बागेचा आराखडा

प्रिया भिडे
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

गच्चीवर झाडे लावताना बराच विचार करावा लागतो. झाडांच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार गच्चीवर वाफे करायचे, का कुंडीत झाडे लावायची हे ठरवावे लागते. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गच्चीत कोणकोणत्या प्रकारची झाडे हवी आहेत ते ठरवावे लागेल. फुलझाडे, फळझाडे, शोभिवंत पाने, भाजीपाला, काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असे भरपूर पर्याय असतात. प्रत्येक वनस्पतीची प्रकृती वेगळी असल्यामुळे त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाची गरजही वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वप्रथम गच्चीवर उन्हाची उपलब्धता किती आहे हे बघावे. बऱ्याच वेळेला आजूबाजूला असलेल्या उंच वृक्षांमुळे किंवा इतर इमारतींची सावली आल्यामुळे उन्हाची उपलब्धता कमी असते. 

सर्वसाधारण फुलझाडे, फळझाडे व भाजीपाला यासाठी सहा ते आठ तास उन्हाची गरज असते. तुमच्या दिवाणखान्याला लागून किंवा बेडरूमला लागून असलेली गच्ची उत्तरेकडे असल्यास ऊन येण्याची शक्यता कमी होते. अशा ठिकाणी सावली आवडणाऱ्या झाडांची निवड करावी. पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेला बागेसाठी चांगले ऊन मिळते. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन यामुळेसुद्धा उन्हाच्या उपलब्धतेत फरक पडतो. सूर्यऊर्जेवर प्रकाश संश्लेषण व पर्यायाने झाडांची वाढ, पिकाचे उत्पन्न अवलंबून असते. म्हणून उन्हाचा विचार खूप महत्त्वाचा असतो. कोणत्या भागात किती ऊन येते हे पाहून झाडांची निवड करावी. त्या निवडीनुसार कुंड्यांचा आकार व संख्या ठरेल. बाजारात आजकाल कुंड्यांची खूप विविधता आहे. मातीच्या पारंपरिक कुंड्या, प्लॅस्टिकच्या स्वस्त व मस्त कुंड्या, फायबरच्या आकार व रंगांचे वैविध्य असलेल्या महाग कुंड्या, ग्रो बॅग म्हणजे सिंथेटिक वा प्लॅस्टिक कापडाच्या कुंड्या, सेल्फ वॉटरिंगची सोय असलेल्या कुंड्या. त्याशिवाय पिंप, बादल्या असे पुनर्वापराचे पर्यायपण आहेतच. यातून तुम्हाला हवा तो, झाडांच्या वाढीला साजेसा पर्याय निवडायचे कौशल्याचे काम असते.

बागेचा आराखडा करताना झाडांची निगा राखण्यासाठी/काढणीसाठी आजूबाजूला थोडी जागा ठेवावी. गच्चीवर आपण काय काय लावू शकतो असा प्रश्न बरेच जण विचारतात. झाडांची मुळे स्लॅबला त्रासदायक ठरणार नाहीत ना, ही रास्त शंका असते. वड, पिंपळ, औदुंबर असे मोठे वाढणारे वृक्ष त्रासदायक ठरतात, पण आवळा, शेवगा, लिंबू, चिक्कू, पपया छतावर छान वाढतात. पूजेसाठी फुलझाडे, दूर्वा, तुळस, स्वयंपाकासाठी काही मसाले जरूर असावेत. बाकी प्रत्येकाच्या आवडीनुसार झाडांची निवड ठरवू शकतो. काही लोक फुलवेडी असतात, तर काहींना केवळ भाजीपाला लावायचा असतो. काहींना सक्यूलंटस आणि खडकांची रचना करून कोपरा सजवावा वाटतो, तर काहींना केवळ पर्णशोभा आवडते. काहींना बोन्साय करावे वाटते, काहींना इंद्रधनूशी रंगांची उधळण करणारी ऑरकिड्स हवी असतात. शिवाय बांबू, पाम आहेत. गच्चीत कुंद मोगरा, वेली भाज्यांसाठी मांडवाची योजना असावी. मांडव म्हणजे सूर्यऊर्जा साठवण्यासाठीचे नैसर्गिक साधन, जे सावली देते आणि फुलेफळेपण देते. निसर्गाच्या या दातृत्वाने, विविधतेने आपण नमून जातो. माझ्या २०० स्के.मी.च्या बागेत १०० हून अधिक प्रकारची विविध झाडे आहेत. त्याबद्दल पुढे विस्ताराने माहिती घेऊच.    

गच्चीवरील बागेसाठी पाण्याची व्यवस्था हा खूप महत्त्वाचा भाग असतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार झाडांची संख्या ठरवावी. बोअरवेल असल्यास पावसाचे पाणी त्यात सोडण्याची व्यवस्था असावी. बागेत सिंचनासाठी गच्चीवर नळाची सोय हवी. सुरुवातीला पाईपने पाणी द्यायची सोय केली, तरी झाडे वाढल्यावर ठिबक सिंचनाचा पर्याय करण्याचे नियोजन असावे. बागकामाचे साहित्य ठेवण्यासाठी, लहानशी जागा असावी. गच्चीवर सोलर पॅनेल असतील तर त्याखाली साहित्य राहू शकते. 

आपली बाग म्हणजे विरंगुळ्याचे ठिकाण असते. फुलांनी बहरलेल्या शेवंती, गुलाबाच्या ताटव्याशेजारी बसून मित्र-मैत्रिणींबरोबर कॉफी घेण्यासाठी छोटीशी जागा, झोपाळा असला तर अधिक मजा येते. त्याभोवती कुंड्यांची सौंदर्यपूर्ण रचना हे बागेचे बलस्थान असते. खूप मोठी भिंत असेल तर त्यावर फुल वेलींचे नियोजन करावे किंवा छोट्या कुंड्यांचे हिरवे म्युरल छान दिसते.  

बाग म्हणजे आपल्या कलेचा आविष्कार करण्याची संधी. इथे आपण झाडांच्या मदतीने खूप रंगसंगती, रेखाकृती करू शकतो. मोनेसारख्या महान चित्रकारानी चित्रांसाठी कमळतळी, वेगवेगळे बांबूचे पूल, फुलांनी बहरलेल्या कमानी असा निसर्ग त्याच्या घरात आणला, आपणही असा निसर्ग आपल्या घरात आणूया!  
 

संबंधित बातम्या