सेंद्रिय मातीसाठी करूया भेळ

प्रिया भिडे
सोमवार, 9 मार्च 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

बादलीमध्ये पालापाचोळा व ओला कचरा यांचे थर देऊन त्यावर सूक्ष्मजीवांची फौज काम करण्यासाठी सोडायची. त्यांच्यासाठी हवेशीर वातावरण व ओलावा ठेवायचा आणि दर ६० ते ९० दिवसांनी हे माध्यम कुंडी भरायला वापरायचे ही पद्धत आपण पहिली.
सेंद्रिय माती करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे भेळ पद्धत. भेळ करताना शेव, चुरमुरे, फरसाण असे कोरडे पदार्थ व कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची व चिंचेची चटणी असे ओले पदार्थ आपण एकत्र करतो. तशा प्रकारे आपण झाडांसाठी भेळ करणार आहोत.

सध्या पालापाचोळा पडण्याचा हंगाम सुरू आहे. नोव्हेंबरपासून मे महिन्यापर्यंत वेगवेगळी झाडे पानगळ करत राहतात. प्रत्येक वनस्पतीचा गुणधर्म वेगळा असल्यामुळे एकाच ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती, एकाच प्रकारच्या मातीत वाढणाऱ्या वनस्पती, त्यांच्या गुणधर्मानुसार जमिनीतून योग्य ती खनिजे घेतात आणि वेगवेगळ्या भागात साठवतात. पानांमध्येही ही खनिजे साठवली जातात. पानगळ होण्यापूर्वी काही खनिजे झाडाकडे परत पाठवली जातात, तरी काही प्रमाणात ती पानांमध्ये असतातच. सूक्ष्मजीव ती झाडांना उपलब्ध करून देतात. ही खनिजे आपण लावलेल्या झाडांसाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ‘पिकलं पान धातूची खाण,’ असे म्हटले तर वावगे ठरू नये. या पाचोळ्याचा उपयोग झाडांसाठी पौष्टिक भेळ करण्यासाठी करायचा. ओले पदार्थ म्हणून स्वयंपाकघरातील किंवा भाजीवाल्याकडचा ओला टाकाऊ माल वापरायचा. 

साहित्य : एक बादली. एक घमेले. अर्धे घमेले भरून पालापाचोळा, पाव घमेले ओला कचरा, पाव घमेले कोकोपिथ व नीम पेंड यांचे मिश्रण. मिश्रण ओले होईल इतके पाणी व सूक्ष्मजीवांचे विरजण. एक किलो मालास/एक ग्रॅम विरजण असे प्रमाण लागते. मध्यम घमेले असेल तर तीन ते चार चमचे विरजण घ्यावे. शेण असल्यास १:१० प्रमाणात पाण्यात मिसळून घ्यावे.

कृती : पालापाचोळा, ओला कचरा, कोकोपिथ व नीम पेंड एकत्र करून घ्यावे. पाण्यात विरजण कालवावे. एक मग भरून पाण्यात चहाचे तीन ते चार चमचे भरून विरजण घालावे व चांगले हालवून घ्यावे. हे मिश्रण/शेणपाणी घमेल्यातील पालापाचोळ्यावर घालावे व भेळ कालवतो तसे कालवून भोक असलेल्या बादलीत भरून ठेवावे. वर एखादे पोते झाकून ठेवावे, त्यामुळे ओलावा टिकतो.         

वेळ : ६० ते ९० दिवसांत आपल्याला कुंडी भरण्यासाठी माध्यम तयार असेल. 

खास सूचना : कधीकधी या बादलीत निसर्गातून आलेल्या बीजाचे अंकुर फुटतात. सुरुवातीचा उष्णता वाढीचा थर्मोफिलिक टप्पा संपला, की निसर्ग अंकुरतो. माध्यम तयार झाल्याची ही खूण असते.

थर पद्धत व भेळ पद्धत या दोन्ही पद्धतींमध्ये आपण पाहिले, की पालापाचोळ्याचा उपयोग अनिवार्य आहे. कारण केवळ ओला कचरा वापरला, तर दोन्ही पद्धतींमध्ये माध्यम कुजण्याचा धोका असतो. याची अनेक कारणे असतात, त्यातील एक म्हणजे कार्बन-नायट्रोजन रेशो. वनस्पतिजन्य पदार्थांचा कार्बन साठवणुकीवरून C:N रेशो काढला जातो. 

रेशो वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा विघटनाचा काळ वेगळा असतो. आपण ओला व कोरडा माल एकत्र केल्याने C:N रेशोचे प्रमाण योग्य राहते, विघटन योग्यरीतीने होते व मिळणाऱ्या माध्यमाचा C:N रेशोही प्रमाणात राहतो. तसेच तयार होणाऱ्या मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला असतो. 

अशा पद्धतीने आपण आपल्या कुंड्या भरण्यासाठी सेंद्रिय माती/ग्रीन सॉईल तयार करून कुंड्या भरूया. आत्ता पालापाचोळ्याची उपलब्धता भरपूर आहे. याचवेळी घरचा ओला कचरा, भाजीवाल्याकडून थोडा ओला कचरा आणून भेळ पद्धतीने मोठी बादली/पिंप भरली, तर दोन महिन्यांत कुंड्या भरण्यासाठी माती तयार असेल. 

ही सेंद्रिय मातीची पाककृती सोपी आहे, पण यात रासायनिकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र तिन्हीचा अंतर्भाव होतो व अनेक प्रक्रिया घडतात. बादलीत भेळेइतकी ओल ठेवण्याचे कसब तुम्हाला साधले पाहिजे. सरावाने तुम्हाला सहज जमेल. संजीव कपूर यांनी एखादी पाककृती सांगितली, तरी ती आपल्याला उत्तमरीतीने करता येण्यासाठी सराव करावा लागतोच नाही का?

संबंधित बातम्या