वेली भाज्यांची विविधता 

प्रिया भिडे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

खेड्यामधील कौलारू घरांवर हिरव्यागार वेलाचे आच्छादन असते. कधी मोठ्या पानांचा लाल भोपळ्याचा वेल दिसतो, एखाद्या घरावर सूर्यऊर्जा खाऊन विसावलेला गोल गरगरीत लाल भोपळापण दिसतो. एक दृश्य माझ्या कायम लक्षात आहे. काही वर्षांपूर्वी जळगावजवळ एका खेड्यात सगळ्या घरांच्या कौलांवर कारल्याचे वेल पसरले होते, फुलले होते, पिवळ्या फुलांचा शेला पांघरल्यामुळे घरे लोभस दिसत होती.    

लग्नाच्या मंगलविधीमध्ये विहीण बाईला कारल्याच्या मांडवाखालून नेण्याची प्रथा आहे. पूर्वी घरीच लग्न लागत असतील. नाजूक पिवळ्या फुलांनी बहरलेला, सुरेख कातरलेल्या पानांचा कारल्याचा वेल घरोघरी असणार. विहिणीचे स्वागत, मान करायचा सोपा मार्ग म्हणून कारल्याच्या सुंदर वेलाखालून जाण्याची प्रथा पडली असेल. आता लाखो रुपये खर्च करून फुलांचे सुशोभन करतात, प्लॅस्टिकची पाने लावून वेल करतात आणि त्याला कारली लावतात. याला काय म्हणायचे?  

शहरात राहून परसबागेत वेली भाज्या लावणे सहज शक्य आहे. दोन मीटर बाय एक मीटरचे दोन विटांचे वाफे किंवा पन्नास लिटरचा ड्रम वापरून वेल वर्गीय भाज्या लावता येतात. कारले, दुधी भोपळा, दोडका, लाल भोपळा, घेवडा, पडवळ, काकडी, घोसावळे, तोंडली असे वेली भाज्यांचे अनेक पर्याय आहेत. उपलब्ध जागा व सूर्य प्रकाश याचे गणित मांडून पर्याय निवडावा. अर्थात आपली आवड महत्त्वाची आहेच. 

कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडूच. पण अनेकांना ते खूप आवडते. कारल्याचे दोन-तीन प्रकार असतात. एक हिरवेगार पंधरा-वीस सेंटिमीटर लांबीचे कारले असते, काही अगदी जेमतेम आपल्या बोटाएवढी लांबीची असतात. लांब निमुळती पांढरी कारली अगदी सुकुमार दिसतात. कारल्याच्या बिया अगदी सहज रुजतात. वेलींच्या बिया लावताना चार पाच बिया लावाव्यात, त्यामधील दोन सशक्त वेलींची रोपे ठेवावीत. वेल भराभर वाढतो. त्याला छोटासा मांडव किंवा बांबूच्या काड्यांचा आधार देऊन दोरीने बांधावे. आधार दिल्याने वेलीची वाढ चांगली होते, सूर्यऊर्जा व्यवस्थित साठवता येते. दीड दोन महिन्यांनी नाजूक पिवळी फुले येतात, परागीभवन झाल्यानंतर लहान कारली लागतात. परागीभवनासाठी आपल्या बागेमध्ये मधमाश्या, फुलपाखरे इतर अनेक छोट्या-मोठ्या माश्या भुंगे यांची वर्दळ असावी लागते. वेलाला छोटी कारली लागल्यानंतर तयार खताची मात्रा द्यावी.  त्यामुळे कारली सशक्त होतात. कारली म्हणजे वेडे पीक आहे, एक वेल मायंदाळ पीक देते. मग भरली कारली, रसातली कारली, तवा फ्राय कारले, काप, लोणचे असे अनेक प्रकार करता येतात. ‘कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा आपुल्या माहेरी,’ असे लोकगीत म्हणूनच म्हणत असावेत. माझ्याकडे वाफ्यात लावलेला एक वेल टोपलीने कारली देतो. 

