संगणकीय बुिद्धमत्ता

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 11 मार्च 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

कमालीचा विकसित मेंदू असलेला मानव हा पृथ्वीतलावरील सर्वात विकसित प्राणी समजला जातो. मानवाच्या उत्पत्तीपासून मेंदूच्या बुद्धिमत्तेद्वारे त्याने अनेक अकल्पनीय गोष्टी साध्य केल्या आहेत. त्याने भाषा विकसित केल्या आणि एका मेंदूतील विचार दुसरीकडे पोचू लागले. लिखाणाच्या लिपीचे असंख्य पर्याय शोधले आणि सर्व गोष्टींचे दस्तऐवज जमा होऊ लागले. कागदाचा शोध लागला आणि मनातले विचार पुस्तकबद्ध झाले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात विज्ञानाने जीवनातील घटनांचे विश्‍लेषण केले, मानवी अडचणी दूर करणारी साधने शोधली, असंख्य दुर्धर प्रश्नांची उत्तरे शोधली. वैद्यकीय शास्त्राने मानवाच्या शरीरातील रचनेची, कार्याची जीवन-मरणाच्या यात्रेतील अनेक पैलूंची शोधमीमांसा केली. त्यामधून असाध्य वाटणाऱ्या विविध आजारांचे आणि विकारांचे उपचार अस्तित्वात आणले. 

मानवानेच मानवी बुद्धीच्या कार्याचे अनुकरण करणारा संगणक निर्माण केला आणि बुद्धीच्या कार्यकारणभावाचा पाठलाग करत संगणकाच्या अनेकविध प्रणाली अस्तित्वात आणल्या आणि होता, करता एके दिवशी मानवी बुद्धीवरही मात करेल अशी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजेच ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (ए.आय.) अद्‌भुत पर्याय अतित्वात आणला.

मानवाच्या सर्व बुद्धिमत्तेचे सार, त्याच्या विचारांचे जंजाळ आणि त्याच्या कौशल्याचा परिपाक एकत्रितरीत्या संगणकीय प्रणालीद्वारे एखाद्या यंत्राकडून घडवून आणणे म्हणजे संगणकीय बुद्धिमत्ता. 

बरोबर तीन वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी २०१६ रोजी हाँगकाँग येथील ‘हॅन्स रोबोटिक्‍स’ या कंपनीने तयार केलेल्या सोफिया या यंत्रमानवाला सौदी अरेबियाचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. सोफिया समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखू शकते, स्वतः निर्णय घेऊ शकते आणि कोणाबरोबरही सर्वसामान्यपणे गप्पा मारू शकते. तिला फीड केलेली वाक्‍यच ती केवळ बोलत नाही, तर एखाद्या खऱ्याखुऱ्या माणसाप्रमाणे प्रसंगानुरूप विचार करून ती आपल्या भावना आणि विचार व्यक्त करते.

संगणकीय बुद्धिमत्तेद्वारे

 •     विचारपूर्वक मुद्देसूद बोलणे
 •     कोणत्याही शैक्षणिक मुद्द्याचे आकलन करून घेणे
 •     एखाद्या गोष्टीचे, घटनेचे, कार्याचे नियोजन करणे
 •     समोर उद्‌भवणारे प्रश्न आणि अडचणी सोडवणे अशी बौद्धिकदृष्ट्या उच्च पातळीची कामे करता येतात. 
 •     यासाठी त्या संगणक प्रणालीमध्ये खालील गुणांचा अंतर्भाव केला जातो.
 •     ज्ञान संकलित करणे
 •     एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा शोधणे
 •     साध्या आणि जटिल प्रश्नांची उकल करणे
 •     आकलन करणे
 •     नवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करणे
 •     नियोजन करणे
 •     माहितीवर आधारित योग्य निर्णय घेणे
 •     ऐनवेळी उभ्या ठाकणाऱ्या गोष्टींप्रमाणे वागण्या-बोलण्यात आणि नियोजनात योग्य बदल करणे 

आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा एखादी समस्या निर्माण होते, त्यावेळेस त्या समस्येचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर आपण विचार करतो. काही उपायांचा विचार करतो. माहिती-संदर्भाच्या आधारे ते ताडून पाहतो आणि अखेर समस्येवर एखादा तोडगा काढतो. अगदी याच पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (ए.आय.) संगणक प्रणाली काम करते. 

ए.आय.ची निर्मिती करताना अनेक प्रकारचे कार्यकारणभाव जोडणारे हजारो अल्गॉरिदम्स संशोधक तयार करतात. आजमितीला सीसीटीव्ही कॅमेरा, इमेज प्रोसेसिंग, वाहने, घरगुती कामे, क्‍लिनिंग, स्मार्ट होम्स यात तर कृत्रिम बुद्धीचा (ए.आय.) वापर होतोच आहे. पण आज ए.आय.ची व्याप्ती केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषा, मनोरंजन अशा कित्येक विषयांच्या क्षितिजांचा कल्पनातीत विस्तार होऊ घातला आहे. वैद्यकीय क्षेत्रात याच्या वापराने एक नवी क्रांती होण्याची शक्‍यता आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील वापर
रुग्णाच्या शारीरिक तक्रारींची नोंद करण्यापासून त्याच्या आजारांचे निदान आणि उपचार करण्यापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक प्रकारची यंत्र सामुग्री वापरली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे यंत्रे वापरण्यात आणि यंत्राद्वारे प्रशिक्षण घेण्यात आमूलाग्र बदल होऊ पाहत आहेत. त्यामुळे रुग्ण, डॉक्‍टर्स, रुग्णालये, विमा प्रक्रिया या साऱ्यात अगणित पद्धतीचे लक्षणीय बदल अपेक्षित आहेत.

