कोलेस्टेरॉल ः जाणून घ्या

डॉ. अविनाश भोंडवे 
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

कोलेस्टेरॉल हा शब्द आज अनेकदा कानावर पडतो. टेलिव्हिजनवरील खाद्यतेलांच्या जाहिरातीत त्याचा न चुकता उल्लेख असतोच; पण तरीही कोलेस्टेरॉल म्हणजे काय असते? त्याचे महत्त्व काय? त्याचे फायदे तोटे काय असतात? याबाबतीत सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ असतो. कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी संबंध असल्यामुळे या घटकाविषयी कमालीची उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत. 

कोलेस्टेरॉल हा शब्द आज अनेकदा कानावर पडतो. टेलिव्हिजनवरील खाद्यतेलांच्या जाहिरातीत त्याचा न चुकता उल्लेख असतोच; पण तरीही कोलेस्टेरॉल म्हणजे काय असते? त्याचे महत्त्व काय? त्याचे फायदे तोटे काय असतात? याबाबतीत सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ असतो. कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी संबंध असल्यामुळे या घटकाविषयी कमालीची उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत. 

कोलेस्टेरॉल हा ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. ग्रीक भाषेत ’कोले’ म्हणजे पित्तरस आणि ’स्टीरीऑस’ म्हणजे म्हणजे घनपदार्थ. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातील पेशींमध्ये आढळणारा मेणासारखा पांढरा घनपदार्थ असतो. कोलेस्टेरॉलची निर्मिती शरीरांतर्गत पेशीतून आणि बहिर्गत खाद्यातून मिळणाऱ्या तेलांपासून अशी दोन प्रकारे होते. शरीरातील एकूण कोलेस्टेरॉलच्या साधारण दोन तृतीयांश म्हणजेच १००० मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल अंतर्गतरित्या शरीरात बनते. मुख्यत्वे यकृतामध्ये हे कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. त्याशिवाय आतडी, ॲड्रीनल ग्रंथी आणि त्वचेमध्येही ते बनते. शरीरातील जवळजवळ सर्व पेशी कोलेस्टेरॉल बनवू शकतात. आहारातील प्राणिजन्य पदार्थांमधून म्हणजे लोणी, दूध, तूप, चरबी, आइस्क्रीम, चीज, प्राण्यांच्या मांसातील चरबी, अंड्यातील पिवळा बलक, मासे यापासून ५०० मिलिगॅम कोलेस्टेरॉल बनते.

संपृक्त मेदाम्ले असलेल्या वनस्पतिजन्य स्निग्ध पदार्थांपासून उदा. खोबरेल तेल, शरीरात कोलेस्टेरॉल तयार होते. शेंगदाणा तेलावर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे संपृक्त मेदाम्ले असलेल्या वनस्पती तुपापासूनसुद्धा (वनस्पती घी-डालडा) शरीरात कोलेस्टेरॉल तयार होते. शरीरातील कोलेस्टेरॉलची निर्मिती ही आहारातून येणाऱ्या कोलेस्टेरॉलवर अवलंबून असते. स्निग्ध पदार्थ जास्त असलेल्या आहारात जास्त कोलेस्टेरॉल असते. आहारात संपृक्त तेले जास्त असल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते. आहारातून येणारे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असेल तर यकृतातील निर्मितीचे प्रमाण वाढते. त्यामुळे आहारातून पुरेसे कोलेस्टेरॉल येणे जरुरीचे असते.
फायबर जास्त असलेल्या भाज्या, फळे यातून कोलेस्टेरॉल अजिबात बनत नाही.

