ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी 

ज्योती बागल
सोमवार, 23 मार्च 2020

गुढीपाडवा विशेष
सध्या तरुणींमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. घागरा चोली, लेगिन्स-कुर्ती, जीन्स-टॉप, फॅन्सी साडी असो की काठपदराच्या साड्या, पार्टीसाठी मॉडर्न लुकमध्ये तयार व्हायचे असेल किंवा एखाद्या लग्नासाठी साऊथ इंडियन स्टाईलची साडी नेसायची असेल, या सर्व प्रकारच्या मेकअपवर, ड्रेसवर कोणती ज्वेलरी सहज जात असेल, तर ती ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी!

प्युअर सिल्व्हरला ब्लॅक पॉलिश केल्यानंतर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तयार होते. या ज्वेलरीचा रंग थोडासा काळपट असल्याने ही ज्वेलरी बराच काळ टिकते. शिवाय त्याचा रंग आणि चमकही जात नाही. मुळात या ज्वेलरीला जास्त चमक नसतेच. त्यामुळे एक क्लासी लुक येतो, जो कोणत्याही फंक्शनमध्ये शोभून दिसतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये शॉर्ट आणि लॉंग नेकलेस, झुमके, लांब कानातले, कॉकटेल रिंग्स, पैंजण, मेकला, छल्ला, बँगल्स, चेन, माळा, नोज पिन्स, इअर पिन्स, पायातील कडे, बाजूबंद असे अनेक दागिने वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध असून यांना तरुणींमध्ये चांगली मागणीही आहे. ही सर्व ज्वेलरी हेवी आणि हलक्याफुलक्या अशा दोन्ही प्रकारांत मिळते. प्युअर सिल्व्हरपासून तयार केलेल्या ऑक्सिडाइज्डच्या ज्वेलरीची माहिती इथे बघूया.    

नेकलेसमध्ये शॉर्ट-लॉंग असे दोन्ही प्रकार येतात. ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी प्युअर सिल्व्हरपासून तयार केली असल्याने हे नेकलेस सेट रेडी पिसमध्येच बाजारात येतात. म्हणजेच त्यांची एमआरपी ठरलेली असते. यामध्ये रेग्युलर नेकलेस आणि अँटिक नेकलेस असतात. रेग्युलर नेकलेसला सिल्व्हर पॉलिश असते, तर अँटिक नेकलेसला ब्लॅक पॉलिश केलेले असते. या नेकलेसची प्युरीटी ९२.५ टक्के आहे. यामध्ये कुंदनवर्क सेटिंग जास्त पाहायला मिळते. प्लेन नेकलेसला ब्लॅक पॉलिश करता येत नाही, त्यासाठी नेकलेसवर डिझाईन असावे लागते. ऑक्सिडाइज्डच्या नेकलेसमध्ये टेंपल या प्रकारच्या पॅटर्नचे डिझाईनही बघायला मिळते.                 

ऑक्सिडाइज्डच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये तन्मणी, चिंचपेटीही मिळते. यामध्ये लॅपल कल्चर्ड नावाचे मोती, पाचूचे सेमी स्टोन वापरलेले दिसतात. यांच्या साधारण किमती ६५०० रुपयांच्या पुढे घेऊ तशा आहेत. याव्यतिरिक्त फॅन्सी माळाही पाहायला मिळतात. काही फॅन्सी माळा या थ्रेडमध्ये डिझाईन केल्या आहेत, तर काहींमध्ये रंगीत मोती, स्टोन्स आणि कुंदनवर्क केलेले दिसते. या माळा सेमी रेंजमध्ये उपलब्ध आहेत. थ्रेडवर्क असलेली फॅन्सी माळ रेड ब्लॅक रंगात उपलब्ध असून यांच्या किमती पाच हजारांच्या पुढे आहेत. 

