झळाळी सोन्याची!

ज्योती बागल
सोमवार, 23 मार्च 2020

गुढीपाडवा विशेष
दागिने खरेदी तशी रोज होत नाही. त्यासाठी एखादा खास मुहूर्त साधावा लागतो. मग तो एखाद्या लग्नाचा असो किंवा एखाद्या सणाचा! सोने खरेदीसाठी सध्या गुढीपाडव्यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता असेल? त्यानिमित्त बाजारात उपलब्ध असलेले विविध दागिन्यांचे प्रकार, डिझाईन्स आणि किमतींचा घेतलेला आढावा.

आपल्याकडे दागिन्यांची परंपरा पूर्वापार चालत आली असून पारंपरिक दागिन्यांना वेगळेच महत्त्व आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये चिंचपेटी, ठुशी, मोहनमाळ, पुतळीहार, सर, कोल्हापुरी साज, जोंधळी हार, लफ्फा, तन्मणी, चंद्रहार, बोरमाळ, वाकी, नथ, झुबे, बाजूबंद असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. याचबरोबर अलीकडच्या काळात जास्त वापरात आलेले शॉर्ट व लॉंग नेकलेस, मंगळसूत्रांचे नवनवीन प्रकार, विविध प्रकारच्या बांगड्या, कानातले झुमके, टॉप्स, ब्रेसलेट्स, पैंजण, कंबरपट्टा, अंगठी आणि असे बऱ्याच प्रकारचे दागिने आज कितीतरी डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. 

कोल्हापुरी साज, चंद्रहार, पुतळीहार, मोहनमाळ, शिदेंशाही हार, चपला हार, लक्ष्मी हार, वाकी असे सर्व पारंपरिक दागिने साधारण १० ग्रॅमच्या पुढे घेईल तसे आहेत. या दागिन्यांच्या डिझाईनमध्ये जास्त व्हरायटी पाहायला मिळत नाही.  

नेकलेसमध्ये टेंपल नेकलेस, बंगाली नेकलेस, कलकत्ती नेकलेस हे प्रकार लॉंग आणि शॉर्ट नेकलेसमध्ये बघायला मिळतात. टेंपल नेकलेस साधारण १० ते २५ ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत. बंगाली नेकलेस ७ ते २५ ग्रॅममध्ये येतात, तर कलकत्ती नेकलेस २० ते ५० ग्रॅममध्ये मिळतात. टेंपल आणि कलकत्ती नेकलेसवर हॅंडवर्क केलेले असते. या तीन डिझाईन्समध्ये कलकत्ती नेकलेसला जास्त मागणी आहे. कारण या नेकलेसवर अतिशय नाजूक डिझाईन केलेले असते. टेंपल नेकलेसवर जास्त करून रेडिश पॉलिश असते, कारण त्यामध्ये रेडस्टोन्स वापरलेले असतात, तर कलकत्ती डिझाईनवर यलो पॉलिश पाहायला मिळते. चोकर या प्रकारातले गळ्यातले साधारण १० ग्रॅमच्या पुढे उपलब्ध आहे. हे ठुशीप्रमाणे गळ्याला अगदी चिकटून असते. याशिवाय लक्ष्मी हार, टिकली हार हे साधारण ४० ग्रॅमच्या पुढे येतात.

मंगळसूत्रांमध्ये पट्टी मणी मंगळसूत्र, बंगाली, कलकत्ती, टेंपल, अॅंटिक इत्यादी प्रकारचे पॅटर्न उपलब्ध आहेत. बंगाली पॅटर्न मंगळसूत्र १० ग्रॅमपासून पुढे घेईल तसे आहे. कलकत्ती आणि टेंपल पॅटर्न मंगळसूत्र कमीतकमी ४० ग्रॅमपर्यंत येते. त्यापुढे घेईल तसे आहेत. अॅंटिक मंगळसूत्र साधारण ३५ ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत. मंगळसूत्रांमध्येदेखील कलकत्ती वर्कला जास्त मागणी आहे. यामध्ये स्वतंत्र पेंडेंटही मिळतात. पण पेंडंट हे मंगळसूत्राच्या डिझाईननुसारच घ्यावे लागते. टेंपलमध्ये व्हर्टिकल वाट्या असणारे मंगळसूत्र येते. तसेच शिंपल्यांच्या वाट्या हा जुना प्रकार आजही चालतो. टेंपल, बंगाली आणि कलकत्ती या तीनही प्रकारांत पेंडेंटच्या अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. हल्ली हातात घालण्यासाठी मंगळसूत्र मिळते. हे ब्रेसलेट पॅटर्नमध्ये असून साधारण तीन ग्रॅमपासून पाच ग्रॅमपर्यंत येते. कॉर्पोरेट सेक्टर्समधल्या माहिला हे जास्त वापरतात. 

