सकारात्मक विचारांची संजीवनी 

डॉ. अविनाश भोंडवे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

आरोग्याचा मूलमंत्र
नकारात्मक विचार दूर सारून, आपल्याला हवे आहे ते आपण नक्की करू शकू, विद्यमान परिस्थिती बदलू शकू, आपल्या प्रयत्नात आपण नक्की यशस्वी होऊ; अशा भावना बाळगून, त्या विचारांवर विश्‍वास ठेवून, तसे सातत्याने प्रयत्न करत राहणे म्हणजे सकारात्मक विचारांचा पाठपुरावा.

अगदी लहानपणापासून आपल्या जीवनात नकारात्मक प्रतिक्रियांचा सतत भडिमार होत असतो. आपल्या नकळत आपल्यावर या प्रतिक्रियांचा खोलवर परिणाम होत राहतो. जगण्याचे सर्व पैलू त्यामुळे निराशामय बनत जातात. त्यामुळे नवे काही करायची जिद्द, सद्यपरिस्थितीवर मात करून चांगले दिवस आणण्याची आकांक्षा विरून जाते. 

असे नकारात्मक विचार दूर सारून, आपल्याला हवे आहे ते आपण नक्की करू शकू, विद्यमान परिस्थिती बदलू शकू, आपल्या प्रयत्नात आपण नक्की यशस्वी होऊ; अशा भावना बाळगून, त्या विचारांवर विश्‍वास ठेवून, तसे सातत्याने प्रयत्न करत राहणे म्हणजे सकारात्मक विचारांचा पाठपुरावा. 

जलद रोगमुक्ती 
एखादी व्यक्ती आजारी पडल्यावरही अनेकदा नेहमीच्या गोष्टींच्या रहाटगाडग्याशी जखडलेली राहतात. नकारात्मक विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस घोळत राहतात. असे लोक वैद्यकीयदृष्ट्या बरे झाले, तरी त्यानंतर आयुष्यभर त्या आजाराच्या पडछायेत चाचपडत राहतात.

‘मी लवकर बरा होणार आहे, मी सुखी आहे, समाधानी आहे. पूर्णपणे फिट आहे, मला खूप छान वाटते आहे, मस्त वाटते आहे‘. असे जे रुग्ण स्वतःलाच दिवसभरात शंभरदा बजावतात, ते स्वतःमध्ये जाज्वल्य ऊर्जा निर्माण करतात आणि आश्‍चर्यकारकरीत्या खूप लवकर नॉर्मल होतात. क्रिकेटपटू अनिल कुंबळे जबर जखमी असतानाही गोलंदाजी करतो, जीवघेण्या अपघातातून एफ-1 कार रेसिंगचा जगज्जेता मायकेल शूमाकर सहीसलामत परत येतो. अशी शेकड्याने उदाहरणे जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर घडलेली आहेत. 

नैराश्‍याशी सामना करताना 

 • ज्या गोष्टी आता हाता त आहेत, त्यांच्यावर ताबा मिळवून त्या पूर्णत्वाला न्यायच्या आहेत, हे मनाशी पक्के करावे लागते.
 • आजार किंवा अपघाताबद्दलची मानसिकता, शारीरिक हालचाली, बोलणे-चालणे, विचार जाणीवपूर्वक नियंत्रित करावे लागतात. वर्तमानकाळात त्यांच्यावर ताबा मिळवून जगावे लागते.
 • ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ या केशवसुतांच्या कवितेनुसार वर्तमानात आपल्या कर्तृत्वाने यशस्वी व्हायचे आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधावी लागते. 
 • भूतकाळाचा जाणीवपूर्वक विसर, वर्तमानकाळाचा स्वीकार करून योग्य आणि सुसंगत पावले टाकली तर भविष्यकाळातील निरामय आपल्याला मिळू शकते, हे अनेक मनोवैज्ञानिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.  
 • ‘असाध्य’ नसलेल्या कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आजारात रुग्ण वैद्यकीय उपचारांनी बरे होण्याची शक्‍यता असतेच. पण यापद्धतीने त्याला सकारात्मक विचारांची जोड मिळाली तर रुग्ण हमखास आणि लवकर बरा होतो.

