कोरोनाच्या ऐकीव संकल्पना

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 20 एप्रिल 2020

आरोग्य संपदा
 

कोरोना विषाणू साऱ्या जगभरात थैमान घालतोय. ३१ डिसेंबर रोजी जगाला प्रथमच माहिती झालेल्या या विषाणूच्या साथीमध्ये सर्वसामान्य माणसाची मती कुंठीत झाली आहे. रोज नवनव्या बातम्या, रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींचे आकडे हे सतत ऐकून मनात एक अगम्य भीतीची लहर सळसळून जाते. या काळात सर्व सामान्यांच्या कानावर अनेक नवीन शब्द पडतायत. अनेक न ऐकलेल्या अगम्य शास्त्रीय संकल्पना वाहिन्यांवरून सोशल मीडियामधून त्यांच्या डोक्यावर आदळत आहेत. कित्येकदा हे शब्द वापरणाऱ्या व्यक्तीलादेखील या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? याबद्दल शंका वाटत राहते. कोरोनाच्या या साथीला जेरबंद करायला सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग पुरेपूर असायला हवा, हे आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आले आहेच. त्यामुळे या संकल्पना समजून घेणे नितांत गरजेचे आहे.  

व्हायरस
म्हणजेच विषाणू, सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गुणधर्माने नटलेले असतात. तो सजीवही नसतो आणि निर्जीवही नसतो. तो त्यांच्या सीमारेषांवर असतो. व्हायरस म्हणजे प्रोटीनच्या आवरणाच्या आत काही ''जीन्स'' असलेला एक अतिसूक्ष्म जंतू असतो. व्हायरसवर एक प्रोटीनचे आवरण असते. त्या आवरणाच्या वेगवेगळ्या आकारामुळे व्हायरसदेखील विविध आकारांचे असतात. त्यांची संख्यात्मक वाढ व्हायला त्यांना एक जिताजागता यजमान लागतो. कधी ती वनस्पती असते, तर कधी प्राणी आणि अर्थातच मनुष्य प्राणीसुद्धा. माणसाच्या शरीरात शिरल्यानंतर काय करायचे, याविषयीचे संदेश व्हायरसच्या जीन्समध्ये असतात. ते मानवी शरीरात शिरून ते आपल्या पेशींमध्ये शिरतात आणि तिथे त्यांचे वेगाने पुनरुत्पादन होते. त्यानंतर ते त्या पेशींचे आणि त्यांच्या संदर्भातल्या अवयवांना अपाय घडवतात.

एपिडेमिक
म्हणजे आजाराची साथ. जेव्हा एखाद्या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात असंख्य लोकांना होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होतो, तेव्हा त्या साथीला एपिडेमिक म्हणतात. खूपच मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होणे म्हणजेच साथीचा उद्रेक किंवा एपिडेमिक आउटब्रेक म्हणतात. एखाद्या आजाराची साथ एखाद्या ठराविक भागापुरती मर्यादित असेल आणि त्याभागात सतत त्या आजाराचे रुग्ण आढळत असतील त्याला एंडेमिक म्हणतात. उदा. आफ्रिकेमध्ये काही देशांत मलेरिया सतत आढळतो. तिथे त्याला मलेरियाचा एंडेमिक भूभाग म्हणतात. जेव्हा एखाद्या आजाराची साथ अनेक देशांना, भूभागांना, खंडांना व्यापून टाकते, त्यावेळेस त्या साथीला पॅनडेमिक किंवा ''महामारी'' म्हणतात.

मास्कचे प्रकार 
कोरोनाचा संसर्ग हा रुग्णाच्या खोकल्यातून उडणाऱ्या तुषारांतून होत असतो. त्यामुळे या तुषारांना आपल्या श्वासात जाऊ न देण्यासाठी मास्क वापरले जातात. मात्र, कोणत्याही प्रकारचा मास्क वापरल्याने विषाणू संसर्ग होणे थांबवता येत नाही, पण त्याला काही प्रमाणात रोखणे शक्य होते. त्यामुळे सद्यस्थितीत मास्कची गरज सर्वांसाठीच आहे. 

