पोषक माध्यम माती

प्रिया भिडे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

बागकाम करताना वनस्पतींच्या वाढीसाठीच्या आवश्यक गोष्टींची तरतूद करावी लागते. माती हा त्यातला प्रमुख घटक असतो, कारण वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे पोषक घटक मुळाद्वारे मातीतून घेतले जातात. निसर्गात वेगवेगळ्या खडकांची झीज होऊन मातीचा थर होण्यास शेकडो वर्षे लागतात. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची, पोताची माती दिसते. पण हे दिसणारे रूप फारच ढोबळ असते. मातीतील जैविक व अजैविक घटक जाणून घेतले, तर तिचे विलोभनीय रूप आपल्या समोर येते. मातीचे गुणधर्म भौगोलिक ठिकाणानुसार बदलतात. मातीच्या गुणधर्मानुसार तेथील वनस्पती आणि संस्कृती असे अधिवास तयार होतात. 

मातीचे अनेक उपयोग आहेत, जसे 

 • वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक माध्यम 
 • निसर्गातील अन्नद्रव्याच्या साखळीतला महत्त्वाचा दुवा
 • पाण्याच्या चक्राचा महत्त्वाचा दुवा
 • वेगवेगळ्या वायूंच्या चक्राचा महत्त्वाचा दुवा
 • अभियांत्रिकीसाठी महत्त्वाचा घटक
 • खनिजांची साठवण

आपल्याला क्षुल्लक वाटणारी, निर्जीव दिसणारी ही माती निसर्गातला मती गुंग करणारा कारखाना आहे. डोळ्यांना दिसत नसली तरी यातली उलाढाल खूप मोठी असते व ती आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म समजून घेणे गरजेचे आहे. वनस्पतींची वाढ, त्यांचे आरोग्य, येणारी फुले, फळे असे जीवनचक्र या पोषक माध्यमावर अवलंबून असते.
मातीच्या अभ्यासासाठी O, A, B व C horizon असे विभाग केलेले असतात. प्रत्येक थराचे वेगळे वैशिष्ट्य असते. वनस्पतींच्या वाढीसाठी मातीचा वरचा १० सेंटिमीटर ते २५ सेंटिमीटर हा थर अतिशय महत्त्वाचा असतो, ज्यास टॉप सॉईल असे म्हणतात. या थरात असलेल्या सूक्ष्मजिवांमुळे माती सकस होते.
मातीचे प्रमुख घटक : हवा, पाणी, खनिजद्रव्ये व सेंद्रिय माल (जैव विघटनशील घटक). या चार घटकांचे प्रमाण मातीची गुणवत्ता ठरवते. मातीच्या कणांच्या आकारावरून त्यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्यांची उपलब्धता ठरते. वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या अतिशय महत्त्वाच्या असतात. मातीचे कण फार बारीक असले तर हवेच्या पोकळ्या कमी होतात व मातीत पाणी साठून राहते त्यामुळे वनस्पतींची वाढ योग्यरीतीने होत नाही. चिकट मातीपेक्षा दळदार मातीमध्ये वनस्पती अधिक चांगल्या प्रकारे वाढतात. 
मातीमध्ये वास्तव्य करणारे हजारो-लाखो डोळ्यांना दिसणारे व न दिसणारे सजीव, जसे अनेक प्रकारच्या बुरशी, बॅक्टेरिया, निमॅटोड, वेगवेगळ्या प्रकारची गांडुळे, गोम वगैरे असतात. एक ग्रॅम मातीमध्ये साधारण १०,००,००,००० सूक्ष्मजीव असू शकतात. सजीव माती झाडांचे पोषण करते. वनस्पतींचे व प्राण्यांचे अवशेष मातीत पडल्यावर सूक्ष्मजीव वनस्पतींनी व प्राण्यांनी साठवलेल्या खनिजांचे विघटन करतात. वनस्पती ही खनिजे व पाणी मुळांद्वारे शोषतात. त्यामुळे आपल्या बागेसाठी माती सजीव असणे गरजेचे असते.
मातीचा सामू (PH) योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. मातीतील हायड्रोजन आयन व हायड्रोसिल आयन यांचे प्रमाण म्हणजे मातीचा सामू (PH).

 • न्यूट्रल ७ सामू 
 • आम्लधर्मीय माती : ७ पेक्षा कमी सामू
 • अल्कलीधर्मीय माती : ७ पेक्षा जास्त सामू
 • खूप आम्लधर्मीय अथवा खूप अल्कलीधर्मीय मातीमध्ये वनस्पतींची वाढ नीट होत नाही.
 • वनस्पतींच्या पोषणासाठी मातीमध्ये विविध खनिजद्रव्ये यांची आवश्यकता असते. 
 • अधिक प्रमाणात लागणारी खनिज द्रव्ये (Macronutrients): कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, नायट्रोजन, पोटॅशिअम, फॉस्फरस, सल्फर, सिलिकॉन. 
 • सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिज द्रव्ये (Micronutrients): कॉपर, कोबाल्ट, आयर्न, मॅंगेनिज, निकेल, सोडिअम, झिंक, बोरॉन, क्लोरीन, मॉलिब्डेनम.

खनिजद्रव्ये व मातीमध्ये असलेले पाणी यापासून द्रावण तयार होते (सॉईल सोल्युशन). वनस्पतीची मुळे स्वपोषणासाठी ते शोषून घेतात. बहुतांश खनिज द्रव्ये कमी अधिक प्रमाणात मातीमध्ये उपलब्ध असतात, पण त्याचबरोबर सूक्ष्म जीवजंतूंची विपुलता, ओलावा असणेही गरजेचे असते. आपल्या बागकामासाठी लागणाऱ्या मातीची तपासणी करून घेतल्यास या द्रव्यांची उपलब्धता किती आहे हे समजू शकते. मातीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब (organic C) हा एक महत्त्वाचा घटक असतो. सेंद्रिय कर्ब मातीची गुणवत्ता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतो. जमिनीत सेंद्रिय माल घातल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. निकृष्ट जमिनीत सेंद्रिय कर्ब ०.५ हून कमी आढळतो, चांगल्या प्रतीच्या जमिनीत तो २ पेक्षा अधिक असू शकतो.
झाडांच्या वाढीसाठी मातीमधून मिळणारे घटक समजले, की आपण सेंद्रिय माल वापरून झाडांसाठी आवश्यक पोषक माध्यम सहज तयार करू शकतो.  

(संदर्भ : द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, नायल ब्रॅडी आणि रे वेल) 

संबंधित बातम्या