सिझेरियन : समज, गैरसमज 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 18 मार्च 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

केवळ आर्थिक फायदा व्हावा म्हणून अकारण सिझेरियन शस्त्रक्रिया करून डॉक्‍टर्स पेशंटला लुटतात, असा अपप्रचार गेले कित्येक काळ सुरू आहे. पण सिझेरियन म्हणजे काय असते? कोणत्या परिस्थितीत ते करावे लागते? आजमितीला सिझेरियनचे प्रमाण वाढण्याची नक्की काय कारणे आहेत? याची माहिती न घेता असे बिनबुडाचे आरोप सर्रास केले जातात. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती कशी असते आणि सिझेरियन करण्याचा निर्णय का आणि केव्हा घेतला जातो, याची प्राथमिक माहिती असणे आवश्‍यक ठरते.

नैसर्गिक प्रसूती
नैसर्गिक प्रसूती टप्प्याटप्प्याने होणारी क्रिया असते. चाळीस आठवड्याहून अधिक गर्भकाल असल्यास वैद्यकीय देखरेखीखाली प्रसूती करावी लागते. अन्यथा आई आणि तिच्या पोटातील बाळ या दोहोंच्या जिवाला धोका संभवतो. भारतीय मानकाप्रमाणे ३८ व्या आठवड्यातील प्रसूती सामान्य आणि नैसर्गिक समजली जाते.

पहिला टप्पा 
यात गर्भाशयाच्या आकुंचन पावण्याने गर्भाशयमुखाची रुंदी कमी होऊन दहा सेंटीमीटरपर्यंत उघडते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे बाळाभोवतीचे वारेचे आवरण फाटते आणि द्रवपदार्थ योनीमधून बाहेर येतो. गर्भाशयमुखावरील प्रकारचे चिकट स्त्राव असलेली घट्ट गोळी (म्युकस प्लग) निघून जाते. यामध्ये थोडासा रक्तासारखा द्रावसुद्धा दिसून येतो. याला ‘शो’ असे म्हणतात. बाळाभोवती असलेल्या वारेमधील द्रवामध्ये असलेल्या अर्भकाचे डोके शरीराच्या मानाने अधिक वजनाचे असते. त्यामुळे सामान्यपणे बाळाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. या कारणाने मुलाचा जन्म होताना आधी डोके गर्भाशय आणि योनीतून बाहेर येते.

दुसरा टप्पा
यात गर्भाशयाच्या कळा तीव्रतेने येतात. गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने आणि गर्भाशयमुखाच्या विस्तृत होण्याने मातेच्या कंबरेत आणि ओटीपोटात असह्य वेदना होतात. वेदना संवेदनांमुळे ‘ऑक्‍सिटॉसिन’ संप्रेरक स्त्रवू लागते. ऑक्‍सिटॉसिनच्या परिणामाने गर्भाशय आणि गर्भाशयमुख अधिक आकुंचन पावते. यास पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतात. जोपर्यंत गर्भाशय पूर्णपणे आकुंचन पावून अर्भकाचा जन्म होत नाही, तोपर्यंत ऑक्‍सिटॉसिनचे स्त्रवणे आणि गर्भाशयाचे आकुंचन पावणे हे चालूच राहते. मातेला प्रसूतीच्या वेळेस होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे शेवटी प्रतिक्षेपी क्रियेमुळे पोटाचे आणि श्रोणिगुहेचे स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात आणि अर्भक योनीबाहेर येते. दर दहापैकी नऊ बाळंतपणात बाळाचे डोके आधी बाहेर येते. 

तिसरा टप्पा 
यात आवरण, नाळ आणि वार गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने गर्भाशयाबाहेर येतात. यानंतरदेखील गर्भाशय आकुंचन पावत राहते. त्यामुळे नाळ गर्भाशय भित्तिकेपासून वेगळी होते. या प्रसंगी गर्भाशय भित्तिका आणि अपरेमधील रक्त पोकळ्या उघडतात आणि रक्तस्राव होतो. एका प्रसूतीच्या वेळी सुमारे १५० ते २०० मिलिलिटर रक्तस्राव होतो. मूल जन्मल्यानंतर नाळ आणि वार गर्भाशयाबाहेर येण्यास साधारणतः पाच-दहा मिनिटांचा वेळ लागतो.