कापडी मास्क : सर्वसाधारण व्यक्तींनी आवश्यक कामांसाठी बाहेर जाताना, रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक, स्वागत कक्षातील कर्मचारी अशा अल्पकाळ रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या अतिरिक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी, घरोघरी फिरून रुग्णांचे सर्वेक्षण तसेच जनजागृती करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी किंवा आरोग्य कर्मचारी यांनी कापडी मास्क वापरण्यास प्राधान्य द्यावे. हा मास्क दररोज जंतुनाशाकाच्या पाण्यात काही वेळ ठेवून अथवा गरम पाण्याने धुऊन, वाळवून वापरणे शक्य असते.

सर्जिकल मास्क : पॉलिप्रॉपिलीन या प्रकारच्या मेणकागदासारख्या सामुग्रीने तयार केले जाणारे हे मास्क तिपदरी असतात. सर्वसाधारण रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी अशा रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी हे उत्तम असतात. एकदा वापरल्यानंतर त्यांची विल्हेवाट सुक्या कचऱ्यात करायची असते. 

एन-९५ मास्क : तसेच प्रत्यक्ष कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि सेवकांनी, अतिदक्षता विभागातील आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लास्टिक शील्ड मास्क तसेच एन ९५ मास्क वापरावे. मास्कचा वापर करण्यापूर्वी हात साबणाने धुऊन घ्यावेत. ते लावताना फक्त कानांवर लावायच्या दोरीला स्पर्श करावा. त्याच्या पुढील बाह्यभागाला हात लावू नयेत. 

वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई)
पीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा साधने. वैयक्तिक हे वापरल्याने एखाद्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते. हे उपकरण कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. यामध्ये हातमोजे, पायमोजे, मास्क, गाऊन, डोक्याचे संरक्षण करण्यासाठी कव्हर, रेस्पिरेटर्स, डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी साधन, फेस शिल्ड आणि गॉगल अशा गोष्टी असतात. पीपीईचा वापर सामान्यत: रुग्णालये, डॉक्टरांची कार्यालये आणि क्लिनिकल लॅबसारख्या आरोग्य सेवांच्या संस्थांमध्ये केला जातो. त्वचा, तोंड, नाक, डोळ्यांतून होणाऱ्या संसर्गातून वैद्यकीय सेवकांचे संरक्षण होण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.

क्वारंटाइन 
जिथे एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ सुरू आहे, अशा प्रदेशातून कोणी व्यक्ती आली असेल. उदाहरणार्थ सध्या ज्या देशात करोनाची साथ आहे अशा देशातून आलेले प्रवासी आपल्या देशात आल्यावर वरवर निरोगी वाटले, तरी त्यांना वेगळे ठेवले जाते, त्यालाच''क्वारंटाइन'' असे म्हणतात. अशा व्यक्तींच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनाही हा आजार होऊन तो पसरण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते.
जागा : या व्यक्तींना क्वारंटाइनसाठी विशेष करून तयार केलेल्या इमारतीत, एखाद्या वेगळ्या वसतीगृहात, वेगळ्या जागेत ठेवले जाते. अनेकदा अशा व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्याच घरात विशेष सूचना देऊन वेगळे ठेवले जाते, त्याला ''होम क्वारंटाइन'' म्हणतात. 
मुदत : तेथे त्यांना ठेवण्याचा काळ, साधारणतः त्या आजारात शरीरात विषाणू किंवा जिवाणूंनी प्रवेश केल्यावर त्या रोगाची लक्षणे दिसू लागण्यासाठी जितके जास्तीत जास्त दिवस लागतात, तितके दिवस असतो. सध्याच्या साथीत ही मुदत १४ दिवसांची आहे. क्वारंटाइनच्या या काळात त्या व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांचे बारकाईने निरीक्षण केले जाते. जर आवश्यक वाटले, तर त्यांच्यावर आजाराचे निदान करणाऱ्या चाचण्या केल्या जातात. 

