प्रोस्टेट-व्यथा

डॉ. अविनाश भोंडवे 
गुरुवार, 8 मार्च 2018

आरोग्याचा मूलमंत्र

स्त्री-पुरुषांचे हे स्वतंत्र आजार साहजिकच प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांचे नाहीतर त्यामधील कार्यप्रणालीचे असतात. प्रोस्टेटसंबंधीचे आजार असेच ’फक्त पुरुषांचेच’ असतात.

काही आजार ’फक्त स्त्रियांचे’ असतात. उदा. रजोनिवृत्तीचा म्हणजेच मेनोपॉजल त्रास, गर्भाशयाचा कर्करोग, पीसीओएस वगैरे. पण फक्त पुरुषांचेसुद्धा असेच काही आजार असतात. स्त्री-पुरुषांचे हे स्वतंत्र आजार साहजिकच प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांचे नाहीतर त्यामधील कार्यप्रणालीचे असतात. प्रोस्टेटसंबंधीचे आजार असेच ’फक्त पुरुषांचेच’ असतात. 

फक्त पुरुषांच्या शरीरात आढळणारी प्रोस्टेट या ग्रंथीचा आकार पुरुषांच्या वयोमानानुसार वाढत जातो, त्यामुळे मूत्रविसर्जन करताना त्रास होतो. हा विकार साधारणतः वयाच्या पन्नाशीच्या आसपास व्हायला लागतो. सर्व जगातच आयुर्मान वाढल्यामुळे बी.पी.एच (बीनाईन हायपरप्लाझिया ऑफ प्रोस्टेट) चा त्रास असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. भारतातदेखील त्यामुळे प्रोस्टेटचे विकार असलेल्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. साहजिकच आज ५० वर्षे उलटलेल्या प्रत्येक पुरुषाने आपल्या वार्षिक शारीरिक तपासणीत प्रोस्टेटच्या आजारांची तपासणी करणे आज अनिवार्य झाले आहे.

१५ ते ३० घनसेंटीमीटर घनफळाच्या आकारमानाच्या या प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांच्या प्रजनन संस्थेचा एक भाग असतात. ही ग्रंथी पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या सुरवातीच्या भागात असते. मूत्राशयाकडे जाणारी मूत्रनलिका प्रोस्टेटमधून जाते. वृषणाकडून येणाऱ्या वीर्यवाहक नलिका प्रोस्टेटमधून जाऊन मूत्रनलिकेच्यादोन्ही बाजूला उघडतात. वृषणामध्ये तयार होणाऱ्या शुक्राणूंमध्ये प्रोस्टेटमध्ये तयार होणारा द्राव एकत्रित होऊन वीर्य बनते.

प्रोस्टेटचे आजार
बी.पी.एच. - प्रोस्टेट ग्रंथीचा उतारवयात आकार वाढून त्याचा मूत्रनलिकेवर दबाव येऊन मूत्रविसर्जन करताना जोर कमी पडतो. यामध्ये 

 • रात्री वारंवार लघवी करण्यासाठी झोपेतून उठणे
 • लघवीची धार बारीक आणि शक्तिहीन असल्याप्रमाणे पडणे
 • लघवीची धार पायांवर किंवा कपड्यांवर पडणे
 • लघवी करताना सुरवातीला वेळ लागणे.
 • लघवी थांबून थांबून होणे.
 • लघवी थेंब थेंब होणे.
 • लघवी पूर्ण न होणे आणि पूर्ण झाल्याचे समाधान न मिळणे.
 • बीपीएच या आजाराचे वैद्यकीय निदान वेळीच करून न घेतल्यास किंवा त्रास अंगावर काढत त्याकडे दुर्लक्ष करत राहिल्यास या आजारात बरीच गुंतागुंत होऊन तो वाढू शकतो यामध्ये... 
 • लघवी अचानक अडकू शकते. प्रयत्न करूनही रुग्णाला मूत्रविसर्जन करता येत नाही. ओटीपोट फुगू लागते आणि शेवटी कॅंथेटरच्या मदतीनेच मूत्राशय रिकामे करावे लागते.
 • लघवी पूर्ण न होऊन मूत्राशय रिकामे होत नाही. त्यामुळे लघवीत जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे थंडी-ताप येणे आणि इतर त्रास होतात.
 • मूत्रमार्गामधील अडथळा वाढून मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठते. त्यामुळे किडनीतून मुत्राशयामध्ये मूत्र येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मूत्रवाहक नलिका आणो मूत्रपिंडे यांना सूज येऊ शकते. यामधून मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. 
 • मूत्राशयात सातत्याने लघवी जमा होत राहिल्याने मुतखडा होण्याची शक्‍यता असते.