मेडिकल रेकॉर्ड्‌स : डॉक्‍टरांकडे येणाऱ्या रुग्णाच्या शारीरिक तक्रारी, त्याची त्या पूर्वीची वैद्यकीय पार्श्वभूमी, त्या आजारासंबंधी त्याचा कौटुंबिक इतिहास, ही सर्व माहिती वैद्यकीय निदानात आणि संशोधनात महत्त्वाची ठरते. ए.आय.द्वारे ही माहिती गोळा करणे, तिचे संकलन करणे, त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे एकत्रीकरण करून त्याचे महत्त्व जाणून घेणे, या सर्व माहितीचे परिशीलन करणे ही कामे कमालीच्या वेगाने आणि अचूकरीत्या केली जातात.

निदानपद्धतीचे संयोजन आणि निर्णय : रक्त चाचण्या, एक्‍सरे, स्कॅन, ॲन्जिओग्राफी, एन्डोस्कोपी अशा अनेक तपासण्या झाल्यावर डॉक्‍टरांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने रुग्णाचे निदान केले जाते. यामध्ये थोडाफार वेळ जाणे अपेक्षित असते. मात्र नजीकच्या भविष्यात ए.आय.चा वापर करून रुग्णाचे निदान अत्यंत तातडीने करण्यात डॉक्‍टरांना याचा उपयोग होईल.  

उपचारांचे नियोजन : रुग्णाच्या फाईलमधील रिपोर्टस, डॉक्‍टरांच्या नोंदी, संशोधनात्मक नवीन गोष्टी यांचा अचूक वापर करून रुग्णाला कुठले उपचार, कसे आणि किती काळ करावेत? कोणत्या पद्धतीने त्याला लवकर बरे वाटू शकेल? याबाबतच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली आज विकसित होत आहेत.

रोबॉटिक शस्त्रक्रिया : रोबॉटिक शस्त्रक्रियांमध्ये आजही ए.आय.कार्यप्रणाली वापरली जात आहे. त्यामुळे भविष्यात अधिक प्रकारच्या लहान-मोठ्या शस्त्रक्रिया जास्तीत जास्त अचूकपणे केल्या जातील. कदाचित प्रत्येक शस्त्रक्रिया ए.आय.च्या साह्यानेच केली जाईल.

डिजिटल कन्सल्टेशन : आजमितीला ब्रिटनमध्ये ‘बॅबिलॉन’ नावाचे एक ॲप विकसित केले गेले आहे. यामध्ये रुग्णाने आपल्या आजाराची माहिती सांगायची असते. त्याच्या लक्षणांना अनुसरून रुग्णाने पुढे काय तपासण्या करायच्या, कोणती औषधे घ्यायची याचा सल्ला ए.आय.मार्फत हे ॲप देते. यापुढील काळात यापेक्षाही विकसित तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या कन्सल्टन्ट डॉक्‍टरप्रमाणे रुग्णाच्या लक्षणांद्वारे निदान आणि उपचारांचा सल्ला मिळू शकेल.

आभासी शुश्रुषा : डॉक्‍टरांनी रुग्णाला पाहून गेल्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, रुग्णाच्या शुश्रुषेचे नियोजन करणे, त्याच्या तब्येतीत होणाऱ्या बदलांची नोंद करून त्या डॉक्‍टरांना दाखवणे यासाठी डिजिटल नर्सिंग वापरले जाते. २०१६ मध्ये बॉस्टन हॉस्पिटलच्या बालरोग विभागातर्फे ॲमॅझॉन ‘अलेक्‍सा’ नामक एक ॲप विकसित केले गेले. तसेच ‘सेन्स.एलवाय’ याद्वारे ‘मॉलि’ ही एक डिजिटल नर्स निर्माण केली गेली. यामध्ये एका आभासी पारिचारिकेद्वारे रुग्णाची शुश्रुषा केली जाते. भविष्यात ही कल्पना अनेक रुग्णालयात, घरगुती शुश्रूषेत अधिकाधिकरित्या वापरली जाऊ शकेल.