स्वयंप्रेरणा 
सकारात्मक विचारांमध्ये स्वयंप्रेरणा किंवा प्रोॲक्‍टिव्ह विचार महत्त्वाचे ठरतात. भविष्यातील गोष्टींचा कानोसा घेऊन, भावी परिस्थितीत क्रांती घडवणारे हे विचार असतात. यात वागणुकीमध्ये येणारा एक पुढाकार घेऊन केलेला सहेतुक बदल असतो. भविष्यात काही संकट उभे राहिले तर ‘जेव्हा होईल तेव्हा पाहू’ याऐवजी ती परिस्थिती उद्‌भवलीच, तर ‘मी हे हे करेन’ अशी योजनापूर्ण आखणी असते. असे सकारात्मक नियोजन करण्यासाठी व्यवस्थापन शास्त्रामध्ये असलेले ‘स्वॉट ॲनॅलिसिस’सारखे स्वतःचे मनोविश्‍लेषण करावे. आपल्यामधील शारीरिक-मानसिक दोष, आपल्याला ज्या त्रासाचा सामना करावा लागेल त्याची माहिती, आपल्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा गोष्टींची जाणीव आणि क्वचित घडेल पण अशक्‍य नसतील अशा गंभीर प्रसंगांचा विचार करावा लागतो. 

काही वास्तविकता 
वैद्यकीय शास्त्रातील एका संशोधनपूर्वक केलेल्या सर्वेक्षणान्वये, सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक आरोग्यमय फायदे आढळतात. 

 • हृदय आणि रक्ताभिसरण संस्था जास्त तंदुरुस्त असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्तीदेखील अधिक भक्कम असते. 
 • आजार साधा असो किंवा दुर्धर त्यांना आजाराचा त्रास कमी होतो आणि ते लवकर हिंडू फिरू लागतात. 
 • तणावरहित आणि प्रसन्न राहणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये सुक्षेम प्रसूती होण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचप्रमाणे त्यांचे बाळ निरोगी निपजते.
 • हृदयाचे स्पंदन तालबद्ध राहते, हृदयाचे ठोके जलद पडत नाहीत उलट थोडे कमी होऊन या व्यक्तींची आयुर्मर्यादा वाढते. 
 • ‘प्लाझ्मा फायब्रिनोजेन’ हे रक्तामध्ये विरघळलेल्या स्वरूपातील प्रथिन असते. रक्तातील थ्रॉम्बिन या घटकामुळे त्याचे फायब्रिन नावाच्या घटकात रूपांतर होते आणि शरीरांतर्गत रक्तप्रवाहात रक्ताची गुठळी निर्माण होते. या गुठळीमुळे हृदयविकाराचा झटका येणे, अर्धांगवायू होणे असे गंभीर त्रास होतात. सकारात्मक विचारांमुळे रक्तातील ‘प्लाझ्मा फायब्रिनोजेन’चे प्रमाण घटते आणि हे गंभीर विकार टळू शकतात. 

सकारात्मक बनण्यासाठी 
एकुणातल्या फक्त २५ टक्के व्यक्तींनाच सकारात्मक विचार आणि मानसिक प्रसन्नता साध्य होते. सकारात्मक बनायला काही महत्त्वाच्या गोष्टी मनात आणि आचरणात आणल्यास सकारात्मक होता येते. 

