लिली आणि गुलाबाचे साम्राज्य 

प्रिया भिडे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

गच्चीवरील बाग
वाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी? पाहूया या सदरामध्ये...
प्रिया भिडे

खाद्योपयोगी कंदाची विविधता खूप आहे, तसेच शोभेच्या फुलांचे कंदही खूप आहेत. निशिगंध, ग्लाडीओलस, लिली असे मोहक फुलांचे कंद लावून बागेची शोभा वाढवता येते. मुख्य म्हणजे कंदाला जास्त जागा लागत नाही, छोट्याशा कुंडीमध्येही लावता येतात.

मनमोहक सुगंधाने सायंकाळ रम्य करून टाकणाऱ्या निशिगंधाचे कंद लावण्यासाठी, एखाद्या गोल कुंडीत तळाला नारळ करवंटीचे दोन ते अडीच सेंटिमीटरचे तुकडे घालून त्यावर पालाखत व नीमपेंड यांचे मिश्रण भरावे. कंदाला पाणी जास्त झाले तर तो कुजण्याचा धोका असतो. शुभ्र पांढरा एकेरी पाकळ्यांचा आणि मागे लालसर छटा असलेला दुहेरी, हे दोन्ही निशिगंध छान दिसतात. फुलांच्या काड्या हळूहळू फुलत जातात, दीर्घकाळ टिकतात. फुले येऊन गेल्यावर कंद काढून ठेवावेत, त्यांना विश्रांती द्यावी. योग्य वेळ येताच कोंब येतात व सांगतात, ‘लावा मला’. पांढरा, लिंबोणी, केशरी, जांभळा अशा अनेक रंगांची ग्लाडीओलसची फुले अति परिचित व लोकप्रिय आहेत. यातील कोणत्याही रंगाचे कंद निवडून छोट्या गोल किंवा आडव्या कुंडीत लावावेत. फुलाचा दांडा वर आल्यावर त्याला बारीक काडीचा आधार द्यावा. बहर गेल्यावर कंद काढून वाळवावेत नाहीतर कुजतात. 

गर्द हिरव्या रंगाची लांब पाने असलेल्या स्पायडर लिलीचे कंद शक्यतो आडव्या कुंडीत लावावे. श्रावणात ही लिली भरभरून फुलते. लिलीच्या शुभ्र कळ्या अतिशय सुंदर दिसतात. पूर्ण उमलण्याअगोदरची कळी  जणू पुष्पदीप! किंचित विलग झालेल्या पाकळ्या एका टोकाला जोडलेल्या असतात आणि एका क्षणात  पाकळ्या विलग होऊन फूल उमलते. सात्त्विक सुगंधामुळे लिली हारासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात.  कंदाची पिल्ले वाढत जातात. लोकसंख्येचा विस्फोट होऊन कुंडी फुटू शकते त्यामुळे विरळणी करावी. कंद वाटून टाकावेत.

पिवळी, पांढरी, गुलाबी नाजूक फुले येणारी लिली बिया लावूनही सहज येते. ही फुले खूपच मोहक असतात. कंद मिळाले तर छोट्या बाऊलमध्ये, जुन्या काचेच्या बरणीत, छोट्या कुंडीत लावावेत. फुले आल्यावर टेबलवर ठेवता येते. दिवाणखान्याच्या बाल्कनीमध्ये वाफा असेल, तर ही नाजूक लिली जरूर लावावी. पांढरी, पिवळी फुले वाऱ्याच्या झुळकेने हलकेच डोलताना बघणे आनंददायी असते. फुले सुकल्यावर फळ धारणा होऊन चपट्या काळ्या बिया येतात. त्या सहज रुजतात. 

इस्टर लिली, मार्च लिली नावाने परिचित असलेल्या लिलीची पाने दोन अडीच सेमी रुंद असतात. तलवारीच्या पात्यासारखी पाने सुरेख दिसतात. त्यामुळे फुले नसतानाही कुंडी छान दिसते. मार्चमध्ये पानांमधून जाड दांडा वर येतो. टोकाला चार ते पाच मोठ्या कळ्या येतात. कर्ण्यासारखी फुले सुंदर दिसतात. ही मोठ्या आकाराची फुले खूप दिवस टिकतात. माझ्याकडे केशरी, गर्द लाल, गुलाबी व पांढरा असे चार रंग आहेत. दर्शनी भागात फर्न व लिली लावल्यास छान दिसते. हे कंद काढून विश्रांती दिली नाही तरी चालते. 

केवळ मे महिन्यात फुलणारा लाल भडक रंगाच्या फुलांचा चेंडू मे फ्लॉवर म्हणून सगळ्यांना माहीत आहे.  याचा एखादा कंद बागेत लावावा. मध्यम आकाराच्या कुंडीत दोन टीन कंद लावले तर लाल गर्द चेंडू छान दिसतात. एरवी याची पानेही तजेलदार असतात. कंद वर्गीय फुलांमध्ये खूप विविधता आणि फुलण्यात सहजता आहे, म्हणून ती बागेत समावून जातात. 