बांगड्यांमध्ये गोठ पॅटर्न, टेंपल पॅटर्न, दुबई पॅटर्न, रेग्युलर बांगडी इत्यादी प्रकार पाहायला मिळतात. साधारण चार किंवा सहा बांगड्यांचा सेट असतो. हा सेट साधारण १० ग्रॅम ते ५० ग्रॅमपासून पुढे घेईल तसा आहे. गोठ पॅटर्नला हॉलो पॅटर्न असेही म्हणतात. या सेटमध्ये दोन बांगड्या असतात. दुबई पॅटर्नमध्ये जाळीवर्क जास्त असते, तर रेग्युलर पॅटर्नमध्ये हॅंडवर्क असते. या बांगड्या रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत. तोडे पॅटर्न आणि टेंपल पॅटर्न हे फॅन्सी प्रकारात मोडतात. हे तोडे इतर बांगड्यांच्या पुढे घालतात. पाटल्या साधारण २० ग्रॅमच्या पुढे घेईल तशा येतात. यामध्ये प्लेन आणि नक्षी असे दोन प्रकार दिसतात.

नथीमध्ये आजही मोत्यांच्या नथीला जास्त मागणी असून लहान मोठ्या आकारांत या नथी दिसतात. नथ ही २०० मिलीग्रॅमपासून उपलब्ध आहे. कल्चर्ड मोती आणि सेमी कल्चर्ड मोतींचा वापर या नथींमध्ये केलेला दिसतो. सेमी कल्चर्ड मोतींच्या नथी स्वस्त असल्याने त्यांना जास्त मागणी आहे. कल्चर्ड मोती असलेली नथ ८ हजारांच्या पुढे येते, तर सेमी कल्चर्ड मोती असलेली नथ १५०० रुपयांपासून उपलब्ध आहे. तसेच काही फॅन्सी प्रकारातही नथ पाहायला मिळते. यांच्या किमती सहा हजारांपासून आहेत.   

कानातल्यांमध्ये स्टोन टॉप्स, टेंपल टॉप्स, बंगाली टॉप्स, झालर टॉप्स, सुई धागा लटकन टॉप्स, झुबा टॉप्स इत्यादी प्रकार पाहायला मिळतात. तसेच टेंपल, बंगाली, कलकत्ती या प्रकारांत झुमके जास्त चालतात. टॉप्स साधारण १ ते १० ग्रॅमपर्यंत येतात, तर झुमके ५ ते ३० ग्रॅमपासून पुढे घेईल तसे आहेत. झुमक्यांमध्येदेखील कलकती प्रकारचे झुमके जास्त वापरले जातात. झुमक्यांची किंवा टॉप्सची शोभा वाढवण्याचे काम 'कान' आणि 'वेल' करतात. हे कान टिकली आणि कोयरी डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. हे साधारण दोन ग्रॅमपासून पुढे असतात. याशिवाय रिंग्जमध्येही अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. या रिंग्ज अगदी अर्धा ग्रॅमपासून उपलब्ध आहेत. काही प्लेन रिंग्जमध्ये अमेरिकन डायमंडचा वापर दिसतो. याबरोबरच डुल पॅटर्नमध्येही अनेक डिझाईन्स आहेत. उदा. खड्यांचे डुल, प्लेन डुल, एंबाॅस, कटक, अमेरिकन डायमंड वापरलेले असे. हे डुल पाऊण ग्रॅमपासून जास्तीत जास्त दोन ग्रॅमपर्यंत येतात. 

अंगठ्यांमध्ये पुरुषांसाठी एंबाॅस, कास्टिंग, रजवाडी, नजराणा इत्यादी प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत, तर महिलांसाठी याच प्रकारांबरोबरच कलकत्ती पॅटर्नच्याही अंगठ्या उपलब्ध आहेत. या अंगठ्या साधारण दोन ग्रॅमपासून पुढे घेईल तशा आहेत. याव्यतिरिक्त अंगठ्यामध्ये बॅंड पॅटर्न पाहायला मिळतो. या अंगठ्या खास जोडप्यासाठी असतात. यामध्ये जिप्सी बॅंड आणि डायमंड स्प्रेडर हे प्रकार उपलब्ध आहेत. जास्तकरून डायमंडच्या अंगठ्यांना जास्त पसंती दिली दिसते. लहान मुलांसाठीच्या अंगठ्या अर्धा ग्रॅममध्येही मिळतात.

ब्रेसलेटमध्ये पुरुषांचे ब्रेसलेट्स साधारण १० ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत, तर महिलांचे पाच ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत. यामध्ये अमेरिकन डायमंड, कास्टिंग, टिकली, कोयमतुरी, चेन इत्यादी प्रकारातले ब्रेसलेट्स आहेत. अमेरिकन डायमंडचा वापर असलेल्या ब्रेसलेटला चांगली मागणी आहे. 