पुढच्या लागवडीसाठी एखादे कारले वेलावर पिकू द्यावे. एका कारल्यातून भरपूर बिया मिळतात. हे केशरी रंगाचे कारले खूप छान दिसते, उकलल्यावर आत लालबुंद आवरणात बिया असतात. हे आवरण पक्ष्यांना खायला खूप आवडते, ते बिया खात नाहीत. 

दुधी भोपळ्याचा वेलही अशाच प्रकारे बी लावून लावता येतो. आजकाल संकरित दुधी भोपळ्याची रोपे मिळतात. याला भरपूर भोपळे लागतात, पण यापासून बी मिळत नाही. त्यामुळे दरवेळेला आपल्याला रोप विकत आणावे लागते. शेतकऱ्यांनासुद्धा रोपासाठी अवलंबून राहावे लागते. त्याऐवजी गावरान दुधी भोपळा लावावा. दुधी भोपळा मोठा असल्याने मोठा ड्रम किंवा वाफ्यातच लावावा. लहान ड्रम वापरल्यास वेलाच्या बाजूला छोटी जाळी किंवा जुनी प्लॅस्टिकची बरणी ठेवावी. त्यामध्ये तयार खताची मात्रा किंवा ओला कचरा घालावा, त्यामुळे दुधी भोपळे चांगले भरतात. बी लावल्यावर दहा-पंधरा दिवसांत रोप तरारते. याला भरपूर पाणी व ऊन लागते. शक्यतो पूर्वेकडे वेल लावावेत, मग चांगले ऊन मिळते. छोटासा मांडव करावा. केवळ ओला कचरा खाऊन वेल पंचवीस-तीस दुधी सहज देते. मग सूप, हलवा, ज्युस, कोफ्ते असे अनेक पर्याय सुगरणींना उपलब्ध होतात. वेलीला पंधरा दिवसातून एकदा मुठभर नीमपेंड जरूर घालावी.

लाल भोपळा लावण्यासाठी वाफा किंवा मोठा ड्रम असावा. तीन चार किलोचे दोन तीन भोपळे हवे असतील, तर त्याला तेवढे खाणे उपलब्ध असेल हे बघावे. कोणतेही रासायनिक खत न वापरता भाज्या लावल्या, की त्यांना भरपूर खाद्य म्हणजे सेंद्रिय माल/कचरा लागतो, तो घालावा. 

भोपळ्याला जमिनीवर पसरायला आवडते. त्याला मुक्तपणे पसरू द्यावे, शिस्त लावू नये. पानाचा आकार त्याचे आरोग्य सांगेल. मोठी ताटासारखी पाने वाढून ऊन खातील, मग मोठाली केशरी फुले येतील. यामध्ये नर फुले व मादी फुले वेगळी असतात. मादी फुलाला मागे पिटुकला भोपळा असतो. जर परागीभवन झाले तरच भोपळा मोठा होतो, अन्यथा फुले गळून पडतात. काहीजण हाताने परागीभवन करतात. परंतु कीटकांची वर्दळ असली तर त्याची गरज पडत नाही. एकेका फुलामध्ये पाच-सात मधमाश्‍या मस्त लोळताना दिसतात. भोपळा मोठा व्हायला लागल्यावर त्याला आठवड्यातून एकदा तरी तयार खताची मात्रा द्यावी. तसेच भोपळा जमिनीला टेकणार नाही याची दक्षता घ्यावी, नाहीतर खालून खराब होतो. तीन चार महिन्यांनी भोपळे तयार होतात. भोपळा तयार झाला की साल पिवळट पडते. अशा वेळेला पाच ते सात सेंटिमीटर देठ ठेवून भोपळा कापावा. देठ लांब ठेवल्याने टांगलेला भोपळा दोन महिने सहज टिकतो. कोवळ्या पानांची भाजी, फुलांची भाजी, कढीलिंब-मिरची-तीळ घालून फुलांची चटणी, छान होते. बियासुद्धा खाता येतात. तयार भोपळ्याचे भाजी, भरीत, सूप, पाय असे पदार्थ आहेतच, पण घरच्यांची पसंती असते घारग्यांना. त्यासाठी सोसायटीमध्ये/सामूहिक गच्चीवर एखादा वेल नक्की लावावा. पालाखताच्या ढिगावर बी टाकले तरी एखादा भोपळा सहज मिळतो. 

