भूमिगत खाद्यखजिना 

प्रिया भिडे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

वेगवेगळे कंद व कंदमुळे खाणे ही आपली प्राचीन परंपरा आहे. वनस्पतीचे मातीच्या वरचे खाद्योपयोगी  भाग व मातीत लपलेले खाद्योपयोगी भाग असे दोन विभागच आपण करू शकतो. मातीतले भाग म्हणजे कंद, मुळे, रायझोम इत्यादी. यात खूप विविधता आहे. आपल्या पूर्वजांनी खाद्य संस्कृतीमध्ये सामावून घेतलेला भूमिगत खजिना बघून आपण थक्क होऊन जातो.

बीट, गाजर, मुळा, सुरण हे तर रोजच्या वापरात असतात. पण खास उपवासाला लागणारे रताळे, लोणच्यासाठी ओली हळद, चहासाठी लागणारे आले, मुलांसाठी ओल्या भुईमुगाच्या शेंगा असे आपल्याकडे खूप पर्याय असतात.

गच्चीवर वाफ्यात किंवा आडव्या क्रेटमध्ये कांदे लावू शकतो. नाकाने सोलता येणारा असा हा कांदा नाजूकच. तयार माती, कोकोपिथ व नीमपेंडचे मिश्रण करून त्यात कांद्याची रोपे २५ ते ३० सेमी अंतरावर लावावीत. कांद्याला पाणी फार आवडत नाही. बी लावून रोपे करणे जिकिरीचे असते. रोपांची वाढ जलद होते. पाने म्हणजे पात तरारते. अनेक शेतकरी केवळ पातीसाठी रोपांची लागवड करतात. काही जण केवळ बियांसाठी लागवड करतात. कांद्याच्या बिया म्हणजे कलौंजी, पंजाबी पाककृतीमध्ये खूप लोकप्रिय आहे. पात हवी असेल तर दीड महिन्याने काढावी. कांदे हवे असतील तर महिन्यातून एकदा बोनमील किंवा तयार खताची मात्रा द्यावी. चार महिन्यांनी पात सुकेल, मग कांदे काढावेत. बियांसाठी रोपे ठेवली तर कांद्याच्या पातीमधून एक दांडा बाहेर येऊन त्याला पांढऱ्या फुलांचा चेंडू येतो, खूप छान दिसतो. पुष्परचनेसाठी वापरता येतो. ओरिसामध्ये या फुलांची भाजी करतात. काही वेळा कांद्याला कोंब येतात. ते छोट्या कुंडीत, प्लॅस्टिकच्या बाटलीत लावले तर चायनीज पाककृतीसाठी हाताशी पटकन थोडी पात उपलब्ध होते.

कांद्यावर लांब दोऱ्यासारखी बुरशी येण्याचा धोका असतो. त्यासाठी दोन चमचे नीमतेल ५०० मिली पाण्यात किंवा गोमूत्र १:२० पाण्यात मिसळून फवारावे.

गाजर, लाल मुळा, पांढरा मुळा, बीट लावायचे, तर क्रेट किंवा दोन विटांचा वाफा, १५ सेमी व्यासाच्या जुन्या पीव्हीसी पाईपमध्ये तयार खत, नीमपेंडचे मिश्रण करून वीस ते पंचवीस सेमी अंतरावर बी लावावे. बियाणे आणताना पाकिटावर तारीख बघून आणावी. बीचे पाकीट मोठे असते. त्यामुळे बियाणे तीन-चार  जणांनी वाटून घ्यावे. 

गाजराची कातरलेली पाने छान दिसतात. अडीच तीन महिन्यांनी गाजरे काढावीत. गाजराची पांढरी, नाजूक फुले खूप छान दिसतात. पूर्वी हलक्या गुलाबी रंगाची, नाजूक, वर जाड व खाली शेपटीसारखी निमुळती होत जाणारी गावरान गाजरे मिळत. आता जाड, केशरी, दडदडीत, बेचव नाहीतर रंगात बुडवलेली गाजरे मिळतात. सुटीत घरातील मुलांनी बिया लावल्या, तर त्यांना बागेतली कोवळी गाजरे उपटून खायला मजा येते.   

मुळा, नवलकोलचे बियाणे लावावे. यासाठी थर्माकोलच्या खोक्याला खालून व बाजूला भोके पाडून त्यात पालाखत भरून वर कोकोपिथचा थर देऊन त्यात बियाणे खोचावे. रोपे भराभर वाढतात. याची पाने भाजीसाठी वापरता येतात. सलाड, थालीपिठामध्ये घालता येतात. तीन महिन्यांनी करकरीत पांढरे शुभ्र मुळे, कोवळे नवलकोल मिळतात.

