इंद्रधनुषी रंगफुले 

प्रिया भिडे
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...

निळे जांभळे तुरे डोलती 
हलके वाऱ्यावरती
रंगबावरी फुले 
त्यावर रविकिरणांची प्रीती 

पावसाच्या सरींनंतर आकाशात उमटलेले इंद्रधनुष्याचे रंग, जलबिंदू आणि सूर्याच्या किरणांमधून येणाऱ्या रंगाच्या विविध लहरींतून प्रकट होतात. सूर्यकिरणांची प्रीती लाभली तर बागेत रंगीत फुलांची बहार येते. रोपवाटिकेत गेलात तर ही फुलांची दुनिया वेड लावेल इतके पर्याय असतात.

गर्द लाल, केशरी, गुलाबी रंगाचे फुलांचे गच्च गेंद, हिरवीगार तजेलदार पाने असलेला एक्झोरा. चार पाकळ्यांची याची फुले दीर्घकाळ टिकतात. कळ्या आल्यावर झाडाला ओल्या सेंद्रिय मालाची मात्रा द्यावी. कुंडीतली एका कोपऱ्यातली माती बाजूला करून त्यात मुठभर ओला कचरा घालून मातीने झाकून टाकावे. यामुळे मातीचा कस टिकून राहतो व भरपूर फुले येतात. एक्झोरा जमिनीत लावल्यास दोन अडीच मीटर वाढू शकतो, बहुवर्षायू आहे. त्यामुळे मध्यम किंवा मोठ्याच कुंडीत लावावा. खास आपल्या कोकणातला पांढऱ्या रंगाचा, नाजूक फुलांचा एक्झोरा रोपवाटिकेत मिळत नाही, पण मिळाला तर जरूर लावावा. फुलांचे गुच्छ येऊन गेल्यावर पूर्ण छाटणी करावी. काडी खोचून रोप तयार होईलच अशी शाश्‍वती नसते, त्यामुळे गुटी कलम करून रोप करतात. 

एक्झोरासारखाच पण नाजूक फुलांचा गुच्छ असलेला पेंटास प्रत्येक बागेत असायलाच हवा. मध्यम आकाराच्या कुंडीत लावावा. पांढरा, अतिशय फिकट जांभळा, गुलाबी, राणी, गर्द अमसुली अशा अनेक रंगांची पाच पाकळ्यांची फुले असतात. फुलांचे हे गुच्छ म्हणजे तारकापुंज आणि एक एक फुल म्हणजे मधुरस पेले. या फुलावर मकरंदासाठी अगदी छोटेसे कीटक, मोठे भुंगे हजेरी लावतात. फुलपाखरांची तर अतिशय आवडती फुले आहेत. फुले येऊन गेली की बिया धरतात, सहज रुजतात. नंतर छाटणी करावी, काड्या खोचून नवी रोपे करता येतात. मैत्रिणींना देता येतात. 

आकर्षक रंगाची, गुच्छात येणारी जिरेनियमची पाने फुले दोन्ही छान दिसतात. किलवरच्या आकाराची किंचित आंबट वासाची पाने असतात. गुलाबी, गर्द लाल, जांभळी, पांढरी अशा खूप रंगांची फुले येतात. छोट्या कुंडीत काडी खोचली तरी सहज रुजते. याला जास्त पाणी आवडत नाही, मुळे व खोड लगेच कुजते.

पावडर पफ या नावातच फुलाचे वर्णन आहे. कोमल मुलायम केशराचे गुच्छ, अशा अनेक छोट्या गुच्छाचे मिळून एक फूल तयार होते. जमिनीत लावल्यास छोटेखानी वृक्ष होऊ शकतो, पण मध्यम आकाराच्या कुंडीतही छान फुलतो. गर्द लाल, गुलाबी, पांढरे पावडर पफ सुंदर दिसतात. स्पर्शाला मऊ मुलायम पण गंधहीन असतात. या फुलांसारखी दिसणारी शिरीष वृक्षाची फुले शेवाळी रंगाची व मंद सुगंधाची असतात. पावडर पफला चॉकलेटी शेंगा येतात. त्यातील बियांमधून नवीन रोपे तयार करता येतात. फारशी देखभाल लागत नसल्याने एखादे पावडर पफ लावायला हरकत नाही.