चेनमध्ये रस्सी चेन, इंद्रजित चेन, गोप, प्लेन, हाय वे, बॉक्स इत्यादी पॅटर्न पाहायला मिळतात. या चेन साधारण पाच ग्रॅमपासून पुढे उपलब्ध आहेत. पुरुषांमध्ये रस्सी चेनला जास्त मागणी आहेत, तर महिलांमध्ये बॉक्स आणि प्लेन चेनला जास्त मागणी आहेत. 

आज सोन्याचा एक छोटासा दागिना घ्यायचा म्हटले तरी थोडा खर्च नसतो. पण एवढा खर्च करायचा नाही म्हणून आपल्या आवडीचे दागिनेही घालायचे नाहीत का? यावर एक उत्तम पर्याय म्हणजे एक ग्रॅम सोन्यामध्ये मिळणारा दागिना. 'सोनचाफा'मध्ये असे एक ग्रॅम सोन्यामध्ये उपलब्ध दागिने मिळतात. या दागिन्यांमध्येही टेंपल, अॅंटिक, स्टोन नेकलेस असे अनेक प्रकार अनेक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. ही प्लेटेड ज्वेलरी असते. यांच्याकडे पारंपरिक आणि फॅन्सी असे दोन्ही प्रकारातले दागिने उपलब्ध आहेत.            

अमेरिकन डायमंडमध्ये मंगळसूत्र उपलब्ध असून याचे डायमंड मशीनने फिटिंग केलेले असतात. सेमी कल्चर्ड मोतींचे काही नेकलेसही पाहायला मिळतात. चिंचपेटी ही दोन आणि तीन लेअरमध्ये उपलब्ध असून ७०० ते ८०० रुपये दरम्यान आहे. चिंचपेटीची किंमत ही तिच्या कुशनवर्कवरून ठरते. जर कुशनवर्क नसेल तर कमी किमतीतही चिंचपेटी मिळते. तसेच जशी पेटी असेल तसे त्यावर कानातले असतात. तन्मणीची किंमत १४०० पासून १९०० च्या दरम्यान आहे. 

कानातल्यामध्ये १५० रुपयांपासून पुढे स्टोनचे टॉप्स उपलब्ध आहेत. तसेच अॅंटिक प्रकारातले कानही पाहायला मिळतात. हे कान आकाराने मोठे असतात. यामध्ये एलईडी स्टोन्स वापरल्याने ते हायलाइट होतात. याच्या किमती २५० रुपयांपासून पुढे आहेत. 

तसेच काही फॅन्सी लॉंग शॉर्ट नेकलेसही उपलब्ध आहेत. शॉर्ट नेकलेस हे ८०० रुपयांपासून पुढे आहेत, तर लॉंग नेकलेस १२०० रुपयांपासून पुढे आहेत. तसेच रोजगोल्डमध्येही काही फॅन्सी नेकलेस आहेत. यांचा जरासा पिंकीश कलर असतो. या नेकलेसच्या किमती १६०० ते १८०० रुपये दरम्यान आहेत. याबरोबरच वेगवेगळे हार, झुमके, ब्रेसलेट अशी सर्वच प्रकारच्या दागिन्यांची व्हरायटी इथे पाहायला मिळते.
     
आपल्याकडे टेंपल पॅटर्नमध्ये पारंपरिक दागिन्यांच्या अनेक डिझाईन्स उपलब्ध असून या ज्वेलरीला जास्त मागणी आहे. कारण हल्ली साउथ पॅटर्न साड्या जास्त वापरल्या जातात. या साड्यांवर ही ज्वेलरी शोभून दिसते. हे दागिने काळजी घेतली तर बरेच टिकतात, फक्त यांना गरम पाणी आणि बॉडी स्प्रेपासून लांब ठेवावे लागते. 
रूपाली धुमाळ, सोनचाफा

सध्या सोन्याचेही मार्केट थंड आहे. सोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे म्हणावी तशी विक्री होत नाही, ग्राहकवर्ग कमी झाला आहे. शिवाय नोटाबंदीचा परिणाम आजही जाणवत आहे, त्यातच चीन अमेरिका व्यापार युद्धाचाही फटका मार्केटला बसला आहे.
सचिन बहिवाळ, अष्टेकर ज्वेलर्स

बिंदीया ही १० ग्रॅममध्ये येत असून कलकत्ती वर्कला जास्त पसंती आहे. बाजूबंद हे साधारण २० ग्रॅमच्या पुढे येतात. यामध्ये प्लेन, कलकत्ती, टिकली हे प्रकार जास्त चालतात. कंबरपट्ट्यामध्ये प्लेन, साखळी आणि नक्षीकाम असलेले असे तीन प्रकार येत असून हा साधारण २० ग्रॅमच्या पुढे उपलब्ध आहेत.

(लेखात दिलेल्या किमतीत आणि वजनात बदल होऊ शकतो.)

संबंधित बातम्या