कोलेस्टेरॉलचे प्रकार
 रक्तातील चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका सूक्ष्म बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते. प्रथिनांनी बनलेले हे वेष्टण रक्तात विरघळत नाही. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनच्या घनतेनुसार त्याचे  प्रकार पडतात.
 लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (एलडीएल) - याला ’बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. कारण ते यकृताकडून शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेत असते.
 हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन (एचडीएल)- याला ’गुड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. कारण ते शरीरातल्या विविध पेशींकडूनयकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. रक्तातील एचडीएल जितके जास्त तितकी हृदयविकाराची जोखीम कमी असते.
 व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (व्हीएलडीएल) 
कोलेस्टेरॉलचे हे तीन प्रकार फक्त रक्तातच असतात. मात्र आहारातील पदार्थात ते नसतात.

उपयुक्तता : आहारातून मिळणाऱ्या स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी पित्तरस आवश्‍यक असतो. हा पित्तरस कोलेस्टेरॉलपासून बनतो. 
     आपल्या शरीरात ड जीवनसत्त्व बनवण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज असते. 
     शरीरातील स्टीरॉइड हार्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉल वापरून होते. या स्टीरॉइड हार्मोन्समध्ये पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन, स्त्रियांमधील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे लैंगिक हार्मोन्स, तसेच कॉर्टीसॉल हे महत्त्वाचे हार्मोन्स असतात. 
     शरीरातील प्रत्येक पेशीच्या आवरणात कोलेस्टेरॉल हा आवश्‍यक घटक असतो. कोलेस्टेरॉलच्या अभावी पेशींच्या आवरणाची एकसंधता कमी होते तसेच प्रतिकारशक्ती कमी होते.

कोलेस्टेरॉलचे परिणाम : रक्तातील कोलेस्टेरॉलपैकी शरीराला जेवढी गरज असेल तेवढेच वापरले जाते. उरलेले जास्तीचे कोलेस्टेरॉल रक्तात विरघळत नसल्याने चरबी- प्रथिनांच्या रुपात घट्ट स्वरूपात रक्तवाहिन्यांमधून फिरत राहते. जसजसे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते तसतसे धमन्यांच्या भिंतीवर थरावर थर वाढत जातात. यामुळे धमन्यांच्या भिंती जाड होऊन त्या टणक तर बनतातच पण अरुंदही होतात. यालाच ॲथरोस्क्‍लेरोसिस म्हणतात. रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढलेले राहिले रक्तवाहिन्यांचा अंतर्भाग अरुंद होतो आणि त्यातील रक्ताचा दाब वाढतो. अरुंदपण वाढत गेल्यास त्या रक्तवाहिनीतून होणारा रक्तपुरवठा कमी होत जातो. याला करोनरी हार्ट डिसीज म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना होणाऱ्या कमी रक्तपुरवठ्यामुळे छातीत वेदना होतात. याला अंजायना पेक्‍टोरीस म्हणतात. कोलेस्टेरॉलचे थर आणखी वाढत गेल्यावर त्या रक्तवाहिनीमधून हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होत जाऊन प्रसंगी ती पूर्णपणे बंद होते आणि त्यापुढील भाग निर्जीव बनतो. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट ॲटॅक (मायोकार्डीयल इन्फार्क्‍शन) म्हणतात. अशा प्रकारे मेंदूच्या रक्तवाहिन्या बंद पडल्यास त्या रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येतो.
रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जितके जास्त तितके हृदयविकाराचा धोका अधिक असतो. 

कोलेस्टेरॉल तपासणी
रक्तातील कोलेस्टेरॉलची ’लिपिड प्रोफाईल’ या तपासणीतून केली जाते. यासाठी किमान बाराते चौदा तास उपाशी राहावे लागते. याकाळात कोठलाही अन्नपदार्थ घ्यायचा नसतो. मात्र पाणी प्यायला हरकत नसते. म्हणजे आदल्या दिवशी रात्री ८ वाजता जेवल्यानंतर काहीही न खाता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ नंतर ही तपासणी करावी.

कोलेस्टेरॉल नियंत्रण
रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी आदर्श ठेवण्यासाठी जीवनशैलीत विविध बदल करावे लागतात.