सुंदर फुलांचे आयपोमियाचे वेल बागेत सुशोभनासाठी लावतात. यात निळा, गुलाबी, पांढरा, जांभळा असे फुलांचे अनेक रंग असतात. रताळे त्यांचे भावंड. मला कंदमुळांमध्ये रताळे लावायला आवडते, कारण कमी श्रमात भरपूर पीक येते. गोड चवीचे, उपवासासाठी लागणारे मूळचे दक्षिण अमेरिकेचे पण आता आपलेच झालेल्या रताळ्याची वेल एकदा लावली, की कायमची बागेत राहते कारण ती अतिशय सहज रुजते. कोंब आलेले रताळे किंवा वेलाचे कडे लावावेत. रंगाची बादली, क्रेट, माठ वापरावा. क्रेट घेतला तर आतून वर्तमानपत्राचे अस्तर लावावे, म्हणजे माती वाहून जात नाही. जुने पोते घातले तरी चालते. मी रताळे वाफ्यात लावत नाही, कारण लहानसे मूळ राहिले तरी वेल फोफावते. एक पोते पालापाचोळा, दोन घमेली तयार पालाखत, अर्धे घमेले ओला कचरा व नीमपेंड, क्रेटमध्ये भरून घ्यावे व कडे खोचावे. कडे पटकन रुजते. रताळ्याचा तुकडा खोचला, तर पंधरा दिवसांत नवी पाने फुटतात. वेल वेगात वाढते, खूप सूर्यप्रकाश खाते. मी पंधरा दिवसांतून एकदा भाजीवाल्याकडून ओला खाऊ आणून वेलावर पसरून टाकते. केळीप्रमाणे रताळेसुद्धा भरपूर ओला कचरा खाते. वेल वाढते व तयार केलेले अन्न मुळात साठवते, रताळी म्हणून! रताळ्याचे विविध प्रकार असतात. माझ्याकडे चार प्रकार आहेत. गर्द/फिकट अमसुली, पिवळट तसेच काही संकरित रताळी आतून जांभळ्या, केशरी रंगाचीदेखील असतात.

पानांचे रंग व आकारातही फरक असतो. काही पाने गर्द हिरवी हृदयाकृती, हाताच्या पंजाच्या आकाराची, काही गर्भाशयाच्या आकाराची असतात. अमसुली रंगाच्या पानांची रताळी अगोड असतात, पण पाने छान दिसतात. मी सुशोभनासाठी जलाशयाच्या बाजूला हे वेल लावले आहेत. रताळी लावल्यावर चार ते पाच महिन्यांनी काढता येतात. क्रेटमध्ये लावल्यास पाहिजे त्यावेळी माती बाजूला करून रताळी काढून घेता येतात किंवा क्रेट उपडा करून मोठी रताळी काढावीत व पिल्ले परत लावावीत. हृदयाकृती पानांच्या प्रकारात पांढरी माशी कीड पडण्याचा धोका असतो. पाने काढून टाकावीत व गोमूत्र फवारावे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये फुलपाखरांच्या अळ्या पाने खातात, त्यावेळी काही फवारू नये. वेलाला आडवे धावायला किंवा खाली पडायला आवडते. उंचावर ठेवल्यास छान हिरवा पडदा दिसतो. पाच महिन्यांनी फिकट जांभळ्या रंगाची फुले येतात. माझ्याकडे बारा महिने रताळी असतात. एकादशी व शिवरात्रीला भरपूर रताळी मिळतात. रताळी काढल्यावर वेलाची कडी वाटून टाकते, नाहीतर पाण्यात टाकून खत करते. मे महिन्यात पाच पोती भरून वेल वेगवेगळ्या लोकांना लावायला दिले.         

एखाद्या गोष्टीपासून अनेक खाद्यपदार्थ तयार करणे ही भारतीय संस्कृतीची खासियत आहे. रताळ्याचा कीस, साखर पेरून केलेली फेणी वगैरे. आम्ही तर काटक्या, नारळाच्या शेंड्या चुलीत घालून रताळी भाजून खातो. नाहीतर मायक्रोव्हेवमध्ये साजूक तूप, तिखट, मीठ लावून दोन मिनिटे भाजावे. केरळमध्ये याचे चिप्स करून कांदा मिरची रायत्याबरोबर खातात. पंजाच्या आकाराच्या पानांची छान गोडसर भाजी होते. तेलावर परतून सलाडमध्ये पाने घालता येतात. या बहुगुणी रताळ्याचा एखादा क्रेट गच्चीवर असावा. ऑक्टोबरमध्ये लावली तर शिवरात्रीला आणि एप्रिलमध्ये लावली तर एकादशीला कमी कष्टात, कमी खर्चात येणारे, खूप कचरा खाणारे पीक म्हणून जरूर लावावे.

कंदामधील आपण नेहमी वापरत असलेला आरोग्यदायी सुरणसुद्धा सहज लावता येतो. फक्त सुरण खाजरा नाही ना हे बघून घ्यावे. सुरणाला कोंब फुटला, की गड्ड्याचा थोडा भाग व डोळा कापून लावायचा असतो. सुरण चांगले भरण्यासाठी मोठे पिंप, वाफा असावा. मी १०० लिटरच्या पत्र्याच्या (६० सेमी बाय ६० सेमी बाय ६० सेमी) पिंपात लावते. मातीत दहा ते पंधरा सेमी खड्डा करून त्यात कोंब लावावा व वरून अलगद माती घालावी. अतिशय वेगाने कोंब वाढून हिरवा दंड वर येतो, कातरलेली मोठी पाने येतात. सुरणाचे झाड खूप सुंदर दिसते. महिन्यातून एकदा अर्धे घमेले तयार खताचा डोस द्यावा. पाणी खूप घालू नये फक्त ओलावा राखावा. नऊ ते दहा महिन्यांनी पाने पिवळी झाली, की हलक्या हाताने माती उकरून सुरणाचा तयार गड्डा काढावा. हा गड्डा काढला की मातीतून एखादा धनाचा हंडा मिळाल्याचा आनंद होतो. नऊ दहा किलो माल मिळतो, शिवाय छोटी छोटी पिल्ले मिळतात ती वेगळीच. ती इतरांना लावायला देता येतात. सुरणाचे काप, चिप्स, कटलेट, भाजी असे अनेक प्रकार करता येतात. 

कंद, रायझोमचे आणखीही खूप प्रकार बागेत लावू शकतो, त्या विषयी बघूया पुढील लेखात.

संबंधित बातम्या