भूमिगत खाद्यखजिना (भाग २)

प्रिया भिडे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

वनस्पतींची विविधता जाणून घ्यायला लागलो, की नवनवीन माहिती मिळू लागते. रानावनात राहणाऱ्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचा भाग असलेल्या अनेक वनस्पती आपल्याला माहीत नसतात. आपल्या शहरी जीवनात त्यांचे अस्तित्व नाहीसे होते, त्यांचे अधिवास हरवून जातात. सुरणासारखे काही कंद शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात लावले जातात आणि आपल्यापर्यंत पोचतात.  

कंदामधला सुंदर प्रकार म्हणजे कोनफळ! उंधियोसाठी वापरला जाणारा जांभळा कंद. याचा हृदयाकृती पानांचा वेल खूप सुंदर दिसतो. जुन्या फ्लेक्सचा ट्रे करून पालाखताने भरून त्यात कंद लावता येतो. वेल झपाट्याने वाढतो. सहा महिन्यांनी दोन किलो कंद सहज मिळतो. या कंदाचा खूप प्रकारे वापर करता येतो. रवा घालून काप, तूप जिरे घालून भाजी, रस भाजी आणि खास उंधियो. वरून काळपट आणि आतून जांभळा! माती, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती इतका सुंदर रंग तयार करू शकतात हे अद्‍भुत आहे. याचा जांभळा रंग इतका सुंदर असतो; या रंगाचा मोह वस्त्रकर्त्यांना न पडता तरच नवल.  कोनफळी रंगाची शाही पैठणी म्हणजे महाराष्ट्राची खास ओळख!

असेच आणखी एक चविष्ट कंदमूळ, मीट्टीआलू. खंबाआलू हे याचे ओरिसामधले नाव. काळपट रंगाचे रताळ्याहून मोठे, लांबट आकाराचे कंदमूळ. हृदयाकृती पानांचा याचा वेल रंगाच्या बादलीत, फ्लेक्सच्या ट्रेमध्ये पालाखत भरून लावता येतो. आधार लागतो; आधाराला विळखे घेत वेल वेगाने वाढतो, सुंदर दिसतो. मी रंगाच्या बादलीत एकेक मीट्टीआलू लावला व बांबूचा आधार दिला. आता तीन वेलांचा छानसा हिरवा आडोसा झाला आहे. आता सहा महिन्यांनी बादली उपडी करून मीट्टीआलू काढणार. याची भाजी मस्त होते. ओडिशामध्ये मासे घालून रस्सा करतात. जग्गन्नाथाच्या प्रसादात याला विशेष स्थान आहे, खीर केली जाते. आमच्याकडे रव्यावर परतलेले कापही आवडतात. 

घोर कंद, डुक्कर कंद असे अनेक स्थानिक कंद वापरण्याच्या खास पद्धती असतात. ते खूप धुऊन, भिजत घालून वापरावे लागतात. ग्रामीण लोकांना याची चांगली माहिती असते. आपण ती जाणून घ्यावी. एकदा नगर जिल्ह्यातील अकोलेच्या बाजारात एक आजी वेलीचे कोवळे दांडे व कंद विकत होती. तिला विचारले  हे काय? ‘अगं ही चाईची भाजी, धा ला एक वाटा.’ मी दोन वाटे घेतले. घरी आल्यावर डेख परतून चविष्ट भाजी केली. आजीबाईंकडून आणलेला कंद कुंडीत लावून टाकला. त्याने चांगले बस्तान बसवले आहे. या कंदाचीदेखील भाजी होते. 