रोगनिदान
 रुग्णाच्या सुरवातीच्या चर्चेमध्ये वर सांगितलेली लक्षणे किंवा गुंतागुंत लक्षात येऊ शकते. आणि त्याच्या आजाराचे प्राथमिक निदान तज्ज्ञ डॉक्‍टर लगेच करू शकतात.

पर रेक्‍टल (पी.आर.) तपासणी ः मूत्रविकार तज्ज्ञ अथवा शल्य चिकित्सक गुदद्वारात बोट घालून प्रोस्टेटची तपासणी करतात. यात प्रोस्टेटचा वाढलेला आकार लक्षात येतो. बोटाने केलेल्या तपासणीत बी.पी.एच झालेल्या रुग्णांची प्रोस्टेट गुळगुळीत आणि रबराप्रमाणे लवचिक लागते.

सोनोग्राफी ः या तपासणीत रुग्णाचे मूत्राशय पूर्ण भरलेले असताना प्रथम सोनोग्राफी केली जाते आणि मूत्राशयात असलेली लघवी मापली जाते. त्यानंतर त्याला मूत्रविसर्जन करायला सांगून पुन्हा मूत्राशयात शिल्लक राहिलेली लघवीचे मोजमाप केले जाते. प्रोस्टेटच्या आकारमानात झालेली वाढ, मूत्र विसर्जन केल्यावर जास्त प्रमाणात शिल्लक राहिलेली लघवी यावरून बीपीएचचे निदान केले जाते.

प्रयोगशाळेतील चाचण्या ः यात बी.पी.एच.चे निदान झाले नाही तरी, बी.पी.एच. मुळे होणाऱ्या त्रासांचे निदान मात्र नक्की होते. लघवीच्या तपासणीत लघवीतील जंतुसंसर्ग, रक्तातील क्रीअँटिनिन, ब्लड युरिया, जीएफआर या चाचण्यांमध्ये मूत्रपिंडांच्या कार्यावर प्रकाश पडू शकतो. ’पी.एस.ए.’ या रक्त तपासणीत या त्रासात रुग्णाला हा त्रास प्रोस्टेटच्या कॅन्सरमुळे असू शकेल का? याचा अंदाज येतो. 

इतर तपासण्या ः युरोफ्लोमेट्री या तपासणीमध्ये लघवीच्या धारेतील तीव्रता मोजली जाते. सिस्टोस्कोपी आणि युरेथ्रोग्रामसारख्या विशिष्ट तपासण्या केल्यास मूत्राशयातील आणि मूत्रसंस्थेतील इतर त्रास कळू शकतात.

उपचार
औषधोपचार ः एके काळी प्रोस्टेटच्या त्रासावर शस्त्रक्रिया हा एकच इलाज समजला जायचा. मात्र आजमितीला बी.पी.एच.मुळे जर लघविला खूपदा आणि वारंवार होण्याचा त्रास होत नसेल आणि कोणतीही गंभीर गुंतागुंत नसेल, तर नव्या प्रकारची काही औषधे घेऊन त्यावर उत्तम प्रकारे नियंत्रण आणता येते. अल्फा ब्लॉकर्स (प्रॅझोसिन, टेराझोसीन डॉक्‍साझोसीन, टॅमस्युलोसिन किंवा फिनास्टेराईड, ड्युटास्टेराइड अशा औषधांमुळे मूत्रमार्गातला अडथळा कमी होऊन मूत्रविसर्जनातील अडथळा नियंत्रित होतो.
प्रोसिजर्स ः ज्या रोग्यांना योग्य औषधे देऊनही त्यांच्या लक्षणात सुधारणा होत नाही, त्यांना विशिष्ट उपचारांची गरज भासते. काही लक्षणे याबाबत महत्त्वाची ठरतात. यामध्ये  

