फळभाज्यांची सुगी

प्रिया भिडे
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

गच्चीवरील बागेतली कोवळी काटेरी वांगी काढून कांदा, मसाला, कोथिंबीर, लसूण, मिरचीचा मसाला भरून वाफेवर शिजवायचे. हे मळंवांग सांगली कोल्हापूरकडे खूप प्रसिद्ध आहे. मळंवांग म्हणजे मळ्यातून काढायचे आणि शिजवायचे. आहाहा... ताज्या, रसरशीतपणामुळे हे पटकन शिजते व चवदार लागते. मळंवांग करण्यासाठी तरी गच्चीवर वांगी हवीतच. आठ ते दहा तास ऊन असेल तर भेंडी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर अशा अनेक भाज्यांचे पर्याय आहेत. त्यामुळे बागेत फळभाज्या लावण्यासाठी जागा असावी. 

दोन विटांचे एक मीटर बाय दोन मीटर असे वाफे करावेत नाहीतर वीस लिटरची कुंडी, रंगाची बादली, तेलाचा डबा घ्यावा. त्याला वीस भोके असावीत, त्यामुळे मातीत हवा खेळती राहते, पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते. झाडाला पोषक द्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी पांढरी मुळे खूप महत्त्वाची असतात. पत्र्याचा डबा घेतलात तर त्याला गंज रोधक रंग लावावा, कारण झाडाला रोज पाणी दिले जाते; रंग असेल तर गंज चढत नाही. भाजी व दुधासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक क्रेटही उपयुक्त असतात. त्याला कडेने वर्तमानपत्र घालावे म्हणजे माती वाहून जात नाही. त्यानंतर त्यामध्ये पालाखत, नीमपेंड व कोकोपिथचे मिश्रण भरावे. तुमच्याकडे माती असेल तर ती वापरू शकता. तीन भाग मिश्रणात एक भाग माती घालावी.

बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की बियाणे कुठून आणायचे की रोपे आणायची. भाजीपाल्याची रोपे बियांपासून करण्यास बरीच निगुती लागते. बाजारात मिळणाऱ्या बियांची पाकिटे मोठी असतात. तेवढी रोपे आपल्याला लागत नाहीत, तसेच त्याची उगवण किती होईल सांगता येत नाही. उगवलेली नाजूक रोपे वाढवणेपण जिकिरीचे असते. ते आपल्या धावपळीत जमेल असे नसते. त्यापेक्षा नवीन सुरुवात करणाऱ्यांनी फळभाज्यांची रोपे विकत आणावीत. शहराबाहेर शेतकऱ्यांसाठी खास रोपवाटिका असतात. या रोपवाटिकेमधून प्रत्येक भाजीची दहा-बारा रोपे आणावीत. मित्रमैत्रिणींचा गट करून एकदम शंभर रोपांचा ट्रे आणून वाटून घ्यावीत, हे सोपे पडते. एक दोन रोपे जगली नाहीत तरी उरलेली रोपे भरपूर फळे देतात. ही रोपे संकरित व सुधारित जातींची असतात. रोपे आणल्यावर लगेच त्यांना पाणी द्यावे व एक दोन दिवसातच लावावीत. रोपे लावताना कुंडीत छोटा खळगा करावा. त्यात नीमपेंड व दोन चमचे राख घालावी. रोपे लावून माती सारखी करावी, पाणी द्यावे व रोपाभोवती परत राखेचे रिंगण करावे. यामुळे किडीपासून रक्षण होते. रोपे दहा-पंधरा सेंटिमीटर झाली, की त्यांना काठीचा आधार द्यावा.   

वांग्याची रोपे तशी दणकट असतात, प्रकारही खूप असतात. कापाची लांब वांगी, भरताची ढब्बू काळी वांगी, धुळ्याची भरताची हिरवी लांबट वांगी, कृष्णाकाठची हिरवी वांगी, काटेरी जांभळी आणि बिन काट्याची जांभळी वांगी. काय लावायचे ते आवडीनुसार ठरवावे. वेगवेगळ्या प्रकारची दोन-तीन रोपे लावली तरी चालतील. कारण वांगी यायला लागली की काढून थकाल. दीड महिन्यांनी जांभळी फुले येतात, त्यावेळी नीमपेंड व खताचा डोस द्यावा. नंतर प्रती महिना दोन ओंजळी तयार पालाखताची मात्रा द्यावी. वांग्याचे एक बरे असते, एक आले तर डाळ वांगे करायचे आणि जास्त आली तर भरले वांगे.

मिरचीची रोपे लावली तर भरपूर ऊन असलेल्या जागी ठेवावीत. चार-पाच रोपे लावली तर भरपूर मिरच्या मिळतात. काही वेळा पानांच्या मागे पांढरी माशी येते. पाने धुवावीत, नीमतेल फवारावे. नाहीतर गोमूत्र १:२० पाण्यात मिसळून फवारावे. ढगाळ हवा झाली तर रोग येतात. गावरान मिरच्या वाळवून, त्याचे बी रोपे करण्यासाठी वापरता येते. विकत रोपे आणली तर त्याच्या मिरच्यांच्या बीपासून चांगली रोपे तयार होत नाहीत, कारण त्या संकरित, सुधारित जाती असतात. 

भेंडीसाठी पत्र्याचा डबा वापरला तर एकात एक बी लावावे, क्रेट वापरलात तर एकात दोन बिया लावता येतात. तीन आठवड्यात रोप तरारून येते. भेंडीची निदान बारा ते पंधरा रोपे हवीत, मग पुरेशा भेंड्या मिळतात. कोवळी भेंडी नुसती तेलावर कुरकुरीत परतून मस्त लागते. कुठे गावरान पांढऱ्या भेंडीचे बी मिळाले तर जरूर लावावे. ही खूप काटेरी असते, नेहमीच्या भेंडीपेक्षा जाड असते पण अगदी कोवळी असते.

