चला तयार करूया सेंद्रिय माती...

प्रिया भिडे
सोमवार, 2 मार्च 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

बागेचा आराखडा तयार केल्यानंतरची पायरी म्हणजे झाडे लावण्यासाठी माध्यम तयार करणे व कुंड्या भरणे. आपण निसर्गाची हानी करून माती विकत आणायची नाही, तर झाडांसाठी आपण सेंद्रिय माल, पालापाचोळा व ओला कचरा वापरून पोषक माध्यम ग्रीन सॉईल कशी तयार करायची ते पाहू. ग्रीन म्हणजे सेंद्रिय माती करणे ही माझ्यामते एक पाककृती आहे. 

इडलीसाठी आपण डाळ व तांदूळ भिजत घालतो, ते वाटून एकत्र करून आंबवायला ठेवतो म्हणजे सूक्ष्मजीवांसाठी, त्यांना काम करण्यासाठी योग्य वातावरण तयार करतो. हे मिश्रण जास्त दिवस तसेच राहिले तर वास येतो, म्हणजे आपल्या दृष्टीने वापरण्यासारखे राहत नाही. दही विरजताना दुधाचे तापमान, विरजणाचे दही किती घ्यायचे याचा आपला अंदाज चुकला तर दही नीट विरजत नाही. या प्रक्रियेत सूक्ष्मजीवांचे मोठे योगदान असते. त्यांना योग्य वातावरण निर्माण करण्याचे काम आपण करत असतो. पदार्थ टिकण्यासाठी आपण ‘वाळवण’ करतो, कारण तिथे सूक्ष्मजीव नको आहेत. हे सगळे विस्ताराने सांगण्याचे कारण, प्रत्येक पाककृतीचे साहित्य वेगळे, कृती वेगळी. लागणारा वेळ वेगळा आणि त्यातील विज्ञानदेखील वेगळे असते.

आपल्या पाककृतीमध्ये सूक्ष्मजीवांना काम करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केले, की वेगवेगळ्या जैव विघटनशील पदार्थांचे रूपांतर ‘ग्रीन सॉईल’मध्ये करण्याचे आपले काम सोपे होते. तर पाहूयात ही अनोखी पाककृती व त्यातील विज्ञान. सेंद्रिय माती करताना तीन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
Air : प्रक्रिया होत असताना भरपूर हवेची उपलब्धता असणे.
Temperature : प्रक्रिया सुरू असताना तापमानात वाढ होणे.
Moisture : प्रक्रिया सुरू असताना माध्यम ओले असणे. हा ओलावा भेळेइतका असावा.

सूक्ष्म जीवजंतूंना सेंद्रिय मालाचे विघटन करताना हवेची व ओलाव्याची गरज असते. विघटन होताना ऊर्जानिर्मिती होते व तपमान ६० ते ७० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. यातील पहिला टप्पा मेझोफेलिक टप्पा. यामध्ये ३० ते ४० अंश सेल्सिअस तापमान होते. नंतर थर्मोफिलिक टप्प्यात ६० ते ७० अंश सेल्सिअस तापमान होते. यानंतर तापमान हळूहळू कमी होत जाते व काळी दळदार माती तयार होते. 

दोन प्रकारच्या कृती आपण बघणार आहोत  
१) थर पद्धत   २) भेळ पद्धत

थर पद्धत
साहित्य : बादली, ट्रे, बादलीला भोके पाडण्यासाठी स्कुअर

कच्चामाल : पालापाचोळा, ओला कचरा, कोकोपिथ, नीम पेंड, पाणी, शेण किंवा सूक्ष्म जीवजंतूंचे तयार विरजण,(Essential Microorganisms soution ) 

वेळ : ६० ते ९० दिवस 

कृती : प्लास्टिकच्या बादलीला/पिंपाला गरम करून भोके पाडून घ्यावीत. वीस लिटरची बादली असल्यास निदान वीस भोके असावीत. बादलीच्या तळाला चार भोके पाडावी. बादलीच्या तळाला दहा सेंटिमीटर पालापाचोळ्याचा थर द्यावा, वर थोडेसे कोकोपिथ भुरभुरावे. त्यावर घरातील ओला कचरा टाकत जावा. सात ते आठ सेंटिमीटर कचऱ्‍याचा थर झाल्यावर सूक्ष्मजीवांचे विरजण घालावे. दोन-तीन चमचे विरजण पावडर अर्धा वाटी पाण्यात मिसळून ते पाणी या थरावर शिंपडावे. यावर परत पालापाचोळ्याचा थर द्यावा. वरील पद्धतीत बादली पूर्ण भरून घ्यावी. ही बादली बाजूला ठेवून अशाच पद्धतीत दुसरी बादली भरायला घ्यावी. आपली दुसरी बादली भरेपर्यंत पहिल्या बादलीचे मिश्रण कुंडी भरण्यासाठी वापरायला तयार असते.

थर पद्धतीमध्ये पालापाचोळ्याच्या थरांमध्ये अधिकचा ओलावा शोषला जातो, हवा खेळती राहते व ओला कचरा हलवण्याची गरज पडत नाही. कोकोपिथमुळेसुद्धा स्वयंपाकघरातील टाकाऊ घटकात ओलाव्याचे प्रमाण ६० टक्क्यांहून जास्त असते. हे ओले पदार्थ बादलीत टाकत गेलो, तर हवेच्या पोकळ्या नष्ट होऊन आपली पाककृती बिनसेल. पदार्थ कुजेल व वास येईल. सूक्ष्मजीवांना भरपूर हवेशीर घर हवे हे लक्षात ठेवावे.   

खास सूचना 

  • बादलीमध्ये थर देताना सेंद्रिय मालाचे तुकडे करायचे का? मिक्सरमधून काढायचे का? असा प्रश्न असतो. लहान तुकडे केल्यास सरफेस एरिया वाढते व सूक्ष्मजीवांचे काम सोपे होते. फणस किंवा कलिंगड यासारखे जाड सालीचे घटक तुकडे करून घालावेत अन्यथा तुकडे करायची गरज नाही. फक्त थर देताना पसरून थर द्यावा ढीग करू नये. 
  • जास्त ओलावा झाला तर पालापाचोळा घालावा, माध्यम कोरडे वाटले तर पाणी शिंपडावे. 
  • शेण व पाणी १:१० प्रमाणात करून विरजण म्हणून वापरता येते. आम्ही शेणपाण्याचा खूप वापर करतो.  

पुढील भागात पाहूया भेळ पद्धत... 

संबंधित बातम्या