आहार : एलडीएल हा घटक वाढल्यास हृदयविकार आणि अर्धांगवायू होण्याच्या शक्‍यता जास्त असतात. त्यासाठी आहारात मुख्यत्वे संपृक्त मेदाम्ले (सॅच्युरेटेड फॅट्‌स) कमी असावीत. दिवसभरात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थातून मिळणाऱ्या कॅलरीजपैकी ७ टक्‍क्‍याहून ती कमीच असली पाहिजेत. यासाठी फास्टफूड, तळलेले पदार्थ, तूप आणि दूध एकत्रित असलेल्या मिठाया, प्राणीजन्य मांसाहार, मार्गारिन - चीज लावलेले सॅण्डविचेस, अशा गोष्टी टाळाव्यात.

संपृक्त मेदाम्लांऐवजी मोनो : अनसॅच्युरेटेड-फॅट्‌स (मुफा) असलेले पदार्थ आहारात वापरावेत. याकरता स्वयंपाकात मुफाचे प्रमाण जास्त असलेले ऑलिव्ह ऑइल आणि कनोला ऑइल वापरावे.

आहारात ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ म्हणजे अक्रोड. बदाम असावेत. त्याचप्रमाणे माशांमध्ये ओमेगा-३ भरपूर असल्याने मांसाहाराऐवजी मासे आहारात उत्तम ठरतात. त्याचप्रमाणे माशांचे तेल असलेल्या प्रमाणित गोळ्या मर्यादित प्रमाणात घेतल्यास एचडीएल वाढू शकते. सॅण्डविचसाठी प्राणिजन्य मार्गारिनऐवजी वनस्पतिजन्य मार्गारीन वापरावे. गव्हाचा कोंडा असलेले होल व्हीट पीठ, हातसडीचा तांदूळ आहारात असावे. इनसोल्युबल फायबर असलेले पदार्थ म्हणजे फळे, पालेभाज्या, ओट्‌स, इसबगोल यांचा वापर आहारात असल्यास एलडीएल कमी होते.

ट्रायग्लिसेराइड्‌स हा एक महत्त्वाचा घटक असतो. मैदा आणि प्रक्रियायुक्त पिठांमध्ये तो जास्त आढळतो. मैद्यापासून बनलेले नान, पुऱ्या आहारात असल्यास ट्रायग्लिसेराईड्‌स वाढतात. त्याऐवजी हातसडीचा तांदूळ, नाचणीच्या भाकऱ्या आहारात असल्यास ही ट्रायग्लिसेराईड्‌स कमी राहतात.
थोडक्‍यात सांगायचे झाले तर, दिवसभराच्या आहारात २ मुठी भाजीपाला, एक मूठभर फळे, बदाम किंवा अक्रोड १२ आणि शून्य प्रमाणात प्रक्रियायुक्त काद्ये आणि पेये असली तर कोलेस्टेरॉलचे नियंत्रण उत्तम होते.

व्यायाम : शरीराची भराभर हालचाल करणारा व्यायाम रोज ३० मिनिटे केला तरी कोलेस्टेरॉलच्या दृष्टीने तो  उत्तम ठरतो. फार न दमता हा व्यायाम करावा. यात भरभर चालणे, सायकलिंग, पोहणे तर येतातच पण नृत्य आणि बागकाम अशा मन रिझवणाऱ्या छंदांचाही समावेश होतो.

आदर्श वजन : भारतीय आणि दक्षिण आशियायी जनतेमध्ये वजनवाढीची समस्या गंभीर स्वरूप धारण करते आहे. वाढत्या वजनाचे कारण पोटाचा वाढता घेर असते. पोटाचा घेर हा पोटावर आणि पोटात साठणाऱ्या चरबीशी संबंधित असतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी तो आवश्‍यक ठरतो.        

कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे : रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी ज्यांच्यामध्ये जास्त आहे आणि हृदयविकार उद्भवू शकेल अशा गोष्टी (उदा. धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व, आनुवंशिकता) ज्या व्यक्तींमध्ये आढळतात, अशा व्यक्तींना आहार आणि व्यायाम यायोगे कोलेस्टेरॉलची पातळी प्रथम कमी करावी लागते. त्याच्या जोडीला कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. यामध्ये स्टॅटिन्सया औषधवर्गातील विविध प्रकार वापरले जातात. सिम्व्हास्टॅटिन, ॲटोर्व्हास्टॅटिन, रोझुव्हास्टॅटिन अशी औषधे त्यात येतात. ट्रायग्लिसेराईड्‌सची पातळी जर जास्त असेल 

तर फायब्रेट्‌स वर्गातील औषधे वापरण्याचा
प्रघात आहे. ओमेगा-३-फॅटीअँसीड तसेच माशांचे तेल असलेल्या गोळ्यादेखील दिल्या जातात. स्टॅटिन्समुळे कोलेस्टेरॉल कमी होते, मात्र काही रुग्णांना पोटऱ्या आणि अन्य स्नायूंमध्ये वेदना होण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र याबाबत तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. वाढते कोलेस्टेरॉल आणि त्यातून उद्भवणारा उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे आजच्या आधुनिक जीवनशैलीचे परिणाम आहेत. त्यामुळे जीवनशैलीत बदल आणि त्याचबरोबर तज्ज्ञांच्या साहाय्याने औषधोपचार हाच या त्रासातून मुक्त होण्याचा मार्ग ठरतो.

रक्तातील कोलेस्टेरॉलचे आदर्श प्रमाण असे असावे  
टोटल कोलेस्टेरॉल : २०० मिलिग्रॅम /१०० मिलिलिटर पेक्षा कमी
एचडीएल : - ४०-४५मिलिग्रॅम / १०० मिलिलिटर पेक्षा जास्त
एलडीएल : १३० मिलिग्रॅम / १०० मिलिलिटर पेक्षा कमी
ट्रायग्लिसेराईड्‌स : १५ मिलिग्रॅम / १०० मिलिलिटर पेक्षा कमी

हृदयविकार आणि कोलेस्टेरॉल
     कोलेस्टेरॉल हा हृदयविकाराला कारणीभूत असलेला एकमेव धोका नसतो.
     फक्त कोलेस्टेरॉलची पातळी योग्य ठेवली म्हणजे हृदयविकार टाळतो असे नाही.
     रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी २०० मिलिग्रॅम/ प्रती १०० मिलीपेक्षा कमी ठेवणे गरजेचे असते. आहारातून कोलेस्टेरॉल निर्मिती करणारे स्निग्ध पदार्थ वर्ज्य करूनही रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत मर्यादितच परिणाम होतो.
     हृदयविकार होऊ नये म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल योग्य पातळीत ठेवण्यासोबत व्यायाम, वजन कमी करून ते योग्य प्रमाणात आणणे, मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन करणे,  मधुमेह नियंत्रित ठेवणे, रक्तदाब आदर्श पातळीत ठेवणे, धूम्रपान सोडणे, मद्यपान टाळणे या गोष्टी कराव्याच लागतात.
     आहारातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे आणि तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्‍चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा असतो.
  कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्यांचीच आवश्‍यकता असते. 
     आहारातील तेलातुपाच्या एकूण प्रमाणाच्या आठ टक्के एवढे गाईच्या शुद्ध तुपाचे सेवन केले तर चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल) वाढते, असे म्हैसूरच्या केंद्रीय अन्न संशोधन प्रयोगशाळेतील संशोधनात सिद्ध झाले आहे.
     ‘रीफाईंडे’ खाद्यतेल आणि त्यात पदार्थ तळण्याच्या प्रक्रियेमध्ये अनसॅच्युरेटेड तेलांमधील ‘ट्रान्स फॅट्‌स’चे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्‌सचे प्रमाण वाढू शकते. जे हृदयविकाराला आमंत्रण देते.

संबंधित बातम्या