संगणक वापरा; आरोग्यही जपा

डॉ. अविनाश भोंडवे 
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

आरोग्याचा मूलमंत्र
संगणकाच्या या वापरामुळे आपली अनेक जीवनावश्‍यक कामे खूपच सोपी झाली आहेत हे नक्की. तरीही अतिरेकी प्रमाणात तो वापरून निर्माण होणारे आरोग्यातील बिघाड आणि असंख्य विकार आज प्रामुख्याने समोर येऊ लागले आहेत.

आजचे युग हे तसे संगणक युग आहे. साधारणतः ऐंशीच्या जगात भल्या थोरल्या संगणकांपासून सुरवात झालेल्या या युगात जेव्हा संगणकांचा मोबाईलशी संयोग होऊन स्मार्टफोन आला, तेव्हा त्यात आमूलाग्र क्रांती झाली. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांबरोबर संगणकाचा वापर ही तितकीच महत्त्वाची बाब बनली आहे. संगणक आणि त्यावरचे इंटरनेटचे मायाजाल हे केवळ माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी नव्हे तर जीवनातील अनेक गोष्टींशी निगडित झाले आहे. विजेचे बिल, मोबाईल-लॅण्डलाईन, टेलिफोनचे बिल, क्रेडिट कार्डाचे पैसे, विम्याचे हप्ते, महापालिकेचे कर, आयकर अशा महत्त्वाच्या गोष्टींचे शुल्क भरणे असो किंवा रेल्वे, विमानप्रवास, हॉटेलचे बुकिंग करणे, कुणाला महत्त्वाचा अर्ज पाठवायचा किंवा संदेश पाठवायचा असो, पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करायचे असो, आजमितीला सर्व क्षेत्रात संगणक वापरणे अत्यंत अत्यावश्‍यक होऊन बसले आहे. त्यात पुन्हा फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडीयामुळे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाइन खरेदीच्या साईट्‌सवरील व्यवहारांसाठी आणि मनोरंजनासाठी चित्रपट किंवा व्हिडिओ बघण्यासाठी याचा वारेमाप वापर  होतो ते वेगळेच. 

संगणकाच्या या सर्व वापरामुळे, संगणक वापरणारे आणि या सेवा देण्यासाठी झटणाऱ्या संगणकाच्या तंत्रज्ञांचा असे दोन वर्गांमध्ये संगणकाचा सातत्याने वापर होऊ लागला आहे. आज कोणताही व्यवसाय असो, कुठलाही धंदा असो किंवा नोकरी असो; संगणकांचा वापर हा त्यातील पंच्याहत्तर टक्के लोकांना करावा लागतो.

संगणकाच्या या वापरामुळे आपली अनेक जीवनावश्‍यक कामे खूपच सोपी झाली आहेत हे नक्की. तरीही अतिरेकी प्रमाणात तो वापरून निर्माण होणारे आरोग्यातील बिघाड आणि असंख्य विकार आज प्रामुख्याने समोर येऊ लागले आहेत. 

संगणकामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांची करणे पुढीलप्रमाणे 

 • संगणकासमोर दीर्घकाळ बसून राहणे
 • बसताना शारीरिक ढब (पोश्‍चर) न सांभाळता वेडेवाकडे बसणे
 • संगणकातील रचनेचा दोष
 • संगणकाच्या पडद्यातून होणारा किरणोत्सर्ग 

संगणकामुळे होणारे विकार
कार्पल टनेल सिंड्रोम
संगणकावर काम करताना सतत की-बोर्ड आणि माऊसचा वापर करावा लागतो. अक्षरे टाइप करताना तासनतास होणारी बोटांची हालचाल आणि की-बोर्डवर हात ठेवताना होणारा मनगटाची स्थिती यामुळे हा आजार होतो. मनगटाच्या आतून हाताकडे जाणारे मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या यांच्यावर दबाव येतो. त्यामुळे मनगट, हातांची बोटे दुखणे, बधिर होणे, त्यांच्यातील शक्ती कमी होणे असे त्रास जाणवतात. माऊस वापरताना तर मनगट वाकलेले आणि बोटे आखडून ठेवावी लागतात. त्यामुळे बोटे बधिर होतात. एवढेच नव्हे तर बोटांच्या पेरांना सूज येऊन ती वाकडी होतात. ज्या लोकांना अत्यंत वेगाने काम करावे लागते, त्यांच्या बोटांची अशा वाकड्या स्थितीत दिवसातून लाखोवेळा अथक हालचाल होत असते. या लोकात हा विकार मोठ्या प्रमाणात आढळतो.