पाच पाकळ्यांचे अतिशय नाजूक फूल असलेला जेट्रोफा लोकप्रिय आहे, कारण बारमाही फारशी देखभाल न करता गर्द राणी, गुलाबी, पांढरी फुले देत राहतो. फांद्या वेड्यावाकड्या वाढत राहतात. छाटणी करून, काड्यांपासून नवीन रोपे करता येतात. फुले येऊन गेल्यावर लंबगोल कुपीसारखी फळे येतात, ती उकलली की बिया पडून नवीन रोपे तयार होतात. जेट्रोफाचा चीक विषारी असतो. याच्यात कुटुंबातला एका सदस्याच्या बियांचे तेल इंधनासाठी वापरतात.

शंकासुर नावाने आपल्याला परिचित असलेला, नाजूक पर्णिका असलेली पाने आणि केशरी, गुलाबी, पिवळा, लाल अशा रंगांची उधळण करणारे फुलांचे तुरे यामुळे छान दिसतो. मोठ्या कुंडीत लावला तर भरभरून फुलतो. फुलांचे तुरे खालपासून वर उमलत जातात, मनोहारी दिसतात. शंकासुराच्या बिया पक्ष्यांना आवडतात, पायात शेंगा धरून सोलून बिया फस्त करणारे पोपट बघताना मजा येते. शंकासुरसारखाच खूप फुलणाऱ्या नाजूक पिवळ्या फुलांच्या शोभिवंत कॅशियाची फुले सुंदर दिसतात. नाजूक पर्णिकांची पानेपण छान दिसतात. मोठ्या कुंडीत लावले तर एक दीड मीटर वाढू शकते.  

आजकाल कुंडीमध्ये लावता येण्यासाठी बुटका देवचाफा मिळतो. यातील गुलाबी रंगाचा सिंगापुरी चाफा खूपच महाग असतो. पण हौसेला मोल नसते, त्यामुळे एखादा चाफा गच्चीच्या मध्यभागी ठेवून बाजूला शोभिवंत दगडांची रचना केली तर सुरेख दिसते. याशिवाय पांढरा, गर्द लाल, राणी, लिंबोणी अशा वेगवेगळ्या रंगातला चाफा  

बागेत भरगच्चपणा आणतो. कारण जाड खोड, मोठाली पाने यामुळे चाफ्याला भारदस्तपणा असतो. याला पाणी फारसे आवडत नाही.

गुच्छामध्ये फुले येणारा, राजस रंगांची फुले असलेला हायड्रेंजीया निळा, पांढरा, हिरवा, फिकट गुलाबी रंगात फुलतो. मातीच्या सामूमुळे याच्या रंगात फरक होऊ शकतो. त्याला खूप ऊन आवडत नाही, त्यामुळे जागा निवडताना काळजी घ्यावी. याची प्रकृती तशी नाजूक असते, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते.

तांबडा इक्झोरा, नारिंगी शंकासुर, पिवळा कॅशिया, हिरवा-निळा हायड्रेंजीया, पांढरा-जांभळा पेंटास ही परदेशातून इथे रुजलेली इंद्रधनुषी रंगांची फुले बागेची शोभा वाढवतात. आपली पिवळी सोनकी, जांभळ्या तुऱ्यांची भारंगी  मात्र रानोमाळ डोलत राहते.

रानोमाळी सजती वाटा फुलाफुलांची दाटी
अवचित कोणी येऊन म्हणते, फुलता कोणासाठी? 

संबंधित बातम्या