नवीन औषधाचे संशोधन : एखाद्या अगदी नवीन आजाराची साथ आली, तर ती आटोक्‍यात आणण्यासाठी नवीन औषधांचा आणि उपचारांचा एक दंडक (प्रोटोकॉल) बनवायला लागतो. यासाठी रुग्णांची लक्षणे आणि त्यांना लागणाऱ्या औषधांचे विश्‍लेषण करावे लागते. मानवी बुद्धीने यामध्ये काही महिने किंवा एखाद-दोन वर्षे लागू शकतात. अशावेळेस ए.आय.च्या माध्यमातून याबाबत शीघ्र निर्णय दिला जाऊ शकतो. गेल्या काही काळात ‘इबोला’ विषाणूमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून त्यावरील औषध एका दिवसात विकसित केले गेले आणि त्यावरील उपचार सोपे आणि सुटसुटीत केले गेले.

जनुकीय आजारांचे निदान : मानवी शरीरातील जनुकांचे आणि त्यांच्या रचनेच्या शास्त्रांना ‘जिनेटिक्‍स’ आणि ‘जिनोमिक्‍स’ म्हणतात. यामध्ये जनुकीय रचनेत होणाऱ्या बदलांमुळे उद्‌्भवणारे आजार, जन्मजात आजार आणि आनुवंशिक आजारांचे निदान आणि उपचार केले जातात. ए.आय.द्वारे शरीराचे विविध स्कॅन्स करून बालकांमध्ये अशाप्रकारच्या जनुकीय आजारातील  कर्करोग आणि रक्तवाहिन्यांच्या विकृतींचे निदान, बाळांचा जन्म झाल्यावरच करणे शक्‍य होईल. 

औषधे घेण्यावर नियंत्रण : अनेक महत्त्वाच्या आजारांमध्ये तसेच क्‍लिनिकल ट्रायलमध्ये रुग्णांनी त्यांना दिलेली औषधे नियमितपणे आणि दीर्घकाळ घेणे जरुरीचे असते. त्यासाठी त्यांच्या औषधे घेण्यावर नियंत्रण करणारी संगणकप्रणाली विकसित होत आहेत. सध्या ‘एआयक्‍युअर’ नावाच्या एका ॲपमध्ये जे रुग्ण औषधे घेणे टाळतात किंवा अधूनमधून औषधांचे डोस विसरतात, त्यांना औषधे घ्यायला आठवण करणे आणि त्यांनी प्रत्यक्षात घेतलेल्या आणि विसरलेल्या औषधांच्या नोंदी करण्याचे कार्य केले जाते. भविष्यात डॉक्‍टरांना रुग्ण पुन्हा तपासणीसाठी आला, की त्याने औषधे किती वेळेवर घेतली हे त्याला न विचारता समजू शकेल. त्यामुळे त्याच्या आजारातील उतार-चढाव लक्षात येतील.

आरोग्याची देखरेख : सतत वर खाली होणारा रक्तदाब, छातीत अधून मधून होणारी धडधड, हृदयाचे ठोके अनियमित पडणे अशा त्रासांमध्ये त्या व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्‍यांची, रक्तदाबाची सातत्याने देखरेख करावी लागते. आज अशी काही ‘वेअरेबल ॲप्स’ प्रचलित आहेत. त्यायोगे हे काम केले जाते. भविष्यात अशी माहिती या ॲप्सद्वारे गोळा करून त्या व्यक्तीच्या आजाराचे निदान आणि पर्यायी उपचार सुचवले जातील.

आरोग्यव्यवस्थेची देखभाल  : ए.आय.चे मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे योगदान ठरावे. आज जगभरात आणि भारतातदेखील असंख्य आजारांच्या साथी येतात. या रुग्णांच्या नोंदी करून त्यांचा प्रादुर्भाव कोणत्या भागात आहे, या आजाराची लक्षणे प्रामुख्याने कोणती आहेत, त्या लक्षणात काही बदल झालेत का? कोणत्या औषधांनी त्या रुग्णांना बरे वाटते? रुग्णांना इस्पितळात केव्हा दाखल करावे? रुग्ण दगावण्याची करणे कोणती? अशा असंख्य गोष्टींच्या माहितीचे संकलन, विश्‍लेषण आणि त्यातून मिळणारे निर्णय कृत्रिम बुद्धीने सजलेल्या संगणक प्रणाली क्षणार्धात देऊ शकतील. साथीच्या आजारांप्रमाणेच मधुमेह, हृदयविकार, अनेमिया, संधिवात, स्थूलत्व, कुपोषण, अनेक प्रकारचे कर्करोग असे असंख्य बिगर साथीचे आजार (नॉन कम्युनिकेबल डिसिजेस) मोठ्या प्रमाणात आढळून येतायत. त्यांच्या माहितीचे संकलन आणि विश्‍लेषण सहजसाध्य होईल.

आजमितीला भारतात या दोन्ही प्रकारच्या आजारांची माहिती खूप कमी प्रमाणात संकलित होते. गुगलचा ‘डीप माइंडेड हेल्थ प्लॅटफॉर्म’ आणि आयबीएमचा ‘वॉटसन’ यांच्या सहयोगाने हे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे. खाजगी क्षेत्रात २०२० पर्यंत यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक नियोजन चालू आहे. भारतात डॉक्‍टरांची आणि इस्पितळांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे याप्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून भारतीय आरोग्यव्यवस्था एक वेगळे सर्वव्यापी वळण घेऊ शकेल. 

संबंधित बातम्या