ज्याच्या शिवाय बागेला पूर्णत्व नाही, किंबहुना बागेचे मुख्य आकर्षण म्हणून ज्याच्याकडे पहिले जाते, ते फूल, नव्हे फुलांचा राजा... गुलाब! फार मोठी कुल महती असणारा गुलाब घरी आणायचे ठरले की त्यासाठी शाही तयारी हवी. सहा ते आठ तास ऊन असलेली जागा हवी. निदान तीस सेमी बाय तीस सेमी बाय तीस सेमीची कुंडी हवी. तळाला काटक्या घालून पालाखत, नीमपेंडचे मिश्रण घालून त्यात आपल्या आवडीचे गुलाबाचे रोप लावावे. पूर्वी माझ्याकडे हिरवळीभोवती पंधरा शुभ्र फ्लोरीबंडा होता. गुच्छात भरपूर फुले ही याची खासियत. हिरवळीभोवती ही पांढरी फुलांची किनार सुंदर दिसायची. गुलाबात वेली गुलाब, बटण गुलाब, संशोधकांनी केलेले अनेक संकर व हायब्रीडमधील सुंदर रंग मालिका आपल्याला लुब्ध  करते. लाल, केशरी, हिरवा, काळा, जांभळा, दुरंगी फुले, रंग मिश्रणाची फुले.. खूप मोठी दुनिया. आकारात ही अशीच विविधता. अगदी नाजूक बटण गुलाब तर दोन्ही हातात मावणार नाहीत असे मोठे, काही एका दिवसात उमलणारे तर काही काही अनेक दिवस हळूहळू उमलत जाणारे गुलाब असतात.    

ग्लाडीएटरसारखी फुले वीस पंचवीस दिवस फुलत राहतात. दीर्घकाळ टिकणारी, लांब दांड्याची फुले असलेले गुलाब लावले तर पुष्प रचनेसाठी वापरता येतात. गुलाबाला जास्त पाणी आवडत नाही. ओलावा ठेवावा. चांगल्या बहरासाठी महिन्यातून एकदा शेणपाणी दिले तर उत्तम. निदान दोन महिन्यांनी नक्की द्यावे. फुले येऊन गेल्यावर थोडी छाटणी करावी. नवी फूट यायला लागल्यावर बोनमील, स्टेरामिल किंवा तयार पालाखताची मात्र द्यावी. प्राणिजन्य खत गुलाबाला आवडते. अंड्याची साले, मासळी खतसुद्धा चालते.   मी कोणतेच रासायनिक खत, कीडनाशक वापरत नाही. अधून मधून नीमतेलाची फवारणी करते.   मुळाभोवतीची माती घट्ट झाली की रोपाचे आरोग्य धोक्यात येते, त्यामुळे माती खुरपून घ्यावी. तण काढावेत. रोपाचा आकार छान दिसावा यासाठी एकमेकांना छेद देणाऱ्या फांद्या, निस्तेज फांद्या व पाने कापून टाकावीत. कलमी गुलाबाचे मातृरोप वाढत नाही ना याकडे लक्ष द्यावे. कारण कलम म्हणजे देवकीचे बाळ यशोदेने वाढवणे. कधीकधी मूळ रोपाची वाढ होते व कलम केलेला डोळा वाढत नाही व मग फुले येत नाहीत. कलमी गुलाबामध्ये विविधता खूप असते, पण त्यावर रोग पडण्याचा धोका असतो.  

गुलाब विश्वात हायब्रीड टी व फ्लोरीबंडाचे वर्चस्व आहे. पीस, ब्लूमून, आयफेल टॉवर, सुपर स्टार, क्रिमसन ग्लोरी, ख्रिश्चन डायर अशी अनेक वलयांकित नावे आहेत, त्यामध्ये रोज भरच पडत असते. फुलांचे रंग, कळीचा मोहक आकार यामुळे आपण याची निवड करतो. पण मोतिया, गुलाबी, पांढरा, लालगुलाबी मिश्र रंगाचे देशी गुलाबही आवर्जून लावावेत. यांचे आयुष्य खूप असते. परडी भरून फुले  मिळतात. माझी आज्जी ओल्या नारळाच्या करंजीत, खिरीत, गुलाब पाकळ्या घालत असे. याचा सुगंधी स्वाद अविस्मरणीय. आईकडे खडीसाखर व गुलाब पाकळ्यांचा गुलकंद असे. मीपण गुलकंद करते, ताजे गुलाब पाणी करता येते. या गुलाबाची काडी खोचली तरी सहज रुजते. देशी गुलाबाची रोपे वाटिकेत सहसा मिळत नाहीत. तुमच्याकडे असतील तर संक्रांतीला याची रोपे लुटा.

आपल्या बागेत गुलाब का हवा?.... गुलाबाची फुले बागेची शोभा वाढवतात, आपल्याला खूप आनंद देतात आणि या हृदयीचे त्या हृदयी पोचवायचे तर गुलाबासारखा सखा नाही!

संबंधित बातम्या