 • सर्वप्रथम आपले ध्येय निश्‍चित करून ते आपण कसे साध्य करणार आहोत याचा एक आराखडा करावा. 
 • आजारांची तुलना करू नये. त्यांना झालेला त्रास आपल्याला होईल असे विचार मनातून लगेच झटकून टाकावेत. अर्धवट तुलनेने नकार प्रवृत्ती वाढते. 
 • मनात भरकटणाऱ्या स्वैर नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या वागण्यावर होत असतो. म्हणूनच या नकारात्मक गोष्टी जितक्‍या टाळता येतील, तितक्‍या टाळाव्यात. 
 • स्वप्रतिमा जागृत ठेवणे ः सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वतःविषयी आदर निर्माण होतो आणि सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. अशा व्यक्ती स्वतःबद्दल जागृत राहून, स्वतःच्या गुण-दोषांबद्दल जाणीव ठेवतात. स्वतः:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी महत्त्वाची असते. 
 • प्रमाणबद्ध व्यवहार ः आपल्या शरीराच्या मर्यादांची जाणीव आपल्याला असावी लागते. एखादी गोष्ट किती प्रमाणात करायची हे विचार जागृत मनात ठेवून वागावे लागते. मग व्यायाम करणे असो, आपल्याला आवडणारा पदार्थ खाणे असो किंवा मद्यपानासारखी बाब असो, अतिरेक टाळणे आणि आपल्या मर्यादा काळजीपूर्वक सांभाळणे गरजेचे असते. 
 • आरोग्य ः आपले सर्वसामान्य आरोग्य जोपासण्याची तयारी ठेवावी. उत्तम चौरस आहार, नियमितपणे योग्य व्यायाम आणि पुरेशी विश्रांती यात सातत्य असेल, तर एखादा आजार असला तरी सकारात्मक विचार प्रगल्भ होतात. 
 • स्वस्वीकार ः आत्मसुधार - आपला रंग, रूप, उंची या त्रिमितीतून स्वतःचे मूल्यमापन होत असते. प्रत्येक व्यक्तीप्रमाणेच आपणही निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहोत ही भावना जागृत ठेवावी. बऱ्याच वेळेला आपण जसे नाही तसे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न आपण करत असतो. यातूनही मोठी निराशा येऊ शकते. आपण जसे आहोत तसेच प्रदर्शित होणे महत्त्वाचे आहे. यामुळे स्वतः:वरचा विश्वास आणि आदर वाढतो. 
 • स्वसंवाद ः आपणच आपल्याला चांगले ओळखू शकत असल्यामुळे, स्वतःमध्ये असणाऱ्या गुण-दोषांसह स्वतःला स्वीकारणे ही सकारात्मक स्व-प्रतिमा बनवण्याची पहिली पायरी असते. इतरांबाबत ईर्षा, राग किंवा तिरस्कार न बाळगता, आपल्याबद्दल इतर लोक काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वतःची किंमत न करता आपली स्वतःची उमेद जागृत ठेवावी. 
 • स्वयंसूचना ः आधुनिक मानसशास्त्राने असे सिद्ध केले आहे, की सकारात्मक स्व-सूचनांचा व्यक्तिमत्त्व विकासात चांगला परिणाम दिसून येतो. स्वतःमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करताना, निर्णय घेताना, कार्याची अंमलबजावणी करीत असताना सकारात्मक स्वयंसूचनांचा निश्‍चित फायदा होतो. उदाहरणार्थ, - मी प्रत्येक काम आत्मविश्वासाने करीत आहे. - माझी एकाग्रता वाढली आहे. - मी पुन्हा आधीसारखा होईन. 
 • वेगळे विचार ः जीवन जगताना नावीन्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर सृजनशीलता विकसित होते. दैनंदिन कृती करताना, एखादी समस्या सोडवताना यामध्ये आणखी काय वेगळे करता येईल, याचा विचार केला तर अनेक मार्ग सुचतात. नावीन्य ही मनाची ओढ असली तरीही प्रत्यक्षात कृती करताना आपण नवीन मार्ग अवलंबायला धजावत नाही. सकारात्मक विचारांमुळे या विचारसरणीमध्ये निश्‍चित बदल होतो. 
 • सामाजिक बांधिलकी ः ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तरच जगलास’ या अनंत काणेकरांच्या विचारांप्रमाणे, इतरांसाठी काही तरी चांगले केल्यास सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते. आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. साऱ्या समाजाचा विचार करत, आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला तरच स्वतःमध्ये सकारात्मक बदल होतोच, पण समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होतो. 
 • आनंदी वृत्ती ः जीवनातील विसंगतींना अनुसरून मिस्कील विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, चित्रपट-नाटक-साहित्य यांचे रसग्रहण करणे, उघड्या डोळ्यांनी जीवन जगणे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन आपली वृत्ती आनंदी होते. 

आनंदी वृत्ती दुःखद आणि कसोटीच्या प्रसंगातही आपल्याला आनंदी राखते आणि आजारातून बरे होण्याबाबत विश्‍वास उंचावते. सतत हताश, निरुत्साही आणि दुःखी राहणाऱ्यांना इतरांकडून सहसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याला अपयश, आजार आणि दारिद्य्र हमखास येते. 
‘औषधं जावी तोयम्‌, वैद्यो नारायणो हरी’ अशी सकारात्मक वृती आरोग्य कायम ठेवण्यासाठीच नव्हे, तर दुर्धर आणि असाध्य व्याधीतून आपल्याला तारून नेण्यासाठी एक अमोघ संजीवनी आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या