 • ज्यांना प्रयत्न करूनही बराच काळ लघवी करता येत नाही. 
 • ज्यांना कॅंथेटरच्याच मदतीनेच लघवी होते. 
 • ज्यांना वारंवार लघवीत जंतुसंसर्ग होतो. 
 • ज्यांना लघवीतून रक्त जाण्याचा त्रास होतो. 
 • लघवी केल्यानंतरही ज्यांच्या मूत्राशयात खूप प्रमाणात लघवी शिल्लक राहते. 
 • मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठल्याने ज्यांच्या मूत्रपिंडाचा आणि मूत्रनलिकेचा आकर फुगून वाढतो. 
 • लघवी साठल्यामुळे ज्यांना मुतखडे होत राहतात 

अशांना सिस्टोस्कोपी, शस्त्रक्रिया किंवा इतर विशिष्ट पद्धतीच्या उपचारांची गरज भासते.

टीयूआरपी (ट्रान्स युरेथ्रल रिसेक्‍शन ऑफ प्रोस्टेट) ः बीपीएचच्या उपचारांसाठी ही सर्वात परिणामकारक आणि सर्वाधिक प्रचलित पद्धत आहे. औषधोपचारांचा विशेष फायदा न होणाऱ्या ९० टक्के रुग्णांसाठी हा उपचार वापरला जातो. 

 • या पद्धतीत ऑपरेशन किंवा शरीराची कुठलीही कापाकापी नसते.
 • सामान्यपणे रोग्याला पूर्ण भूल न देता मणक्‍यात इंजेक्‍शन देऊन स्पायनल ॲनेस्थेशियाद्वारे कमरेच्या खालचा भाग बधिर करून केला जातो.
 • या उपचारात मूत्रनलिकेतून दुर्बीण घालून प्रोस्टेट ग्रंथीचा अडथळा निर्माण करणारा भाग काढला जातो.
 • ही प्रोसीजर दुर्बीण अथवा व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारा दुर्बिणीत पाहून केली जाते. त्यामुळे प्रोस्टेटचा अडथळा निर्माण करणारा भाग आवश्‍यक त्या प्रमाणातच काढला जातो. यामुळे रक्तस्राव खूपच कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे ३ ते ४ दिवस इस्पितळात राहून रुग्णाला घरी पाठवता येते.

शस्त्रक्रिया ः जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीची वाढ खूप जास्त प्रमाणात झालेली असते आणि त्याचबरोबर मूत्राशयातल्या मुतखड्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते, तेव्हा दुर्बिणीच्या मदतीने परिणामकारक उपचार होऊ शकत नाहीत. अशा रोग्यांच्या बाबतीत शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. या शस्त्रक्रियेत सामान्यपणे जांघेचा भाग आणि मूत्राशयावर कट घेऊन प्रोस्टेट बाहेर काढली जाते.
अन्य पद्धती ः याशिवाय लेझरद्वारे, औष्णिक पद्धतीद्वारे (थर्मल ॲब्लेशन), मूत्रमार्गात विशेष प्रकारची नळी (स्टेंट) घालून प्रोस्टेटचा इलाज केला जातो.

प्रोस्टेटचा कर्करोग
प्रोस्टेटच्या आजाराची लक्षणे ज्या रुग्णात आहे अशा रुग्णांना त्याचा कर्करोग असण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात असते. भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ५०  हजार रुग्णांमध्ये या कर्करोगाची बाधा होते. साधारणपणे ६५ वर्षे वयाच्या पुढच्या रुग्णांमध्ये हा आढळतो.  

कुणाला होऊ शकतो : ज्यांच्या वडील, काका, मामा, आजोबा, भाऊ अशा जवळच्या नातेवाइकांमध्ये प्रोस्टेटच्या कर्करोग झाल्याची घटना असेल तर त्यांना हा आजार  होण्याची दाट शक्‍यता असते. मधुमेही, स्थूल, धूम्रपान करणारे, नसबंदी झालेले. 
प्रोस्टेटच्या कर्करोगात बीपीएचमध्ये होणाऱ्या लघवीच्या त्रासासमवेत इतरही काही लक्षणे आढळून येतात. यामध्ये लघवीतून रक्त जाणे हे लक्षण सर्वात महत्त्वाचे असते. या रुग्णांमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग झालेल्या या रुग्णांमध्ये कंबर, मांडीची हाडे, खुबा, बरगड्या यामध्ये कमालीच्या वेदना जाणवू लागतात. कर्करोग वाढून तो हाडांमध्ये पसरल्याची ही लक्षणे असतात.  