कंद व कंदमुळांची दुनिया खूप मोठी आहे, तशीच आणखी आणि परिचित दुनिया आहे ‘आले’ कुटुंबाची.  रोज लागणारे, जेवणाचा स्वाद वाढवणारे आले बागेत हवेच. अगदी छोट्याशा गोल कुंडीत आल्याचे रायझोम लावू शकता. बागेत एखादा ट्रे, वाफा पालाखताने भरून घ्यावा व त्यात आल्याचा सशक्त तुकडा खोचावा. आल्याला कोंब फुटायला वेळ लागू शकतो पण धीर धरा. कोंब फुटेल व सरळ दांड्याला नाजूक पात्याची पाने येतील. पानांना आल्याचा वास असतो. आल्याला पाणी आवडत नाही, फक्त ओलावा ठेवा. जास्त पाणी घातले तर आले कुजून जाईल. त्यामुळे शेतात गादी वाफा करतात. कुंडीत आले लावले की पाहिजे त्यावेळी माती बाजूला करून तुकडा तोडून घेता येतो. त्यामुळे अगदी छोटी बाग असली, तरी आले जरूर लावावे. 

आल्याच्या कुटुंबातील शोभेचे प्रकार खूप आहेत. जसे सोनटक्का, हेलीकोनिआ; असाच एक प्रकार शाम्पू फ्लॉवर! याची पाने सोनटक्क्यापेक्षा थोडी नाजूक असतात. मार्चनंतर तीन चार महिने फुलण्याचा काळ असतो. फुलासाठी जमिनीतून वीस ते तीस सेमीचा दांडा जमिनीतून वर येतो. त्याला लॉलीपॉपसारखा कोन येतो. सुरुवातीला हिरवा असणारा हा कोन हळूहळू गर्द लाल होतो. या कोनाच्या खवल्यातून फिकट पिवळ्या रंगाची छोटीशी फुले येतात. हे लाल रंगाचे लॉलीपॉप खूपच छान दिसतात. याची खरी मजा वेगळीच आहे. हे कोन हलक्या हाताने दाबल्यावर सुगंधी रंगाचा द्रव बाहेर येतो. हा अस्सल निसर्गतः तयार झालेला शाम्पू. हा शाम्पू केसालाही लावता येतो, तसेच अंगालाही लावता येतो. याचे रायझोम कडू आले म्हणून ओळखले जातात. आपल्याकडे याचा खाण्यासाठी वापर होत नाही, परंतु मलेशिया, थायलंड  या ठिकाणी खाण्यासाठीही हे आले वापरले जाते. मी मात्र फुलातला शाम्पूच वापरते.

जंगलात रानआले दिसते. याची गर्द केशरी फुले सुंदर दिसतात. भूमिगत असलेले हे सगळेच रायझोम गुणी असतात. फारशी देखभाल न करता फुलत राहतात. बहर संपल्यावर सुकून जातात. दीर्घ विश्रांतीनंतर, पावसाळ्याच्या सुमारास परत तजेलदार पाने येतात.

