हिरवे पिवळे, पान पिसारे 

प्रिया भिडे
सोमवार, 13 जुलै 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

वनस्पतींचे विश्‍व विस्मयकारक, वैविध्यपूर्ण आणि म्हणूनच विलोभनीय आहे. कोट्यवधी वर्षांपासून उत्क्रांत होत आलेल्या वनस्पतींमध्ये बुरशी, शैवाल, नेचे, तृण, वेली, महावेली, वृक्ष, महावृक्ष अशा अनेक वनस्पती आहेत. काही फुलणाऱ्या वनस्पती, तर काही न फुलणाऱ्या वनस्पती आहेत. या सगळ्यांमधून बागेसाठी आपण काय निवडायचे? सुरुवात करताना आपण निवडूया पर्ण शोभा.

वनस्पतींच्या अन्न निर्मितीचा कारखाना म्हणजे पान. पानांचे रंग वेगळे. आकार वेगळे. देठाची रचना वेगळी, त्यामुळेच प्रत्येक झाडाचा आकृतिबंध निराळा. पानांच्या बाष्प बाहेर टाकण्याच्या, ट्रान्सईव्हापोरेशन प्रक्रियेमुळे मायक्रो क्लायमेट तयार होण्यास मदत होते, आजूबाजूच्या वातावरणापेक्षा तापमान थोडे कमी राहते. म्हणून तर झाडांच्या सान्निध्यात आपल्याला थंडावा, गारवा जाणवतो. गच्चीवरच्या बागेसाठी हे मायक्रो क्लायमेट खूप महत्त्वाचे असते. हिरवे कापड लावून झाडांसाठी मायक्रो क्लायमेट तयार करता येते, परंतु झाडांची संख्या जास्त असेल तर एकमेकांच्या सान्निध्यात झाडे छान वाढतात. नैसर्गिक मायक्रो क्लायमेट तयार होते.

बागेसाठीची पूर्वतयारी झाल्यानंतर झाड निवडीचे आव्हान असते, सुरुवातीला दणकट प्रकृतीच्या पर्ण शोभेच्या झाडांना प्राधान्य द्यावे, जसे उष्ण, थंड, हवामानात तग धरणारा वक्राकार, हिरव्यागार पर्णिकांचा सुरेख आकृतिबंध निर्माण करणारा अरेका पाम. लहानशा कुंडीतही छान वाढतो. एकदा रोप रुजलं, की मुळामधून नवीन फुटवे येत राहतात. सरळ दणकट खोड उंच वाढत जाते, तसा पानांचा आकार व पर्णिकांची संख्या वाढत जाते. जमिनीत लावल्यास तीन-चार मीटरही उंच होऊ शकतो. छोट्याशा जागेतही अरेका पाम भरगच्च हिरवाई निर्माण करतो. 

कॅफे, हॉटेल, कार्यालय अशा अनेक व्यावसायिक ठिकाणी आडोसा करण्यासाठी, हिरवी भिंत करण्यासाठी याचा छान उपयोग होतो. अतिशय कमी देखभाल, कमी पाण्यात चैतन्यमयी हिरवाई निर्माण करणारा अरेका पाम घरातही छान वाढतो.

पंख्याच्या आकाराची पाने असलेला ईपिस पाम, चायनीज फॅन पाम अशा पंख्याच्या आकाराची, मोठ्या आकाराची पाने असलेले पाम बागेची शोभा वाढवतात. यातला एखादा तरी आपल्या घरी असायला हरकत नाही. 

हाताच्या पंज्यासारखी पाने असलेला शाफलेरासुद्धा कुंडीत लावता येतो. गर्द हिरव्या पानांचा तर कधी पांढऱ्या हिरव्या व्हेरीगेटेड पानांचा शाफलेराही दणकट प्रवृत्तीचा आहे. याची वाढ जोमाने होते, त्यामुळे फांद्यांची छाटणी करून त्याला आटोक्यात ठेवावे लागते. छाटणी केलेल्या फांद्यांचा नवीन रोपे करण्यासाठी वापर करता येतो.  बोन्साय करण्यासाठीचे हे एक लोकप्रिय झाड आहे. घरात, कार्यालयातसुद्धा याच्या एक-दोन कुंड्या ठेवल्यास  छान दिसतात.

गर्द किरमिजी, हिरव्या पिवळ्या रंगाच्या छटांची क्रोटन बागेत जरूर असावीत. रंगीत पानांमुळे ही बघणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात. भरपूर ऊन आवडणारी क्रोटन बहुतेक रोपवाटिकांमध्ये उपलब्ध असतात. हिरव्या पानांवर पिवळ्या  रंग कणांची उधळण केलेला गोल्डन डस्ट, केशरी, लाल पानांचा बुश ऑन फायर अशा आकर्षक नावाने प्रमाणित आकर्षक क्रोटनची विविधता आपल्याला थक्क करते. अगदी ३० सेंटिमीटरपासून ते तीन मीटरपर्यंत वाढणारी क्रोटन आपल्याला लावता येतात. लहान मोठ्या कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांची, विविध आकाराच्या पानांची क्रोटन लावून बागेत रंग उधळण करता येते. याला फारशी देखभाल नाही; योग्य वेळेत छाटणी करून आकार नीटनेटका ठेवणे तेवढेच करावे लागते.

पानांच्या रंगात विविधता असलेला ड्रेसीना, गच्चीत, दिवाणखान्यात छान दिसतो. सरळ वाढणाऱ्या खोडावर, टोकाला गुलाबी किरमिजी रंगसंगतीची निमुळती पाने असलेला ड्रेसीना हिरवाईमध्ये रंग भरतो. अणकुचीदार पात्यासारखी गुलाबी पाने असलेला ड्रेसीना सध्या लोकप्रिय आहे. हा एक दीड मीटर उंच वाढतो.
परदेशी असूनही आपल्या देशाचे नाव मिरवणारा सोंग ऑफ इंडिया ड्रेसीनाचाच एक सदस्य. वक्राकार फांद्यांच्या टोकाला, हिरव्या अंतरंगाची पिवळ्या किनारीची निमुळती पाने, वक्राकार फांद्यांवर खालून वर फुलत जाणारी पर्ण रचना आकर्षक दिसते. त्यामुळेच पुष्परचना करण्यासाठी याचा छान उपयोग होतो. रंगबेरंगी ही आपल्याला तर आनंद देतातच, पण हे हिरवे पिवळे पान पिसारे प्रतिभावंतांना स्फूर्ती देतात अन् ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत म्हणतात, 
पान पिसारे हिरवे, झिळीमिळी घेती डोल  
किती पहावेसे वाटे त्यात चैतन्य सुढाळ 

संबंधित बातम्या