दोडका, घोसावळी यांचे वेल बिया लावूनच वाढवावेत. आधारासाठी फॅब्रिकेटेड स्टँड असले, तर त्याचा कायमस्वरूपी उपयोग होतो. फारशी देखभाल न करता भरपूर भाज्या मिळतात. 

एखादा दोडका किंवा घोसावळे  वेलावर वाळवून, त्याची वरची साल काढून, आतील तंतुमय जाळी घासणे म्हणून वापरता येते. प्लॅस्टिक घासणीपेक्षा ही पर्यावरणपूरक घासणी आपण वापरू शकतो आणि मैत्रिणींनाही देऊ शकतो. सूर्यऊर्जा, पाणी व  आपल्याला नको असलेला ओला कचरा यांच्या साहाय्याने वनस्पतीने तयार केलेली ही जाळीदार सुंदर रचना बघून आपण स्तिमित होतो. 

पडवळाचा वेल लावल्यास, पडवळ लहान असताना टोकाला छोटे वजन लावावे त्यामुळे ते सरळ राहते. तोंडलीसुद्धा सहज येणारा वेल आहे. खूप वाढतो, इतर झाडांवर पसरतो. त्याला जाळी असेल तर छान चढतो. खूप तोंडली देतो. कोवळी तोंडली कच्ची खाता येतात. भात, भाजीसाठी उपयोग होतो. जून तोंडल्यांचा रस्सा छान होतो. सारस्वत लोक पानांची तमळी करतात. वेलावर मावा पडण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी महिन्यात एकदा गोमूत्र किंवा नीम तेल फवारावे.  

चवळी, घेवडा, फरसबी याची लागवडही बियांनी करता येते. या वेलींच्या मुळावर नत्र स्थिरीकरणाच्या गाठी असतात. हे वेल आपल्या परसबागेत मातीची सकसता राखण्यासाठी जरूर लावावेत. रेशीम/बाजीराव घेवडा हा तर माझा बालमित्र. लहानपणी आमच्या बंगल्याच्या आवारात या घेवड्याच्या वेलाची झोपडी असायची. अतिशय आक्रमकरीत्या वाढतो. जांभळ्या रंगाच्या चपट्या शेंगांची लयलूट करतो. माझी आई डिसेंबर-जानेवारीमध्ये या शेंगांच्या दुरड्या भरून वाटत असे. जून-जुलैमध्ये टपोऱ्या काळ्या बियांची लागवड केली, तर डिसेंबर-जानेवारीमध्ये भरपूर कोवळ्या, लुसलुशीत शेंगा मिळतात.

अबई बबई नावाच्या शेंगा कधी पहिल्या आहेत का? या घेवडा वर्गीय शेंगा कोयत्यासारख्या, १५-२० सेमी. लांब असतात. कोवळ्या शेंगांची भाजी मस्त होते. अशा खास गावरान, आपल्या भागातील विस्मृतीत गेलेल्या भाज्यांना आपल्या बागेत जागा असावी. 

वेली भाज्या लावणे सोपे आहे. त्याने गच्चीवर सावली येते. पक्षी, कीटकांची सोय होते आणि आपल्याला भरपूर भाज्या मिळतात. कौलारू घरांसारख्या शहरातील गच्च्यासुद्धा वेलींनी सजल्या तर बहार येईल नाही का!

संबंधित बातम्या