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये सर्वांत जास्त पसंती असते ती कानातल्या अँटिक झुमक्यांना. हे झुमके हेवी आणि सिंपल अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती १५०० ते पाच हजारांच्या दरम्यान आहेत. यांचीही एमआरपी ठरलेली असते. तसेच पेंडंट आणि इअरिंग्जच्या फॅन्सी सेटमध्येही अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. यांच्या किमती साधारण दोन हजारांपासून पुढे आहेत. कानातले टॉप्स हे लहान मोठ्या दोन्ही स्वरूपात उपलब्ध असून मोठ्या टॉप्सना तुलनेने जास्त मागणी दिसते. यामध्येही वेगवेगळ्या स्टोन्सचा वापर केलेला पाहायला मिळतो. बांगड्यांमध्ये स्टोन आणि अँटिकच्या बांगड्या सेमी रेंजमध्ये उपलब्ध आहेत. स्टोनच्या बांगड्या तीन हजारांपासून पुढे घेऊ तशा आहेत. बांगड्यांव्यतिरिक्त अँटिकच्या कड्यांमध्येही काही डिझाईन्स आहेत. हे कडे साधारण आठ हजारापर्यंत येते. पुरुषांसाठीही ब्लॅक पॉलिशमध्ये कडे उपलब्ध असून त्यांच्या किमती चार हजारांपासून पुढे आहेत.ऑक्सिडाइज्डच्या पैंजणामध्ये हेवी आणि सिंगल चेनचे पैंजण उपलब्ध आहेत. यामध्ये कमी जास्त घुंगरांचे डिझाईन पाहायला मिळते. तसेच काहींमध्ये रंगीत खडेही वापरले आहेत. चमकणाऱ्या चांदीच्या पैंजणांपेक्षा हे पैजणही छान दिसतात. यामध्ये फक्त पॉलिशचा फरक असतो. यांच्या साधारण किमती दोन हजार ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच ३५ ग्रॅम ते १०० ग्रॅमच्या दरम्यान ते येतात. 

ऑक्सिडाइज्ड छल्ले हे ३० ग्रॅमपासून पुढे घेऊ तसे आहेत, मात्र छल्ल्यांमध्ये चांदीच्या छल्ल्यांना जास्त मागणी दिसते. बऱ्याचदा लग्नासाठी हेवी छल्ले घेतले जातात, तर भेट म्हणून देण्यासाठी सिंपल आणि कमी वजनाचे छल्ले घेतले जातात. 

ऑक्सिडाइज्ड मेकला १२० ग्रॅमपासून अगदी ५०० ग्रॅमपर्यंत मिळतो. मात्र मेकला, छल्ला यांना सीझननुसारच मागणी असते. इतर दागिने तर नेहमी वापरले जातात. नोज पिन तर ब्लॅक पॉलिशमध्ये मिळतेच, पण नाकातली पारंपरिक नथही ऑक्सिडाइज्डमध्ये मिळते. या नथीमध्ये वापरलेला गुलाबी स्टोनमुळे ती जास्त उठावदार दिसते. 

सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ट्रेंड तर बाराही महिने असतो, पण ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीबरोबर प्लॅटिनमचे दागिनेही ट्रेंडमध्ये आहेत. सोबर पण चकचकीत असे प्लॅटिनमचे दागिने सर्वांना आकर्षित करतात. यामध्ये हातातले कडे, ब्रेसलेट, बांगड्या, अंगठ्या, नेकपीस, अॅंकलेट असे दागिने पाहायला मिळतात. मात्र यामध्ये जास्त मागणी ही कपल अंगठ्या, अॅंकलेट, कानातले टॉप्स आणि ब्रेसलेटला दिसते. शिवाय हे दागिने जास्तकरून पार्टी वेअरवरती घातले जातात. सध्या प्री-वेडिंग फोटोशूट सर्रास केली जात असून त्यासाठी वनपीस ड्रेसवर खास असेच आकर्षक दागिने वापरले जात आहेत. शिवाय एंगेजमेंटसाठी प्लॅटिनमच्या कपल रिंग्जना चांगली डिमांड दिसते. मात्र प्लॅटिनमच्याही किमती जास्त असल्याने एका ठराविक वर्गातीलच ग्राहक ही ज्वेलरी घेताना दिसतात.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची काळजी घेण्यासाठी काही टिप्स : 

