नाही. त्यामुळे मालिकांमध्ये काम करत नाही.
 

संबंधित बातम्या