भारतीय स्वयंपाकातील अविभाज्य भाग असलेली हळद म्हणजे भूमीतले सोनेच. प्रत्येकाने आपल्या बाल्कनीत, गृहनिर्माण संस्थेत, गच्चीत हळद आवर्जून लावावी. लावायला सोपी, दिसायला सुंदर आणि स्वादाबद्दल काय सांगावे! हळदीचे कंद जून-जुलै महिन्यात लावतात. हौशी लोकांनी छोट्याशा कुंडीत कधीही लावायला हरकत नाही. हळद लावण्यासाठी, आंब्याच्या जुन्या पेट्या, थर्माकोलचे बॉक्स, कुंडी आणि जास्त प्रमाणात हवी असेल तर एखादा वाफ्यामध्ये, तयार पालाखत, राख, नीमपेंड असे मिश्रण एकत्र करून २० ते ३० सेंटिमीटर अंतरावर कंद लावावेत. ओलावा राहील असे पाणी घालावे. हळदीला पाणी आवडते, पण पाण्याचा निचरा झाला पाहिजे. तीन आठवड्यात पाने फुटतात. कर्दळीच्या पानासारखी पण फिकट हिरव्या रंगाची. हळदीचा वास असलेली पाने सुंदर दिसतात. त्यामुळे ही कुंडी दरवाजात, दर्शनी भागातसुद्धा ठेवता येते. हळदीचे पंजे जमिनीत वाढत राहतात. पाच सहा महिन्यांनी, माती बाजूला करून एखादा तुकडा काढून ओल्या हळदीचे ताजे लोणचे करता येते. हळदीच्या पानांना खूप छान स्वाद असतो. पाने पातोळ्या करण्यासाठी वापरता येतात. मांसाहार करणाऱ्या लोकांना, विशेषतः मासे आवडत असतील तर, मसाला लावलेले मासे पानात गुंडाळून चुलीवर भाजावेत. मडक्यात तळाला पाणी घालून त्यावर लाडीची पाने घालून मिश्र भाज्या, खोबरे, दाणे घालून पोपटीपण करता येते. हळदीच्या रोपांची गर्भार मुलीसारखी नऊ महिने काळजी घ्यावी लागते. जूनमध्ये लावली, तर फेब्रुवारीत काढायची. पाने सुकल्यावर दहा पंधरा दिवस रोपे तशीच ठेवावीत, पाणी देऊ नये. त्यानंतर रोपे अलगद उपटून काढावीत. मधले जाड कंद लावण्यासाठी वेगळे ठेवावे. हळदीचे पंजे धुऊन घ्यावेत. मी दोन आडव्या पिंपात सोळा कंद लावले तर दहा किलोहून आधिक हळद येते. यापासून हळद करणे जिकिरीचे असते, त्यामुळे मी ओली हळदच वापरते. लोणचे करायचे, किसून वाळवून ठेवायची व उरलेली मैत्रिणींना वाटायची. नवीन बाग सुरू करणाऱ्यांना मी हळद कंद लावायला देते. कारण सहज येते, छान दिसते. ‘पी हळद हो गोरी,’ असे म्हटले जाते, कारण हळदीतील कुर्क्युमा घटक औषधी असतो. पिवळ्या हळदीप्रमाणे काळी, तांबडी रंगाची हळद असते. गौरीचे हात म्हणून रान हळदीची फुले गणपतीत बाजारात येतात. यामुळे तिचे अस्तित्व धोक्यात येते. या प्रथा टाळाव्यात, किंबहुना आपल्या बागेत हळदीची विविधता आपण जपू शकतो.

शोभिवंत पानांचा कोलीयस खूपजण लावतात. त्याचा भाऊबंद इंडियन कोलीयस, ज्याची मुळे आपण लोणच्यासाठी वापरतो, ते माईनमुळे बागेत लावायचा प्रयोग करून बघावा. 

नाजूक पानांचा, सुंदर पांढऱ्या फुलांचा काटेरी वेल शतावरी एखाद्या कुंडीत लावता येतो. याची मुळे औषधी असतात. मुळांची पावडर वापरतात. आपण ही वेल शोभेसाठी लावावी. 

एखाद्या छोट्या घमेल्यात वाळा लावला, तर सुगंधी सरबतासाठी वाळ्याची मुळे वापरता येतात. हा गवत कुटुंबातला वाळा नाजूक छान दिसतो. याला पाणी आवडते त्यामुळे घमेल्याला भोके पाडू नयेत. वाळ्याची  मुळे जमिनीत खूप खोल जातात, पण घमेल्यात मुळांची जाळी होते. ती काढून वापरता येते.  

कांदे, बटाटे, सुरण, बीट, मुळा, हळद, आले, घोर कंद, मीट्टीआलू, रताळे असा हा भूमिगत खाद्यखजिना अफाट आहे. त्यातला थोडाच आपण घरी लावू शकतो.

वनस्पतींनी तयार केलेले चविष्ट घटक खाद्यसंस्कृतीत आणणारे आपले पूर्वज धन्य आणि केवळ माती, पाणी व सूर्यप्रकाश यांच्यापासून स्वगुणांनी अनेक घटक तयार करणाऱ्या वनस्पती त्याहून धन्य!

संबंधित बातम्या