चौथा टप्पा 
हा प्रसूतीनंतरचा टप्पा असतो. नाळ आणि वार बाहेर आल्यानंतर या टप्प्याचा काळ साधारणतः एक ते चार तासांचा असतो. या काळात गर्भाशयातील नाळ गर्भाशयापासून सुटल्याने उघड्या झालेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तस्राव थांबतो. 

प्रसूतीमध्ये घ्यावयाची काळजी 
प्रसूती होताना माता आणि अर्भकाची अनेक प्रकारे काळजी घेत अनेक निर्णय त्वरित घ्यावे लागतात. मातेची सुरक्षितता, मातेचे आरोग्य, अर्भकाची सुरक्षितता, अर्भकाची जन्म घेण्यावेळीची स्थिती, प्रसूतिमधील टप्पा तसेच माता आणि अर्भकाचा प्रतिसाद यांना अपरंपार महत्त्व असते. प्रसूतीच्या वेळी माता आणि अर्भकाच्या हृदयाचे ठोके, मातेचा रक्तदाब व अर्भकाच्या टाळूवरील दाब यांचे सतत परीक्षण करावे लागते. प्रसव काळात कळा येण्यासाठी पिटोसिन (ऑक्‍सिटॉसिन) देण्याचा निर्णय योग्य वेळी मातेच्या क्षमतेनुसार घेतला जातो. सुलभ प्रसूतीसाठी योनिमुख आणि गुदद्वारामध्ये उभा छेद (एपिझियाटॉमी) घेण्याने प्रसूती लवकर होते. ही जखम कालांतराने बरी होते.

सिझेरियनचा निर्णय
नैसर्गिकरीत्या प्रसूती होणे अशक्‍य असते किंवा आई अथवा मुलाच्या जिवालाच धोका निर्माण होण्याची शक्‍यता असते, अशाच परिस्थितीत ‘सिझेरियन सेक्‍शन’ केले जाते. एखादी गर्भवती सुरळीत प्रसूतीच्या सीमारेषेवर असेल अथवा किंचित अवघड प्रसूतीची शक्‍यता असेल, तर एकदम शस्त्रक्रिया न करता प्रथम प्रयोगादाखल कृत्रिमरीत्या कळा आणवून पाहिले जाते. अशावेळी अनेकदा नैसर्गिक पद्धतीनेच प्रसूती घडून येते. याशिवाय  चिमट्यांचा वापर करून शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कळा जोरात येऊनही मूल व्यवस्थितपणे बाहेर येत नसेल, तसेच मुलाला किंवा मातेला दुखापत होण्याचा संभव असेल, अशावेळी कृत्रिम कळा आणताना होणाऱ्या प्रसूतीमधील जंतुसंसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रसूतीमार्गाची शक्‍य तेवढी कमी पण वारंवार तपासणी करावी लागते आणि एकदा पाणवट फुटल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही त्वरित घ्यावा लागतो.