  • ही ज्वेलरी कापडामध्ये न ठेवता कापूस किंवा प्लॅस्टिकच्या कागदात ठेवावी.
  • प्युअर सिल्व्हरची ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेताना तिची क्वालिटी/प्युरीटी तपासून घ्यावी. तसेच वॉरंटी आणि गॅरंटीदेखील विचारून घ्यावी.
  • विशेषकरून इअरिंग्ज खरेदी करताना जास्त हेवी घेऊ नयेत, कानांना त्रास होऊ शकतो.
  • साधी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेताना त्यामध्ये कोणते मेटल वापरले आहे ते पाहावे, अन्यथा ॲलर्जी होण्याची शक्यता असते.
  • ऑनलाइन ज्वेलरी खरेदी करण्यासाठी ब्रँड विश्वसनीय असेल याची खात्री करावी. अशा वेळी त्या ब्रँडच्या वेबसाईटवर ज्वेलरी खरेदीसंबंधी ग्राहकांनी केलेल्या कॉमेंट्सचा उपयोग होऊ शकतो.

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला सध्या मार्केट आहे. मात्र, यांची रेंज थोडी जास्त असल्याने ठराविक ग्राहकच घेतात. यामध्ये सर्व प्रकारच्या कानातल्यांना जास्त मागणी आहे. त्यातही लांब आणि मोठ्या झुमक्यांना तरुणींची जास्त पसंती असते. हे दागिने वेलवेटच्या कापडामध्ये न ठेवता एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवावेत, म्हणजे खराब होत नाहीत. अशी थोडी काळजी घेतली, तर हे दागिने आहे तसे राहतात. 
निलेश जोरी, पीएनजी ज्वेलर्स

मला ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी प्रचंड आवडते. जास्तकरून वेगवेगळ्या प्रकारचे इअरिंग्ज जास्त आवडतात. यामध्ये अलीकडे बरीच व्हरायटीही बघायला मिळते.रोजच्या वापरासाठी आणि फंक्शनसाठी ही ज्वेलरी मस्त आहे. कॉटनच्या साडीवर तर अगदी उठून दिसते. मला जणू ब्लॅक पॉलिशचे कानातले जमवण्याचा छंदच आहे.  
सपना घाटगे

प्युअर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सोडून, सर्वांना परवडेल अशा दरातही ब्लॅक पॉलिशचे दागिने अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या किमतीतही बाजारात उपलब्ध आहेत. पुण्यात एफसी रोड, तुळशी बाग, पुणे कॅम्प, खडकी बाजार अशा ठिकाणी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सहज मिळते. यामध्ये जास्तकरून शॉर्ट-लॉंग नेकलेस आणि लॉंग इअररिंग्जला कॉलेज तरुणी जास्त पसंती देतात. नेकलेसमध्ये एक-दोन-तीन लेअरचे नेकलेस आहेत. यामध्ये लाल, हिरवा, पिवळा आणि ब्लॅक असे मॅट कलरचे स्टोन्स जास्त वापरलेले दिसतात. तसेच सध्या नोज पिन्सचाही ट्रेंड पाहायला मिळतो आहे. थोड्या मोठ्या आकारातल्या नोज पिन्स जास्त चालतात. या नोज पिन्स प्रेसिंगच्या असल्याने कोणालाही सहज वापरता येतात. तसेच ब्रेसलेटपेक्षा हातातल्या जाड कड्यांची तरुणींमध्ये जास्त क्रेझ पाहायला मिळते. काही लटकन असणाऱ्या बंगड्याही बघायला मिळतात. ब्लॅक पॉलिशच्या अंगठ्याही खूप चालतात. यांचा आकार आणि त्यावर केलेले डिझाईन नेहमीच्या आकारापेक्षा मोठे असते, पण वजन मात्र कमी असते. हातात बांगडी न घालता फक्त अंगठी घातली आणि नखांना नेलपेंट लावले, तरी छान लुक येतो. तसेच पाचही बोटांमध्ये घलण्यासाठीही अंगठ्याचा सेट येतो, यात एकसारख्या किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या असतात. या प्रकारची ज्वेलरी रोज न घालता, एखाद्या फंक्शनच्यावेळी जास्त शोभून दिसते. या दागिन्यांमध्ये जास्तकरून हलक्याफुलक्या दागिन्यांना प्राधान्य दिले, तर कोणीही हे दागिने सहज कॅरी करू शकते. तरुणींना रोज कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना ही ज्वेलरी सहज वापरता येते. 

(लेखात दिलेल्या किमतीत आणि वजनात बदल होऊ शकतो.)

संबंधित बातम्या