...या लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 25 मार्च 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ अशी एक म्हण पूर्वी प्रचलित होती. कोर्ट ..कर्जे वर्षानुवर्षे चालू राहतात. भरपूर मानसिक त्रास आणि खर्च होतो; पण हवा तो न्याय मात्र मिळत नाही. याला अनुषंगून तसे म्हटले जायचे. या म्हणीबरोबरच, ‘आयुष्यात मी कसलाही दवाखाना म्हणून पाहिला नाही’ किंवा ‘पाच पैशाचे औषधही मला कधी लागले नाही’, अशा फुशारक्‍यादेखील मागच्या दोन-चार पिढ्यांत मारल्या जायच्या. आपण आजारी पडलो नाही, म्हणजे आपण आरोग्यसंपन्न आहोत, असे समजले जाण्याचा तो काळ होता. 

वैद्यकीय शास्त्रातल्या प्रगतीमुळे मात्र आजच्या जमान्यात नवनवीन आजारांचे, त्यांच्यावरील उपचारांचे शोध लागले. त्या आजारांच्या प्रतिबंधक उपायांची जशी जाणीव विकसित झाली, तशीच वेळेत निदान झाल्यास कितीही गंभीर आजार असला, तरी त्यातून निभावून जाण्याची शक्‍यताही वाढली. या साऱ्यांमुळे मानवाचे आयुर्मानही वाढत गेले.

अनेक प्रकारचे मोठमोठे आजार प्रकट होण्यापूर्वी त्यांच्या आगमनाची पूर्वसूचना देत असतात. मात्र आजार अंगावर काढण्याची सवय असलेल्या व्यक्ती आजाराच्या या वर्दीकडे डोळेझाक करतात आणि नंतर तो पूर्ण स्वरूपात प्रगट झाला, की स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतात. सहाजिकच प्राणांतिक गंभीर स्वरूपाच्या या आजारात रुग्णांना शारीरिक त्रासही होतात. उपचारांचा खर्चही खूप वाढतो आणि बऱ्याचदा पदरी निराशा येते.

महत्त्वाची लक्षणे 
सर्दी, खोकला, इकडे दुखते, तिकडे दुखते अशा क्षुल्लक कारणांसाठी लोक दवाखान्यात गर्दी करतात. औषधांची गरजही नसणाऱ्या, आपोपाप बऱ्या होणाऱ्या लक्षणांबाबत चिंताक्रांत होऊन अनेक जण शेकडो तपासण्या स्वतःहून करतात. पण कित्येकदा वरवर किरकोळ वाटणाऱ्या आणि नंतर तीव्र आणि धोकादायक स्वरूप धारण करणाऱ्या काही लक्षणांचा पाठपुरावा करण्याकडे सोईस्करपणे पाठ फिरवतात. कारण, ही लक्षणे अंगावर काढू नयेत. त्यांच्याकडे दुर्लक्षही करू नये. योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांच्या निदानांचा छडा लावला, तर अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते. साहजिकच अशा लक्षणांचा विचार करणे गरजेचे ठरते.

 •  छातीत दुखणे : अनेकदा छातीचे स्नायू आखडणे, बरगड्यांचे जोड दुखणे (कॉस्टोकॉण्ड्रॉयटिस), ॲसिडिटीमुळे छातीत जळजळणे, गॅसेस होणे यामुळे छातीत दुखते. पण बऱ्याचदा हृदयविकाराच्या झटक्‍याचे ते महत्त्वाचे लक्षण असू शकते. अशावेळेस या दुखण्याबरोबर खूप घाम येणे, दम लागणे, चक्कर येणे असे त्रासही होऊ शकतात. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत होतीलच असे नाही. त्यामुळे छातीत दुखत असेल, तर किती वाजले आहेत, आपण कुठे आहोत, आपण काही काम करतोय याचा विचार न करता जिथे आयसीयू असेल अशा रुग्णालयात त्वरित जाऊन तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासून घ्यावे. अनेकदा केवळ ईसीजी काढून तो ठीक असल्यास दुर्लक्ष केले जाते; पण लक्षात ठेवा, हृदयविकाराचा झटका असताना कित्येकदा सुरुवातीला ईसीजी नॉर्मल असू शकतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांना शंका असल्यास ते २४ तासांच्या निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल व्हायला सांगतात. मात्र रुग्णांचा त्यावर विश्वास बसत नाही आणि ते घरी निघून जातात. पण घरी गेल्यावर अनेकांना हृदयविकाराचा मोठा झटका येऊ शकतो.