गोवारी लावायची झाली, तरी निदान पंधरा रोपे हवीत. गोवारी वाफ्यात चांगली येते. दोन रोपांच्या मधे दुसरी पालेभाजीपण लावता येते. 

कोबी, फ्लॉवरची रोपे लावावीत. यांना अगदी छोटी कुंडी, पंधरा सेंटिमीटर रुंद प्लॅस्टिक पाईपही पुरतो. एखाद्या मोठ्या झाडाच्या कुंडीतसुद्धा एक एक रोपे लावता येते. एका वाफ्यात फक्त कोबी किंवा फक्त फ्लॉवर अशी रोपे लावल्यास रोग पडण्याचा धोका असतो, त्यामुळे या रोपांच्या बाजूला मोहरी किंवा झेंडू लावावा. मोहरीवर कीड आधी येते मग ही पाने काढून टाकावीत. पंधरा दिवसाला नीमपेंड घालावी, कारण रोपे रोगाला पटकन बळी पडतात. कोबीच्या पानांना गोगलगायीपासून जपावे लागते. पाणी जास्त झाल्यास किंवा कुंडी भरताना नारळाच्या शेंड्या वापरल्या, तर गोगलगायी होण्याचा धोका वाढतो. मी नारळ शेंड्या वापरत नाही, कारण त्यांच्या अर्धगोलाकार व ओल धरून ठेवण्याचा गुण यामुळे गोगलगायी होण्याचा धोका वाढतो. 

फ्लॉवरचा गड्डा हळूहळू वाढताना बघायलापण मजा येते. शुभ्र पांढरा घरचा फ्लॉवर आणि रासायनिक खताशिवाय वाढलेला कोबी मिळणे ही पर्वणीच असते. फ्लॉवर, कोबीच्या बाहेरच्या पानाचीसुद्धा पीठ पेरून भाजी करता येते. 

गच्चीवर मका छान येतो. रंगाची बादली, पाण्याची २० लिटरची बादली पालाखताने भरून बी पेरून मका लावावा. दोन महिन्यांत ताटे दीड मीटर वाढतात. कणसे धरल्यावर याला भरपूर तयार खत घालावे, त्यामुळे दाणे चांगले भरतात. मका सहज येतो, फारशी देखभाल लागत नाही. आजकाल मक्याचे दाणे काढून मिळतात, हे मातीत टाकले तरी रोपे येतात. घरातील मुलांना लावायला सांगितले तर मुलांना मजा येते. कणीस वाढताना बघणे व कोवळे कणीस भाजून खाणे असा कार्यानुभव देता येतो. 

रोज लागणारे पण थोड्या नाजूक प्रकृतीचे असे टोमॅटो, याची रोपे लावल्यावर थोडी काळजी घ्यावी लागते. खोडाजवळची साल खाऊन टाकणारी कीड लगेच हल्ला करते, त्यासाठी राखेचे रिंगण करावे. चांगला भक्कम आधार द्यावा लागतो. बांबूच्या काठ्या व तार वापरून आधार द्यावा, नाहीतर फॅब्रिकेटेड स्टँड करावेत. नाजूक हाताने फांद्या आधाराला बांधाव्या. त्यामुळे झाड उंच वाढते. आधार दिल्याने सूर्यऊर्जा नीट साठवली जाते. टोमॅटोच्या फांद्या नाजूक असतात. आधारामुळे टोमॅटोचा भार पेलणे सोपे जाते. केवळ पालाखतावरसुद्धा लालबुंद, रसरशीत भरपूर टोमॅटो येतात.

वेलीसारख्या वाढणाऱ्या, घोसाने लगडणाऱ्या छोट्या लालबुंद चेरी टोमॅटोची रोपे झपाट्याने वाढतात. ही रोपे चिवट प्रकृतीची व आक्रमक आहेत. दुसऱ्या झाडाच्या आधाराने वेल वाढते, खूप चेरी टोमॅटो येतात. मुलांना येता-जाता मटकावता येतात. सांबर, रस्समला छान रंग देतात. लेट्युस, मोहरीची कोवळी पाने, मीठ, लिंबू, साखर घालून हे टोमॅटो सलाडसाठी वापरता येतात. बियांपासून प्रचंड रोपे तयार होतात. ती वाटून टाकावीत नाहीतर हिरवे खत म्हणून झाडालाच घालावीत.

फळभाज्यांच्या रोपांचे जीवनमान चारपाच महिने असते. वांगी जास्त काळ राहू शकतात. नंतर फळधारणा कमी होते, आकार कमी होतो, पाने सुकतात, रोगांना बळी पडतात. मग रोपे काढून टाकावीत. खताच्या खड्ड्यात घालावीत. भाज्या वाफ्यांमध्ये लावल्या असतील, तर पुढच्या वेळी तिथे वेगळी भाजी, फेरबदल करून लावावी. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्यामुळे किडीचे प्रमाण कमी होते. भाज्यांमध्ये विविधता मिळते. आपल्या श्रमाची ताजी भाजी मित्र-मैत्रिणींना वाटण्यातला आनंद घेता येतो. माझ्याकडे अनेक लोक पालापाचोळा देतात, त्यांना ताजी भाजी देता येते. हा जरा वेडाचारच वाटेल, पण तुम्हीही करून बघा, झपाटून जाल.

संबंधित बातम्या