सिझेरियनची वैद्यकीय कारणे

  • रेंगाळलेली प्रसूती : गर्भाशयाच्या आकुंचानाची क्रिया व्यवस्थित होत असूनही गर्भाशयमुख प्रसरण पावत नसेल, तर त्याला ‘स्टॉल्ड लेबर’ किंवा रेंगाळलेली प्रसूती म्हणतात. यात बाळाचे डोके गर्भाशयाच्या बाह्य मार्गात थांबते. त्याला मिळणारा प्राणवायू कमी होऊन जिवाला धोका संभवतो. अशा वेळेस सिझेरियनचा निर्णय घेऊन बाळाचे प्राण वाचवले जातात.
  • बाळाची स्थिती : सर्वसाधारणपणे बाळाचे डोके आधी बाहेर येते. पण प्रसूतीच्या वेळी बाळ आडवे असल्यास (ट्रान्सव्हर्स लाय) किंवा बाळ पायाळू असल्यास म्हणजे डोक्‍याऐवजी बाळाचे ढुंगण खाली असल्यास (ब्रीच प्रेझेन्टेशन) नैसर्गिक प्रसूती होणे अशक्‍य असते. कारण बाळाचा जन्म होण्यासाठी असलेला गर्भाशयाचा मार्ग त्यापेक्षा रुंदीने छोटा असतो. सबब सिझेरियनला पर्याय नसतो.
  • जुळी अथवा अधिक बाळे : मातेच्या गर्भात जुळे किंवा एकापेक्षा अधिक बाळे असतील तर सिझेरियन करावे लागते. यात अनेकदा एखादे बाळ ब्रीच प्रेझेन्टेशनचे असण्याची शक्‍यता जास्त असते.
  • प्लासेन्टा प्रीव्हिया : गर्भाशयात बाळाची वार नेहमी बाळाच्या मागील किंवा वरील बाजूस असते. काही मातांमध्ये ही वार गर्भाशयाच्या मुखाशी असते आणि बाळ त्याच्या मागे किंवा वर असते. अशावेळेस प्रसूती दरम्यान कमालीचा रक्तस्राव होऊन प्रसूतीत धोका होऊ शकतो. त्यामुळे सिझेरियन करणे अगत्याचे ठरते.
  • नाळ बाहेर पडणे : आईच्या गर्भाशयात असताना बाळाला नाळेद्वारे पोषण मिळत असते. ही नाळ एका बाजूला वारेला जोडलेली असते, तर दुसऱ्या बाजूला बाळाच्या पोटाला. प्रसूतीच्या वेळी कधीकधी ही नाळ गर्भाशयाच्या मुखातून निसटून आधीच बाहेर पडते. याला ‘कॉर्ड प्रोलॅप्स’ म्हणतात. अशावेळी ही नाळ गर्भाशयाच्या आकुंचनात सापडून दाबून जाते आणि बाळाला मिळणारे पोषण आणि प्राणवायू बंद होऊ शकतात. या प्रसंगी सिझेरियन शिवाय गत्यंतर नसते.
  • मातेचे आजार : गर्भवती स्त्रीला जर उच्च रक्तदाब, हृदयविकार, दमा, गर्भावस्थेतील मधुमेह (जेस्टेशनल डायबेटिस), प्रसूतीदरम्यान अपस्माराचे झटके येण्याचा आजार (एक्‍लाम्प्शिया ऑफ प्रेग्नन्सी) असेल तर प्रसूतीच्या कळा आणि तीव्र वेदना यांच्यामुळे तिच्या जिवाला धोका उद्‌भवू शकतो. त्यामुळे मातेला आधीच सांगून तिचे सिझेरियन केले जाते. काही स्त्रियांना एचआयव्ही, लैंगिक अवयवांची नागीण (जनायटल हर्पीस) असे आजार असतील तर योनिमार्गातून होणाऱ्या नैसर्गिक प्रसूती दरम्यान या आजारांचा अर्भकांना संसर्ग होण्याची शक्‍यता असते. यासाठी सिझेरियनचा निर्णय घेतला जातो. 
  • प्रसूतीस अडथळा : मातेच्या गर्भाशयात मोठ्या गाठी असतील (फायब्रॉइड) किंवा तिच्या कंबरेच्या हाडाला फ्रॅक्‍चर होऊन ते सरकलेले असेल, बाळाचे डोके गर्भाशयाच्या बाह्यमार्गापेक्षा खूप मोठे असेल (सिफॅलो पेल्व्हिक डिसप्रपोर्शन), बाळाला डोके मोठे असण्याचा जन्मजात विकार असेल (हायड्रोकेफॅलस) तर शस्त्रक्रिया करून प्रसूती करणे भाग असते.
  • आधीचे सिझेरियन : जर एखाद्या गर्भवतीचे आधीचे बाळंतपण सिझेरियनने झाले असेल तर दुसऱ्या खेपेस पोटावरील ताण वाढल्यास तिला गंभीर त्रास होण्याची शक्‍यता असते. कित्येकदा नातेवाइकांच्या आणि मातेच्या इच्छेने पहिले सिझेरियन असताना दुसरे बाळंतपण नैसर्गिकरीत्या करताना गर्भाशय ताणले जाऊन फाटते (युटेराईन रप्चर) आणि लगेच घाईने सिझेरियन करणे हाच इलाज उरतो. 
  • नैसर्गिक प्रसूतीचे अपयश : कित्येकदा नैसर्गिकरीत्या प्रसूती होताना मातेला जखमा होतात, चिमटा लावताना किंवा व्हेन्ट्युज वापरल्यावर त्रास होतो आणि बाळाचे ठोके मंदावू लागतात. अशावेळेस तातडीने सिझेरियन करावे लागते.
  • बाळाने पोटात शी करणे : सर्वसामान्यपणे बाळ आईच्या पोटात शू करत असते व गर्भजल पीत पण असते. गर्भजल जंतुविरहीत असल्याने यात धोका नसतो. मात्र कळा सुरू झाल्यावर कळांच्या दबावामुळे बाळाला प्राणवायू कमी पडल्यास बाळ शी करते. हे शी केलेले गर्भजल बाळाच्या एकवेळ पोटात गेले तर फार मोठी समस्या नसते, पण बऱ्याचदा बाळ हे गर्भजल श्वसनमार्गात ओढून घेते. मग मात्र फारच बिकट समस्या उभी राहते. (मेकोनियम अस्पिरेशन) अशी बाळे जन्माला येताना श्वास नीट घेऊ शकत नाहीत. शी केलेले गर्भजल त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन दाह निर्माण करते. अशी बाळे लगेच नवजात अतिदक्षता केंद्रात दाखल करावी लागतात आणि हा आजार बाळाचे प्राण घेऊ शकतो. वरील कारणांनी १५ ते २० टक्के स्त्रियांमध्ये सिझेरियन करणे भाग पडते. पण आजच्या घटकेला हे प्रमाण यापेक्षाही जास्त आढळते. याचे कारण डॉक्‍टरांची सिझेरियन करण्याची इच्छा नसून त्याची काही वेगळी कारणे आहेत.  