 • अचानक दम लागणे : छातीत दुखून श्वास घ्यायला त्रास होणे, हे लक्षण हृदयविकाराप्रमाणे इतरही गंभीर आजारात दिसून येते. फुफ्फुसातल्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी होणे (पल्मोनरी एम्बोलिझम), फुफ्फुसाच्या निर्वात आवरणात अचानक हवा भरली जाणे (स्पॉन्टॅनिअस न्युमोथोरॅक्‍स), फुफ्फुसाच्या आवरणात पाणी होणे (प्ल्युरल इफ्युजन) अशा तातडिक इलाज लागणाऱ्या आजारात हे लक्षण दिसते. कुठल्याही कारणाने सतत दम लागल्यास हार्ट फेल्युअर, अस्थमा, ब्राँकायटिस, सीओपीडी, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा जंतुसंसर्ग, कर्करोग अशा आजारांची शक्‍यता असू शकते. त्यामुळे डॉक्‍टरांकडून तपासून त्यांचा सल्ला घेऊन तपासण्या आणि उपचार घ्यावे लागतात. कित्येकदा जास्त दम लागल्यास शरीरातील प्राणवायूचे प्रमाण खूप कमी झाल्याकारणाने रुग्णालयात त्वरित दाखल व्हावे लागते. 
 • सर्वांगाला खाज सुटणे : वावडे किंवा ॲलर्जी असलेली एखादी गोष्ट खाण्यात आली, तर अंगाला थोडीशी खाज सुटण्याची शक्‍यता असते. कधी कधी एखाद्या गोष्टीचा स्पर्श, सेंट्‌स, तेल, सौंदर्यप्रसाधने, प्राण्यांच्या अंगावरील केस, वनस्पती यामुळे खाज सुटून पुरळ येते. कित्येकदा कीटकदंश, औषधे, इंजेक्‍शन्स यांच्यामुळेही अशी रिॲक्‍शन येते. मात्र काही वेळेस खाज आणि पुरळ वाढत जाऊन त्या व्यक्तीचे ओठ, जीभ यांना सूज येते, घशामध्ये खवखव सुरू होते. पाणीसुद्धा गिळणे अशक्‍य होते. खोकल्याची ढास सुरू होते. छातीमधून सूं सूं असा आवाज येऊ लागून श्वास गुदमरायला लागतो. छातीत धडधड होऊ लागते, उलट्या होतात आणि रुग्ण अचानक बेशुद्ध पडतो. ही सर्व लक्षणे वेगाने, एकापाठोपाठ एक अशी प्रगट होतात. याला ‘ॲनॅफायलॅक्‍सिस’ म्हणतात. जिवावर बेतणारी ही परिस्थिती असल्याने रुग्णाला त्वरित आयसीयुमध्ये भरती करून अत्यंत तातडीने इलाज करावे लागतात.
 • खोकल्यातून रक्त येणे : न्यूमोनिया, क्षयरोग, एच.आय.व्ही. अशा आजारात काही दिवस खोकला, ताप येत असतो आणि अचानक त्यातून रक्त पडू लागते. खोकला येत असेल, तर साधे घरगुती उपचार, काढे, जाहिरातीतील खोकल्याची औषधे घेण्याकडे लोकांचा कल असतो. पण कुठलाही खोकला १५ दिवसांपेक्षा लांबला किंवा खोकल्याची उबळ येऊन पडणाऱ्या बेडक्‍यात रक्ताचे थोडे थेंब आले, तरी ते धोकादायक असते. सहाजिकच घरगुती उपाय थांबवावेत आणि फुफ्फुसाच्या रोगातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा (पल्मोनॉलॉजिस्ट) सल्ला घ्यावा.
