कचरा नव्हे, कच्चा माल!

प्रिया भिडे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

कचरा व्यवस्थापन ही सामाजिक गरज झाली आहे, कारण शहरांमध्ये निर्माण होणारा मानवनिर्मित कचरा अनेक प्रकारच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. कचरा म्हणजे आपल्याला नको असणाऱ्या वस्तू, पदार्थ, रसायने, असे अनेक घटक असतात. 

निसर्गनिर्मित घटक विघटनशील (biodegradable)असतात. या घटकांचे विघटन कधी होणार, कसे होणार व कोण करणार हे त्यामध्ये असलेल्या रासायनिक घटकांवर अवलंबून असते. निसर्गनिर्मित घटक तयार होत असताना सूर्यऊर्जा वापरली जाते. हे घटक अन्नसाखळीचे एक भाग असतात. मानवनिर्मित घटक वेगवेगळ्या रसायनांच्या माध्यमातून, मिश्रणातून, विविध प्रक्रियांद्वारे तयार केले जातात. मानवनिर्मित घटक तयार करण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते व विघटनासाठीपण खूप ऊर्जा खर्च करावी लागते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण दोन्ही प्रकारच्या वस्तूंचा भरपूर वापर करतो व नको असलेल्या गोष्टी कचरा म्हणून फेकून देतो. कचरा व्यवस्थापनातील प्राथमिक पायरी म्हणजे कचरा या शब्दाबद्दल आपल्या मनात असलेली भावना बदलणे.

निर्माण होणारी प्रत्येक वस्तू उपयुक्त आहे. ती आपल्याला उपयोगी नसेल, तरी दुसरा कोणीतरी त्याचा वापर करू शकतो. कोणतीच वस्तू टाकाऊ नाही, पण त्याचा वापर करू शकणारी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. आपल्याला नको असलेल्या वस्तू ज्यांना हव्या आहेत, त्यांच्यापर्यंत योग्य त्या स्थितीमध्ये पोचवायला हव्यात. त्यासाठी आपण निसर्गनिर्मित घटक व मानवनिर्मित अविघटनशील घटक वेगळे ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या वर्गीकरणामुळे दोन्ही प्रकारच्या घटकांचा एक संसाधन म्हणून पुनर्वापर करता येतो. मग कचरा हा कचरा न राहता कच्चा माल होतो. मी गेली तीस वर्षे आमच्या घरातील कचऱ्याचे असे वर्गीकरण करत आहे. ओला कचरा गच्चीवरील बागेमध्ये जिरवत आहे.

याबाबतीतील माझे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे... विशेषकरून सुरुवातीची पंधरा वर्षे आणि नंतरची पंधरा वर्षे यामध्ये झालेली स्थित्यंतरे खूप महत्त्वाची आहेत.

जंगली महाराज रोडवर असलेल्या आमच्या घराची गच्ची ४०० स्क्वेअर मीटर इतकी मोठी होती. तेथे बाग करावयाचे ठरवल्यानंतर आम्ही दोन ट्रक माती पाचव्या मजल्यावर चढवली, हे वर्ष होते १९९०. गच्चीवर एक छोटेसे गोल तळे, त्या भोवताली हिरवळ, हिरवळीच्या चारी बाजूला सिमेंटच्या आडव्या कुंड्या ठेवून त्यामध्ये पांढरा फ्लोरीबंडा गुलाब अशी रचना एका बाजूला, तर दुसऱ्‍या बाजूला वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या असे विभाग केले होते. पाण्याच्या टाकीखाली सावलीत वाढणाऱ्या पर्णशोभेच्या कुंड्या होत्या. बाग छान बहरत होती. पुढे २००२ मध्ये आम्ही नव्या वास्तूचे नियोजन केले व येथेही सहाव्या मजल्यावर बाग करावयाची असे ठरवले. गच्चीवरती बाग करावयाची असेल तर आधीच नियोजन करावे लागते. ते काय करायचे हे आपण पाहूच. परंतु, दरम्यानच्या काळात आम्ही निसर्गाचा अभ्यास करत होतो, आजूबाजूचा निसर्ग डोळसपणे बघत होतो. यातूनच आम्ही अधिकाधिक निसर्ग साक्षर होत गेलो. माझे पती सुनील भिडे यांनी मातीचा अभ्यास सुरू केला. मातीचा  दोन-तीन सेंटिमीटरचा थर तयार होण्यास शेकडो वर्षे लागतात, माती म्हणजे स्थानिक जीवसृष्टीचा आधार आहे याची जाण आली. मग प्रश्‍न पडला, की अशी ही माती जी शेतकऱ्याचा जीवनाधार आहे, ज्यावर स्थानिक निसर्ग अवलंबून असतो, ती माती आपण आपल्या हौसेच्या बागेसाठी लांबून कुठून तरी उकरून, ओरबाडून आणायची  का? अर्थातच आमचे उत्तर नाही होते. पण मग झाडे वाढवायची कशी असा प्रश्‍न पडला.

त्याचे उत्तर आम्हाला निसर्गानेच दिले. निसर्गात, जंगलांमध्ये वनस्पतींचे पोषण कसे होते हे पहिले. जंगलांमध्ये जमिनीवर पालापाचोळ्याचा थर पडलेला दिसतो, त्यातच प्राणिजन्य घटक पडतात आणि शतकानुशतके हा निसर्ग फुलत राहतो, फळत राहतो, इतर प्राणिसृष्टीला आधार देतो. मातीमध्ये सतत सेंद्रिय घटक पडत जातात, तिथेच ते जिरतात आणि त्यातूनच वनस्पतींचे पोषण होत जाते हे समजले. मग आम्ही निसर्गाची नक्कल करायचे ठरवले. आमच्या बागेसाठी आजूबाजूला खूपच कच्चा माल, संसाधने दिसून आली, ती पालापाचोळ्याच्या स्वरूपात! त्याचा वापर करून आम्ही झाडे वाढवायचे ठरवले.

ती कशी वाढवली ते सांगेनच, पण त्याआधी बघूया गच्चीच्या बागेसाठीचे तांत्रिक नियोजन, पण पुढील भेटीत!         

संबंधित बातम्या