सिझेरियन वाढण्याची कारणे
रुग्णांचा आग्रह : आजच्या जीवनशैलीत बाळंतपणाच्या कळा सोसण्याची कल्पनाच अनेक गर्भवती स्त्रियांना मंजूर नसते. त्यांच्याकडून सिझेरियनचा आग्रह धरला जातो.
गर्भवतीचे वय : आजच्या जगात तिशीनंतर गर्भवती होणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. या वयातल्या मातांची बाळंतपणे ही तशी रिस्की मानली जातात. त्यामुळे सिझेरियन वाढली आहेत. 
स्थूलपणा : आधुनिक जीवनशैलीमुळे आज तरुण मुलींमध्ये स्थूलपणाचे प्रमाण वाढले आहे. अशा मातांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विकारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. हे एक महत्त्वाचे कारण या शस्त्रक्रिया वाढण्यामागे आहे.
वंध्यत्वाचे वाढते प्रमाण : उशिरा लग्न, पस्तीस वर्षानंतर गर्भधारणेचा निर्णय घेतल्यावर अनेक स्त्रियात वंध्यत्वाची समस्या उद्‌भवते. त्यामुळे टेस्टट्यूब बेबीसारखे उपचार करावे लागतात. हेसुद्धा सिझेरियनच्या वाढत्या प्रमाणाचे कारण आहे. 

सरकारी आणि खासगी रुग्णालये
सिझेरियनचे प्रमाण खासगी रुग्णालयात जास्त असते आणि सरकारी रुग्णालयात कमी असते, असे सांगितले जाते. मात्र, याचे कारण गरोदरपणात गुंतागुंत झाल्यास किंवा वंध्यत्वाच्या, टेस्ट ट्यूबबेबीच्या उपचारांची सरकारी रुग्णालयात सोय नसते, त्यामुळे रुग्ण खासगी प्रसूतीगृहातच उपचार घेतात. याशिवाय उच्चउत्पन्न गट, उच्च मध्यमवर्ग, नवश्रीमंत कुटुंबे प्रसूती आणि इतर उपचार खाजगी रुग्णालयात घेणेच पसंत करतात.    

संबंधित बातम्या