सोशल डिस्टन्सिंग
संसर्गजन्य आजार हे दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या की पसरतात. त्यामुळे व्यक्तीव्यक्तीमध्ये अंतर ठेवणे, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. कोरोनाच्या आजारात कोरोना बाधित रुग्ण खोकला, की त्याच्या खोकण्यामुळे त्याच्या तोंडातून उडणारे तुषार तीन फूट अंतरापर्यंत पसरतात. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांपेक्षा जास्त अंतर राखणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. हा नियम जिथे आपणहून पाळता येत नाही, म्हणजे जिथे दोन व्यक्ती मनात असो नसो, जवळजवळ असतात, अशी ठिकाणे बंद केली जातात. उदा. शाळा, कॉलेजेस, सिनेमा-नाट्यगृहे, समारंभ, सभा. यानंतरही लोक एकत्र येत असतील तर जमावबंदी, म्हणजे चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी असलेला कायदा जाहीर केला जातो. त्यामध्येही लोकांकडून सहकार्य मिळत नसेल, तर कर्फ्यू लागू केला जातो. यात लोकांना कोणत्याही कारणासाठी रस्त्यावर फिरणे बंद करायला भाग पडले जाते. त्याच्या पुढची पायरी म्हणजे लॉकआऊट. यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतूक व्यवस्था, विमाने, रेल्वे, लोकल्स, बसेस, रिक्षा-टॅक्सीसारखी प्रवासी वाहने यावरही निर्बंध आणले जातात. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याला, जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे कुलुपबंद केल्या जातात.

आयसोलेशन
संसर्गजन्य साथीच्या आजारात ज्यांना तो आजार झाल्याचे पक्के निदान होते, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा व्यक्तींना इतर रुग्णांना त्यांचा संपर्क होऊ नये म्हणून वेगळ्या वॉर्डात ठेवले जाते, याला ''आयसोलेशन'' म्हणतात. या व्यक्ती रुग्णालयातच ठेवाव्या लागतात आणि त्यांच्यावर सातत्याने उपचार आणि तपासण्या केले जातात. या रुग्णांमधील लक्षणे दूर होऊन त्यांच्या चाचण्या पूर्ण नॉर्मल येईपर्यंत त्यांना आयसोलेशनमध्येच ठेवतात. रुग्णापासून इतरांमध्ये आजार पसरण्याचा प्रत्येक आजाराचा एक विशिष्ट अवधी असतो. हा अवधी संपेपर्यंत त्या रुग्णाला आयसोलेशनमध्येच ठेवावे लागते.

क्वारंटाइन आणि आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना रुग्णासमोर जाताना वैयक्तिक सुरक्षा साधने (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) म्हणजे विशेष मास्क्स, गॉगल्स, विशेष अंगरखे, पादत्राणे, ग्लोव्हज त्या त्या आजारातील आवश्यकतेनुसार वापरावी लागतात.    

साथीच्या स्टेजेस
कोणत्याही देशात आजाराची साथ सुरू झाली आणि ती मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन तिने जागतिक स्वरूप (पॅनडेमिक) धारण केले, की त्याच्या प्रसाराचे टप्पे पडले जातात. काही वर्षांपूवी आलेल्या स्वाईनफ्लूच्या साथीत ही वर्गवारी सुचवली गेली होती. या स्टेजेस अशा -
पहिली स्टेज : साथ सुरू असलेल्या बाहेरील देशातून लागण झालेल्या किंवा लक्षणे दिसण्यापूर्वीच्या स्थितीतल्या व्यक्ती येतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये या आजाराची लागण किंवा लागण होण्याचा धोका निर्माण होतो. 
दुसरी स्टेज : बाहेरून आलेल्या लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांपासून इतरांना म्हणजे स्थानिक लागण सुरू होते. ती एकमेकांपासून पसरत जाते. या टप्प्यात नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत जाते. पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही ठीक असते. मृत्युदर मर्यादित असतो. याच काळात सोशल डिस्टन्सिंगचे कर्फ्यू, जमावबंदी आणि लॉकआउट हे पर्याय वापरून हा दुसऱ्या टप्प्याचा काळ लांबवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यायोगे साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत नाही.
तिसरी स्टेज : कम्युनिटी ट्रान्समिशन - यामध्ये परदेश प्रवासाला न गेलेल्या, कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होते. यामध्ये या रुग्णाचा कोणत्या रुग्णाशी संपर्क आला आहे, याचा मागोवा घेणे अशक्य होऊन बसते. अशा वेळेस आजाराचा सामाजिक प्रसार म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला असे समजले जाते. या टप्प्यात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढू लागते आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात होते. पण मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिवसागणिक जास्त जास्त होत जातो. या काळात एक्स्पोनन्शियल वाढ होते. म्हणजे भौमितिक प्रमाणात वाढ दिसायला लागते. आज शंभर, तर उद्या दोनशे, परवा चारशे अशा प्रमाणात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागते. 
चौथी स्टेज : जेव्हा एखाद्या देशातील साथीचा रोग, देशात सर्वत्र पसरतो. देशभरात मोठ्या प्रमाणात रोगाचा संसर्ग होतो, तेव्हा तो देश चौथ्या टप्प्यात असल्याचे म्हटले जाते. यात मोठ्या संख्येने लोक संक्रमित होऊ लागतात आणि विषाणूपासून बचाव करण्याचे उपाय निष्फळ ठरू लागतात. बाधित रूग्णांची संख्या नियंत्रित करणे जवळजवळ अशक्य होऊन बसते. चीनने या अवस्थेचा अनुभव घेतला आहे.

