बागेसाठी छताचे नियोजन

प्रिया भिडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

जमिनीवर इमारत बांधताना अनेक तांत्रिक बाबींची काळजी घ्यावी लागते. मातीचा प्रकार (strata), खडक, जमिनीतले पाणी अशा अनेक बाबींचा विचार केला जातो, तसेच इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरची स्लॅब म्हणजे छत, यासाठीही विशेष नियोजन करावे लागते. सर्वसाधारणपणे यासाठी स्लॅबवर येणारे वजन व वॉटरप्रूफिंग हे महत्त्वाचे घटक असतात. यासाठी वास्तुविशारदतज्ज्ञ तसेच आरसीसी सल्लागार व प्रत्यक्ष काम करणारे ठेकेदार या सगळ्यांची टीम महत्त्वाची असते. आमच्या गच्चीचे नियोजन करताना वरील सर्व बाबी ध्यानात घेऊन सुनील भिडे यांनी आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी वास्तुविशारदतज्ज्ञ चैतन्य पेशवे व आरसीसी सल्लागार सतीश मराठे यांना सांगितल्या. या दोघांनी अतिशय उत्तम नियोजन करून दिले, ज्यामध्ये स्लॅबवर दीड फूट ओल्या मातीचे वजन पेलले जाईल अशी योजना केली. उत्तम प्रकारचे स्टील वापरले. संपूर्ण स्लॅब कास्ट करताना एकसंधपणा राहण्यासाठी स्लॅब एकाच दिवसात पूर्ण होईल याची खबरदारी घेतली व काँक्रीट भरताना flat bed vibrator वापरला.

त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे वॉटरप्रूफिंग. आमच्या गच्चीवर आम्ही ब्रिक बॅट कोबा पद्धत वापरली आहे. यामध्ये स्लॅबवर विटांच्या तुकड्याचा थर दिला जातो, त्यावर सिमेंटचे मिश्रण ओतले जाते, हे करत असताना छतावर पडलेले पाणी वाहून जाण्याच्या ड्रेन पाइपच्या दिशेने उतार दिला जातो. गळती न होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

बाग करा अथवा न करा, छतावर पाणी साठले तर ते अगदी बारीकशा फटीतून, भेगेतून वाट मिळेल तेथून झिरपते, कुठून तरी मार्ग काढते व खालच्या मजल्यांवर गळते. उत्तम स्लॅब ही बांधकाम व्यावसायिकांची मोठी जबाबदारी असते. स्लॅबची गुणवत्ता वापरलेले सिमेंट, पाणी, खडी यांचे मिश्रण यावर अवलंबून असते. विशेष करून water/cement ratio महत्त्वाचा असतो. सिमेंटमध्ये पाणी घातल्यानंतर उष्णता निर्माण होते व काँक्रीट पटकन घट्ट होते. काँक्रीटच्या मिश्रणामध्ये प्लास्टिसायझर घातल्यास पाण्याची गरज कमी होते, स्लॅब सेटिंग सावकाश व चांगले होते. या शिवाय वॉटरप्रूफिंग करताना आजकाल बाजारात गळती रोधक मिश्रणे उपलब्ध असतात, तीसुद्धा स्लॅबमध्ये वापरता येतात. आमच्या इमारतीच्या छताला प्लास्टिसायझर व फिक्सिट वापरले आहे. त्यामुळे गच्चीवर पालापाचोळ्याचा दोन फूट थर असला तरी गेल्या पंधरा वर्षांत गळती नाही.

