कोरोनामुळे जीवनशैली बदलणार?

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 6 मे 2020

आरोग्य संपदा
 

एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या अखेरच्या वर्षात संपूर्ण मानवजात एका अकल्पित आणि भयावह चक्रात सापडली आहे. कोरोना विषाणूच्या अनाकलनीय व्यूहात सारे जग व्यापून गेले आहे. पराकोटीचा संसर्गजन्य असलेला आणि डोळ्याने न दिसणारा, अशा वर्णनाच्या या अदृश्य राक्षसाने जगातल्या लाखो जीवितांची अखेर घडवून आणली. विकसित आणि विकसनशील अशा जवळजवळ १८५ देशांत पसरलेल्या या जागतिक साथीमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग एवढेच प्रतिबंधक पर्याय जगातील सर्व सरकारे, डॉक्टर्स, प्रसारमाध्यमांच्या हातात आहेत.
कोरोनाच्या रुग्णाने स्पर्श केलेल्या आपल्या घरातल्या, ऑफिसातल्या आणि इतरत्र असलेल्या वस्तूंना हात लावला आणि तो आपल्या नाकातोंडाला लावला, की हा अदृष्य शत्रू आपल्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे रोजच्या दिनक्रमात नकळत ज्या गोष्टींना आपला स्पर्श होत असतो, अशा गोष्टींना नवे पर्याय शोधण्याचे काम सुरू झाले आहे. या नित्याच्या गोष्टींमध्ये पाण्याचे नळ, सोप डिस्पेन्सर्स, लाइटची बटणे, स्विचबोर्ड, लिफ्टचे दरवाजे, दारावरच्या बेल्स, संगणकांचे कीबोर्ड्स, कारच्या दरवाजाची हॅंडल्स अशा अनेक गोष्टी वापरात येऊ नये यासाठी काही उपाय विचारात घेतले जात आहेत. कदाचित यामुळे आपली भावी जीवनशैली बदलून जाणार आहे. 
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या मार्च २०२० च्या अंकात कोरोना विषाणू काही वस्तूंवर किती काळ तग धरून राहतो, याचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. यात तो एरोसॉलमध्ये तीन तास, तांब्याच्या वस्तूंवर चार तास, कार्डबोर्डवर चोवीस तास आणि स्टील व प्लास्टिक वस्तूंवर तब्बल तीन दिवस जिवंत राहतो असे नमूद केले आहे. या संशोधनानंतर घरातील फरशांपासून वापराच्या नोटांपर्यंत, दुधाच्या पिशवीपासून फळे आणि भाज्यांपर्यंत आणि अंगावरच्या कपड्यांपासून मोबाइल, चाव्या, पैशाच्या पाकिटांपर्यंत लाखो गोष्टी कशा जंतू विरहित करता येतील याबाबतच्या चिंतेची एक मोठी लाटच जगभरात पसरली. त्यामुळे या गोष्टींना स्पर्शच होऊ नये अशा प्रकारच्या गोष्टींवर संशोधन करून नवे पर्याय शोधण्याची जबरदस्त मोहीम सुरू झाली.  

काय बदलेल?
मे महिन्यात जरी लॉकडाऊन काही ठिकाणी सैल केला, काही ठिकाणी उठवला, तरी कोरोनाची साथ एवढ्या लवकर संपुष्टात येणार नाही हे नक्कीच. जरी जून महिनाअखेर ती आटोक्यात येण्याची चिन्हे दृष्टिपथात आली, तरी कदाचित जुलै-ऑगस्टमध्ये, पावसाळ्यातल्या दमट हवेमध्ये तो पुन्हा उसळी घेण्याचे भाकीत शास्त्रज्ञ वर्तवित आहेत. साहजिकच ही साथ आणि तिचे पडसाद येत्या वर्ष-दीड वर्षे उमटत राहणार हे नक्की. त्यामुळे या काळातले प्रतिबंधक उपाय लोकांच्या अंगवळणी पडण्याची शक्यता आहे.   

स्वच्छता : कोरोनाच्या साथीनंतरच्या जगात सर्वात आधी लोकांना स्वच्छ राहण्याची, स्वच्छ कपडे घालण्याची, रोज आंघोळ करण्याची आणि सर्वात विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस हात स्वच्छ धुण्याची सवय लागेल. सॅनिटायझर असो वा साबणाचा डिस्पेन्सर असो हात न लावता केवळ सेन्सरने त्यातून सॅनिटायझरचे अथवा साबणाचे द्रावण बाहेर पडणारी ऑटोमॅटिक डिस्पेन्सर बाजारात येऊ घातली आहेत. 

स्वच्छ अंघोळीसाठी आणि हात धुण्यासाठी नळाचा कॉक हाताने उघडण्याऐवजी हात नळाच्या जवळ गेला, की आपोआप पाणी सुरू होणारे नळ मोठ्या प्रमाणात वापरात येतील. आजही अनेक ठिकाणी विशेषतः विमानतळावर किंवा पंचतारांकित हॉटेल्समध्ये असे नळ वापरले जातातच. ते आता सर्व सार्वजनिक ठिकाणी म्हणजे साध्या हॉटेलात, लग्न कार्यालयात, ऑफिसात, रेल्वे तसेच बसस्टेशनवर आणि तुमच्या-आमच्या घरात वापरले जातील. 

