मानवनिर्मित शोकांतिका 

प्रिया भिडे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

आपण निसर्गाकडे डोळसपणे बघायला लागू, तसे निसर्गातील बदल समोर येत जातील. प्रत्येकाने आपल्या सोयीसाठी केलेले, स्वतःच्या जीवनशैलीला अनुरूप, आपल्याला त्रास नको म्हणून केलेले बदल, फुकट उपलब्ध म्हणून निसर्गाचा केलेला वापर, अज्ञानातून निसर्गाची केलेली हानी समोर येईल. इतक्या छोट्याशा कृतीने काय होणार आहे, असे प्रत्येकाला वाटेल आणि त्यातूनच निसर्गाची शोकांतिका झालेली दिसेल. ज्येष्ठ इकॉलॉजिस्ट हार्डिंन यांनी १९६८ मध्ये यास ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स असे म्हटले आहे. ही संकल्पना त्यांनी आल्प्स पर्वतावरील मेंढ्यांच्या चराऊ कुरणासाठी वापरली होती. आज शहरात माती व पाणी या दोन्ही संसाधनांची दुरवस्था आहे, कारण या दोन्हींप्रती लोकांमध्ये पुरेशी संवेदनशीलता नाही. शहरांमध्ये माती असलेला पृष्ठभाग घटत चालला आहे, त्यामुळे पाणी मुरण्याच्या जागा कमी होत आहेत, विविध वनस्पतींचा अधिवास कमी होत आहे. इमारतीभोवती सुखसोयींसाठी स्थानिक वनस्पती काढून बॉटल पाम लावले जातात. आजकाल बघावे त्या नव्या गृहनिर्माण संस्थांमध्ये रस्त्याच्याकडेला बॉटल पाम दिसत आहेत. काही वर्षांनी बॉटल पामचे शहर होईल. सावली न देणारे, नुसते उंच वाढणारे, पाने न गळणारे, पक्षी, कीटकांना निरुपयोगी झाडे आपण का लावत आहोत? सुशोभीकरणासाठी!

नवीन घरात दोन बाथरूम असतात. त्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो, पण पावसाचे पाणी साठवले जात नाही, पुनर्वापर केला जात नाही. तरणतलावासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि लाखो रुपये खर्च करून टँकरने पाणी आणतात. हे शाश्‍वत नाही.

दुसरीकडे शहरांमध्ये आपण निर्माण करत असलेला रोजचा कचरा टाकण्यासाठी शेकडो एकर जमिनीचा वापर होत आहे. टाकलेल्या कचऱ्यामधून मिथेन वायू निर्माण होऊन त्याला आगी लागत आहेत. हवेचे प्रदूषण होत आहे. कचऱ्यातून निर्माण झालेल्या काळ्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे. ज्या ठिकाणी हे कचरा डेपो आहेत, त्या ठिकाणच्या माणसांचे जीवन नरकप्राय झालेले आहे आणि जे लोक कचऱ्यामध्ये काम करत आहेत, अहोरात्र कचऱ्याचे ढीग उपसत आहेत त्यांच्या आरोग्याबद्दल काय बोलावे? शहरवासीयांची ही शोकांतिका आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गात केलेला बदल आपल्याला मोठ्या प्रमाणात फटका देतो, हे यावेळच्या पावसाळ्यात आपण अनुभवले आहे. 

नैसर्गिक संसाधने आपल्या सर्वांची आहेत, जसे ओढे, नाले, नद्या, सागर, महासागर, डोंगर, टेकड्या, मोकळी पटांगणे, रस्ते. पण सगळीकडे आपण टाकलेल्या कचऱ्याचे अस्तित्व जाणवत राहते, या नैसर्गिक स्रोतांची आपण केलेली ही शोकांतिका आहे. प्रत्येकाला वाटते माझ्या घरून थोडासा कचरा बाहेर जातो, पण सरतेशेवटी तो रोज १९०० टन इतका होतो, जो वर्षानुवर्षे दुसऱ्या कुणाच्या तरी दारात जाऊन पडतो. विचार करा शहर वाढते, लोक वाढताहेत, कचरा वाढतोय.

निसर्गात या कचऱ्याचे काय होते? निसर्गात कचरा ही संकल्पना असते का? जंगलामध्ये एखादा प्राणी मरून पडला, तर त्याला खाणारे इतर अनेक जीव असतात, मांसाहारी प्राण्यांपासून सूक्ष्मजीवांपर्यंत अन्नसाखळी जपली जाते, सूक्ष्मजीव आणि विघटित केलेला देह मातीत मिसळून जातो, नवीन झाडांना जीवन देण्यासाठी. आपणही मृतजीवास मातीत पुरून टाकत असू, आता आपण मातीलाच पुरून टाकत आहोत. एक अन्नसाखळी तोडून टाकत आहोत. आपल्याला शहरी जीवनात ही अन्नसाखळी जपायला हवी, निसर्गचक्र जपायला हवे. कमी जागेत खूप लोक राहत आहेत, त्यासाठी आपण प्रत्येकाने निसर्गपूरक कृती करण्याची गरज आहे. 

हवा, माती, पाणी या मुलभूत गरजा आहेत त्यांचे आरोग्य आपल्या हातात आहे आणि या सार्वजनिक मालमत्ता आहेत. बोअरवेलचे पाणी तुमच्या आवारातले असले, तरी त्याचा झिरपा लांबच्या प्लॉटमधून असू शकतो. तुमच्या आवारात जाळलेल्या पालापाचोळ्याचा धूर सगळ्यांच्या हवेचे प्रदूषण करत असतो, अगदी तुम्ही श्‍वास घेता त्या हवेत हे प्रदूषण असते, हे आपण विसरत आहोत. 

इकॉलॉजिस्ट गेरेट हार्डीन यांनी लोकांनी समूहाने बेदरकारपणे निसर्गाचे शोषण कसे केले हे मांडले, पण नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञ डॉ. एलिनोर ओस्त्रोम यांनी सकारात्मक भूमिका मांडली. त्या म्हणतात, निसर्गाची, पर्यावरणाची शोकांतिका लोकसमूहाच्या एकत्रित प्रयत्नाने टाळता येऊ शकते. त्यांच्या गव्हरनिंग द कॉमन्स या पुस्तकात त्यांनी अनेक ठिकाणी लोकसमूहांनी निसर्ग संसाधने वापरताना ती चिरंतन जपली जातील यासाठी केलेले प्रयत्न मांडले आहेत. शहराच्या शाश्‍वत विकासाचे धोरण आखताना हेच उद्दिष्ट हवे आणि माझे शहर माझे घर ही आपली भूमिका हवी. डॉ ओस्त्रोम यांनी मांडलेले विचार आपण कृतीमध्ये आणण्याची गरज आहे. यासाठी आपण आपल्या घरापासून प्रयत्न सुरू करूयात. जशी आम्ही कुटुंबीयांनी केली...  

संबंधित बातम्या