छतावर पडलेले पाणी लवकरात लवकर छतावरून वाहून जाणे महत्त्वाचे असते. बऱ्याच वेळेला खूप मोठ्या गच्चीला एखादाच ड्रेन पाइप दिलेला असतो, मग पाणी तुंबण्याचा, गळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पाणी पटकन वाहून जाण्यासाठी ड्रेन पाइपची योग्य संख्या ठेवावी लागते. यातल्या तांत्रिक गोष्टी या बांधकाम व्यावसायिकांकडून केल्या जातातच. परंतु, तरीदेखील छतावर बाग करताना खालच्या मजल्यावर गळणार नाही ना, अशी शंका बहुतेक लोकांना असते व ती रास्तच आहे. गळती होऊ नये म्हणून बागेचे नियोजन करण्याआधी योग्य प्रकारे गळती रोधक थर देऊन घ्यावा. गच्चीवर झाडे लावताना वाफ्यामध्ये किंवा कुंडी, ड्रम अशा कंटेनरमध्ये लावू शकतो. गच्चीच्या भिंतीलगत वाफा केल्यास गळण्याचा धोका वाढतो. कारण तळाच्या स्लॅबचा वॉटरप्रूफिंगचा वाटा व गच्चीच्या भिंतीचे प्लास्टर यामध्ये एक जोड असतो. या ठिकाणी पाणी मुरल्यास गळती होऊ शकते. त्यामुळे वाफा करताना भिंतीपासून लांब करावा. आमच्या गच्चीवरच्या वाफ्याच्या तळास डांबराचा खडा पातळ करून त्याचा थर दिलेला आहे. त्यामुळे वॉटरप्रूफिंगचा दुहेरी थर होतो. थंडी व उन्हाळा दोन्ही ऋतूंमध्ये डांबराच्या आकुंचन व प्रसरण पावण्याच्या क्षमतेमुळे स्लॅबचे संरक्षण होते. आम्ही दोन विटांचा वाफा बांधला आहे. त्याला चारी बाजूंनी पाणी वाहून जाण्यासाठी चार से.मी.ची भोके ठेवली आहेत. या वाफ्यात उताराच्या दिशेने पीव्हीसीचे सछिद्र पाइप घातले आहेत. वाफ्यातून पाणी पटकन वाहून जावे यासाठी डांबराच्या थरावर विटांचे तीन-चार सेंटिमीटरचे तुकडे, वाळूचा चाळ किंवा खडी टाकावी. त्यामुळे झाडांना दिलेले पाणी आणि पावसाचे पाणी वाफ्यातून पटकन बाहेर पडून वाहून जाते.

वाफ्यासाठी बांधकाम करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. दोन विटांचा नुसता थर ठेवूनही त्यात झाडे लावता येतात. यामुळे पाण्याचा निचरा पटकन होतो व हवाही चांगली खेळती राहते. तळाला प्लॅस्टिकचा कागद घातला तर चालेल का, असा प्रश्न बरेच लोक विचारतात. प्लॅस्टिकचा कागद फाटू शकतो किंवा त्याला चुण्या पडल्यास त्यामध्ये पाणी साठू शकते. या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. एकूणच काय तर गच्चीवर बाग करताना तांत्रिक बाबींचे नियोजन करून मगच पुढे जावे. जमिनीवरची बाग व गच्चीवरील बाग यामध्ये हाच मोठा फरक आहे. पण आजकाल तंत्र खूप प्रगत आहे, गच्चीवर तरणतलावदेखील केले जात आहेत. परंतु, त्यापेक्षा आज गरज आहे हिरवाईची. हिरवाई कचरा जिरवण्यासाठी मदत करेल, फुले भाजीपाला देईल, प्रत्येक इमारतीचा जणू छोटासा ऑक्सिकॅफे असेल. नवीन वास्तू घेणाऱ्यांनी तरणतलावापेक्षा हिरवाईला प्राधान्य द्यावे. वास्तुविशारदतज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक कोट्यवधी रुपये खर्च करून देखण्या वास्तू निर्माण करताहेत. त्यांनी काळाची गरज ओळखून गच्चीवर हिरवाई ही अमेनिटी ठेवावी. हरित वास्तूचा, उत्तम स्थापत्याचा आविष्कार करावा.  

संबंधित बातम्या