आंघोळ करायला शॉवर वापरणे अगदी कॉमन झाले आहे. पण त्यातही हाताने ते सुरू करावे लागतात आणि त्यांच्या गरम-थंड पाण्याचे मिक्सिंग नळाच्या काही खटक्यांनी करावे लागते. पण आता हे काम सेन्सरने होणार आहे. अशा प्रकारचे सेन्सर असलेले नळ आणि शॉवर बाजारात आले आहेत आणि ते संगणकावरून ऑर्डर करून, त्यात दिलेल्या माहिती पत्रकाप्रमाणे आपले आपण पूर्वीच्या नळांना बसवू शकतो.

लाइटची बटणे आणि स्विचेस-ऑफिसमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांत, कंपन्यांच्या दरवाजात, हॉटेल्सच्या खोल्यांत, ऑफिसच्या खोल्यांत, सोसायटीच्या कॉमन लाइटिंगमध्ये, जिन्यात प्रकाश पडण्यासाठी दिव्यांची बटणे लावावी लागतात. सार्वजनिक ठिकाणी अनेकांचा त्यांना हस्तस्पर्श होतच असतो. हे टाळण्यासाठी कुणीही व्यक्ती आत आल्यावर आपोआप दिवे लागण्याची आणि ती बाहेर गेल्यावर दिवे विझण्याची सोय असलेली पद्धत आजही काही ठिकाणी असते, तिचा वापर सर्वत्र करण्याची गरज लोकांना वाटणार आहे. 

ऑफिसमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आणि घरीदेखील एक टाळी वाजवली, की दिवे सुरू आणि दोन टाळ्या वाजवल्या, की ते बंद अशी सिस्टीम वापरली जाईल. ही पद्धत अजिबात नवी नाही, पण कोरोनानंतरच्या जीवनपद्धतीत त्यांचे पुनरुज्जीवन होईल.
सार्वजनिक ठिकाणी, मोठ्या सोसायटीमध्ये, कंपन्या, रिसॉर्ट्समध्ये, सार्वजनिक रस्त्यांवर दिवस मावळला, की सुरू होतील आणि उजाडला की विझतील, अशा पद्धतीचे विजेचे किंवा सौर उर्जेचे दिवे वापरायला सुरुवात होईल.

सुरक्षा : आजकाल दारांना, दुकानांना कुलपे लावावीच लागतात. पण भविष्यकाळात संगणकीय कुलुपे वापरली जातील, जी मोबाइलमध्ये पासवर्डप्रणीत आज्ञा दिल्यावर बंद होतील किंवा उघडतील.
आजकाल सीसीटीव्ही कॅमेरे दुकाने आणि ऑफिसेसमध्ये बसवले जातात. लॉजेस आणि सोसायटीमध्ये ते बसवणे आवश्यक मानले जाते. यामध्येही संगणकाने किंवा मोबाइलने कार्यान्वित होणारे रिमोट कंट्रोल सीसीटीव्ही कॅमेरे वापरणे आवश्यक होऊन बसेल.

चलन वापर : गेली काही वर्षे सरकारचा भर पैसे किंवा चेक्स वापरण्याऐवजी नेटबँकिंग किंवा पैसे भरण्याची अॅप्लिकेशन्स वापरण्यावर आहे. याबाबतीत अनेक लोकांचा नकार असतो. पण कोरोनाच्या साथीमध्ये लोकांनी नोटांचा धसका घेतला आहे. त्यामुळे व्यवहारामध्ये चेक्स, नोटा आणि पैसे वापरणे जवळपास बंद होईल. सर्व नागरिक ऑनलाइन पेमेंट, क्रेडिट कार्ड्‌स, डेबिट कार्ड्‌स वापरू लागतील. त्यातही कार्ड्‌स स्वाईप करण्याऐवजी त्याच्या यंत्राच्या जवळ गेले, की व्यवहार पूर्ण करणारी पद्धत सुरू होऊ शकते. 

खरेदीविक्री : किराणा माल, स्टेशनरी, कपडे, औषधे, बारीक सारीक फर्निचर अशा नित्य व्यवहारातल्या गोष्टी दुकानात जाऊन विकत घेण्याऐवजी त्या संगणकावरून ऑनलाइन मागवणे आत्ताही मोठ्या प्रमाणात होत होते, त्याचे प्रमाण, संख्या आणि वस्तू वाढतील. कदाचित दुकाने कमी होतील आणि आपले किरकोळ दुकानदार मोबाइलवरून ऑर्डर घेऊन घरपोच देण्याची व्यवस्था सुरू करतील.