नव्या पद्धतीच्या संगणकात की-बोर्ड आणि माऊसला चाट देऊन ’टच स्क्रीन तंत्रज्ञान’ वापरले जाते. कदाचित त्यामुळे हे विकार कमी होतील अशी अशा बाळगायला हरकत नाही.

दृष्टीवर परिणाम 
संगणकाच्या सतत वापराने डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना खाज सुटणे, त्यांच्यात कोरडेपणा निर्माण होणे असे त्रास जाणवतात. खरे तर संगणकाची स्क्रीन आणि ती वापरणारी व्यक्ती यात किमान दोन फुटांचे अंतर असावे लागते. पण संगणकाची आणि त्याच्या पडद्याची (मॉनिटर) रचनाच अशी असते, की तो वापरताना हे अंतर फुटभरसुद्धा राहत नाही. स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा प्रकाश तीव्र असतो. तसेच त्यातून किरणोत्सर्गी उष्णता बाहेर पडते. त्यामुळे डोळ्यांवर हे परिणाम होतात. याशिवाय डोळे दुखणे , मध्येच अस्पष्ट दिसणे, दृष्टी मंद होऊन चष्मा लागणे किंवा चष्म्याचा नंबर वाढणे हा त्रास मोठ्या प्रमाणात आढळू लागला आहे. काही रुग्णांत डोळ्याच्या आतील द्रावाचा दाब वाढून ग्लॉकोमा हा दुर्धर विकार होऊ शकतो.

पाठ-मान दुखणे
संगणक, त्याचा पडदा, की-बोर्ड, माऊस यांची रचनाच अशी असते, की तो वापरताना पूर्णपणे ताठ बसणे अशक्‍य असते. साहजिकच पुढे झुकून, खांदे वाकवून, मान पुढे झुकवून, एक हात पुढे आणि दुसरा की-बोर्डवर अशी रचना करावी लागते. सातत्याने या पद्धतीने बसल्यामुळे मानेचा स्पॉण्डिलायटिस व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मान दुखणे, दंड दुखणे, हात बधिर होणे, हातांना मुंग्या येणे लक्षणे दिसू लागतात. याशिवाय खांदे दुखणे, सतत पाठ भरून येणे, कंबर दुखणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात. 

एका वैद्यकीय पाहणीनुसार हे त्रास संगणकाचा वापर करणाऱ्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त करून आढळून येतात.

ताणतणाव आणि झोप
वैद्यकीय संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की संगणकाच्या पडद्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे शरीरातील ’मेलॅटोनिन’ नावाचे संप्रेरक जास्त प्रमाणात स्त्रवते. त्याच्या परिणामाने झोपेचे प्रमाण खूप कमी होते. साहजिकच यामुळे ताणतणाव आणि त्याचे परिणाम वाढतात. याचा परिपाक मानसिक चिंता आणि नैराश्‍यात होतो.

संगणक , टेलिव्हिजन आणि मोबाईल यामध्ये हा परिणाम होतो हे आता सर्वांच्याच ध्यानात आलेले आहे. याशिवाय सततच्या वापराने या व्यक्तींचा लहरीपणा वाढतो, काही बौद्धिक गोष्टी समजण्याची आकलनशक्ती कमी होते आणि वागण्यातदेखील बदल दिसू लागतात. काही व्यक्तींमध्ये अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे विचित्र भास होण्याच्या तक्रारीदेखील आढळून येतात.

आभासी जग
सोशल मिडीयाच्या अती वापराने एकटेपणा वाढणे, संशयी स्वभाव होणे आणि नैराश्‍य वाटणे असे त्रास होतात. काही व्यक्तींमध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याचे प्रकार घडतात. 

उपाय
दीर्घकाळ संगणक वापरताना होणारे हे त्रास टाळण्यासाठी काही गोष्टींच्या सवयी बदलणे गरजेचे आहे.