 • अचानक खूप डोके दुखणे : डोके दुखणे ही खूप सर्वसाधारण तक्रार असते. एखादी डोकेदुखीवरची गोळी खाल्ली, की बरे वाटते. पण जर या नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा वेगळ्या प्रकारची तीव्र डोकेदुखी झाल्यास, त्वरित रुग्णालयातील तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. डोके खूप दुखणे हे अर्धांगवायू होण्यापूर्वीचे लक्षण असू शकते. क्वचित प्रसंगी मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये एखादा फुगवटा आलेला भाग (एऑर्टिक ॲन्युरिझम) फुटण्याची शक्‍यता असते. हा अतिशय गंभीर आजार असतो. मेंदूच्या आवरणांना जंतूसंसर्गामुळे सूज येऊन होणाऱ्या मेनिनजायटिस या आजारातसुद्धा खूप डोके दुखू लागते. अशा तीव्र स्वरूपाच्या डोकेदुखीबरोबर जर ताप येणे, एकाचे दोन दिसणे, दृष्टी मंदावणे, चालताना तोल जाणे अशी लक्षणे असल्यास रुग्णाला शक्‍य तितक्‍या त्वरेने रुग्णालयात हलवावे लागते.
 • अचानक भ्रमिष्टासारखे वागणे : मानसिक रुग्ण नसलेली व्यक्ती जर अचानक गोंधळल्यासारखी किंवा भ्रमिष्ट झाल्यासारखी वागू लागली, तर लगेच लक्ष द्यावे. हे लक्षण अर्धांगवायूचे, मेंदूमध्ये असलेली एखादी ट्युमरची गाठ वाढत जाऊन मेंदूतील मज्जासंस्थेवर दबाव आणत असल्याचे, तसेच मज्जासंस्थेच्या जंतुसंसर्गाचे लक्षण असू शकते. याही रुग्णाला रुग्णालयात हलवावे लागते. क्वचितप्रसंगी मधुमेहाच्या रुग्णाच्या रक्तातील साखर खूप कमी झाल्यावर (हायपोग्लायसेमिया), फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांना श्वास घेतल्यावर मिळणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा खूप कमी झाल्यावर, रुग्णांना सुरू असलेल्या औषधांमुळेसुद्धा हा त्रास होऊ शकतो.
 • एकाएकी कमी दिसू लागणे : दृष्टिपटल निखळणे, काचबिंदू बळावणे, डोळ्यांना किंवा मेंदूला जंतुसंसर्ग होऊन अचानक दृष्टी जाणे, दृष्टी अचानक कमी होणे, प्रकाशाकडे पाहिल्यावर त्रास होणे, डोळ्यांच्या खोबणीत दुखणे अशी लक्षणे दिसतात. 
 • पोटात दुखणे : पोटात एकाएकी जास्त दुखू लागल्यास ते दुर्लक्षित करू नये. गर्भवती महिलांमध्ये हे गर्भनलिकेत गर्भधारणा झाल्याचे (एक्‍टॉपिक प्रेग्नन्सी) लक्षण असते. याशिवाय अपेंडिसायटिस, आतड्यांना पीळ पडून अडथळा होणे (बॉवेल ऑब्स्ट्रक्‍शन), पोटातील अल्सर फुटणे, पित्ताशयाच्या नलिकेत खडा होऊन तो अडकणे, अशा अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
 • हातपाय हलवता न येणे : अचानक एक पाय आणि त्याच बाजूचा हात उचलता न येणे किंवा त्यातील शक्ती जाणे हे अर्धांगवायूचे महत्त्वाचे लक्षण असते. याबरोबर चेहऱ्याची हालचाल करता न येण्याचे लक्षणही काही रुग्णांत आढळते.
 • कंबर दुखणे : खूप काम केल्याने किंवा अजिबात काही न करता खूपवेळ एका जागी बसून राहिल्यावर पाठ-कंबर भरून येते. मात्र हा त्रास लगेच थांबू शकतो. पण एकाएकी कंबरेत उसण भरून दोन्ही पाय हलवता न येणे, शौच आणि मूत्रविसर्जनावरील ताबा जाणे, याचबरोबर उलट्या होणे आणि शुद्ध हरपणे यापैकी लक्षणे दिसल्यास रुग्णाला लागलीच रुग्णालयात हलवावेच लागते.