रेल्वे, बस आणि विमानप्रवास : यामध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य होईल. साहजिकच रेल्वे, बसेस आणि विमानात दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे होईल. हे प्रवास साहजिकच खूप सुकर आणि आरामदायी होतील, पण त्यातील बैठकांची संख्या कमी झाल्यामुळे हे प्रवास नक्कीच तिपटीने तरी महागतील. जवळच्या अंतरावर स्वतःच्या गाड्या वापरणे लोकांना जास्त स्वस्त वाटेल, पण त्यातही प्रवासी संख्या दोन किंवा तीन राखावी लागेल. 
सर्वात कठीण गोष्ट असेल ती रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि विमानतळांवरील प्रवाशांच्या गर्दीची. यासाठी संगणकावर आधारित अपॉइंटमेंट सिस्टीम तयार करून, रेल्वे-बसस्थानकांची किंवा विमानतळांचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन जेवढे प्रवासी मावतील तेवढेच एका वेळेस बोलवावे लागतील. गाड्यांची, विमानांची संख्या मर्यादित करावी लागेल. अधिक मोठी रेल्वे स्टेशन्स, बस स्थानके तयार करावी लागतील किंवा त्यांचे आकार वाढवावे लागतील. प्लॅटफॉर्मवर एका वेळेस तीन फूट अंतर राखून प्रवासी घ्यावे लागतील. रेल्वे आणि बसस्थानकांच्या बाबतीतले हे निर्णय लॉकडाऊन शिथिल करतानाच घ्यावे लागतील आणि तेही पुढे दीर्घकाळ पाळावे लागतील. 

शाळा-कॉलेजेस : सध्या जर्मनीमध्ये लॉकडाऊन शिथिल करून शाळा-कॉलेजेस सुरू करण्यात आली आहेत. तिथे मुलांना शाळेत येता-जाताना, वर्गात बसताना, खेळताना सोशल डिस्टन्सिंगची तत्त्वे पाळायला सांगितली आहेत. जर्मनीसारख्या शिस्तबद्धतेची परंपरा असलेल्या देशात हे सहज शक्य आहे. पण आपल्या देशातल्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आज लॉकडाऊनच्या काळात घरात बसणे अशक्य होते आहे. विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्या तरुणांना आजही पोलिस रोज शेकड्याने पकडतायत. लॉकडाऊन नंतर त्यांना कसे आवरायचे हा प्रश्नच असेल. पण थोड्या कडक नियमावलीमधून हे शक्य होईल. 

प्रार्थनास्थळे : आज जगभरातील मंदिरे, चर्चेस, मशिदी ईश्वराच्या प्रार्थनेसाठी बंद आहेत. पण लॉकडाऊन उठल्यावर काय होईल? तीर्थयात्रा, सार्वजनिक प्रार्थना, गणेशोत्सव, दहीहंडी, आळंदी-पंढरपूरची वारी यांत सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य आहे? यावर धार्मिक वाद उठू नये.

क्रीडांगणे : जपानमध्ये यावर्षी होणारी ऑलिंपिक स्पर्धा पुढच्या वर्षावर ढकलली आहे. भारतातली आयपीएलही पुढे ढकलली आहे. कदाचित त्या स्पर्धेत हे नियम पाळले जातीलही. पण फुटबॉल, क्रिकेट अशा खेळांच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भरगच्च स्टेडियम्स कशी ठेवता येतील? त्याऐवजी क्रीडांगणावर मर्यादित लोकांना प्रवेश आणि टेलिव्हिजनवर सामने दाखवायचे अशी पद्धत सुरू होईल. त्यासाठी कदाचित स्पोर्ट्‌स वाहिन्या आपले शुल्क खूप वाढवतील. 
या खेळांच्या प्रेक्षकांचे ठीक आहे, पण फुटबॉल, हॉकी, अॅथलेटिक्स आणि कबड्डी अशा खेळांच्या खेळाडूंनी डिस्टन्सिंग ठेवून हे खेळ खेळायचे कसे? आणि खेळात विजय मिळवल्यावर गळ्यात गळे घालून नाचायचे नाही? नक्कीच विजयोत्सवाच्या पद्धती बदलाव्या लागतील.

करमणूक : लॉकडाऊनचा करमणूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. सोशल डिस्टन्सिंगचे तत्त्व पाळून रसिकांना हॉलमध्ये बसवल्यास एकुणातील प्रेक्षकसंख्या रोडावेल. तिकिटांचे दर वाढतील आणि लोक घरच्या टीव्हीवर किंवा नेटफ्लिक्ससारख्या नव्या मीडियावर चित्रपट पाहणे जास्त पसंत करतील. पण प्रश्न आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळून सिनेमातले मारामारीचे प्रसंग कसे चित्रित करतील? आणि प्रणयप्रसंगांचे शूटिंग कसे करतील? कदाचित टेक्नॉलॉजी वापरून हे प्रसंग चित्रित करावे लागतील.
एक गोष्ट नक्की आहे की कोरोनाची साथ जेव्हा केव्हा संपेल, त्यावेळेस ही आज उठता बसता ऐकावी लागणारी आणि पाळावी लागणारी सगळी तत्त्वे पाळली जातील का? पाळणे शक्य होईल का? का पुन्हा येरे माझ्या मागल्या...? 

संबंधित बातम्या