 • बसण्याची ढब बदलावी. खूप काळ एकाच पद्धतीने बसू नये. खुर्चीत बसताना पुढे झुकून काम करण्याऐवजी पाठ मागे कलती ठेवून बसने इष्ट.
 • दर तासाला पंचावन्न मिनिटे झाल्यावर पाच मिनिटांसाठी शॉर्टब्रेक घ्यावा. या काळात खुर्चीवरून उठून थोडे फिरून येणे, प्रसाधनगृहात जाणे, पाणी पिऊन येणे अशा गोष्टी कराव्यात. न चुकता या पाच मिनिटात अंगाला आळोखे-पिळोखे द्यावेत आणि स्ट्रेचिंग करावे.
 • शक्‍य झाल्यास टेबलखुर्चीऐवजी स्टॅण्डिंग डेस्क वापरावे आणि उभे राहून काम करावे. 
 • कामापूर्वी किंवा नंतर पीटीचे व्यायाम, योगासने करावीत. यामुळे अंग सैल पडून दुखणी टळतात आणि स्नायू मजबूत होतात.
 • डेस्कटॉप संगणक वापरताना मॉनिटरची वरची कड आपल्या डोळ्यांच्या पातळीत समोर हवी, खाली किंवा वर नसावी. मॉनिटर १० अंशाने किंचितसा मागे कललेला असावा. 
 • खांद्यापासून तुमचा हात सरळ केल्यावरच तुमच्या बोटांना स्पर्श होईल एवढ्या अंतरावर मॉनिटर असावा.
 • बसण्याची खुर्ची, पाठ मागे-पुढे आणि शरीर वर-खाली होईल अशी असावी. आजकाल खुर्चीऐवजी मोठे चेंडू (एक्‍झरसाईझ बॉल्स) वापरले जातात, ते याबाबत उत्तम ठरतात. 
 • ’नमपॅड’ नसलेले की-बोर्ड वापरावेत. त्याची लांबी कमी असल्याने माऊस त्याच्याशेजारी ठेवता येतो. त्यामुळे मनगटावर पडणारा तणाव कमी होतो. 
 • एवढे करूनही पाठदुखी, मान, खांदे, कंबर दुखणे किंवा तत्सम त्रास होत असल्यास अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

संगणक वापरणाऱ्यांना येणाऱ्या मानसिक वैफल्याकरिता मेडिटेशन, मित्रमैत्रिणी आणि परिवार यांच्याशी मोबाईलवरील सोशल मिडियावरून संपर्क ठेवण्याबरोबर वरचेवर प्रत्यक्ष भेटीगाठी घ्याव्यात. काही छंद विकसित करावेत.
वेळच्यावेळी जेवण, पुरेशी झोप आणि विश्रांती त्याचप्रमाणे दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम केल्यास वरचेवर होणारे छोटेमोठे आजार तर टाळता येतातच, पण स्थूलत्व, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा या संगणकीय बैठ्या जीवनशैलीतून उद्‌भवणारे आजार चार हात दूर लोटता येतात.
  आज संगणक क्षेत्रात काम करणे हे सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते; पण ही प्रतिष्ठा, मानसन्मान खऱ्या अर्थाने अनुभवायचे असतील, तर त्यासाठी आरोग्य व्यवस्थित असायला हवे. संगणकामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व स्वतःची प्रकृती एकदा नीट समजून घेतली आणि त्यानुसार जीवनशैली आखली, साध्या पण प्रभावी उपायांची योजना केली, तर आरोग्य तर टिकेलच आणि व्यवसायातील कार्यक्षमताही वृद्धिंगत होईल.

संगणकामुळे डोळ्यांना होणारे त्रास टाळण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घ्याव्यात

 • मॉनिटरवरील डिस्प्लेचा प्रकाश तीव्र नसावा. 
 • मॉनिटरपासून होणारा किरणोत्सर्ग कमीत कमी असावा. त्याकरिता तो उत्तम प्रतीचा वापरावा.   
 • अधून मधून डोळे वीस सेकंद मिटावेत.
 • ‘२०-२०-२०’ हा नियम लक्षात ठेवा. म्हणजे दर वीस मिनिटांनी वीस फूट दूर अंतरावरची वस्तू वीस सेकंद पाहत राहावी. सतत मॉनिटरवर नजर लावून बसल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण कमी होतो. यासाठी दर वीस मिनिटांचा अलार्म लावून ठेवावा.
 • संगणक वापरण्याच्या खोलीतील प्रकाशाप्रमाणे संगणकाच्या पडद्याची तीव्रता कमी जास्त करावी. जेंव्हा अंधार असेल तेंव्हा पडद्यावरील प्रकाशाची तीव्रता कमी असावी.
 • संगणक वापरताना खोलीतील दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर येऊ नये. 
 • दर सहा महिन्यांनी तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून डोळे तपासून घ्यावेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या