निदान-प्रोस्टेटच्या कर्करोगाचे निदान करताना
बोटाद्वारा तपासणीः शल्यचिकित्सकांनी रुग्णाच्या गुद्‌द्‌वारामार्गे केलेल्या या तपासणीत प्रोस्टेट बोटाला दगडासारखी कडक लागते. 

पी.एस.ए. ः या रक्तातील विशेष तपासणीत त्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळल्यास ते कॅन्सरचे लक्षण मानले जाते. प्रोस्टेटच्या कर्करोगासाठी ही स्क्रीनिंग मानली जाते.

बायॉप्सी ः सोनोग्राफी यंत्रासोबत असलेल्या विशेष प्रोबच्या मदतीने गुदद्वारातून सुई घालून प्रोस्टेटची बायॉप्सी करतात. सूक्ष्मदर्शकाद्वारे केल्या जाणाऱ्या हिस्टोपॅंथॉलॉजिकल तपासणीत (एचपीइ) प्रोस्टेटच्या कर्करोगाची पूर्ण खात्री होते.

उपचार
प्रोस्टेटच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर रॅडिकल प्रोस्टेटेक्‍टॉमी ही शस्त्रक्रिया करून ग्रंथी काढली जाते. साधारणतः १० दिवस इस्पितळात राहिल्यावर रुग्ण घरी पाठवला जातो. सुमारे ३ महिन्यांच्या कालावधीत तो बरा होतो. ’रोबोटिक कीहोल’ या प्रकारच्या शस्त्रक्रियेत हा काळ कमी होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. 

ब्रॅकीथेरपी : शस्त्रक्रियेऐवजी या रुग्णांच्या प्रोस्टेटमध्ये किरणोत्सर्गी बीज बसवून त्यावर रेडिओॲक्‍टिव्ह किरणांचा मारा केला जातो आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. 

ॲण्ड्रोजेन्स पद्धतीचे पुरुषी हॉर्मोन्स प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत समजले जातात. त्यामुळे काही रुग्णांमध्ये ॲण्ड्रोजेन्सना दबवणारे हॉर्मोन्स वापरले जातात. याला एडीटी (ॲण्ड्रोजेन्स डीप्रायव्हेशन थेरपी) म्हणतात. हा उपचार दीर्घकाळ घ्यावा लागतो. प्रोस्टेटच्या ग्रंथीचे हे आजार आजवर दुर्लक्षिले गेले. पण वैद्यकीय निदानाची अधिकाधिक उपलब्धी आणि उपचारांची सुविधा वाढल्यामुळे या आजारांचे वेळेतच निदान आणि उपचार करून घेता येतात. 

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा आज मोठा प्रश्न आहे. खासकरून स्त्रिया आणि प्रोस्टेटचे रुग्ण या वर्गांना याचा खूपच त्रास होतो. वयाची साठी उलटलेले हे ज्येष्ठ नागरिक, वरचेवर लघविला जावे लागेल, म्हणून सार्वजनिक समारंभांना जाणे टाळायला लागतात. ‘सारखा सारखा लघविला जातो, मग लोक काय म्हणतील?‘ या विचारांनी त्यांना नैराश्‍यही येते. प्रोस्टेटमुळे होणारी त्यांची मूत्रविसर्जनाची कुचंबणा आणि त्रास फक्त शारीरिक नसतो, तर त्यामुळे होणारी त्यांची मानसिक घुसमट आणि त्यांच्या सामाजिक जीवनावर होणारे परिणाम यामुळे या आजाराकडे गंभीरतेने बघायला हवे. या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता याबाबत जनजागृती करणे आज नक्कीच गरजेचे झाले आहे.

संबंधित बातम्या