नक्षीदार पर्णशोभा

प्रिया भिडे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

घराच्या बाल्कनीत अथवा घरात कमी उन्हाच्या ठिकाणी पर्णशोभेचे अनेक प्रकार लावता येतात. यामध्ये काही वेली असतात, तर काही झुडुपे. सिंघोनियम,  मोनेस्ट्रा, पॉइंसेट्टिया, स्नो बुश, डायफेनबेकीया, स्नेकप्लांट, कोलीयस, युफोरबिया अशी एक ना अनेक हिरव्या व रंगीत रंगछटांची, नक्षीची, वैविध्यपूर्ण आकारांची पाने असलेल्या वनस्पती आपल्या घराचे सदस्य होऊ शकतात.

सिंघोनियमची वेल नाजूक असते, त्रिकोणी तजेलदार पाने याची खासियत. पांढुरक्या हिरव्या रंगाची, तर कधी गर्द हिरव्या रंगाची. क्वचित हलक्या लालूंच्या रंगाची पानेही छान दिसतात. वेलीचे छोटे कडे कुंडीत खोचल्यास सहज रुजते. याला आधार दिल्यास वेगाने वाढते. गच्चीवरील एखाद्या भिंतीवर चढवल्यास  भिंतीच्या आधाराने पटपट वर चढते. त्याला जास्त ऊन आवडत नाही, त्यामुळे दिवाणखान्यातही छान वाढते.

वेलवर्गीय मॉनेसट्रा हा दणकट पानाचा असतो. पानांना वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्या हे याचे वैशिष्ट्य. त्याच्या पानांमध्ये प्रचंड विविधता आढळते. भिंतीचा आधार दिल्यास याची मुळे भिंतीला घट्ट पकडतात. कुंडीत लावायाचा झाल्यास काठीचा आधार द्यावा लागतो. या आधारावर मुळे आपली पकड घट्ट बसवतात. नारळाच्या शेंड्या वापरून आधारासाठी काठी तयार करता येते. बाजारातही कॉयरच्या अशा काठ्या मिळतात. 

गर्द हिरव्या पानांवर पांढरे ठिपके किंवा लिंबोणी रंगाच्या पानांवर गर्द हिरव्या रंगाची नक्षी असलेला दणकट प्रकृतीचा डायफेनबेकीया सावलीत छान वाढतो. याचे सरळसोट वाढणारे खोड व त्यावर एकआड एक मोठाली पाने एखाद्या कोपऱ्याला भरगच्च हिरवाई देतात. खोडापासून उपशाखा येतात, त्या कापून नवीन रोपे तयार करता येतात. याच्या पानांमध्ये विषारी घटक असतात, त्यामुळे शक्यतो हाताळू नये. 

सावलीत वाढणारा, कमी देखभाल लागणारा आणखीन एक सदस्य म्हणजे चायनीज एव्हरग्रीन. नावाप्रमाणेच हिरव्या पानांवर पांढऱ्या रंगाची नक्षी, तर कधी फिकट हिरव्या रेघा असतात. कधी रुपेरी, कधी फिकट हिरवी पाने असतात. पंधरा ते वीस सेंटिमीटरचा खोडाचा तुकडा मातीत खोचला, तरी पटकन पाने फुटतात. खोडापासून येणाऱ्या नवीन फुटव्यांमुळे कुंडी भरगच्च दिसते.

शाफलेरा पण असेच दणकट प्रकृतीचे, आकर्षक पान असलेले झाड. कुंडीत लावून छान आकार दिला, तर गच्ची अथवा दिवाणखान्यात छान दिसते. यात दोन प्रकार आढळतात, हिरव्या पानांचा व पांढऱ्या हिरव्या पानांचा व्हेरीगेटेड शाफलेरा. याची वाढ खूप वेगाने होते, त्यामुळे छाटणी करून त्याला आटोक्यात ठेवावे लागते.

छोट्या कुंड्यांसाठी लालसर पानांचा, त्यावर पांढऱ्या शुभ्र रेघा असलेला मरांटा निवडता येतो. याला थोडे ऊन आवडते. मोठ्या पसरट कुंडीत भरपूर रोपे  लावून प्रवेशद्वारापाशी ठेवली, तर फुलांच्या ताटव्याइतकाच याचा ताटवा सुरेख दिसतो. मुळांपासून नवीन रोपे फुटून कुंडी भरून गेली, तर कुंडीतून अलगद रोप काढून विरळणी करावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा निचरा होतो आहे ना याकडे लक्ष ठेवावे. जास्त पाण्याने मुळे कुजून जातात, पाने पिवळी पडतात व रोप मरते.

पानांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले कोलीयस आवर्जून लावावे. याच्या पानांचा विविधतेला काही गणतीच नाही. पोपटी, आमसुली, लाल पानावर हिरव्या रेघा, तर कधी ताम्रपर्णी पाने. कधी पानांच्या कडा अतिशय नजाकतीने कातरलेल्या असतात, तर कधी झिपरी पाने असतात. कोलीयसला पांढऱ्या जांभळ्या रंगाचे फुलांचे तुरे येतात, पण फुलांपेक्षा पानेच अधिक सुंदर दिसतात. रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध असतात. यांची प्रकृती जरा नाजूक असते. सहा ते आठ महिन्यांनंतर पानांचा आकार लहान होत जातो, ती निस्तेज होत जातात. अशावेळी दोन-चार फांद्या कापून त्या मातीत खोचून नवीन रोपे तयार करावीत. जुने रोप काढून टाकावे. रेक्स बेगोनिया हादेखील फुलांपेक्षा पानांसाठी प्रसिद्ध, असीमिट्रिक आकाराचे पान ही खासियत. सहज काडी खोचून येणारे, गुलाबी लोलकांसारखी फुले देणारे बेगोनिया छोट्याशा कुंडीत लावून वाढवावे.

आकर्षक पानांचा केलेडियम अगदी छोट्याशा कुंडीत, एखाद्या बोलमध्येसुद्धा लावता येतो. याची पाने म्हणजे रंग कुंचल्यातून ओघळले, अवचित पानांवरी थबकले. कधी लाल पांढरे ठिपके, चकाकणारे पट्टे असलेली अळूसारखी पाने असल्यामुळे रंगीत अळू म्हणूनही ओळखला जातो. कंद लावून याची लागवड करता येते. पावसाळ्याच्या सुमारास आकर्षक पाने येतात. पाने सुकल्यावर कंद काढून त्यांना विश्रांती द्यावी. लहान मोठ्या कुंड्यांमध्ये स्नो बुश, पॉइंसेट्टिया,  चकाकणाऱ्या जांभळ्या रंगाची पाने असणारे पर्शियन शिल्ड अशी शोभिवंत पाने असलेली झाडे लावता येतात. अधून-मधून खुरपणी, पंधरा दिवसांतून एकदा सेंद्रिय पदार्थांचा खाऊ, आकर्षक आकारासाठी छाटणी अशी माफक काळजी घेतली तर पर्णशोभेची झाडे बागेचे सौंदर्य वाढवतात. 

संबंधित बातम्या