कोरोनामधील चाचण्या
सामान्य तपासण्या : प्रत्येक आजारासाठी सर्वसाधारण चाचण्या आणि आजाराचे निदान करणाऱ्या विशेष चाचण्या असे दोन प्रकार असतात. संशयित आजाराची लक्षणे सांगणाऱ्या रुग्णाला डॉक्टर प्रथम तपासतात. त्यामध्ये काही आजाराचा संशय वाटल्यास, आजाराच्या शंकेप्रमाणे चाचण्या करायला सांगतात. सीबीसी, इएसआर या रक्ताच्या चाचणीत रुग्णाला जंतुसंसर्ग झाला आहे किंवा नाही हे कळते. छातीच्या ''एक्स-रे''मधून रुग्णाच्या श्वसनसंस्थेतील फुफ्फुसांना सूज आली आहे का, फुप्फुसांच्या आवरणांमध्ये पाणी झाले आहे का, फुप्फुसांत काही पोकळी झाली आहे का अशा प्रकारची, फुप्फुसांच्या रचनेत बदल झाल्याची माहिती मिळते. मात्र, कोणत्या प्रकारच्या जीवाणूचा किंवा विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे सांगता येत नाही. त्यासाठी त्या आजाराच्या विशिष्ट चाचण्या सांगितल्या जातात.
विशेष चाचण्या : पीसीआर - यामध्ये रुग्णाच्या नाक आणि घशातील स्त्रावाची तपासणी केली जाते. यासाठी कापसाचा निर्जंतुक बोळा नाकात किंवा घशात सोडला जातो आणि त्याद्वारे स्त्राव त्या बोळ्यात शोषला जातो. एका विशेष परीक्षानळीतून ते सरकारमान्य प्रयोगशाळेत ४ अंश सेल्सिअस इतका थंडपणा टिकवून (कोल्डचेन) ते बोळे पाठवले जातात. तेथे पीसीआर तपासणीत या आजाराच्या खात्रीचे निदान होते. रुग्णाला आजाराची नुकतीच सुरुवात झाली असेल, तरी ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. साधारणपणे ३ ते ५ तासांत याचे निदान कळते. सध्या सरकारी प्रयोगशाळांत आणि काही थोड्या खासगी प्रयोगशाळांमध्ये याची तपासणी होते. मात्र, कामाच्या व्याप्तीमुळे रिपोर्ट येण्यास एक ते दोन दिवस जातात.
रॅपिड टेस्ट्स : यात अनेक प्रकार आहेत. एका प्रकारात रुग्णाच्या रक्तातील आयजीएम, अॅंटिबॉडीज तपासून तो बाधित आहे किंवा नाही हे लगेच कळते. मात्र, यातल्या अॅंटिबॉडीज तयार व्हायला आजाराला सुरुवात होऊन किमान पाच ते सात दिवस उलटलेले असावे लागतात. दुसऱ्या प्रकारात मॉलिक्युलर टेक्नॉलॉजीचा वापर करून पाच मिनिटांत या आजाराचे निदान होऊ शकते. मात्र, अजून या प्रकारची मशीन्स मोठ्या प्रमाणावर तयार नाहीत.

संबंधित बातम्या