 • सतत लघवी होणे : रुग्णाला मधुमेह नसताना अचानक सतत लघवी होणे, हे मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या आजाराचे लक्षण असते. यावर वेळीच इलाज न केल्यास मूत्रमार्गातून मूत्रपिंडात जंतुसंसर्ग होऊन किडनी सेप्सिस किंवा ट्रिगर सेप्सिस होतो. प्रोस्टेटच्या रुग्णांमध्ये कर्करोगाची शक्‍यता असल्याने या त्रासाची तज्ज्ञांकडून संपूर्ण तपासणी होणे आवश्‍यक असते.
 • ताप : ताप साधा वाटला, तरी त्यात अजिबात घाम न येणे, मान कडक होऊन दुखणे, झटके येणे, भ्रम होणे, खूप डोके दुखणे आणि कमालीचे अस्वस्थ वाटणे ही लक्षणे दिसल्यास रुग्णाला रुग्णालयात न्यावे. डेंग्यू, स्वाईन फ्लू, टायफॉईड अशा आजारांच्या साथीत डॉक्‍टरांना दाखवणे आवश्‍यक असते. अशा आजारात वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. ताप सोडता इतर काही लक्षणे नसली आणि बारीक किंवा कडक ताप जर ५ दिवसांपेक्षा लांबला तरीही डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावाच.
 • शौचाला रक्त पडणे : मूळव्याधीत शौच करताना रक्त पडते. पण ते थेंब थेंब गळते किंवा त्याच्या छोट्या चिळकांड्या उडतात. मात्र एखाद्याला शौच होताना रक्त पडत असेल, तर आमांशापासून मोठ्या आतड्याच्या कर्करोगापर्यंत अनेक त्रास निघू शकतात. शौचामध्ये रक्त पडल्यावर रुग्णाला चक्कर येणे, तो बेशुद्ध पडणे, हातपाय थंडगार पडणे अशी लक्षणे आढळल्यास त्याला लागलीच रुग्णालयात न्यावे लागते.
 • बेशुद्ध पडणे : डोके दुखणे, छातीत दुखणे, पाठ-कंबर दुखणे, डोक्‍याला किंवा पोटाला मार लागलेला असणे, उलट्या होणे अशी लक्षणे असलेला रुग्ण जर बेशुद्ध पडला, तर वैद्यकीयदृष्ट्या ती एक ‘इमर्जन्सी’ असते. तसेही कुठल्याही कारणाने एखादी व्यक्ती तात्पुरती किंवा दीर्घकाळ बेशुद्ध पडली, तरी त्वरित डॉक्‍टरी सल्ला घ्यावा.
 • भाजणे : कोणत्याही कारणाने एखाद्याला कमी-जास्त प्रमाणात भाजले, तर घरगुती ऐकीव इलाज न करता, डॉक्‍टरांकडूनच इलाज करून घ्यावा. साधारणतः  १५ ते २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भाजणे गंभीर ठरू शकते. अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे. 
 • जखमा : किरकोळ कारणांनी, अपघातात जखमा झाल्या असल्यास डॉक्‍टरांना दाखवून घ्यावे. जर साध्या वाटणाऱ्या जखमेतून पाणी किंवा पू निघू लागल्यास डॉक्‍टरांकडून मलमपट्टी, गोळ्या-औषधे घावी.
 • हाडांच्या इजा : अपघातामुळे, पडल्यामुळे, खेळताना हाडांना मार लागल्याने सूज येते किंवा संबंधित अवयवांची हालचाल वेदनामय होते. अशावेळेस हाड फ्रॅक्‍चर असण्याची शक्‍यता असते. अशावेळी डॉक्‍टरांचे मत घेऊनच लगोलग उपचार करावेत. याशिवाय, नाकातून रक्त येणे, सतत उलट्या होणे, शरीरात कोठेही सतत वेदना होत राहणे अशी लक्षणे आढळली, तर कुठलेही पाऊल उचलण्याआधी त्वरित डॉक्‍टरांचे मत घ्यावे.

 दैनंदिन आयुष्यात हरघडी आढळून येणाऱ्या लक्षणांबाबतीत हेळसांड न करता योग्य डॉक्‍टरांकडून त्वरित वैद्यकीय सल्ला घेतल्यास शंभरातील सत्तर-ऐंशी वेळेस पुढचा बाका प्रसंग टळू शकतो.
 

संबंधित बातम्या